Aug 09, 2022
कथामालिका

रेशीमबंध भाग ६

Read Later
रेशीमबंध भाग ६
मागील भागाचा सारांश: पुनमच्या मनात पुन्हा लग्न करावे की नाही याबाबत अजून शंका होती म्हणून ती त्याबद्दल बोलण्यासाठी पाटील मॅडम कडे जाते. पाटील मॅडम तिला समजावून सांगतात तसेच प्रविण देशमुखची त्या स्वतः चौकशी करण्यात मदत करणार आहे असेही तिला सांगतात. चैताली पुनमकडे प्रविण देशमुखचा फोटो मागते पण तेवढ्यात त्यांना चव्हाण सर बोलावतात. पुनमच्या ऑफिसमध्ये प्रविण देशमुख, पंकज पवार या त्याच्या सहकाऱ्या सोबत येतो, चव्हाण सर त्या दोघांची ओळख पुनम व चैताली सोबत करुन देतो. पुनम व चैताली सोबत प्रविणच्या कंपनीला एका प्रोजेक्ट मध्ये सोबत काम करायचे असते. आता हे चौघेही एका प्रोजेक्टवर काम करणार असतात. प्रविण देशमुख हा कामाच्या बाबतीत स्ट्रिक्ट असल्याने चैताली त्याला नावं ठेवत होती. पुनम ह्याच प्रविण देशमुखला भेटायला गेली होती हे चैतालीला माहीत नव्हते.
आता बघूया पुढे....
चैताली आश्चर्याने जवळजवळ ओरडून म्हणाली," काय? तु ह्याच प्रविण देशमुख ला भेटायला गेली होतीस!"
"अग जरा हळू, पूर्ण ऑफिसला ओरडून सांगणार आहेस का?" पुनम बोलली.
चैताली म्हणाली," तु खरं सांगत आहेस?"
पुनम म्हणाली," अग मी खोटं का बोलू?"
"तु जस वर्णन केलं होतं तसा हा प्रविण देशमुख नाहीये" चैतालीने विचारले
" प्रोफेशनल आणि पर्सनल लेव्हलला प्रत्येकजण वेगळा असू शकतो ना? प्रविण देशमुख कामाच्या बाबतीत सिरिअस आहे. मला त्यांचं बोलणं काही चुकीचं वाटलं नाही, तुला वाटत असेल तर ते तुझं मत आहे.I\"m ok with it" पुनमने शांतपणे उत्तर दिले
चैताली म्हणाली," हम्मम तुझं म्हणणं बरोबर आहे.एकाच व्यक्ती बद्दल आपापले वेगळे मत असूच शकते. तु तुझा निर्णय घे, उगाच मी काही बोलणार आणि तुझा निर्णय बदलेल."
पुनम म्हणाली," हे बघ चैताली माझा निर्णय कोणी काही सांगितलंय म्हणून बदलणार नाहीये, अस असतं तर मी लग्नाला केव्हाच तयार झाले असते आणि आत्ताही माझा निर्णय अजून फिक्स नाहीये. ऑफिस मधील ही आपली पहिलीच भेट होती, आता उद्या पासून आपण एकत्र काम करणार आहोत, त्यानंतर हळूहळू प्रविण देशमुख कसा आहे? हे आपल्याला कळेलच."
"तुला कसलीच घाई कशी नसते ग, तु कोणा बद्दल पटकन आपले मत पण बनवत नाही, तुला जे जमतं ते मला का जमत नाही?" चैतालीने विचारले
पुनम म्हणाली," कारण माझ्या आयुष्यात जे मला अनुभवायला मिळाले आहे ते तुला मिळाले नाहीये ना, मी ज्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवला त्याने माझा विश्वास घात केला. आणि ज्या पाटील मॅडमचा खडूस म्हणून रागराग केला त्यांना आज माझ्या सोबत काहीतरी चांगले घडावे असे वाटत आहे. लोक तितक्या प्रकृती. आता हे बघ पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला असेल तर एक व्यक्ती म्हणेल की हा ग्लास अर्धा रिकामा आहे तर दुसरी व्यक्ती म्हणू शकते की हा ग्लास अर्धा भरलेला आहे, प्रत्येकाची विचारपद्धती वेगवेगळी असू शकते. आपण दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत पण आपली विचार करण्याची पद्धत वेगळी आहे ना. आता तु या विषयावर जास्त विचार करु नकोस फक्त एकच कर की पटकन दुसऱ्या माणसा बद्दल मत बनवू नको. जस दिसतं तसं नसतं, म्हणूनच हे जग फसतं."
