Aug 18, 2022
कथामालिका

रेशीमबंध भाग ७

Read Later
रेशीमबंध भाग ७

मागील भागाचा सारांश: पुनम व चैताली प्रविण देशमुख सोबत एकाच प्रोजेक्टवर काम करु लागल्या होत्या. पुनमने प्रविणला स्पष्ट सांगून टाकले होते की ऑफिसमध्ये आपल्या पर्सनल विषयावर बोलायचं नाही. प्रविण देशमुख रविवारी सानवीला भेटण्यासाठी पुनमच्या घरी जातो, पुनमचे आई बाबा बाहेर गेलेले असतात.

आता बघूया पुढे....

पुनम चहा घेऊन हॉल मध्ये येते तेव्हा प्रविण ट्रॉफीज बघत असतो, त्याला ट्रॉफीज बघताना बघून पुनम म्हणाली," नृत्य स्पर्धांमध्ये मला ह्या सर्व ट्रॉफीज मिळालेल्या आहेत"

चहाचा कप पुनमच्या हातातून घेत प्रविण म्हणाला,"वाव भरपूर ट्रॉफीज आहेत, तुम्ही डान्स मध्ये खूपच एक्सपर्ट आहात वाटतं."

पुनम म्हणाली," हम्मम शाळेपासूनच मला डान्सची आवड होती. गेल्या काही वर्षांपासून डान्स चा डी पण मला माहीत नाही."

प्रविण म्हणाला," तुम्ही डान्स साठी पुन्हा थोडा फार वेळ काढला पाहिजे."

प्रविण बोलत असतानाच सानवीने पुनमला आवाज दिला होता. पुनम सानवीचा आवाज ऐकून म्हणाली," सानवी उठली वाटतं, मी तिला घेऊन येते."

एवढं बोलून पुनम सानवीला घेण्यासाठी बेडरूममध्ये गेली होती, पुनम सानवीला कडेवर उचलून घेऊन आली. सानवीला बघून प्रविणने स्माईल दिली व तो म्हणाला," हाय सानवी"

सानवी झोपेत असल्याने काही बोलली नाही. मग पुनम म्हणाली," आमचं सानवी बाळ अजून झोपेत आहे. अग बाळा मी तुला काल बोलली होती की नाही, तुला भेटण्यासाठी एक अंकल येणार आहेत तेच हे अंकल आहेत. चल बरं अंकलला हाय बोल."

मग सानवी पुनमच्या कडेवरुन खाली उतरली व ती प्रविण जवळ जाऊन म्हणाली," हाय अंकल, तुमचं नाव काय आहे?"

प्रविण म्हणाला," माझं नाव प्रविण आहे, मी तुझ्या मम्मा सोबत तिच्या ऑफिस मध्ये काम करतो. तुझी मम्मा तुझं खूप कौतुक करायची म्हणून म्हटलं या गोड मुलीला आपण भेटायला हवं. सानवी बाळा मी तुझ्या साठी एक गिफ्ट आणलं आहे."

गिफ्टचं नाव ऐकून सानवीच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि डोळ्यात चमक आली. सानवी म्हणाली," प्रविण अंकल तुम्ही माझ्या साठी गिफ्ट आणलंत, काय आणलं बघू जरा."

प्रविणने सानवीच्या हातात त्याने आणलेलं गिफ्ट दिलं. सानवी गिफ्ट घेऊन पुनमकडे जाऊन म्हणाली," मम्मा बघ प्रविण अंकलने माझ्या साठी गिफ्ट आणलं आहे, मम्मा मला हे गिफ्ट ओपन करुन देना."

पुनमने बॉक्स वरचा गिफ्ट पेपर काढला, आतील बॉक्समध्ये बार्बीचा सेट होता, तो बघून सानवी म्हणाली," अंकल तुम्हाला कस माहिती की मला बार्बी आवडते, थँक यू सो मच अंकल."

