रेशीमबंध भाग ४०(अंतिम)

Story Of Relationship

मागील भागाचा सारांश: प्रविण व त्याचे दोन्ही भाऊ शेवटी एकत्र येतात, त्यांच्या आईची ही इच्छा पूर्ण होते. प्रविणच्या दादाला त्याची चूक समजते. आईची अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या पार पडते. 

आता बघूया पुढे...

पुनमच्या बर्थडेला एक आठवडा अवकाश असतो.पुनमचा बर्थडे येत्या शुक्रवारी असतो. पुनमचा बर्थडे कसा साजरा करायचा, तिला काय गिफ्ट द्यायचे हे सर्व प्रविणने ठरवलेले असते. प्रविण आपल्या प्लॅनमध्ये चैतालीला सुद्धा सहभागी करुन घेतो. एके दिवशी पुनम आपल्या कामात व्यस्त असते.

"पुनम फ्री आहेस का? थोडं बोलायचं होतं" प्रविणने विचारले

पुनम म्हणाली," हो बोला ना."

प्रविण म्हणाला,"तुझं सर्व लक्ष लॅपटॉप मध्ये आहे म्हणून विचारलं."

पुनम लॅपटॉप बंद करुन म्हणाली,"बोला काय म्हणता?"

प्रविण म्हणाला," काही वेळापूर्वी माझ्या एका कॉलेज फ्रेंडचा फोन आला होता, त्यांनी एक गेट टूगेदर प्लॅन केला आहे, सर्वजण लोणावळ्याला भेटणार आहे आणि तेही या शुक्रवारी, पुढे शनिवार, रविवार सुट्टी असल्याने सर्वांचं असं म्हणणं आहे की एक छानपैकी ट्रिप पण होऊन जाईल आणि गेट टूगेदर पण होऊन जाईल. अग सगळेच जण ह्या कोरोनामुळे अडकून गेले आहेत सो मी पण जावं असं म्हणतोय."

पुनमने मोबाईल मध्ये कॅलेंडर ओपन करुन शुक्रवारी कोणती तारीख आहे हे बघितले तेव्हा तिच्या लक्षात आलं की ह्या शुक्रवारी तर आपला बर्थडे आहे आणि प्रविणला मित्रांसोबत फिरायला जायचं आहे. पुनम काहीच बोलत नाहीये हे बघून प्रविण पुढे म्हणाला," पुनम मी गेलं तर चालेल ना? पुनम तीन दिवसांचा तर प्रश्न आहे, तु ऍडजस्ट करुन घेशील ना?"

पुनम म्हणाली," आता तुम्ही जायचं हे पक्कं ठरवलंच आहे तर तुम्ही जा. मी ऍडजस्ट करुन घेईल."

त्यावेळी पुनमला प्रविणचा राग आला होता पण तिने तो त्याच्या समोर व्यक्त केला नाही. पुनमला तिचे मन मोकळे करायचे असल्याने ती चैतालीला भेटण्यासाठी गेली. पुनमला आपल्या घरी बघून चैताली म्हणाली,"पुनम हल्ली तुला माझी खूपच आठवण येत आहे ना, माझ्या घरी येणं जाणं वाढलं आहे म्हणून म्हटलं."

पुनम रागाने म्हणाली," मी तुझ्या घरी नको येत जाऊ का? तु माझी एकुलती एक हक्काची मैत्रीण आहेस की जिच्याकडे मी माझं मन मोकळं करु शकते आणि तु पण जर असं बोलत असलीस तर मग."

पुनमला रडायला येत असल्याने ती पुढे काहीच बोलू शकली नाही. चैताली म्हणाली, "पुनम काय झालंय? मी तुझी गंमत करण्यासाठी असं बोलले तर त्यात तुला रडायला येण्यासारखं काय आहे?"

पुनम म्हणाली," प्रविण शुक्रवारी त्यांच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणार आहे आणि तेही तीन दिवसांसाठी."

चैताली म्हणाली," अग मग त्यात रडण्यासारखं काय आहे?"

पुनम म्हणाली," म्हणजे तुही विसरलीस का? अग शुक्रवारी माझा बर्थडे आहे."

चैताली म्हणाली," अरे मी खरंच विसरले होते. आता घरीच राहत असल्याने कॅलेंडर कडे लक्षच जात नाही. प्रविणला जायचं तर जाऊदेत, तु माझ्या घरी ये, आपण तुझा बर्थडे साजरा करुयात."