चैताली म्हणाली," ओके मॅडम"
चैताली व पुनमच्या काम करण्याच्या जागा बदलणार असल्याने एक शिपायाने येऊन त्यांचे सामान दुसऱ्या जागेवर हलवण्यास चैताली व पुनमची मदत केली. संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ झाल्यावर घरी जाण्यासाठी चैताली व पुनम ऑफिसच्या बाहेर पडून पार्किंग मध्ये गाडी काढण्यासाठी गेल्या होत्या तर तिथे प्रविण देशमुख गाडी काढत होता, पुनमला बघितल्यावर प्रविण देशमुखने स्माईल दिली, पुनमनेही त्याला स्माईल दिली. पुनम गाडी काढत असताना प्रविण तिच्या जवळ येऊन म्हणाला," Can we talk for a while?"
पुनम म्हणाली," yes sure"
प्रविणने चैतालीकडे बघितले तेव्हा पुनम चैतालीला म्हणाली," चैताली तु पुढे जा,मी निघतेच."
चैताली निघून गेल्यावर पुनम म्हणाली," बोला काय म्हणत होता?"
प्रविण म्हणाला," आपण उद्या पासून एकत्र काम करणार आहोत म्हणून मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे, मी प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगळी ठेवतो, माझ्या प्रोफेशनल वर्तनाचा इफेक्ट तुमच्या निर्णयावर पडला नाही पाहिजे."
पुनम हसून म्हणाली," नाही होणार, I can understand"
प्रविण पुढे म्हणाला," मी कामाच्या बाबतीत जरा जास्तच सिंसिअर आहे, तुम्हाला वाटत असेल की हा किती खडूस आहे पण प्रोजेक्ट लीडर म्हणून काम करणे सोपं नाही, टीम मध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात, त्यांच्या कडून काम करुन घेण्यासाठी थोडं स्ट्रिक्ट व्हावचं लागतं. तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग आला नाही ना? तुमच्या चेहऱ्यावरुन तरी तस काही वाटलं नाही पण तुमच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरुन तिला माझं बोलणं पटलं अस वाटलं नाही."
पुनम म्हणाली," आता इतक्यात तुम्हीच काय म्हणालेत, टीम मध्ये वेगळ्या विचारांचे लोक असतात, चैताली आणि मी जरी मैत्रिणी असलो तरी आमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. चला आपण निघूयात, ऑफिस मधील कोणी आपल्याला बोलताना इथे पाहिलं तर अजून वेगळ्या चर्चांना उधाण येईल आणि माझी अजून एक रिक्वेस्ट आहे,चैताली व तुम्ही सोडून ऑफिसमध्ये कोणालाच माझ्या पर्सनल लाईफ बद्दल जास्त काही माहिती नाहीये सो कोणाला काही सांगू नका प्लिज."