" तुला गिफ्ट आवडलं का?" प्रविणने विचारले

सानवी म्हणाली," हो खूप"

पुनम म्हणाली," सानवीला बार्बी खूप आवडते, आत्ता पर्यंत बार्बीचे भरपूर सेट घेऊन झालेत पण कुठेही गेलं की ती पहिले बार्बीचा सेट मागते. छान गिफ्ट आहे, आमच्या मॅडम खुश झाल्या असतील. तुम्हाला बार्बी घ्यायला बरं सुचलं."

प्रविण म्हणाला," मला काही आयडिया नव्हती, दुकानात गेल्यावर मी त्यांना सांगितलं की लहान मुलीला गिफ्ट द्यायचं आहे मग त्यांनी एक दोन गिफ्ट्स दाखवलेत, त्यातून मला हे आवडलं म्हणून घेतलं."

पुनम म्हणाली," अच्छा, बोलायच्या नादात विचारायचं राहून गेलं, चहा चांगला झाला होता ना?"

"हो चहा चांगला होता" प्रविणने उत्तर दिले

सानवी म्हणाली," अंकल माझ्या सोबत तुम्ही खेळाल का?"

प्रविण म्हणाला," हो खेळूया ना, बोल काय खेळायचं?"

सानवी म्हणाली," तुम्ही माझ्या सोबत माझ्या रुममध्ये चला, मी तुम्हाला माझ्या खेळण्या दाखवते."

पुनम म्हणाली," तुम्ही सानवीच्या खेळण्या बघा तोपर्यंत मी तुमच्या साठी सँडविच बनवते."

सानवी प्रविणला आपल्या रुम मध्ये घेऊन गेली व तिने त्याला आपल्या सर्व खेळण्या दाखवल्या. सानवी व प्रविण एकमेकांशी मस्त खेळत होते. पुनम किचनमध्ये बिजी होती. सँडविच बनवून झाल्यावर पुनम प्रविणला बोलावण्यासाठी रुम मध्ये गेली असता तिने बघितले की सानवी प्रविण सोबत खेळताना खूप खुश होती आणि प्रविण सुद्धा आनंदात दिसत होता. पुनम म्हणाली," सानवी बेटा माझं सँडविच बनवून झालं आहे, आता प्रविण अंकलला सँडविच खाऊन घेऊ दे बरं, तु पण दूध पिऊन घे. आता खेळणं बस झालं."

पुनमने प्रविणला सँडविच दिलं आणि सानवीला दूध प्यायला दिले. प्रविणने सँडविचचा एक घास खाल्ल्यावर तो म्हणाला, "सँडविच एकच नंबर झालं आहे, मस्त आहे."

पुनम म्हणाली," थँक्स"

सानवी म्हणाली," प्रविण अंकल माझी मम्मा सगळाच स्वयंपाक yummy बनवते, माझ्या फ्रेंड्सला सुद्धा तिने बनवलेले सर्व पदार्थ आवडतात."

पुनम हसून म्हणाली," मी सुद्धा foodie आहे पण त्यासाठी मी वेगवेगळ्या कॅफेत जात नाही. जे पदार्थ आवडतात ते घरीच बनवून बघते. सानवीला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात म्हणून नवनवीन पदार्थ बनवून बघते."

प्रविण म्हणाला," मला फक्त चहा किंवा कॉफी बनवता येते, बाकी काहीच मला बनवता येत नाही."

पुनम म्हणाली," बेसिक पदार्थ प्रत्येकाला बनवता आले पाहिजे, सतत बाहेर खाणं शरीरासाठी हानिकारक आहे. तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हालाही स्वयंपाक जमेल."

प्रविण म्हणाला," हम्मम प्रयत्न करायला काही हरकत नाहीये, मी ट्राय करुन बघेल. Actually मी कॉलेजमध्ये असताना ऑम्लेट व मॅगी बनवायला शिकलो होतो पण नोकरी लागल्यानंतर कॅन्टीनमध्ये खायला लागलो मग घरी काही बनवण्याचा प्रश्नच राहिला नाही."