पुनम म्हणाली," चैताली तु थोडी वेडी आहेस का ग? मला माझ्या बर्थडेला प्रविण इथे हवे आहेत. इतकी वर्षे मी माझा बर्थडे साध्या पद्धतीने साजरा करत होते पण यावर्षी मला वाटलं होतं की प्रविण सोबत असल्याने आपला बर्थडे मस्त साजरा होईल. माझा बर्थडे त्याच्या लक्षात सुद्धा नाहीये. आपलं माणूस आपल्या बर्थडेला असावं हे वाटणं चूक आहे का?"

चैताली म्हणाली," मग आपण आपल्या माणसाला सांगावं की माझा बर्थडे आहे तर तु कुठे जाऊ नकोस मग आपला माणूस बरोबर इथे थांबेल."

पुनम म्हणाली," मी त्यांना असं काहीच सांगणार नाही, हे त्यांचं त्यांना समजायला हवं."

चैताली म्हणाली," एकतर पुनम तु प्रविण सरांना तुझ्या मनात त्यांच्या बद्दल असणाऱ्या भावनांबद्दल काहीच सांगितलं नाहीये तर त्यांना हे कसं समजेल की तुझ्या बर्थडेला त्यांची उपस्थिती गरजेची आहे."

पुनम म्हणाली," मी त्यांना माझ्या मनातील कसं सांगू? हे त्यांचं त्यांनाच कळायला पाहिजे होतं."

चैताली म्हणाली," अग पुनम तुझ्या मनातील ओळखायला ते काही जादूगार आहेत का?"

पुनम चिडून म्हणाली," तु त्यांची मैत्रीण आहेस की माझी?"

चैताली म्हणाली," अर्थात तुझी."

पुनम म्हणाली," मग तु त्यांची बाजू का घेत आहेस?"

चैताली म्हणाली," अग वेडाबाई मी त्यांची बाजू घेत नाहीये, तु समोर आलेल्या परिस्थिती कडे फक्त एकाच नजरेतून बघत आहेस, दुसरी बाजू तु बघतच नाहीये. पुनम तुला प्रविण सर आवडतात हे त्यांना तु सांगून दे म्हणजे तुमचं नातं पुढे सरकेल, आता त्यांच्या मनात तुझ्या बद्दल काय आहे? हे तेव्हाच कळेल. तुझ्या मनात एकाच वेळी खूप गोष्टी चालू असल्याने तुझा गोंधळ उडाला आहे."

पुनम म्हणाली," मी एवढ्यात तरी त्यांना काहीच सांगणार नाहीये, माझा बर्थडे होऊन जाऊदे मग मी त्यांच्या सोबत या विषयावर बोलेल."

पुनम आपल्या घरी निघून गेल्यावर चैताली मनातल्या मनात म्हणाली, "दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम आहे पण ते एकमेकांपाशी व्यक्त करण्याची हिंमत दोघांमध्येही नाहीये. या दोघांचं पुढे जाऊन काय होणार? काय माहीत."

प्रविणने त्याच्या ट्रिपची तयारी गुरुवार पासूनच केली होती, प्रविण त्याची बॅग भरत होता. पुनम त्याच्या सोबत नीट बोलत नव्हती. प्रविणला पुनमच्या मनातील राग कळाला होता.प्रविणने विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर पुनम सरळ देत नव्हती म्हणून प्रविण रागाने तिला म्हणाला," पुनम तुझं हे काय चालू आहे? मी केव्हापासून बघत आहे की तु माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर सरळ देत नाहीयेस, तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? मला तर तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाहीये."

पुनम म्हणाली," तुम्हाला खरंच कळत नाहीये की न कळण्याचं नाटक करत आहात."

प्रविण म्हणाला," मी नाटक कशाला करु?"

पुनम म्हणाली," उद्या माझा बर्थडे आहे आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला जात आहात."

प्रविण म्हणाला," पुनम एकतर उद्या तुझा बर्थडे आहे हे मला माहीत नव्हतं आणि तु मला हे आज सांगत आहेस. मी माझ्या मित्रांना जायला नकार दिला असता पण आता मी असं करु शकत नाही. मी तिकडून परत आल्यावर तुझा बर्थडे साजरा करुयात."

