रेशीमबंध भाग ३९

Story Of Relationship

मागील भागाचा सारांश: पुनम उमेशच्या घरी जाऊन गप्पा मारत असते तोच उमेश त्यावेळी घरी येतो. उमेश पुनमला बघून ओळखतो की ही प्रविणची बायको असेल म्हणून कारण त्याने पुनमला प्रविण सोबत बघितलेले असते. पुनम उमेशला आईच्या इच्छेबद्दल सांगते व उमेशला आईला भेटण्यासाठी घरी बोलावते तेव्हा उमेश घरी येण्यास नकार देतो यावर पुनम उमेशला समजावून सांगते. पुनमच्या भावाला म्हणजेच अर्जुनला मुलगा झाल्याचे तो स्वतः पुनमला फोन करुन कळवतो.एके दिवशी अचानक उमेश घरी येऊन सर्वांना सरप्राइज देतो. उमेशला घरी आलेलं बघून आई खूप खुश होते.

आता बघूया पुढे...

प्रविण मनात काहीच राग न ठेवता उमेश सोबत मनमोकळेपणाने बोलतो.उमेशला घरी आलेलं बघून आई मनापासून खुश असते. गीता सविता व पुनमला स्वयंपाक करण्यात मदत करते. त्या दिवशी उमेश व गीता प्रविणच्या घरुन रात्रीचे जेवण करुन जातात, त्यांच्या मुलासाठी पुनम जेवण डब्यात भरुन देते. जेवण झाल्यावर उमेश व गीता घरी जायला निघतात तेव्हा पुनम व प्रविण त्यांना सोडण्यासाठी खाली पार्किंगपर्यंत जातात. पार्किंग मध्ये आल्यावर उमेश पुनमला म्हणाला," पुनम वहिनी मी तुमचे आभार कसे मानू हेच मला कळत नाहीये. आज तुमच्या मुळे मला समजलं की मी किती मोठ्या सुखाला मुकलो होतो. मी इतके दिवस उगाच माझा खोटा स्वाभिमान कुरवाळत बसलो. आज केवळ तुमच्या मुळे मी माझ्या भावाला व आईला भेटू शकलो. थँक यू सो मच."

यावर प्रविण पुनमकडे तिरक्या नजरेने बघत म्हणाला," अच्छा तर आपण हे सगळं घडून आणलंय तर."

पुनमने हसून खाली मान घातली. उमेश पुढे म्हणाला," पुनम वहिनीला तु यावर रागावू नकोस, तिने जे केलं ते आईच्या इच्छेखातर केलं आणि यातून output चांगलाच मिळणार आहे."

प्रविण म्हणाला," मी काही याबद्दल पुनमला रागावणार नाहीये पण तुला आपला दादा कसा आहे? हे ठाऊकच आहे ना, तो याचा काहीही अर्थ काढू शकतो. आता आई आजारी असल्याने इथे माझ्याकडे राहते, ती बरी होऊन गावाकडे गेल्यावर ती तिकडे खुश आणि आपण इकडे खुश. मला ह्या फॅमिली पॉलिटिक्स मध्ये पडायचंच नाहीये. पुनमने हे सर्व चांगल्या हेतूनेच केलं पण आपले महान दादासाहेब यातून वेगळेच तर्क वितर्क लावतील."

उमेश म्हणाला," प्रविण दादा आपल्या सोबत जी आजवर खेळी खेळत आला आहे ती केवळ प्रॉपर्टी साठीच, त्याला पूर्ण प्रॉपर्टी एकट्याच्या ताब्यात ठेवायची आहे म्हणून त्याने यातून हळूहळू आपल्याला हद्दपार करण्याचा प्लॅन केला असेल."

प्रविण म्हणाला," अरे पण उमेश आपण त्या प्रॉपर्टीचा ताबा घेऊन काय करणार आहोत? आपण दोघेही इथे पुण्यात स्थायिक झालो आहोत, आपण गावाकडे जाऊन शेती करु शकणार आहोत का?"

