Aug 16, 2022
कथामालिका

रेशीमबंध भाग ४

Read Later
रेशीमबंध भाग ४

मागील भागाचा सारांश: प्रविणने त्याची पहिली बायको सोनाली हिच्या स्वभावाबद्दल पुनमला कल्पना दिली, सोनाली व प्रविणचे लग्न कसे मोडले? हेही प्रविणने सांगितले. त्यांनंतर पुनमने तिचा पहिला नवरा निलेश सोबतचा प्रवास प्रविणला सांगितला.

आता बघूया पुढे...

पुनमच्या भूतकाळा बद्दल ऐकून प्रविण म्हणाला," निलेश चुकीचा व्यक्ती निघाला अस म्हणावं लागेल. मी एक मुलगा असून मला हे कळत नाही की मुलं व्यसनाच्या इतक्या आहारी कसं काय जाऊ शकतात? प्रत्येकाला माहीत असतं की व्यसनापायी आपण आपले पैसे घालवतो आणि शिवाय त्यामुळे आपल्या तब्येतीवर त्याचे वाईट परिणाम होतात. मला जर समजलं असत ना की सोनालीच्या पोटात माझं बाळ वाढतंय तर त्या क्षणापासून मी तिचे सर्व हट्ट न तक्रार करता पुरवले असते, आपलं बाळ या जगात येणार आहे ही किती छान फिलींग असेल. मी देवाकडे प्रार्थना करतो की सोनाली व निलेश सारखे जोडीदार कोणाच्याच आयुष्यात न येवो.आपण त्या विषयावर बोलायला नकोच. तुमची मुलगी किती वर्षांची आहे?"

पुनम म्हणाली," माझी मुलगी चार वर्षांची आहे, तीच नाव सानवी आहे. आजपर्यंत जेवढ्या मुलांना मी भेटले आहे त्यांचं म्हणणं अस आहे की सानवीला आई बाबांनी सांभाळावे म्हणजे ते सानवीच्या आई सोबत लग्न करायला तयार आहे पण सानवीला सांभाळायला तयार नाहीत. तुम्हाला जर असा काही प्रॉब्लेम असेल तर पहिलेच मला कल्पना देऊन ठेवा म्हणजे आपण इथेच आपल्यातील संभाषण बंद करुयात."

प्रविण म्हणाला," आपली भेट होण्या आधी आईने मला तुम्हाला एक मुलगी असल्याची कल्पना दिली होती, मला जर ते मान्य नसतं तर मी तुम्हाला भेटायलाच आलो नसतो."

पुनम म्हणाली," कस आहे ना, आधीच सगळं क्लीअर केलेलं बरं. एक तर असा होता की त्याला एक मुलगा होता, त्याच म्हणणं होतं की त्याच्या मुलगा आमच्या सोबत राहील पण माझी मुलगी मात्र माझ्या आई वडिलांकडे राहील. मी हे कसं मान्य करु शकेल. माझ्या आई बाबांना माझ्या भावाकडे बंगलोरला शिफ्ट व्हायचे आहे पण त्यांना माझ्या मुळे जाता येत नाहीये."

प्रविण म्हणाला," अच्छा, आजच्या आपल्या भेटीवर तुमचा काय निर्णय असेल?"