पुनम रागाने प्रविण समोरुन निघून गेली. दुसऱ्या दिवशी पुनम व सानवी उठण्याआधीच प्रविण आपली बॅग घेऊन घराबाहेर पडला. झोपेतून उठल्यावर पुनमने बघितले की प्रविण आपल्याला न सांगता, बर्थडे विश न करता निघून गेला आहे तर याचा तिला खूप जास्त राग आला होता. चैतालीचा रात्री बारा वाजता पुनमला बर्थडेचा मॅसेज आला होता. तसेच पुनम सध्या ज्या प्रोजेक्टवर काम करत होती त्या प्रोजेक्ट हेडने पुनमला बर्थडे निमित्त सुट्टी दिल्याचा मॅसेज केला होता. अचानक पुनमला सुट्टी मिळाल्याने सगळी कामे पुनम हळुवारपणे आवरत होती. सानवी उठल्यावर पुनम तिचं आवरुन देत होती. सरीता ताईंनी येऊन घरातील कामांना सुरुवात केली होती. काही वेळाने पुनमला तिच्या नेहमीच्या पार्लर मधून फोन आला व त्यांनी तिला सांगितलं की तुमच्या बर्थडेच्या निमित्ताने तुम्हाला पार्लरमध्ये आज सर्व काही फ्री मध्ये करुन मिळणार आहे. मग पुनमने ठरवले की तसाही आज आपला मूड बिघडलाच आहे आणि पार्लरमध्ये सगळं काही फ्री मध्ये होणार आहे तर चला पार्लरमध्ये जाऊन तरी येऊ म्हणजे झालं तर आपलं डोकं शांत होईल. 

सानवीला सरीता ताईंकडे ठेऊन पुनम पार्लरमध्ये निघून गेली. पार्लर मधून घरी परतल्यावर पुनमच्या नावाने एक पार्सल आलेले असते त्यात एक छान साडी असते, साडीचा रंग पुनमचा आवडता असतो. साडी सोबत एक चिठ्ठी असते त्यात एक मॅसेज लिहिलेला असतो,

"मैत्री म्हणजे श्वास

मैत्री म्हणजे आयुष्य

जसं आपलं जेवण मीठ नसल्यावर बेचव, अळणी लागतं तसंच आपलं आयुष्य चांगल्या मित्रांशिवाय अपूर्ण असतं. 

हे गिफ्ट तुला आपल्या मैत्रीची आठवण देत राहील. आपली मैत्री आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल."

गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीचं खाली नाव लिहिलेलं नसतं तेव्हा पुनम विचार करते की हे गिफ्ट नक्कीच चैतालीने पाठवलं असेल, कारण आपल्या आयुष्यात ती एकमेव जवळची मैत्रीण आहे, तिला आपल्या सर्व आवडीनिवडी माहीत आहे. 

संध्याकाळी चारच्या दरम्यान पुनमला तिच्या बाबांचा फोन आला होता त्यांनी तिला सांगितले की आपल्या घरी जाऊन plumbing चा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे घरात लिकेज झालं आहे, तेथील शेजाऱ्यांनी याची तक्रार केली आहे तर तु तिकडे जाऊन तेवढं plumber कडून लगेच रिपेअर करुन घे.

सरीता ताई सानवी जवळ थांबायला तयार झाल्या म्हणून पुनम लगेच आपल्या आई बाबांच्या घरी गेली, तिकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. आई बाबांच्या घरातून बाहेर पडताना पुनम मनातल्या मनात म्हणाली," पुनम या वर्षीचा तुझा बर्थडे तर खूपच छान झाला, पूर्ण दिवस असाच निघून गेला. कोणी माझ्यासाठी केक सुध्दा आणला नाही."

पुनम त्याच विचारात घरी गेली तर सरीता ताई पुनमला पार्किंगमध्ये भेटल्या, त्यांना पार्किंगमध्ये बघून पुनम म्हणाली," ताई तुम्ही इथे आहात आणि सानवी कुठे आहे? ती घरी एकटीच आहे का?"

सरीता ताई म्हणाली," ताई काही वेळापूर्वी साहेब घरी आले आहेत, ते घरी आल्याने मी माझ्या घरी जायला निघाले आहे."