प्रविण म्हणाला," हो नक्कीच"
पुनम आपली गाडी घेऊन निघून गेली. घरी गेल्यावर पुनमने आपल्या आईला ती प्रविण देशमुख सोबत प्रोजेक्ट मध्ये काम करणार असल्याचे सांगितले, यावर आई म्हणाली की बरं झालं, त्या निमित्ताने प्रविण देशमुख कसा आहे हे तरी तुला कळेल. दुसऱ्या दिवसापासून चैताली, पुनम, प्रविण व पंकज एकाच केबिन मध्ये बसून काम करु लागले होते. प्रविणच्या ऑर्डर प्रमाणे सर्वजण काम करत होते. प्रविणला कामात दिरंगाई अजिबात सहन होत नव्हती. प्रविण वेळेच्या आधी पंधरा मिनिटे ऑफिसला पोहोचत होता. पुनम सुद्धा punctual असल्याने वेळ पाळण्याबाबत दोघांचं एकमत झालं होतं. रविवारी प्रविण सानवीला भेटण्यासाठी पुनमच्या घरी जाणार असल्याचे आधीच ठरलेले होते. ऑफिसमध्ये पर्सनल विषयावर बोलायचे नाही हे पुनम व प्रविण मध्ये आधीच ठरले होते म्हणून प्रविणने शनिवारी संध्याकाळी पुनमला फोन केला,
"हॅलो प्रविण बोलतोय"
"हं बोला ना, फोन का केला होता? काही काम होतं का?" पुनमने विचारले
प्रविण म्हणाला," उद्या सानवीला भेटण्यासाठी तुमच्या घरी मी येणार असं आपल्यात ठरलं होतं ना? त्याच संबंधी बोलायला फोन केला होता"
पुनम म्हणाली," हो माझ्या लक्षात आहे, तुम्ही कधी याल, तुम्ही जेवायलाच या ना"
प्रविण म्हणाला," नाही नको,मला थोडं awkward वाटेल. मी संध्याकाळी ४ च्या दरम्यान येईल, चालेल ना?"
पुनम म्हणाली," चालेल की"
" मला एक विचारायचं होतं, सानवी साठी काहीतरी घेऊन यायचा विचार करत होतो पण तिची आवड मला माहिती नाही त्यासाठी मी फोन केला होता." प्रविणने विचारले
पुनम म्हणाली," नाही नको काहीच घेऊन नका येऊ."
प्रविण हसून म्हणाला," तुम्ही काही सांगणार नाही याची कल्पना मला होतीच, नका सांगू मला जे वाटेल ते मी सानवी करता घेऊन येतो. उद्या संध्याकाळी ४ वाजता मी तुमच्या घरी येतो. मला तुमचा पत्ता पाठवून ठेवा."
फोन कट केल्यावर पुनमने प्रविणला आपला पत्ता पाठवला आणि उद्या प्रविण देशमुख घरी येणार आहे हे आईला सांगण्या करीता पुनम आईजवळ गेली व ती सांगू लागली," आई उद्या संध्याकाळी प्रविण देशमुख आपल्या घरी येणार आहेत. आत्ताच त्यांचा फोन आला होता."
पुनमचं बोलणं ऐकून बाबा म्हणाले," अग पुनम पण उद्या दुपारी आम्ही दोघे बाहेर जाणार असल्याचे ठरले होते ना, आमच्या क्लब मधील ते राणे आहेत ना, त्यांच्या घरी आम्ही सर्व जमणार आहोत आणि रात्री जेवण करुन घरी परतणार असा आमचा प्लॅन आधीच ठरला होता."
पुनम म्हणाली," अहो बाबा पण हे तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं, मी त्यांना नका येऊ म्हणून सांगितलं असतं ना? आता पुन्हा फोन करुन सांगणं बरोबर नाही वाटणार." 
यावर आई म्हणाली," पुनम त्यांना घरी येऊदेत, तसही त्यांना सानवीला भेटायचं आहे, आम्ही नंतर भेटू, असं फोन करुन नाही सांगणं बरोबर नाही, एकतर मोठ्या मुश्किलीने तुझ्या लग्नाचा विचार पुढे चालला आहे त्यात नकार घंटा नको."
पुनम थोडी चिडून म्हणाली," अग आई पण ते घरी आल्यावर तुम्ही घरी नसाल हे कसं वाटेल आणि शिवाय घरात असं आम्ही तिघेच ते कसं वाटेल."
आई म्हणाली," काही वाटणार नाही, आम्ही राणेंच्या घरी जातो आणि प्रविण देशमुखला आपल्या घरी येऊदेत, शिवाय आम्ही घरात नसलो तर तुमच्या गप्पा निवांत होतील."
