रेशीमगाठी..

एक नवीन सुरुवात..


रेशीमगाठी..

"जुई मी तासाभरात येईन गं घरी, कंटाळली असशील ना एकटीच? येते हा बाळा लवकर " एवढं बोलून रेवतीने मोबाईल पर्स मधे ठेवला.

"रेवती चला निघायचं का?" मागून उन्मेषची हाक आली आणि ती मागे वळली. मानेनेच होकार देऊन ती तो उभा होता तिथे आली.

"झाला का फोन? काय म्हणाली जुई? " चालता चालता उन्मेष ने विचारलं.

"काही नाही, मी विचारलं कंटाळलीस का तर नाही म्हणाली " पर्स सावरत रेवतीने उत्तर दिलं.

चालत चालत ते बागेच्या मेन गेट पर्यंत आले.
"मी निघते आता. जुई घरी एकटीच आहे ना. आणि थँक्स जुईसाठी ही भेळ पार्सल दिली त्यासाठी" एवढं बोलून रेवती रिक्षा मिळते का पाहू लागली.

"मी सोडतो तुम्हाला घरी. तसही जाता जाता मला तिथे एक काम ही आहे " असं म्हणून तो कार कडे वळला ही. तिला खरं तर त्याच्या या ऑफरला नाही म्हणायचं होतं पण एवढ्यात रिक्षा मिळणार नाही आणि घरी जायला उशीर होईल याची खात्री होऊन ती काही बोलली नाही.
तो कार घेऊन आला. स्वतः उतरून त्याने तिच्यासाठी दार उघडलं. ती थोडी संकोचली. त्याने कार सुरु केली. सौम्य आवाजात गाणं लावलं. ती ही गुणगुणत खिडकी बाहेर पाहू लागली.

"रेवती " त्याची हाक आली तसं तिने त्याच्याकडे पाहिलं.

"रेवती, मला काही गडबड नाहीये. तुम्ही तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. नीट विचार करा आणि मला कळवा."
तो अगदी समजुतीच्या सुरात बोलला.

"हो" एवढंच बोलून ती पुन्हा खिडकी बाहेर पाहू लागली.
थोड्याच वेळात त्यांची कार तिच्या बंगल्यापाशी आली.
कार मधून उतरून तिने हसून त्याला बाय केलं. तो ही बाय म्हणून निघून गेला.

डोअरबेल वाजली तसं जुईने पटकन दार उघडलं. जणू ती वाट पाहत दाराजवळच थांबून असावी. आत आल्या आल्या तिने रेवतीला घट्ट मिठी मारली. लेकीला असं मिठीत घेताना रेवतीला खूप आनंद होई. दोघीही जाऊन सोफ्यावर बसल्या.

"मम्मा, काय काय झालं सांग ना? कुठे कुठे गेलात? काय केलं दिवसभर?" जुईला फार घाई झाली होती सगळं जाणून घेण्याची. तिचे प्रश्नच संपत नव्हते.

"आधी मस्त चहा कर. मगच सांगेन सगळं " सोफ्यावर मान मागे टेकत रेवती उत्तरली.

"काय गं मम्मा, मुद्दाम असं करतेस ना. खरं तर मी हे उन्मेष काकालाच विचारायला हवं होतं. आणते चहा." थोडं नाराज होऊन जुई किचनकडे वळली.

रेवती तशीच डोळे बंद करून विचार करू लागली. आपण जे काही वागतोय ते नक्की बरोबर आहे ना? जुई आता झालीय अठरा वर्षांची पण अजून तशी लहानच ना. ती म्हणतेय खरी लग्न कर - लग्न कर पण हे काय वय आहे का आपलं लग्नाचं? चाळीशीकडे वाटचाल आहे आता. छे.. काय म्हणतील सगळे? नातेवाईक, शेजारी, ऑफिस मधले, ओळखीतले लोकं काय काय बोलतील माझ्या बद्दल. नकोच..आज जुईने शपथ घातली म्हणून जावं लागलं उन्मेषना भेटायला. पण आता तिलाही बजावून सांगायचं की पुन्हा असला कारभार करून ठेवायचा नाही.

"मम्मा, चहा झालाय. ये आत." जुईच्या हाकेने तिची विचारांची साखळी तुटली. भेळेचं पार्सल घेऊन ती किचन मधे आली. एका प्लेट मधे भेळ काढून डायनिंग टेबलवर ठेवली तिने आणि आणि दोघीही बसल्या.

"मम्मा, आता तरी सांग ना गं सगळं " भेळ खात खात जुई पुन्हा विषय छेडला.