उमेश म्हणाला," अरे हेच तर त्याला कळत नाहीये ना, दादा आईच्या अँजिओप्लास्टीच्या वेळेस येईल ना तेव्हा मला सांग, मी इथे येऊन त्याच्याशी जरा बोलतो, ह्याच्या एकट्याकडेच प्रॉपर्टी नाहीये, इथे आपल्याकडे सुद्धा पुण्यात थोडीफार का होईना पण कष्टाने कमावलेली प्रॉपर्टी आहे याची कल्पना त्याला द्यावीच लागेल."

प्रविण म्हणाला," तुला त्याच्या बरोबर जे बोलायचं असेल ते बोल, मी तर त्याच्यापुढे हात जोडले आहे, त्याने मला जितका मानसिक त्रास दिला आहे तेवढा कोणीच दिला नसेल."

उमेश व गीता आपल्या घरी निघून जातात. आईच्या अँजिओप्लास्टीच्या आदल्या दिवशी दादा गावावरुन पुण्यात येतो. दादा आल्यावर आई फोन करुन उमेशला बोलावून घेते. उमेशला प्रविणच्या घरी आलेलं बघून दादा म्हणाला," प्रविण हा इथे तुझ्या घरी काय करत आहे? तुझ्या याच्याशी काही संपर्क होता का?"

आई म्हणाली," उमेशला मी बोलावलं आहे."

"पण का?" दादाने विचारले

आई म्हणाली," कारण तो माझा मुलगा आहे."

दादा चिडून म्हणाला," आई बाबांनी स्वतः याला घराबाहेर काढलं होतं आणि हा तुझा मुलगा असल्याची तुला आज जाणीव कशी काय झाली? उमेश व प्रविणला आता प्रॉपर्टीत हिस्सा मागायचा असेल म्हणून या दोघांनी मिळून आता यावेळी एकत्र यायचा प्लॅन केला असेल. आई नक्कीच यांनी तुला इमोशनल ब्लॅकमेल केलं असेल."

सविता म्हणाली," अहो आईंची उद्या अँजिओप्लास्टी आहे आणि तुम्ही त्यांच्यावर चिडून बोलत आहात. तुम्हाला कसं काही वाटत नाहीये. किती दिवस फक्त प्रॉपर्टी आणि पैश्यांची किंमत करत बसणार आहात, जरा माणसांची कदर करायला शिका. सतत डोक्यात कट कारस्थानं चालू असतात. कोणत्याही गोष्टीकडे वाकडी नजर करुन बघणे गरजेचेच आहे का? तुम्ही घरात मोठे असल्याने तुमचे आई वडील तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते, पण तुम्ही त्या प्रॉपर्टीच्या मोहापायी तुमच्या सख्ख्या भावांनाच आई वडिलांपासून दूर केले, सतत भावांच्या विरोधात आई वडिलांचे कान भरवत होतात. तुमच्या लहान भावांचं चुकलं होत तर त्यांचा कान पकडून त्यांना त्यांची चूक समजावून सांगण्यापेक्षा यात तुमचा फायदा कसा होईल? याकडेच तुम्ही जास्त लक्ष दिले होते. आपल्यातील प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचं तेव्हा जाताना आपण ही प्रॉपर्टी, पैसा यापैकी काहीच घेऊन जात नाही. आपले बाबा सर्व इथेच ठेऊन गेलेत ना? मग हा एवढा अट्टाहास कशासाठी? कोणासाठी? 

तुमच्या अश्या वर्तनामुळे या घरात मला सुद्धा कोणीच किंमत देत नाही, माझं बोलणं, माझी कळकळ कोणालाच खरी वाटत नाही. अहो तुमच्या भावांना तुमच्या सोबत बोलण्याची इच्छा होत नाही, ही त्यांच्या नजरेत तुम्ही स्वतःची किंमत उतरवून घेतली आहे. ही कट कारस्थानं करुन तुम्हाला काय मिळणार आहे? हे देवच जाणे. आता बस करा हे सगळं."