"तुम्ही नॉनव्हेज खातात का?" पुनमने विचारले

"हो, माझ्या घरी बनत नाही पण कॉलेजमध्ये असताना मित्रांच्या सोबतीने खायला लागलो, सोनालीला नॉनव्हेज खूप आवडायचे म्हणून माझं नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण वाढलं होतं. आताही नॉनव्हेज खातो पण इतकं नाही. तुम्ही नॉनव्हेज खातात का?" प्रविणने सांगितलं

पुनम म्हणाली," नाही मी नॉनव्हेज खात नाही, कधीतरी अंडी खाते पण नॉनव्हेज कधीच शक्य नाहीये. निलेशला नॉनव्हेज आवडायचं म्हणून बनवायला शिकले होते पण कधी खाऊन बघितलं नाही."

प्रविण म्हणाला," अच्छा मग तुम्हाला व्हेज मध्ये सर्वांत जास्त काय आवडतं?"

पुनम म्हणाली," तस मला सगळंच आवडतं पण त्यातल्या त्यात पुरण पोळी मला सर्वांत जास्त आवडते."

पुनम बोलत असतानाच सानवी म्हणाली, "अंकल मला काय आवडतं? ते तुम्ही विचारलंच नाही."

प्रविण हसून म्हणाला," अरे हो ना, मी किती मोठी मिस्टेक केली, सानवी बाळा तुला काय खायला आवडतं?"

सानवी म्हणाली," अंकल मला पावभाजी खूप आवडते "

प्रविण म्हणाला," अच्छा म्हणजे आमच्या सानवी बाळाला पावभाजी आवडते तर, मला पण पावभाजी खूप खूप म्हणजे खूप आवडते."

सानवी पुनमकडे बघून म्हणाली," मम्मा आपण प्रविण अंकलला आपल्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये पावभाजी खायला घेऊन जायचं का?"

पुनम म्हणाली," अग आज नको बाळा, अंकलला घरी जायला उशीर होईल, आपण नंतर केव्हातरी जाऊ."

सानवी प्रविणला म्हणाली," अंकल तुम्ही आमच्या सोबत पावभाजी खायला याल का?"

प्रविण म्हणाला," आज नको बाळा, आपण नंतर कधीतरी जाऊ."

सानवी रुसून म्हणाली," सगळे माझ्या सोबत असेच करतात, माझं कोणीच ऐकत नाही. मम्मा मला कधीच बाहेर घेऊन जात नाही, आज प्रविण अंकल सोबत आहेत तर किती मजा येईल पण मम्मा कधीच हो म्हणणार नाही. मला कोणाशी बोलायचं नाहीये."

सानवी तोंड फुगवून बसली होती. पुनम चिडून म्हणाली," सानवी प्रविण अंकल आपल्या घरी गेस्ट म्हणून आले आहेत ना, मग त्यांच्या समोर तु अशी वागणार आहेस का?"

पुनम चिडून बोलल्यावर सानवीच्या डोळ्यात पाणी आलं. प्रविण सानवी जवळ जाऊन म्हणाला," सानवी तु किती गोड मुलगी आहेस, तुझ्या डोळयात पाणी अस शोभत नाही. तुझं सर्वजण तर ऐकतात, बघ बरं मी तुझ्या साठी गिफ्ट पण आणलं आहे, तुला अजून काय हवं आहे ते सांग, नेक्स्ट टाईम मी तुझ्या साठी घेऊन येईल." 

सानवी रडत रडत म्हणाली," अंकल माझी एक फ्रेंड आहे, तिचं नाव मनवा आहे, मनवा तिच्या आई बाबां सोबत नेहमी फिरायला जात असते, ती इमॅजिका ला पण जाऊन आली. माझी मम्मा मला कुठेच फिरायला नेत नाही. नेहमी एकच कारण देते की आपण दोघी एकट्या तिकडे जाऊ शकत नाही, इमॅजिकाला जायला आई राईड्स मध्ये बसायला घाबरते. माझे बाबा देवाघरी गेले आहेत नाहीतर ते मला सगळीकडे घेऊन गेले असते, मम्मा माझं काहीच ऐकत नाही."

