रेशीमबंध भाग ३८

Story Of A Relationship

मागील भागाचा सारांश: पुनम चैतालीच्या घरी गेली होती, पुनमने चैताली कडून उमेश व गीताची माहिती काढली तसेच उमेश प्रविणचा मोठा भाऊ असल्याचे पुनमने चैतालीला सांगितले. पुनम गीताला भेटण्यासाठी तिच्या घरी जाते. दोघींमध्ये चांगल्या गप्पा चालू होत्या.

आता बघूया पुढे....

पुनम व गीताच्या गप्पा चालू असताना दरवाजाची बेल वाजते म्हणून गीता दरवाजा उघडण्यासाठी जाते तर उमेश आलेला असतो. उमेश घरात आल्यावर हॉलमध्ये पुनम बसलेली असते, तिच्याकडे त्याचं लक्ष जातं. गीताच्या हे लक्षात आल्यावर पुनमची ओळख करुन देताना गीता म्हणाली," ह्या पुनम ताई आहेत, चैताली ह्यांची मैत्रीण आहे. माझी कपड्यांची पिशवी चैताली कडे राहिली होती ना, तिचं ह्या द्यायला आल्या आहेत."

उमेश मिश्कीलपणे हसून म्हणाला, "आपण मिसेस प्रविण देशमुख आहात ना?"

 उमेशने अचानक असा प्रश्न विचारल्याने पुनम जरा दचकलीच, पुनम काही बोलणार इतक्यात गीता उमेशला म्हणाली," तुम्हाला ह्यांच्या नवऱ्याचं नाव कसं काय माहीत? तुम्ही त्यांना ओळखतात का?"

उमेश म्हणाला,"मीच काय? तु पण त्याला ओळखतेस."

गीता आश्चर्याने म्हणाली," मी कशी काय त्यांना ओळखते?"

उमेश म्हणाला," तु माझ्या लहान भावाला प्रविणला ओळखत नाहीस का?"

पुनम म्हणाली,"तुम्हाला कसं माहीत की मी त्यांची बायको आहे म्हणून."

उमेश म्हणाला," ज्या दिवशी तुम्ही गीताला दुकानाच्या बाहेर भेटलात तेव्हा प्रविण तुमच्या सोबत होता, त्याने जरी हेल्मेट घातलेलं होतं तरी मी त्याला ओळखलं होतं, त्या दिवशी मी गीता सोबत दुकानात आलेलो होतो."

पुनम म्हणाली," मग तुम्ही त्या दिवशी प्रविण सोबत बोलला का नाहीत?"

उमेश म्हणाला," कारण मला त्या फॅमिलीतील कोणाशीही काहीच संबंध ठेवायचा नाहीये, तुम्हाला कदाचित माझ्या बोलण्याचा राग येईल पण सविता वहिनीच्या नात्यातील मुलीसोबत लग्न करुन प्रविणने सर्वांत मोठी चूक केली आहे आणि म्हणूनच मला त्याच्या सोबत काहीच संपर्क ठेवायचा नव्हता."

पुनम हसून म्हणाली,"उमेश दादा तुम्ही त्या फॅमिली पासून इतके दूर आहात की कोणाच्या आयुष्यात काय चालू आहे? हेही तुम्हाला माहीत नाहीये. सविता ताईंच्या नात्यातील मुली सोबत लग्न करुन प्रविणने चूक केली होती आणि त्याची शिक्षा त्यांना भेटली सुद्धा होती. मी प्रविणची दुसरी बायको आहे, गेल्या काही महिन्यांपूर्वी आमच्या दोघांचं लग्न झालं आहे."

उमेश म्हणाला," हो का? पण हे कधी घडलं आणि त्या मुलीने प्रविणला काय त्रास दिला?"

पुनम म्हणाली," त्या दोघांचा घटस्फोट होऊन जवळजवळ सहा ते सात वर्ष होऊन गेले. प्रविणला आर्थिक नुकसान तर झालेच पण त्यापेक्षा ते मानसिक रित्या खूप जास्त खचले होते. प्रविण सोबत घरातील आई सोडून बाकी कोणीच बोलत नव्हते. प्रविण गेले कित्येक वर्षे घरी सुद्धा गेले नव्हते, ते पूर्णपणे एकटे पडले होते. बाबा एक्सपायर झाल्यावर प्रविण घरी गेले होते, बाबा हे जग सोडून गेले तरी प्रविण सोबत बोलले नव्हते."