"ठीक आहे बाई, सांगते तुला सगळं. ऐक, आम्ही इथून सकाळी निघालो आणि उन्मेषने चालू केलेल्या वृद्धाश्रमात गेलो. तिथे काही वेळ घालवला. मग दुपारचं जेवण एका हॉटेलला केलं. त्यानंतर आपल्या रोजच्या बागेत जाऊया म्हटलं त्यांना. तिथे जाऊन बसलो थोडा वेळ आणि मग त्यांनी मला आपल्या घरी सोडलं." एका दमात हे सगळं बोलून तिने मोकळा श्वास घेतला.

"Woww.. मम्मा अगं पण तू नीट बोललीस ना त्याच्याशी? " लगेच गंभीर होत जुईने विचारलं.

"हो गं. आणि मी का त्यांच्याशी वाईट वागू? बोलले मी नीट " रेवतीची अशी चिडचिड झालेली पाहून जुईला हसू आलं.

"बरं मी थोडा वेळ पडते रूममधे. तासाभराने उठव मला. मग स्वयंपाकाचं बघते." चहाचा कप विसळत रेवती बोलली आणि रूममधे निघून गेली.

एसी ऑन करून तिने बेडवर अंग टाकलं. डोळे मिटले तिने पण झोप काही येतं नव्हती. तिच्या विचारांची साखळी पुन्हा एकदा जोडली गेली. आज दिवसभर किती फिरलो आपण. जवळजवळ चौदा - पंधरा वर्षांनी असं बाहेर पडले. चौदा पंधरा वर्ष??? राजेश गेल्यापासून साधं मैत्रिणीसोबत एखाद्या सिनेमाला पण नाही गेले. राजेश अचानक अपघातात गेला आणि आपलं आयुष्यच बदलून गेलं. जुई चार वर्षांची होती तेव्हा. नशीब चांगला जॉब असल्याने आणि राजेशने त्याच्या बिझनेस मधे चांगलं प्रॉफिट मिळाल्यावर हा छोटासा बंगला घेतला होता म्हणून फारसे हाल झाले नाहीत. लव्ह मॅरेज केलेलं. ते ही वेगळ्या जातीच्या मुलाशी. दोन्ही घरच्यांनी सगळे संबंध तोडले. अगदी कायमचे. राजेश गेला हे कळूनही दोन्ही घरून कोणीही आलं नाही. मित्र मैत्रिणी मात्र जमले होते. आजही अधे मधे चौकशी करतात. पण हल्ली काय हे जुईने डोक्यात घेतलंय? पुन्हा लग्न? उन्मेष खरंच देव माणूस आहे. राजेशचा जिवलग मित्र. तो गेल्यापासून वरचेवर चौकशी करणं, जुईला सतत सपोर्ट करणं, किती काय काय केलंय त्यांनी आमच्यासाठी. ते ही निस्वार्थी भावनेने. पण जुईच्या डोक्यात काय आलंय हे मधेच. दोन महिन्यापूर्वी तिच्या अठराव्या वाढदिवसाला उन्मेष आलेले असताना कशी अचानक बोलून गेली की, काका तू लग्न का करत नाहीस मम्मा सोबत?? माझ्या काळजाचा ठोकाच चुकलेला. दोन महिन्यात हिने त्याला कन्व्हिन्स पण केलं. पण हे काय वय आहे का लग्नाचं? खरं तर उन्मेषना पहिल्यापासून ओळखते मी. सतत घरी येणं व्हायचं. त्यांची स्वप्न, बिझनेसच्या कल्पना सारख्या सांगायचे. नंतर बिझनेस मधे एवढे गुंतून गेले की त्यांना कधी लग्न करावंसं वाटलं नाही. पण जुईने असं काय सांगितलं त्यांना की त्यांनी जुईच्या प्रस्तावाला संमती दिली. खरं तर दोन वर्षांपूर्वी माझा जो छोटा अपघात झालेला तेव्हा ज्या पद्धतीने त्यांनी काळजी घेतलेली तेव्हा माझ्या मनात त्यांच्या विषयी थोडा सॉफ्टकॉर्नर निर्माण झालेला. काहीतरी खास वाटलेलं त्यांच्या बद्दल. पण म्हणून लग्न वगैरे. हे सगळं चुकीचं आहे. कल्पना केली तरी भीती वाटतेय. नाही नाही. शक्य नाही आता ते. उद्याच उन्मेषना फोन करून नकार कळवून टाकते. जुईने कितीही हट्ट केला तरी माझा निर्णय झालाय.

"मम्मा.. ए मम्मा, उठ गं. साडेसात झालेत." जुईच्या हाकेने ती भानावर आली.

उठून तोंड धुवून ती किचनकडे वळली. ती आता उद्याची वाट पाहत होती. उद्या रविवार असल्याने दोघीनांही सुट्टी होती. जेवण आवरून ती झोपायला गेली. जसा जसा वेळ जात होता तिचा निर्णय आणखीन पक्का होतं होता.