सविताच्या या बोलण्यावर दादाचा चेहरा रागाने लालबुंद झालेला असतो, त्याचे डोळे रक्त उतरल्या सारखे दिसत होता. आता हा रागात सविताला काही वाईट बोलू नये म्हणून आई म्हणाली," दादा सविताकडे असं रागाने बघू नकोस, ती काहीच चुकीचं बोलली नाहीये. सविता जे काही बोलली आहे ते तिने इतकी वर्षे स्वतःच्या डोळयांनी बघितलेलं आहे. तुझी अरेरावी सर्वांत जास्त तिलाच सहन करावी लागली आहे. दादा जे झालं ते तुम्ही तिघांनी सोडून द्यावं अशी माझी इच्छा आहे, आता आपण सगळयांनी नव्याने सुरुवात करायला गरजेचे आहे. उद्या माझी अँजिओप्लास्टी आहे तर त्यातून मी जगले वाचले तर पुढे सर्व माझ्या डोळयांनी बघेलच पण आता सध्याची माझी ही शेवटची इच्छा समज. तुझ्या बाबांच्या व माझ्या नावावर जी काही प्रॉपर्टी आहे, तिचे तीन समान हिस्से करण्यात यावे ही माझी इच्छा आहे. तसेच माझ्याकडे जेवढं सोनं आहे ते माझ्या तिन्ही सुनांमध्ये समान वाटण्यात यावे आणि शेवटचं माझ्या नावावर बँकेत थोडेफार पैसे आहेत ते माझ्या दोघी नातींना( म्हणजे दादाची मुलगी व प्रविणची मुलगी सानवी) समान देण्यात यावे."

दादा म्हणाला," आई म्हणजे आजपर्यंत मी जी प्रॉपर्टी सांभाळली,जतन केली ती यांना वाटून द्यायची. आई मला हे मान्य नाही."

आई म्हणाली," प्रविण व उमेश तुझे भाऊ आहेत, त्यांना त्यांचा हिस्सा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. तु जी प्रॉपर्टी सांभाळली ती वडिलोपार्जित आहे, ती तु स्वतः कमावलेली नाहीये तेव्हा तुझ्या फक्त एकट्याचा त्यावर अधिकार नाहीये."

उमेश म्हणाला," एक मिनिट आई प्लिज तुम्ही दोघे यावरुन वाद घालू नका. दादा मला व प्रविणला प्रॉपर्टीत हिस्सा नकोय. आई आम्ही दोघे आता इथे पुण्यात राहत आहे तर आम्ही गावाकडे जाऊन शेती कधी करणार आहोत? तुझ्या व बाबांच्या आशिर्वादाने पुण्यात आमच्या दोघांची घरं झाली आहेत, माझा उद्योग धंदा व्यवस्थित चालू आहे, प्रविण कडे चांगली नोकरी आहे. आम्ही हे सर्व सोडून गावाकडे का जाऊ? दादा तुला ती सर्व प्रॉपर्टी ठेव आणि त्याचा उपयोग तुच करु शकतोस, आम्हाला त्यातील काहीच नकोय. दादा फक्त माझी तुला एक कळकळीची विनंती आहे की हे कट कारस्थानं करणं सोडून दे, तुला जे काही राजकारण करायचं असेल ते घराच्या बाहेर कर, प्लिज इथून पुढे नात्यांमध्ये राजकारण करु नकोस."

आई म्हणाली," आपल्या लहान भावांकडून काहीतरी शिक, ज्या प्रॉपर्टी साठी तु त्यांच्या बरोबर डावपेच खेळलेस त्या प्रॉपर्टीचा त्यांनी तुझ्यासाठी त्याग करायचा ठरवला आहे."

दादा खाली मान घालून म्हणाला," उमेश, प्रविण मला माफ करा, तुमच्या दोघांचं मन खूप मोठं आहे. मी नात्यांमध्ये राजकारण करु पाहत होतो, मी खूप मोठी चूक केली आहे. आई तु जसं म्हणतेस तसंच होईल, सर्व प्रॉपर्टीचे समान तीन हिस्से होतील आणि या दोघांची इच्छा असेल तरच मी यांच्या शेतजमिनीत पिकं पिकवत जाईल."

