रेशीमबंध भाग ५

Story of a relationship

मागील भागाचा सारांश: प्रविण व पुनमच्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला की प्रविणने पुनमच्या मुलीची म्हणजेच सानवीची भेट घ्यावी नंतर पुढे काय तो निर्णय घेण्यात येईल. पुनमने प्रविणला स्पष्ट सांगून टाकले की मी सध्या तरी कुठल्याही नात्याला सुरुवात करण्याच्या मनस्थितीत नाहीये. पुनम उशिरा घरी आल्यामुळे सानवी तिच्यावर रागावलेली असते, सानवीच्या रागा मागील खरे कारण असते की पुनम तिच्या नोकरीमुळे तिला कुठेही फिरायला नेत नाही आणि सानवीची मैत्रीण मनवा मात्र तिच्या आई वडिलांसोबत सगळीकडे फिरत असते. सानवीचा राग जावा यासाठी पुनमने तिला सांगितले की आपण पुढच्या महिन्यात फिरायला जाऊयात.

आता बघूया पुढे.... 

पुनम व पाटील मॅडम मध्ये प्रविण या विषयावर चर्चा चालू असते. पुनमला काही प्रश्न पडलेले असतात ती ते पाटील मॅडमला विचारत असते.

पुनम म्हणाली," चालेल मॅडम मी तुम्हाला प्रविण देशमुख बाबतच्या डिटेल्स देते. मॅडम मला एक म्हणायचं होत की तुम्ही म्हणाल्या की तुम्हाला या वयात एकटं वाटतं बरोबर पण मला तर एक मुलगी आहे तर मी एकटी पडू शकते का?"

पाटील मॅडम हसून म्हणाल्या," आज तुझी मुलगी लहान आहे, तिला तुझी गरज आहे, ती तुझ्यावर अवलंबून आहे म्हणून तुला एकटेपणा जाणवत नाही पण पुढे जाऊन असे अनेक प्रश्न उभे राहतील त्याचा तु एकटी सामना करु शकशील का? मुलगी मोठी झाल्यावर तु एकटी पडणार नाही का? तुझी मुलगी कायम तुझ्या सोबत असेल का? या प्रश्नांचे उत्तर तुझे तूच शोध, त्यावर विचार कर मग आपण यावर बोलूयात."

यावर पुनम म्हणाली," मॅडम माझी सानवी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे, ती मला कधी एकटी पडू देणार नाही."

पाटील मॅडम म्हणाल्या," अग वेडाबाई मला एक सांग तुझी मुलगी आत्ता फक्त चार वर्षाची आहे बरोबर, ती मोठी झाल्यावर कशी वागेल हे आत्ता तु काय, कोणीच सांगू शकत नाही. बरं तीच राहूदेत, मला एक सांग तुझं लग्न झाल्यावर तु तुझ्या आईचा, तिच्या समस्यांचा किती विचार केलास? जेव्ह तुझ्यात व तुझ्या नवऱ्यामध्ये काही issues चालू होते तेव्हा तु आईच्या प्रोब्लेम्सचा किती विचार केलास? आता तेही राहूदेत पण देव न करो पण तुझ्या सारखा किंवा त्यापेक्षा वेगळी काही समस्या तुझ्या मुलीच्या आयुष्यात निर्माण झाली तर त्याला तु एकटे सामोरे जाऊ शकशील का? अशावेळी आपल्या सोबत आपल्या हक्काचा माणूस असावा असे तुला वाटणार नाही का? पुनम पुन्हा लग्न करण्याच्या विषयावर तु असे प्रश्न मनात आणू नकोस नाहीतर तुझा अजून गोंधळ उडेल. जर काही चांगलं घडत असेल तर घडूदेत ना, उगाच नको त्या गोष्टी मनात का आणत आहेस? पुनम कधी कधी काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, तुझा पहिला नवरा चुकीचा निघाला म्हणजे दुसराही तसाच निघेल अस तर होणार नाही ना? उगाच मनात नको त्या शंका आणत आहेस. हे बघ काल काय होतं? यापेक्षा आज तुझ्या समोर काय आहे? याचा विचार कर आणि तु जो आज विचार करशील त्यावर तुझा उद्या घडणार आहे. आणि हे बघ पुनम जे काही होणार असेल चांगलं किंवा वाईट ते होणारच आहे, ते आपण टाळू शकत नाही तेव्हा अति विचार करत बसू नकोस."