रविवारी असल्याने रेवती जरा उशिराच उठली. फ्रेश होऊन किचन मधे आली. जुई तिच्या अगोदर उठून तिच्यासाठी चहा बनवत होती.

"अठरावा वाढदिवस फळला म्हणायचा. माझी लेक माझ्याआधी उठून किचन मधे आलीय हे पाहूनच खूप आनंद झालाय मला." जुईला घट्ट मिठीत घेत रेवती म्हणाली.

"हम्म. मम्मा मला बोलायचं आहे तुझ्याशी." चहाचा कप रेवतीच्या हातात देत जुई म्हणाली.

"जुई नंतर बोलू ना गं. सकाळी सकाळी तो विषय नको. प्लिज." रेवतीने विषय टाळायचा प्रयत्न केला.

"आज मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. तुला बोलावंच लागेल. मी आज माझा गिटारचा क्लास चुकवून फक्त तुझ्याशी बोलता यावं म्हणून थांबलेय." जुईने जवळजवळ सुनावलंच तिला. ओढतच हॉलमधे घेऊन गेली आणि सोफ्यावर बसवलं तिला.

"मम्मा, तू इतकी का गोंधळून गेली आहेस? अगं उन्मेष काका तयार आहे. मी तर वाट पाहतेय त्या दिवसाची. मग तू का पॉसिटीव्हली घेतं नाहीस हे सगळं?" जुईने सरळ विषयालाच हात घातला.

"अगं सोना, हे एवढं सोप्प नाहीये गं. तुला काय वाटतं मी काहीच विचार केला नाही? मी ही पॉसिटीव्हली विचार केला पण हे वाटतं तितकं सोप्प नाहीये बाळा. आपले नातेवाईक, माझे सहकारी, हा समाज या नात्याला स्वीकारणार नाही. आणि ते ही या वयात? मुळीच नाही. अगं नावं ठेवतील मला आणि उन्मेषला ही." रेवती जुईला समजावण्याच्या सुरात बोलली.
पण आज रेवतीच काहीच ऐकायचं नाही, तिचा होकार मिळवायचाच असं ठरवूनच जुई बोलत होती.

"तुला वाटतं असं. अगं मम्मा इथे शेजारी काय चाललंय हे पाहायला ही लोकांना वेळ नसतो. आणि मुळात तू तुझं सुख बघ ना. हा समाज, नातेवाईक, तुझे कलीग तुला पुरणार आहेत का आयुष्यभर? आणि कोण आलं गं आजपर्यंत आपल्या वाईट वेळेत? यापैकी तर नक्कीच कोणी नव्हतं आपल्या सोबत. आपल्या अडचणीत, वाईट वेळेत सोबत होता तो फक्त उन्मेष काका." जुईची चीड तिच्या बोलण्यात स्पष्ट जाणवतं होती.

"हम्म.. सगळं कबूल आहे गं. उन्मेष ना गेली 20-21 वर्ष ओळखतेय मी. आपल्याला आधार देण्यामागे त्यांचा हेतू ही कायम चांगलाच होता हे ही मान्य मला. पण लग्न?? ते ही या वयात? खूप विचित्र वाटतंय गं." रेवती अजूनही तिच्या मतावर ठाम होती.

रेवतीच बोलणं ऐकून जुईने चिडून उन्मेषला फोन केला.
"हॅलो काका, तासाभरात घरी ये." एवढंच बोलून तिने फोन कट केला.

"अगं जुई तू त्यांना का बोलावलं घरी?" रेवतीला काहीच कळत नव्हतं.

"मम्मा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? पण अगदी खरं आणि प्रामाणिकपणे उत्तर दे" जुईने तिचा हात हातात घेत विचारलं.

"हो विचार ना. मी खोटं नाही बोलणार." रेवती उत्तरली.

"नातेवाईक, समाज हे सगळं बाजूला ठेव काही वेळ आणि मला सांग की तुला तुझं पुढचं आयुष्य उन्मेष काका सोबत जगायला आवडेल का?" जुईने आढेवेढे न घेता सरळ विचारलं.

"उन्मेष चांगले आहेत गं. पण.. "

"अगं तू विचारलं तेवढं सांग. हा पण नको आणू मधे." रेवतीचं वाक्य अर्धवट तोडत जुई बोलली.

"हम्म.." एक दीर्घ श्वास घेतं रेवतीने हुंकार भरला.

"म्हणजे हो असंच ना?" जुईने तिला कबुली घेतल्यासारखं विचारलं.

"हो. पण हे शक्य नाहीये बाळा. आधीच मला खूप विचित्र वाटतंय. त्यात तू उन्मेष ना बोलावलय. मला खूप ऑकवर्ड वाटतंय गं." रेवती थोडी नर्व्हस होतं बोलली.

