Aug 18, 2022
कथामालिका

रेशीमबंध भाग ३

Read Later
रेशीमबंध भाग ३

मागील भागाचा सारांश: पुनम प्रविण देशमुख नावाच्या मुलाला भेटायला कॉफी शॉपमध्ये जाते, दोघांमध्ये जनरल गप्पा मारायला सुरुवात होते. पुनमला प्रविण कडून कळते की तो आईच्या इच्छेखातर तिला भेटायला आलेला असतो, त्याला पुन्हा लग्न करायची अजिबात इच्छा नसते. प्रविण तिला स्वतःबद्दल माहिती सांगायला सुरुवात करतो तसेच त्याचं पहिलं लग्न कसं झालं व त्याची पहिली बायको कोण होती? याबद्दल तो सांगत असतो.

आता बघूया पुढे....

आईसोबत फोनवर बोलून झाल्यावर पुनम म्हणाली," सॉरी आईचा फोन आल्यामुळे तुमचं बोलण अर्धवट राहिलं. Actually याआधी मी इतक्या वेळ कोणत्याच मुलासोबत बोलले नव्हते म्हणून आईला वाटलं की आपल्या गप्पा संपल्या असतील. तुम्ही तुमचं बोलणं continue करा."

प्रविण पुढे म्हणाला," ओके,माझ्या पहिल्या बायकोचं नाव सोनाली होतं. सोनालीने एका कंपनीत इंटरव्ह्यू दिला, तिचे सिलेक्शन सुद्धा झाले, सोनालीची नोकरी सुरु झाली होती, पुढील एक महिना आई आमच्याकडे होती. मला जस आयुष्य हवं होतं त्याची सुरुवात झाली होती. सोनाली आईचा मान राखायची, स्वयंपाक करायची. घरातील कामाचा कंटाळा करायची नाही, मी किती वेळेस बोललो असेल की आपण घरकामासाठी बाई ठेऊयात म्हणून पण ती नाही म्हणायची. आई होती तोपर्यंत सगळं काही ठीक होतं पण आई गावी गेल्यावर सोनालीचं पूर्ण रुपच पालटून गेलं होतं. आई असताना सोनाली न कंटाळता घरातील काम करत असायची पण आई गेल्यानंतर ती मला म्हणाली की आपण घरकामा साठी बाई ठेऊयात, मी ते तीच ऐकलं. आठवड्यातून दोन तीन दिवस तरी बाहेरच जेवायचा हट्ट करायची. ऑफिसमध्ये काम करुन तीही थकत असेल म्हणून मी पण बाहेर जेवण करण्यासाठी तयार व्हायचो, पुढे जाऊन तर ती म्हणू लागली की स्वयंपाक करण्यासाठी बाई ठेऊयात तेही मी ऐकलं.

मी सोनालीवर मनापासून प्रेम करायचो पण तिचे प्रेम पैश्यांवर होते. प्रत्येक विकेंडला बाहेर फिरायला जायचे, शॉपिंग करायची, बाहेरच काहीतरी खायचे अस तिचं ठरलेलं असायचं. नवीन नवीन मी तिच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचो पण आपण मध्यम वर्गीय लोक,अस सतत बाहेर फिरणं आपल्या खिशाला परवडणार नसत ना? माझ्या घरच्यां समोर ती आदर्श सुनेप्रमाणे रहायची आणि माझ्या समोर मात्र सतत उधळपट्टी, ऐश आरामात रहायची. मी तिला समजून सांगायचो पण ती माझं काही ऐकत नव्हती. तीन ते चार महिन्यांनंतर चालू नोकरी सोडून दिली का तर म्हणे तिला ही धावपळ सहन होत नव्हती. आता बघायला गेलं तर घरातील प्रत्येक कामाला बाई होती, हिला फक्त कंपनीत जाऊन काम करायचे असायचे.