प्रविण इतक्या लवकर कसा आला या विचारात पुनम घाईघाईने आपल्या घरी गेली, तर प्रविणने दरवाजा उघडला. पुनम काही बोलणार इतक्यात प्रविण तिला म्हणाला, "पुनम एखादी छान साडी घालून तयार हो, आपल्याला बाहेर जायचे आहे."

प्रविणने पुनमला बळजबरी बेडरुममध्ये जाऊन तयार व्हायला लावले. दुपारी गिफ्ट म्हणून आलेली साडी पुनमने नेसली व ती छान नटून थटून तयार झाली. आपलं आवरुन झाल्यावर पुनम बेडरुमचा दरवाजा उघडायला गेली तर तो बाहेरुन बंद केलेला होता म्हणून पुनमने प्रविणला आवाज दिला, पुढील पंधरा मिनिटांनी प्रविण बेडरुममध्ये आला तर पुनम भयंकर चिडलेली होती तर प्रविण म्हणाला, "हॅपी बर्थडे पुनम" एवढं बोलून प्रविणने पुनमच्या डोळ्याला एक पट्टी बांधली. प्रविणने पुनमचा हात पकडून तिला हॉलमध्ये नेले. मग त्याने तिच्या डोळ्यावरची पट्टी सोडली तर हॉलमध्ये पूर्ण डेकोरेशन केलेले होते तर तिच्या आजूबाजूला सासरचे व माहेरचे सर्व लोक होते. पुनमचे आई बाबा, अर्जुन दादा, रश्मी वहिनी व छोटं बाळ सर्वजण बंगलोरहून आलेले होते तर प्रविणचे दोन्ही भाऊ,त्यांच्या बायका, आई हे सर्वजण गावावरुन आले होते. डेकोरेशन पण मस्त केले होते, सगळ्यांना आपल्या अवती भोवती बघून पुनमचे डोळे भरुन आले होते.

प्रविणने सर्वांना खाली बसायला सांगितले, पुनम व प्रविण सगळ्यांच्या मध्ये सेंटरला उभे होते. प्रविणने बोलायला सुरुवात केली, "हॅपी बर्थडे पुनम, तु ह्या साडीत खूप सुंदर दिसत आहेस. मी सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्वांचे आभार मानतो की सर्वजण मी सांगितल्यावर लगेच इकडे आलात, मी स्पेशल आभार अर्जुन दादा व रश्मी वहिनींचे मानेल, ते आपल्या एवढयाशा बाळाला इथे घेऊन आले आहेत." यावर लगेच रश्मी वहिनी म्हणाली," एक मिनिटं प्रविण दादा तुम्ही आमचे आभार मानण्याची काहीच गरज नाहीये, इतक्या वर्षांत आमच्या कडून पुनम दिदींच्या बाबत ज्या चुका घडल्यात, त्या आम्हाला तुम्ही समजावून सांगितल्यात तसेच माझ्यामुळे या बहीण भावांमध्ये दुरावा आल्याचं सुद्धा तुम्ही स्पष्टपणे सांगितलंत त्याबद्दल तर मीच तुमचे आभार मानले पाहिजे. पुनम दिदी मला माफ करा, मी आजवर खूप चुकीची वागले आहे. आय एम सो सॉरी."

प्रविण म्हणाला," वहिनी तुम्ही दोघी नणंद भावजया या विषयावर नंतर बोला. आता आपण मुद्द्यावर येऊयात. मी पुनमला जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो होतो तेव्हा मी पुन्हा लग्न करेल की नाही हीच माझ्या मनात शंका होती, मी आईच्या आग्रहाखातर तिला भेटलो, भेटल्यावर आमच्यात बऱ्याच गप्पा झाल्या त्यावरुन मला एक समजलं होतं की ह्या मुलीसोबत आपण एका घरात राहू शकतो म्हणून मी या लग्नासाठी होकार दिला त्यानंतर काय काय झालं? हे सर्वांनाचं ठाऊक आहे. आमचं लग्न रजिस्टर पद्धतीने झालं होतं, माझ्या घरच्यांपैकी कोणीच लग्नाला उपस्थित नव्हते कारण त्यांना माझं व पुनमचं लग्नचं मान्य नव्हतं. पुनमचे आई बाबा हे दोघेही लग्नाला होते पण कोणालाच आमच्या लग्नामागील सत्य माहीत नाहीये आणि तेच सांगण्यासाठी आज मी तुम्हा सर्वांना इथे बोलावलं आहे.