पुनम म्हणाली,"तुम्ही राग मानून घेऊ नका पण मी आजच्या भेटीचा निर्णय लगेच देऊ शकत नाही. ज्या निलेश वर मनापासून प्रेम केलं तोही कसा निघाला हे मी तुम्हाला सांगितलंच आहे तेव्हा तुमच्यावर एकाच भेटीत मी विश्वास कसा काय ठेऊ? मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. तुम्हीही वेळ घेऊन विचार करा. मला अस वाटत की तुम्ही एकदा माझ्या मुलीला भेटून घ्या, तिच्याशी बोला. सानवीला तुम्ही मनापासून स्विकारले पाहिजे. घाई घाईत हो म्हणायचं आणि नंतर त्या निर्णयाचा पश्चाताप व्हायला नको. मी तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगते की लग्न करण्याचा निर्णय हा मनापासून माझा नाहीये, आत्ताच्या क्षणी तरी मी कुठल्याही नवीन नात्याला सुरुवात करण्याच्या मनस्थितीत नाहीये. आई बाबा, मैत्रिणी सांगत आहेत म्हणून मी atleast पुन्हा लग्नाचा विचार करत आहे, माझा अजून निर्णय पक्का नाहीये.आणि समजा मी लग्नाला होकार जरी दिला तरी मला रुळायला वेळ लागू शकतो. उगाच मला तुम्हाला अति आशेला लावायचे नाहीये."

प्रविण म्हणाला," अगदी माझ्या मनातलं बोललात. एकदा जिभेला चटका बसल्यावर आपण ताक सुद्धा फुंकून पितो तर इथे गोष्ट आपल्या मनाची आहे. नशिबात असेल तर आपलं लग्न होईलच पण मलाही हे नातं मनापासून स्विकारायला वेळ लागेल आणि डोन्ट वरी कुठल्याही बाबतीत मी तुम्हाला गृहीत धरणार नाही, तुमच्या मना विरुद्ध काहीच होणार नाही. मला सानवी ला भेटायचं असेल तर कधी आणि कुठे भेटायचं?"

पुनम म्हणाली," तुम्ही सानवी ला भेटण्यासाठी घरीच या. येत्या रविवारी तुम्ही घरी येऊ शकता, रविवारी सानवी व मला दोघींनाही सुट्टी असते."

प्रविण म्हणाला,"चालेल, If you don't mind, मला तुमचा फोन नंबर मिळेल का? म्हणजे मला तुमच्या सोबत communication करायला सोपं जाईल, नाहीतर प्रत्येक वेळी मी आईला सांगणार मग माझी आई तुमच्या आईला फोन करणार, अशाने communication गॅप पडण्याची शक्यता जास्त असते."

दोघांनी एकमेकांसोबत आपापले फोन नंबर शेअर केलेत. पुनम म्हणाली," तुम्ही सुरवातीला म्हणाला होतात की तुम्ही एखाद्या मुलीला भेटायला जातात तेव्हा पहिल्या काही मिनिटांतच तुम्हाला कळतं की ही मुलगी आपल्या योग्यतेची नाहीये तर माझ्या बाबतीत तुमचं मत काय आहे?"

प्रविण हसून म्हणाला, " तुम्ही मला माझ्या योग्यतेच्या वाटल्या नसत्या तर मी तुमच्याकडे तुमचा फोन नंबर मागितला नसता आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुमच्या बाबतीत मला पटल्या आहेत त्यावर आपण नंतर बोलूयात. आपण आता निघायला हवं, सानवी तुमची वाट बघत असेल ना?"

पुनम हसून म्हणाली," हो तसं मी तिला सांगून आले होते की मला आज यायला उशीर होईल म्हणून, सानवी मला बऱ्यापैकी समजून घेते. तुमची भेट झाल्यावर सानवी कशी आहे याचा तुम्हाला अंदाज येईलच."

पुनम व प्रविण दोघेही कॉफी शॉप मधून बाहेर पडतात. पुनम ती निघाली आहे असं आईला फोन करुन सांगते. प्रविण व पुनम आपापल्या घराच्या दिशेने निघतात. घरी पोहोचल्यावर आईने पुनमला विचारले," पुनम तुला प्रविण देशमुख कसा वाटला? तुझं काय मत आहे?"

पुनम म्हणाली," आई इतर मुलांपेक्षा प्रविण देशमुख जरा वेगळ्या विचारांचा वाटला. इतक्यात मी माझा निर्णय काही देणार नाही. मागच्या वेळेस जी चूक झाली होती ती यावेळेस मला होऊ द्यायची नाहीये. रविवारी प्रविण देशमुख सानवीला भेटण्यासाठी आपल्या घरी येणार आहे. मला वाटतंय अजून दोन तीन भेटी होऊदेत मग मी अंतिम निर्णय घेईल."