मी सोनालीला म्हटलं की आपण दुसरी नोकरी शोधू पण नाही. मग मी तिला म्हटलं की तु नोकरी करणार नसलीस तर घरात ज्या कामाला बायका आहेत त्या काढून टाकू तर ती मला म्हणाली की घरातील काम करायला मी मोलकरीण नाहीये. दिवसभर सोप्यावर, बेडवर लोळत पडलेली असायची. घरातील एका कामाला सुद्धा हात लावत नव्हती. मी कंपनीतून घरी आलो की म्हणायची आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. सोनालीने तिचे खर्च कमी केले नव्हते. मला तरी किती दिवस परवडणार होतं. पैसे खर्च करण्यावरुन आमच्यात वाद व्हायला लागले होते. एके दिवशी आमच्यात भांडण झालं आणि ती माझ्या घरी गावाला निघून गेली व माझ्या बद्दल काहीतरी चुकीचं सांगून माझ्याच घरच्यांना माझ्या विरोधात भडकून दिलं. मग परत आई काही दिवस आमच्या इथे येऊन राहिली. आई असताना घरातील कामवाल्या बाया काढून टाकल्या, स्वतः सर्व काम करु लागली होती. सर्व सुरळीत चालू आहे हे बघून आई निघून गेली. आई गेल्यानंतर पुन्हा तेच पाढे सुरु झाले. मी काही दिवस शांतच राहिलो. सोनाली सोबत बोलणं जवळपास मी सोडूनच दिलं होतं. घरी उशिरा जायचो आणि सकाळी लवकर घरातून बाहेर पडायचो. मॅडमला तोही प्रॉब्लेम झाला होता, लगेच तिने फोन करुन माझ्या बाबांकडे माझी तक्रार केली. बाबांनी फोन करुन मला खूप झापले तेव्हा मी आईला सांगितलं की तु न कळवता अचानक माझ्या घरी ये, तुला सर्व खर चित्र दिसेल. 

आई जेव्हा येणार होती तेव्हा मी कामवाल्या बायांना सुट्टी घ्यायला सांगितली होती. आई जेव्हा आली तेव्हा मीपण घरी नव्हतो, सोनालीने बाहेरून जेवण ऑर्डर केलेले होते, घरात खूप पसारा पडलेला होता, आणि आमच्या मॅडम टी वी बघत सोप्यावर लोळत पडलेल्या होत्या. आई हे चित्र बघून खूप शॉक झाली. आई समोर सर्व सत्य परिस्थिती आली होती. मी कंपनीतून आल्यावर आईला सोनालीच्या शॉपिंगची बिलं दाखवली. माझ्या हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं होतं. आईने सोनालीला समजून सांगितलं. सोनालीने तिची चूक मान्य केली असे आम्हा सर्वांसमोर दाखवले. आई मला म्हणाली की संसार मोडणे एवढं सोपं नाही. पुन्हा एकदा नवी सुरुवात कर. आई गेल्यावर थोडे दिवस ती चांगली राहिली पण परत तेच मग मी तिला म्हटलो की मला तुझ्या सोबत रहायला जमणार नाही. आपण घटस्फोट घेऊयात तर मॅडमने माहेरी जाऊन माझ्यावर मी तिचा मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचा गुन्हा दाखल केला. आता आपला कायदा हा मुलींच्या बाजूने असल्याने आम्ही सगळेच घाबरलो. नातेवाईकांनी मध्यस्थी करुन त्यांना गुन्हा मागे घ्यायला सांगितला पण त्याबदल्यात त्यांनी खूप मोठ्या रकमेची मागणी केली. ती रक्कम त्यांना देण्यासाठी ज्या फ्लॅट मध्ये मी राहायला सुद्धा गेलो नव्हतो तो फ्लॅट मला विकावा लागला.

सोनालीवर विश्वास ठेऊन, प्रेम करुन, लग्न करुन मी खूप मोठी चूक केली होती. यातून मला मानसिक त्रासा सोबतच मोठा आर्थिक फटका बसला, त्यातून सावरायला मला जवळपास पुढची तीन वर्षे लागली. आपला समाज असा आहे की तो मुलालाच दोषी धरतो. आता तुम्हीच सांगा मी पुन्हा एखाद्या मुलीवर विश्वास कसा ठेऊ शकतो?"