लग्न होण्याआधी आमच्या दोघांमध्ये असं ठरलं होतं की लग्न झाल्यावर आमचं नवरा बायकोतील नातं फक्त कागदोपत्री व लोकांसाठी असेल. आमच्या दोघांमध्ये नवरा बायको सारखे कुठलेही संबंध नसतील. आम्ही एकमेकांचे खूप छान मित्र झालो होतो. माझ्या आईला पुनम सून म्हणून मान्य नव्हती तरीही आईच्या आजारपणात पुनमने तिची एक सून करेल त्यापेक्षा जास्त सेवा केली. आज पुनममुळे माझी पूर्ण फॅमिली एकत्र आहे. लग्न झालं त्या दिवसापासून पुनमने सर्व गोष्टींमध्ये माझी साथ दिली आहे.

पुनम मी तुझ्याकडे नेहमी एक मैत्रीण म्हणून बघत आलो होतो पण मी तुझ्या प्रेमात कधी पडलो हे माझे मलाच कळले नाही. मी तुझ्या शिवाय माझ्या आयुष्याचा विचार सुद्धा करु शकत नाही. I love you पुनम." 

हे बोलून प्रविण पुनम समोर खाली गुडघ्यावर बसला व एका हातात त्याने हिऱ्याची अंगठी तिच्या समोर धरली. पुनमच्या डोळयात पाणी आलं होतं, तिने प्रविण समोर अंगठी घालण्यासाठी आपला हात पुढे केला. प्रविणने पुनमच्या बोटात अंगठी घातली,तेव्हा दोघांच्याही डोळयात पाणी होते, जमलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या. 

प्रविणने त्यानंतर लगेच टीव्ही चालू केला त्यात चैतालीचा व्हिडीओ होता. चैतालीने बोलायला सुरुवात केली, "हॅपी बर्थडे पुनम, पुनम प्रविण सर तुझ्या बर्थडेची तयारी गेल्या दोन आठवड्यांपासून करत आहेत, त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि अर्थात तुझंही त्यांच्यावर प्रेम आहे, तुमच्या दोघांच्या डोळयात तुमच्या एकमेकांप्रती असलेलं प्रेम स्पष्ट दिसतं. पुनम आज या क्षणी मला तुझ्या सोबत तिथं उपस्थित रहायचे होते पण ते पॉसिबल नाहीये. पुनम तु तुझ्या आयुष्यात भरपूर दुःख सहन केलं आहेस, बऱ्याच क्षणी तु एकटी पडली आहेस. आता तुझ्या आयुष्यात खूप मोठा आनंदाचा क्षण आला आहे, तो जगून घे. प्रविण सरांनी तुला सरप्राईज देण्यासाठी एकेक गोष्ट अशी प्लॅन केली की मी सुद्धा आश्चर्य चकीत झाले होते. तुझ्यामुळे प्रविण सरांची फॅमिली एकत्र आली म्हणून तुझी फॅमिली एकत्र यावी म्हणून सरांनी बरेच प्रयत्न केले आहे. 

आज तुला अचानक भेटलेली सुट्टी, पार्लरची ऑफर ह्या दोन्ही सरांच्या आयडिया आहेत आणि आत्ता तु जी साडी घातली आहेस ना ती मी नाही सरांनी तुझ्यासाठी घेतली आहे. जास्त बोलून तुमच्या सर्वांचा वेळ घेणार नाही. शेवटी एकच सांगेल की प्रविण सर पुनम तिचं प्रेम तुमच्याकडे व्यक्त करेल की नाही हे मला माहीत नाही पण सर तिचं सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे. पुनम, प्रविण सर तुमचं हे नातं एका रेशीमबंधात गुंफून ठेवा."

त्यानंतर पुनमने प्रविण व सानवी सोबत केक कट केला, पुनमने घरातील मोठ्यांचे पाय पडून आशिर्वाद घेतले. घरातील सर्वांनी पुनमसाठी छोटेमोठे गिफ्ट्स आणले होते. सानवीने पुनम साठी स्वतःच्या हाताने ग्रिटींग तयार केले होते.पुनमला कायम लक्षात राहील असे गिफ्ट प्रविणने पुनमला दिले होते. पुनम व प्रविणच्या नात्याची घरातील सर्वांच्या उपस्थितीत एक नवी सुरुवात झाली होती. 

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all