पुनम म्हणाली," सॉरी मॅडम मी तुम्हाला जास्त प्रश्न विचारुन त्रास देत आहे."

पाटील मॅडम हसून म्हणाल्या," अग नाही ग, तु मला कधीही फोन करुन याबद्दल बोलू शकतेस. माझा प्रामाणिक हेतू हाच आहे की मी जिथे चुकले तिथे तु चुकायला नकोस. माझ्या अनुभवातून तुझं आयुष्यात जर काही चांगलं घडलं तर मला आनंदच आहे."

पुनम म्हणाली," ठीक आहे मॅडम, पुढे काय होईल ते मी तुम्हाला सांगेल."

पुनम पाटील मॅडमच्या केबिन मधून बाहेर येऊन आपल्या जागेवर येऊन बसली, चैताली तिला म्हणाली," पुनम मला प्रविण देशमुखचा फोटो दाखव ना?"

पुनम तिच्या प्रश्नाचे उत्तर देणार तेवढ्यात एका शिपायाने येऊन त्यांना सांगितले की तुम्हाला दोघींना चव्हाण सरांनी कॉन्फरन्स हॉल मध्ये बोलावले आहे. पुनम व चैताली दोघी लगेच कॉन्फरन्स हॉल मध्ये गेल्या, तिथे चव्हाण सरांसोबत अजून दोघेजण पाठमोरे बसलेले होते. 

"मे आय कम इन सर" चैतालीने विचारले

" यस कम इन" चव्हाण सरांनी त्या दोघींना आत बोलावले.

पुनम व चैताली चव्हाण सरांच्या खुर्ची जवळ जाऊन उभ्या राहिल्या. पुनमचे पूर्ण लक्ष चव्हाण सरांकडे होते, तिथे कोण बसलेलं आहे याकडे तिने बघितले सुद्धा नाही.

चव्हाण सर म्हणाले," पुनम, चैताली please have a sit( दोघीजणी खुर्चीत बसल्या) दोन महिन्यांपूर्वी तुम्ही दोघींनी एका प्रोजेक्टवर काम केले होते ते ज्या कंपनीचे प्रोजेक्ट होते त्या कंपनीतून हे दोघेजण आले आहेत( त्यांची ओळख करुन देताना) meet प्रविण देशमुख अँड पंकज पवार, ( पुनमने प्रविणचे नाव ऐकल्यावर वर बघितले तेव्हा तिच्या अस लक्षात आलं की हा तोच प्रविण देशमुख आहे ज्याला आपण काल भेटलो होतो. पुनम व प्रविणने एकमेकांकडे बघून स्माईल दिली, चव्हाण सर चैताली व पुनमची ओळख करुन देताना म्हणाले) ही पुनम कदम आणि ही चैताली देशपांडे, तुमच्या आधीच्या प्रोजेक्टवर या दोघींनीच काम केले होते. चैताली पुनम यांची इच्छा आहे की ह्या प्रोजेक्टवर सुद्धा तुम्ही दोघींनीच काम करावं, प्रविण व पंकज या कामात तुमच्या दोघींची मदत करणार आहेत. तुमच्या दोघींकडे सध्या नवीन कुठलाही प्रोजेक्ट नाहीये आणि यातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटेल. सहा महिने हा प्रोजेक्ट चालेल. याची सविस्तर माहिती प्रविण तुम्हाला देईल."