पुनम म्हणाली," बापरे किती भयानक आहे हे. मुलीही अश्या विचित्र वागू शकतात हे तुमच्या कडून मला कळलं. आपण विचार करतो की आपणच खूप दुःखी आहोत किंवा आपल्याच सोबत इतकं वाईट कसं घडू शकतं. पण नाही आपल्या पेक्षाही या जगात अनेक दुःखी लोक आहेत हे तुमच्या अनुभवावरुन समजतं. तुमचा भुतकाळ भयानक होताच पण माझ्याही आयुष्यात असंच काहीतरी घडून गेलं आहे, actually मी याबद्दल फारसं कोणाशी काही बोलत नाही कारण मला माझं भुतकाळ आठवायला आवडत नाही आणि तो सांगून sympathy मिळवायला त्याहूनही आवडत नाही. माझ्या भुतकाळामुळे मी पूर्णपणे बदलून गेले आहे.

माझे आई बाबा पहिल्यापासूनच पुण्यात राहतात, माझं जन्म पुण्यातच झाला असून माझी जडणघडण पुण्यातच झालेली आहे. मला एक मोठा भाऊ आहे, नोकरीच्या निमित्ताने तो बंगलोरला राहतो. माझे बाबा आता रिटायर झाले आहेत. शाळेत असल्यापासून मला नृत्याची आवड होती. मी भरतनाट्यम पण शिकले होते. शाळेतील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मी भाग घेत होते, नृत्य सादर केल्याबद्दल मला बक्षिसे मिळायची. मला अभ्यासात एवढा रस नव्हता. जेमतेम पास झाले तरी माझ्यासाठी पुरेसे होते. मला डान्समध्ये करिअर करायचे होते.

बारावी नंतर मी BCA ला ऍडमिशन घेतलं, कॉलेज झाल्यावर एका डान्स ऍकॅडमी मध्ये जाऊन नोकरी करायचे म्हणजे मला अनुभव येईल आणि मलाही डान्स ऍकॅडमी काढायची असल्याने ही नोकरी करणे फार गरजेचे होते. सोसायटीतील व आसपासच्या एरियातील मुला मुलींना मी डान्स शिकवायचे. कॉलेजचे शेवटचे वर्ष चालू होते तेव्हा शेजारच्या सोसायटीतील एका लहान मुलीला भरतनाट्यम शिकवण्यासाठी मी तिच्या घरी जात होती, तिथेच माझी व निलेशची पहिली भेट झाली होती, निलेश त्या मुलीचा काका होता. शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने तो बाहेर असायचा आणि तेव्हाच तो पुण्यात शिफ्ट झाला होता. निलेश इंजिनिअर होता, चांगल्या कंपनीत नोकरीला होता, दिसायला हॅन्डसम, रुबाबदार होता. माझ्या कॉलेजच्या आसपास आमची एक दोनदा भेट झाली होती, मग आमच्यात हळूहळू मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे मलाही समजले नाही. निलेशने मला जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तेच मी बघितले. निलेश खरा कसा आहे हे बघण्याचा प्रयत्नच केला नाही.