पुनम काही बोलणार इतक्यात सानवी येऊन म्हणाली," मम्मा उद्या आपल्याकडे कोणी गेस्ट येणार आहेत का?"
पुनम म्हणाली," हो बाळा माझ्या सोबत ऑफिसमध्ये एक अंकल काम करतात त्यांना तुला भेटायचे आहे, म्हणून ते उद्या घरी येणार आहेत, तु त्यांच्या सोबत व्यवस्थित बोलशील ना?"
सानवी म्हणाली," हो मम्मा"
दुसऱ्या दिवशी पुनमने सकाळी लवकर उठून घरातील पसारा आवरला. आई बाबा आपलं आटोपून दुपारी राणेंच्या घरी जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. पुनमने सँडविच ची तयारी करुन ठेवली होती म्हणजे प्रविण आल्यावर त्याला गरमागरम सँडविच खायला देता येईल. बरोबर ४ वाजता पुनमच्या घराची बेल वाजली, पुनम घड्याळाकडे बघून गालातल्या गालात हसली आणि तिने दरवाजा उघडला. प्रविणने तिच्याकडे बघून स्माईल दिली. पुनमने त्याला घरात बोलावले व सोप्यावर बसण्यास सांगितले. पुनमने प्रविण साठी पाण्याचा ग्लास आणला, पाणी पिऊन झाल्यावर प्रविण म्हणाला," घरात कोणी नाहीये का? आई बाबा?"
पुनम म्हणाली," Actually तुम्ही घरी येणार असल्याचे मी बाबांना आधी सांगितलं नव्हतं त्यामुळे त्यांनी आधीच दुसरा प्लॅन बनवून ठेवला होता म्हणून त्यांना तिकडे जावं लागलं आणि तसंही इतर दिवस माझ्या ऑफिसमुळे त्यांना कुठे जाता येत नाही म्हणून मीपण त्यांना जाऊ दिलं. तुम्ही सानवीला भेटण्या करता येणार असल्याने बाबा म्हणाले की आम्ही नंतर भेटू."
प्रविण म्हणाला," इट्स ओके"
" घर शोधताना काही अडचण झाली नाही ना?" पुनमने विचारले
प्रविण म्हणाला," नाही तुम्ही व्यवस्थित पत्ता पाठवला होता आणि लोकेशन शेअर केल्यामुळे आपला गुगल मॅप आपल्याला बरोबर इच्छित स्थळी पोहोचवतो."
पुनम म्हणाली," हो ते आहेच, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी चा तो फायदा आहेच पण त्यामुळे आपण पत्ता लक्षात ठेवत नाही, थोडक्यात काय तर आपण आपल्या बुद्धीचा जास्त वापर करत नाहीत हा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा drawback म्हणावा लागेल."
प्रविण म्हणाला," तुम्ही म्हणत आहात ते एकदम बरोबर आहे, टेक्नॉलॉजी मुळे आपण जास्त शारीरिक व मानसिक कष्ट घेण्याची तयारी दाखवत नाहीत."
पुनम म्हणाली," तुम्ही चहा घेणार की कॉफी"
"काहीही चालेल, सानवी कुठे आहे?" प्रविणने विचारले
"सानवी झोपलेली आहे, एक दहा पंधरा मिनिटांत ती उठेलच, आज नेहमीपेक्षा थोडी उशीरा झोपली म्हणून तिला उठायला उशीर होईल." पुनमने उत्तर दिले
पुनम चहा करण्यासाठी किचनमध्ये निघून गेली, तोपर्यंत प्रविण घर न्याहाळत बसला होता. शोकेसमध्ये भरपूर ट्रॉफीज दिसल्या म्हणून तो आपल्या जागेवरुन उठला व शोकेस जवळ जाऊन ट्रॉफी बघू लागला तेव्हा त्याच्या अस लक्षात आलं की ह्या सर्व ट्रॉफीज पुनमच्या आहेत. पुनमला वेगवेगळ्या नृत्य स्पर्धांमध्ये या ट्रॉफीज मिळालेल्या होत्या.
©®Dr Supriya Dighe
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now