प्रविण आपल्या जागेवरुन उठला त्याने आपला लॅपटॉप प्रोजेक्टरला जोडला व त्याने प्रोजेक्ट बद्दल सर्व माहिती दिली. पुढे तो म्हणाला," मागच्या प्रोजेक्टवरील तुमचे काम खरंच कौतुकास्पद आहे. आमच्या ह्याही प्रोजेक्ट मध्ये तुम्ही असंच मन लावून काम कराल अशी मी आशा व्यक्त करतो. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोलू शकता. तुमच्या कामाची पद्धत मला माहिती नाही पण माझ्या कामाची पद्धत जी आहे, ती मी तुम्हाला सांगतो. कुठलंही काम असो पण ते वेळेत करण्याला मी महत्व देतो, मला कामात हलगर्जीपणा केलेला आवडत नाही. Punctuality ला शुद्ध मराठीत वक्तशीरपणा म्हणतात, मला वेळ न पाळणारे लोक आवडत नाहीत. एखादया वेळेस तुमचं खरंच काही genuine कारण असेल तर ते मी समजून घेईल पण नेहमी मी तुम्हाला समजून घेणार नाही. पंकजला माझ्या स्वभावाची पूर्णपणे कल्पना आहे, त्याने माझ्या सोबत बऱ्याच प्रोजेक्ट मध्ये काम केलेलं आहे."

चैताली मध्येच म्हणाली," सर आपण टीम मध्ये किती जण असणार आहोत?"

"मेन काम आपल्या चौघांचं असणार आहे आणि डेटा एंट्रीच काम आमच्या कंपनीतील काहीजण करणार आहेत, सुरवातीचे तीन महिने आम्ही दोघे इथे येऊन काम करु, पुढचे तीन महिने तुम्हाला आमच्या कंपनीत येऊन काम करावे लागेल, तुमची travelling ची व्यवस्था केली जाईल." प्रविणने उत्तर दिले

चव्हाण सर म्हणाले," प्रविण चैताली व पुनम ह्या दोघी कामाच्या बाबतीत खूप सिंसिअर आहेत, चैताली थोडाफार हलगर्जीपणा करु शकते पण पुनम इतकी सिंसिअर कलीग तुला आजपर्यंत भेटलेली नसेल. पुनम चैतालीला सांभाळून घेते सो डोन्ट वरी. चैताली,पुनम तुमच्या बसायच्या जागा बदलतील. तुमच्या चौघांची सोय एकाच केबिन मध्ये केली जाईल."

पुनम व चैतालीने मान हलवून होकार दिला आणि त्या चव्हाण सरांची परवानगी घेऊन कॉन्फरन्स रुम मधून बाहेर पडल्या. चैताली पुनमला म्हणाली," पुनम आपण पहिले जाऊन कॉफी पिऊयात, प्रविण देशमुखच्या instructions ऐकून माझं डोकं जड पडलं आहे. अश्या instructions देतोय जस आपण दूध पिते बाळ आहोत, अरे आपण पण भरपूर प्रोजेक्टवर काम केले आहेत, आपल्याला सुद्धा काम करता येत."

पुनम व चैताली कॅन्टीन मध्ये कॉफी पिण्यासाठी गेल्या. कॉफी पिता पिता पुनम म्हणाली," चैताली तु एवढी रिऍक्ट का होत आहे? प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगवेगळी असते. आपण नियम तोडायचे नाहीत म्हणजे ते काही बोलणार नाहीत, आपण आपलं काम चोखपणे पार पाडायचे आणि तसही सहा महिन्यांचा तर प्रश्न आहे."

पुनम बोलत असतानाच पंकज तिथे येऊन म्हणाला," मी कॉफी प्यायला इथे बसू शकतो का?"

पुनम म्हणाली," हो बसा ना."