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात ते काही चुकीचं नाहीये, मी तर म्हणेन की love is not only blind but also dumb and deaf also. आमच्या दोघांच्याही घरी आमच्या नात्याला परवानगी मिळाली होती. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने आमचं लग्न पार पडलं. सुरवातीचे दिवस छान गेले होते. मला डान्स ऍकॅडमी काढायची हे निलेशला लग्नाआधीच मी सांगितले होते पण लग्नानंतर तो डान्स ऍकॅडमी साठी नाही म्हणाला, त्याच म्हणणं होतं की डान्समध्ये करिअर करणं आपल्या सारख्या कुटुंबातील लोकांचं हे काम नाही, त्याने माझ्यासाठी एक नोकरी शोधली व ती मला करावी लागली कारण इकॉनॉमिक सपोर्ट ची त्याला गरज होती. माझी इच्छा नसतानाही मी ती नोकरी करायची. घरातील कामांची मला लग्नाआधी सवय नव्हती, लग्नानंतर घरातील काम मी शिकण्याचा प्रयत्न करु लागले होते, आता सुरवातीला चुका तर होणारच ना पण निलेशला मी काही चुका करणंच मान्य नसायचं. लग्नाआधी निलेश अजिबात रागीट वाटला नव्हता, पण नंतर तो प्रत्येक गोष्टीत माझ्यावर रागावू लागला होता, चिडचिड करायचा. माझ्याशी प्रेमाने बोलायचा नाही. मला वाटायचं की आपलंच काही चुकत असेल म्हणून तो अस वागत आहे म्हणून मी त्याच्या रागाकडे दुर्लक्ष करायचे कारण माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं ना? हळूहळू घरातील सर्व कामे करुन मी नोकरी करायचे. निलेश जस सांगेल तस मी वागायचे, माझ्या बाबतीत सर्व निर्णय तोच घ्यायचा. 

सहा महिन्यांनंतर माझ्या असे निदर्शनास आले की निलेशला दारुचे व्यसनही होते, सुरवातीला आठवड्यातून एकदा तो दारु पिऊन यायचा, त्यावेळी सुद्धा मी त्याला समजून घ्यायचाच प्रयत्न केला पण नंतर तर तो दररोज दारु पिऊन घरी यायचा, माझ्या सोबत विनाकारण भांडण उकरुन काढायचा, माझ्यावर हात उगारायला सुरुवात केली मग मात्र माझी सहनशक्ती संपली होती. बडबड कोणीही ऐकून घेईल पण अस मार खाणे माझ्या कडून सहन होण्यासारखं नव्हतं. मी निलेशला समजून सांगायचा खूप प्रयत्न केला पण साहेब सुधारायचे नावच घेत नव्हते मग मी शेवटी माझ्या माहेरी निघून गेले, त्याच्या घरचे लोक मलाच चुकीचे ठरवत असायचे. मी माहेरी निघून गेल्यावर मला समजले की मी प्रेग्नंट आहे, मी ही आनंदाची बातमी निलेशला फोन करुन सांगितली, मला वाटलं होतं की हा आपल्याला आता तरी घरी न्यायला येईल पण तो आलाच नाही, त्याच अस म्हणणं होतं की मी पुनमला घरातून जायला सांगितलं नव्हतं, ती स्वतःच्या मर्जीने गेली आहे, तिला गरज असेल तर तिने परत यावे. शेवटी मलाच माघार घ्यायला लागली, माझ्या आई वडिलांनी माझी समजूत घातली व मी पुन्हा त्याच्या घरी गेले. मी निलेशला समजावून सांगितले की निलेश आता आपल्याला बाळ होणार आहे, आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, हे दारु पिणं सोडून दे पण ऐकेल तो निलेश कुठला? निलेश रोज दारु पिऊन घरी येणे काही बंद झाले नाही. मला दुसरा महिना लागला होता, एके दिवशी निलेश दारु पिऊन घरी येत असताना त्याचा अपघात झाला आणि त्यात तो एक्सपायर झाला.

या सर्वासाठी निलेशच्या घरच्यांनी मलाच जबाबदार धरले व त्यांनी मला त्या घरातून हाकलून दिले, माझ्या पोटातील बाळाचा विचार सुद्धा त्यांनी केला नाही. माझ्या आई वडिलांनी मला सुचवले होते की तु abortion कर म्हणून पण माझ्या मनाला ते पटत नव्हते, माझ्या सोबत जे काही झालं त्यात त्या एवढयाशा जीवाचा काय दोष होता? म्हणून मी त्या बाळाला जन्म दिला. मला एक गोंडस मुलगी झाली, त्या दिवसापासून मी तिच्याच कडे बघून जगत आहे."

©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now