प्रविण म्हणाला," कोण म्हणालं की आपल्या सानवी बाळाचं कोणी ऐकत नाही. तुला पावभाजी खायला जायचं आहे ना? मग आपण नक्की जाऊ. तुझे बाबा नसले म्हणून काय झालं? तुझी मम्मा आहे की नाही ती तुला इमॅजिका ला पण घेऊन जाईल. तुला राईड्स मध्ये बसायला आवडत ना तर मी तुमच्या सोबत येईल मग तर झालं पण त्यासाठी तुला तुझ्या मम्माला सॉरी म्हणावं लागेल. मम्मा सानवी बाळाचा किती लाड करते बरं, चल पटकन तिला सॉरी म्हण बरं."

सानवी आनंदीत होऊन म्हणाली," अंकल आपण खरंच पावभाजी खायला जाणार आणि इमॅजिकाला पण जाणार, मज्जा"

प्रविण म्हणाला," पहिले मम्माला सॉरी म्हण."

सानवी पुनम जवळ जाऊन तिला बिलगून म्हणाली," मम्मा सॉरी"

पुनमने सानवीला कडेवर उचलून घेतलं आणि तिचे डोळे पुसले व पुनम म्हणाली," सानवी बाळा काहीपण हट्ट करायचे नसतात, तु माझी शहाणी पिल्लू आहेस की नाही. तु एवढं म्हणत आहेस तर आपण प्रविण अंकलला पावभाजी खायला सोबत घेऊन जाऊ पण इमॅजिकाला आपण नंतर जाऊ. तु रुममध्ये जो खेळणींचा पसारा केला आहे तो आवर जा."

सानवी तिच्या रुममध्ये निघून गेल्यावर प्रविण पुनमला म्हणाला, "सानवी खेळणींचा पसारा आवरते का?"

पुनम म्हणाली," थोडा फार आवरते, इथेच थांबली असती तर तिने अजून तुमचं डोकं खाल्लं असतं. मला सानवीच्या बोलण्याचं वाईट वाटलं आहे हे तुम्हाला कसं कळालं?"

प्रविण म्हणाला," तुमचा चेहरा खोटं बोलत नाही, तुमच्या सोबत काम करून ते एवढ्यात लक्षात आलं आहे."

पुनम म्हणाली," सानवीचा हट्ट तुम्ही उगाच मान्य केला, तुम्हाला जास्त वेळ आमच्या घरी थांबावं लागेल, तुमचं प्लॅनिंग बिघडेल."

प्रविण म्हणाला," मी तुमच्या सोबत आल्याने सानवी खुश होणार असेल तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. सानवी खूप गोड मुलगी आहे, वयाच्या मानाने ती बरीच समजदार आहे. तिची मैत्रीण फिरायला जाते हे बघून तिलाही कुठे फिरायला जावं अस वाटत असेल तर त्यात सानवीची काहीच चूक नाहीये. इमॅजिकाला जायला तुम्हाला माझ्या सोबत uncomfortable वाटत असेल तर आपण चैताली व पंकजला सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकतो. सानवीला तेवढंच बरं वाटेल. तिला वडील नाहीये यात तिची चूक नाहीये ना?"

पुनम म्हणाली," तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण सानवीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्या कडे नसतात मग अशा वेळी माझी खूप जास्त चिडचिड होते."

प्रविण म्हणाला," I can understand your situation. मी तुमच्या दोघींसोबत असताना तुम्ही जास्त awkward वाटून घेऊ नका. सानवीच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या साठी जास्त महत्त्वाचा आहे बरोबर की नाही. तुम्हाला जर घरातील काही काम आवरायचं असेल तर मी सानवीला घेऊन इथल्या जवळच्या पार्कमध्ये खेळायला घेऊन जाऊ का? म्हणजे तुम्हाला तुमची कामे आटोपण्यात आमची अडचण होणार नाही."

पुनम म्हणाली," ठीक आहे चालेल, मी सानवीची तयारी करुन देते, माझं आवरून झालं की मी पार्कमध्ये येते मग तिथून आपण पावभाजी खाण्यासाठी जाऊयात."

पुनमने सानवीची तयारी करुन दिली, प्रविण सानवीला घेऊन पार्कमध्ये निघून गेला. पुनमने सानवीला आई बाबां व्यतिरिक्त पहिल्यांदा दुसऱ्या कोणाच्या तरी हातात दिले होते. 

©®Dr Supriya Digheईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now