आपल्या तिन्ही मुलांना एकत्र आलेलं बघून आईला खूप छान वाटत होतं, हे सर्व करण्यात आईला पुनमने मदत केल्याचे समजताच दादाने सर्वांसमोर पुनमचे हात जोडून आभार मानले. दुसऱ्या दिवशी तिन्ही भावांच्या उपस्थितीत आईची अँजिओप्लास्टी झाली. अँजिओप्लास्टी झाल्यावर दादा गावाला परत निघून गेला. आईला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावर उमेश तिला आपल्या घरी घेऊन गेला. प्रविण व पुनम दररोज संध्याकाळी आईला भेटण्यासाठी उमेशच्या घरी जात होते. आईला पूर्णपणे बरं वाटल्यावर उमेश व प्रविण आईला गावाकडे सोडून आले. प्रविणला सुट्टी नसल्याने तो गावावरुन त्याच दिवशी परत आला. प्रविण गावावरुन परत आल्यावर पुनम त्याला म्हणाली," आईंना प्रवासात काही त्रास झाला का?"

प्रविण म्हणाला," नाही आई एकदम खुश होती, ती मनातून खुश झाली होती आणि ह्याचे सर्व श्रेय तुला जाते."

पुनम म्हणाली," मी काही केलं नाही. उमेश दादांनी सगळं काही विसरण्याचा निर्णय घेतला तसेच दादांनी त्यांची चूक मान्य केली आणि मी हे सर्व घडून आणलंय हे तुम्हाला कळून सुद्धा तुम्हाला माझा राग आला नाही."

प्रविण म्हणाला," तु जे केलं ते चांगलंच केलंस म्हणून मी रागावण्याचा काही संबंधच येत नाही. आई आपल्याकडे आल्यापासून आपली सर्वांचीच धावपळ झाली होती. आता कुठे जाऊन शांतता मिळणार आहे. बाकी चैतालीची तब्येत ठीक आहे ना? आणि अर्जुन दादाचं बाळ कसं आहे?"

पुनम म्हणाली," चैताली प्रेग्नंट आहे, तिला बेडरेस्ट घ्यायला लावली आहे. अर्जुन दादाचं बाळ व्यवस्थित आहे. अर्जुन दादाच्या बाळाला कधी भेटता येईल काय माहीत? आई बाबांची पण खूप आठवण येत आहे, ते बंगलोरला जाऊन बरेच दिवस झाले ना."

प्रविण म्हणाला,"मग आपण बंगलोरला जायचा प्लॅन करुयात का? आई बाबांची भेट होईल तसेच तुला बाळालाही बघता येईल आणि आपली छानपैकी एक ट्रिप होईल."

पुनम म्हणाली," नाही नको."

"पण का?" प्रविणने विचारले

पुनम म्हणाली," आपण बंगलोरला गेलेलं रश्मी वहिनीला आवडेल की नाही याची मला शंका आहे. मी आई सोबत याबद्दल बोलून घेते, मग आपण बंगलोरला जायचा प्लॅन करुयात."

प्रविण म्हणाला," ओके चालेल."

प्रविण व पुनमचे रुटीन लाईफ नेहमी प्रमाणे सुरु झाले होते. प्रविण ऑफिसमध्ये जाऊन काम करत होता तर पुनमचे वर्क फ्रॉम होम चालू होते. सानवीची ऑनलाईन शाळा सुरु होती. सानवीला सांभाळण्या करता सरीता ताई घरी येत होत्या. सानवीला सरीता ताईंची सवय झाल्याने ती पुनमला त्रास देत नव्हती. पुनमचा बर्थडे जवळ आल्याने तो कसा साजरा करावा हा प्रश्न प्रविणला पडला होता. प्रविणला पुनमला काहीतरी सरप्राईज द्यायचे होते तसेच तिचा बर्थडे असा साजरा करायचा होता की तो तिला कायम लक्षात राहीला पाहिजे. पुनमच्या सर्व आवडी निवडी प्रविणला ठाऊक होत्या तरीही त्याने चैतालीला फोन करुन पुनमला तिचा बर्थडे कसा साजरा करायला आवडतो हे विचारुन घेतले.

प्रविण पुनमचा बर्थडे कसा साजरा करतो हे बघूया पुढील भागात....

©®Dr Supriya Dighe







🎭 Series Post

View all