"मम्मा तुला काय वाटतं की मी एवढं सगळं का करतेय? मला खूप काळजी वाटते अगं तुझी. लहानपणापासून मी पाहत आलेय तुला. किती इच्छा आकांक्षा मारल्यास तू. किती मेहनत घेतलीस माझ्या भविष्यासाठी. काही कमी पडू दिलं नाहीस तू मला. तेव्हा फार काही कळायचं नाही. पण आता कळतं गं मला. तुला जशी माझ्या भविष्याची काळजी वाटते, अगदी तशीच काळजी मला तुझ्या भविष्याची वाटते. मम्मा तुला खरं सांगू? तुझा ऍक्सिडंट झालेला ना दोन वर्षांपूर्वी तेव्हा उन्मेष काका खूप काळजी घेतं होता तुझी. त्याच्या डोळ्यात मी पाहिली ती काळजी. अगं कोणतीही अपेक्षा न ठेवता तो तुला जपत होता. इनफॅक्ट आपल्या दोघीना जपत होता. अजूनही तशीच काळजी घेतो तो आपली. पप्पा बद्दल मला काही आठवत ही नाही. माझ्याकडे तशा आठवणी नाहीत कारण मी खूप लहान होते तेव्हा. पण जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून उन्मेष काकामधे मी माझा पप्पा शोधायचे. मम्मा एकदा विचार कर ना प्लिज." जुई मनातलं घडाघडा बोलून मोकळी झाली. रेवतीला तर अश्रू आवरत नव्हते. काही वेळ दोघी नुसत्या रडत राहिल्या. जशा शांत झाल्या तशी रेवतीने जुईला घट्ट मिठी मारली.

"एवढी मोठी कधी झालीस गं? की मलाच कळलं नाही माझी लेक एवढी मोठी झालीय ते." तिच्या लाडक्या जुईच्या केसातून हात फिरवत रेवती बोलली.

"I love u मम्मा. माझं खूप प्रेम आहे गं तुझ्यावर. आणि तितकीच काळजी ही वाटते गं तुझी. तुझ्यावर माझ्या एवढं प्रेम आणि काळजी करणारी एकच व्यक्ती आहे बघ. उन्मेष काका.." रेवतीला आणखीन बिलगत जुई बोलली.

"हम्म.. पण एक सांग बाळा. तू उन्मेष ना कसं मनवलं?" रेवतीने कुतूहलाने विचारलं.

"अगं मम्मा, त्याला तू आवडत होतीस पण तो बोलू शकत नव्हता. म्हणजे जर बोलला असता तर तू मैत्री तोडशील या भीतीने. त्याला फार कन्व्हिन्स करावं लागलं नाही." हसत हसत जुई म्हणाली.

रेवतीचा नकार मावळलाय याची जुईने खात्री करून घेतली. आणि पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली..

एवढ्यात दारावरची बेल वाजली. कोण आलं असेल याची दोघींनाही कल्पना होतीच. जुई उठून दारं उघडायला गेली. रेवतीची मात्र धडधड वाढू लागली. काय आणि कसं बोलायचं हेच तिला कळत नव्हतं.

"वेलकम उन्मेष काका. ये ना आत." असं म्हणत ती त्याला आता घेऊन आली.

दोघेही ऑकवर्ड झालेत हे जुईला कळलं. साहजिकच होतं ते. इतकी वर्ष ओळख होती पण आज पहिल्यांदा भेटल्यासारखी अवस्था झाली होती त्यांची.

"काका, मम्माने होकार दिलाय. तू सांगितल्या प्रमाणे कोर्ट मॅरेज करू. ते ही पुढच्या आठवड्यात." जुई खुश होत बोलली.

"थँक्स जुई, जे इतकी वर्ष मी बोलू शकलो नाही ते तू शक्य केलंस. तुम्ही दोघीनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाय ना तो मी कायम जपेन." उन्मेष भावूक होत बोलला.

"मी मस्त कॉफी करते आपल्या तिघांसाठी. आलेच. " असं म्हणून जुई किचनकडे वळली.

रेवती तिला पाठमोरी जाताना पाहत राहिली. आज तिची लेक आईच्या भूमिकेत शिरली होती. आणि रेवती तिची लाडाची लेक झाली होती. तिला हुंदका अनावर होत होता. ते जाणून उन्मेषने तिचा हात हातात घेतला. तिच्याही नकळत तिने उन्मेषच्या खांद्यावर डोकं टेकलं. डोकं टेकण्यासाठी आज तिला हक्काचा खांदा मिळाला होता. तो ही तिच्या लेकीमुळेच..

© वृषाली प्रभुदेसाई, कोल्हापूर.