"तुमचा तो खडूस बॉस कुठे आहे? प्रविण सर खरंच खूप स्ट्रिक्ट आहे का?" चैतालीने विचारले

पंकज हसून म्हणाला," मॅडम आपण आपलं काम नीट केलं ना मग सर अजिबात चिडत नाही, सर खडूस नाहीयेत, कामाच्या बाबतीत ते स्ट्रिक्ट आहेत, बाकी बाबतीत सर खूप चांगले आहेत. प्रविण सर चव्हाण सरांसोबत काहीतरी discussion करत आहेत."

चैताली म्हणाली," तुम्ही प्रविण सरांचे फॅन दिसत आहात."

पंकज म्हणाला," मी गॅरंटी देतो की पुढच्या सहा महिन्यांनंतर तुम्ही सुद्धा सरांच्या फॅन व्हाल. तुम्ही मला अरे कारे करु शकता, आपण सोबतच काम करणार आहोत."

 चैताली म्हणाली," मी सरांची फॅन होईल की नाही हे आपण पुढे बघूच. तु मला व पुनमला एकेरी नावाने बोलू शकता, आम्हाला काही अडचण नाही."

कॉफी पिऊन झाल्यावर पंकज तेथून निघून गेला, पुनम व चैताली आपल्या जागेवर येऊन बसल्या. पुनम चैतालीला म्हणाली," चव्हाण सरांनी बोलावण्याच्या आधी तु माझ्याकडे प्रविण देशमुख चा फोटो मागत होतीस ना?"

चैताली म्हणाली," अग हो, actually ह्या प्रविण देशमुख ला भेटण्या आधी मला खर तर त्याचा फोटो बघण्याची इच्छा होती पण आता ना मला प्रविण देशमुख नावाचा राग यायला लागला आहे."

पुनम म्हणाली," जाऊदेत मग म्हणजे तुला त्याचा फोटो पाहण्यात काहीच रस नाहीये ना, आमचं लग्न जमलंच तर त्याला लग्नातच बघ."

पुनम चैतालीला चिडवण्यासाठी हे बोलत होती. यावर चैताली म्हणाली," पुनम अस काय करतेस? फोटो दाखव ना मला, निदान तो ह्या प्रविण देशमुख सारखा खडूस तरी नसेल, प्लिज मला फोटो दाखव, माझं बोलणं एवढं सिरिअसली घेऊ नकोस."

पुनम म्हणाली," फोटो दाखवण्यापेक्षा मी तुझी आणि त्याची भेटचं घालून देते ना?"

चैताली मोबाईल मध्ये बघत म्हणाली," पुनम एक मिनिटं हं, ह्या प्रविण देशमुखने बघ व्हाट्सअप वर आपला ग्रुप पण बनवला आहे, याला आपले फोन नंबर कुठून भेटले असतील, कदाचित चव्हाण सरांकडून त्याने आपले नंबर घेतले असतील. बरं तु काय म्हणत होतीस, तु माझी आणि तुझ्या प्रविण देशमुखची भेट घालून देणारेस?"

पुनम म्हणाली," मी तुझी भेट घालून देणार होती पण नको तु त्यांना खडूस म्हणशील."

चैताली चिडून म्हणाली,"पुनम एवढा भाव खाणं बरं नाही, चल पटकन त्याचा फोटो दाखव."

पुनम म्हणाली," एक काम कर तुझ्या मोबाईल मधील आत्ता तयार केलेला ग्रुप ओपन कर, त्यातील participant ची लिस्ट ओपन कर त्यात ग्रुप admin कोण आहे ते बघ आणि त्याचा dp ओपन कर."

चैताली म्हणाली," हा केला बोल आता पुढे काय करायचं?"

पुनम म्हणाली," फोटो कोणाचा आहे ते सांग."

चैताली म्हणाली," अग आता ग्रुप admin प्रविण देशमुख असेल तर फोटोही त्याचाच असेल ना?"

पुनम म्हणाली," बघ तुला फक्त प्रविण देशमुख चा फोटोच बघायचा होता, तुझी व त्याची भेट सुद्धा झाली."

चैतालीची काय प्रतिक्रिया असेल? हे बघूया पुढील भागात.....

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all