आई म्हणाली," देव पावला म्हणायचा, निदान तु विचार करायला तरी तयार झालीस नाहीतर इतर वेळी मुलांना तोंडावर नाही म्हणून यायचीस."

पुनम म्हणाली," आई सानवी व प्रविण दोघांनी एकमेकांना मनापासून स्विकारले पाहिजे हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे."

तेवढ्यात सानवी पुनम जवळ आली, पुनमने तिला कडेवर उचलून घेतले व तिने सानवीची पप्पी घेतली, सानवीने राग आल्याचं नाटक करत होती तेव्हा पुनम तिला म्हणाली, "आज माझं गोड बाळ माझ्यावर रागावलं का आहे? मम्माला यायला उशीर झाला म्हणून. अरे बेटा मी तुला सांगितलं होतं ना की आज मला यायला उशीर होईल. सानू बाळा मम्माला ऑफिसमध्ये उशीरापर्यंत काम होत ना म्हणून मी लवकर येऊ शकले नाही. माझी बाळ तर मला इतर वेळी समजून घेते मग आज एवढा राग का?"

सानवी म्हणाली," मम्मा माझी फ्रेंड मनवा तुला माहीत आहे ना, तिचे मम्मा पप्पा तिला घेऊन इमॅजिका ला घेऊन गेले होते, त्यांनी तिकडे खूप एन्जॉय केला. मनवा सांगत होती की तिथे स्नो वर्ल्ड आहे,मोठ मोठ्या राईड्स आहेत. मम्मा मलाही तिकडे जायचं आहे, तुझ्या ऑफिसमुळे आपण कुठेच फिरायला जात नाही आणि तुला राईड्स मध्ये बसायला भिती वाटते. मी कोणासोबत जाऊ हे तूच सांग."

पुनम हसून म्हणाली,"अच्छा म्हणजे माझ्या बाळाला फिरायला जायचं आहे म्हणून माझं बाळ रुसलं आहे. सानू बेटा पुढच्या महिन्यात अर्जुन मामा येणार आहे, तो आला की आपण सगळे इमॅजिकाला जाऊयात."

सानवी पुढे म्हणाली," मम्मा अर्जुन मामा एक दोन दिवसांसाठीच येतो आणि त्याला इतर बरीच कामं असतात, तो माझ्याशी खेळत सुद्धा नाही."

पुनम म्हणाली," हे बघ जरी अर्जुन मामा आपल्या सोबत आला नाही तरी आपण दोघी इमॅजिका ला जाऊ मग तर चालेल ना? आणि मी हे खरंच बोलत आहे."

सानवी म्हणाली," मम्मा पिंकी प्रॉमिस"

पुनम हसून म्हणाली," यस पिंकी प्रॉमिस."

मग सानवीचा राग गेला व तिने पुनमला पप्पी दिली. पुनमने सानवीला जेवू घातले आणि त्यानंतर ती जेवण करत होती तेवढ्यात पुनमला चैतालीचा फोन येतो, पुनम तिला सांगते की मी जेवण करते आहे, तुला थोड्या वेळात फोन करते. जेवण झाल्यावर पुनमने चैतालीला फोन लावला, दोन तीन रिंग गेल्यावर चैतालीने फोन उचलला, "हॅलो पुनम प्रविण देशमुख कसा वाटला?"

"चैताली अग मी तुला फोन लावणारच होते पण आमच्या सानवी मॅडम आमच्यावर रागावल्या होत्या तिचा रुसवा दूर करायला थोडा वेळ लागला. प्रविण देशमुख बद्दल विचारशील तर तो मला जरा सेन्सिबल वाटला, त्याला माझं बोलणं तरी कळालं नाहीतर इतर मुले त्यांची फिलॉसॉफी सांगत बसायचे. अजून मी काहीच निर्णय घेतला नाहीये. मला विचार करायला थोडा वेळ आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे त्याला सुद्धा घाई नाहीये."

चैताली म्हणाली," चला ऐकून जरा कानाला बरं वाटलं, atleast तुला एक तरी मुलगा सेन्सिबल वाटला. तुम्ही पुन्हा भेटून निर्णय घेणार आहात की म्हणजे पुढे काय ठरवलं आहे?"

" येत्या रविवारी तो सानवी ला भेटण्यासाठी घरी येणार आहे, मग बघू पुढे काय आणि कसं होईल ते." पुनमने उत्तर दिले

चैताली म्हणाली," चांगलं आहे, कमीत कमी एक स्टेप पुढे तरी तुम्ही जात आहात. सानवी का रागावली होती?"

पुनम म्हणाली," सानवी ला इमॅजिकाला फिरायला जायचं आहे, मला राईड्स ची भीती वाटते म्हणून मी तिला घेऊन जात नाही याचा राग आलेला होता, माझ्या ऑफिस मुळे आम्ही कुठेच फिरायला जात नाही अशी कम्प्लेन्ट होती. मी तिला सांगितलं की आपण पुढील महिन्यात जाऊ तेव्हा कुठे जाऊन मॅडमचा राग शांत झाला."

चैताली हसून म्हणाली," प्रविण देशमुख ला सोबत घेऊन जा म्हणजे तो सानवी सोबत राईड्स मध्ये बसेल."

पुनम म्हणाली," गप ग पुढचं पुढं बघू, फुकटचे तारे तोडत बसू नकोस, उद्या भेटल्यावर सविस्तर बोलूयात. सानवी ला झोपवायचं आहे. बाय गुड नाईट."

सानवीला झोपी लावताना पुनम विचारात पडली की प्रविण खरंच चांगला असेल का? त्याच्या बोलण्यावरुन तर तो चांगलाच वाटत आहे, त्याचे विचारही चांगले वाटत आहे. निलेश सुद्धा मला चांगलाच वाटला होता पण तो नंतर खूप बदलला. निलेश सोबत प्रविणला compare करुन मी चुकी तर करत नाहीये ना. मनाची द्विधा परिस्थिती झाली आहे, काय निर्णय घेऊ? काहीच कळत नाहीये. मला वाटतंय की सगळं काही वेळेवर सोडून देऊ नाहीतर उद्या एकदा पाटील मॅडम सोबत चर्चा करते, त्यांचा अनुभव काय सांगतो? ते तरी बघूयात. पुनम प्रविणचा विचार करत करतच झोपी जाते.

दुसऱ्या दिवशी कंपनीत गेल्यावर पाटील मॅडमने पुनमला केबिनमध्ये बोलावून घेतले. "पुनम माझ्या बोलण्याचा काही विचार केला का? काल त्या मुलाला भेटली होतीस का?" पाटील मॅडमने विचारले

"हो मॅडम मी त्या मुलाला काल भेटले त्याबद्दल मला तुमच्या सोबत बोलायचे होतेच तोच तुम्ही मला बोलावलं. मॅडम मला तुमचं म्हणणंही पटलं होतं पण मनात थोडा गोंधळ सुरु आहे, निर्णय काय घेऊ हेच कळत नाहीये. पुन्हा माझी फसवणूक तर होणार नाही ना याची मला भीती वाटत आहे." पुनमने उत्तर दिले

पाटील मॅडम म्हणाल्या," पुनम तुला जर तो मुलगा चांगला वाटला असेल, तो तुझ्या योग्य वाटत असेल तर त्याची सखोल चौकशी करुन निर्णय घे. त्याच्या कंपनीचे डिटेल्स मला दे, मी माझ्या पातळीवर चौकशी करुन बघते."

पाटील मॅडम व पुनम मध्ये अजून काय चर्चा होते हे बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now