उमेश म्हणाला," बापरे बरंच काही घडून गेलं आहे. मला तर याची काहीच कल्पना नव्हती. बाबा कधी एक्सपायर झाले? त्यांना कोरोना झाला होता का? आणि आई कशी आहे?"

पुनम म्हणाली," बाबा पाच सहा महिन्यांपूर्वी एक्सपायर झाले. बाबांना हार्ट अटॅक आला होता. आई इथे आमच्याकडेच आहेत, दोन आठवड्याने त्यांची अँजिओप्लास्टी आहे."

उमेश म्हणाला," बाबांच्या अचानक जाण्याने आई बरीच खचली असेल ना? त्यादिवशी प्रविणने गीताला ओळखलं नव्हतं का?"

पुनम म्हणाली," आई हळूहळू त्या धक्क्यातून सावरत आहेत. प्रविणने गीता ताईंना ओळखलं होतं आणि म्हणूनच मी आज तुमच्या घरी आले आहे. मी इथे आल्याचं फक्त सविता ताईंना माहीत आहे."

उमेश म्हणाला," पण असं का? प्रविणला तुम्ही याबद्दल सांगितलं का नाही?"

पुनम म्हणाली," काही वर्षांपूर्वी तुमची व प्रविणची कुठेतरी भेट झाली होती तेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत बोलला नाहीत यावरुन त्यांना समजून गेलं होतं की तुम्हाला त्यांच्यापैकी कोणाशीही संपर्क ठेवायचा नाही. मी तुम्हाला भेटले हे जरी त्यांना कळालं तरी त्यांना याबद्दल आक्षेप नसेल पण त्यांचं असं म्हणणं आहे की तु या सगळयात पडू नकोस म्हणून."

उमेश म्हणाला," मग तुम्ही इथे का आलात?"

पुनम म्हणाली," कारण मला तुमच्या आईंची इच्छा पूर्ण करायची आहे."

"आईची इच्छा? आणि ती कोणती?" उमेशने विचारले

पुनम म्हणाली," तुम्ही सर्व भावांनी एकत्र यावे ही आईंची इच्छा आहे तसेच तुमच्यावर आणि प्रविणवर जो अन्याय तुमच्या आई बाबांकडून झाला आहे त्याबद्दल त्यांना तुमची माफी मागायची आहे. सतत आपल्या मोठ्या मुलाचं ऐकून त्यांनी दुसऱ्या दोन मुलांवर अन्याय केला आहे हे त्यांच्या आत्ता लक्षात आले आहे."

उमेश म्हणाला," बरंच लवकर लक्षात आलं. माझ्या बाबतीत जे झालं, ते प्रविणच्या बाबत घडेल असं मला वाटलं नव्हतं. प्रविण कोणाच्याही देण्या घेण्यात नव्हता मग दादाने त्याच्याशी कोणती खेळी खेळली?"

पुनम म्हणाली," तुम्ही जेव्हा प्रविणला भेटाल तेव्हाच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील."

उमेश म्हणाला," तुम्ही आमच्या आईची इच्छा पूर्ण करण्यात तिची मदत का करत आहात? तुमचा त्यामागील हेतू काय आहे?"

पुनम म्हणाली," आईंसोबत माझी कुठलीही इमोशनल attachment नाहीये कारण मी ह्या फॅमिलीत आत्ता आले आहे. माझं असं मत आहे की बाबा तर काही दिवसांपूर्वी अचानक गेले. आईंचं अचानक कधी काय होईल? हे आपण सांगू शकत नाही तर अश्या व्यक्तीची इच्छा आपण जर पूर्ण करण्यात मदत केली तर ती व्यक्ती समाधानाने डोळे मिटेल. ह्या सर्वामागची हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे."

उमेश म्हणाला," तुमचं म्हणणं सर्व बरोबर आहे पण मला पुन्हा त्या सर्वांच्या संपर्कात येऊन मनस्ताप करुन घ्यायचा नाहीये, मी घरातून निघताना मला कोणी अडवलं सुद्धा नाही. माझं काय चुकलं होतं, मी फक्त माझा मान सन्मान मागितला होता, त्या बदल्यात मला काय मिळालं तर थोडे पैसे आणि बाहेरचा रस्ता. इथे पुण्यात आल्यावर माझे किती हाल झाले होते ह्याची कोणी कल्पना सुद्धा करु शकत नाही. आज माझ्याकडे जे काही आहे ते मिळवायला किती कष्ट करावे लागले आहेत. मला पुन्हा त्या गावात, त्या लोकांमध्ये परत जायचं नाहीये."

पुनम म्हणाली," दादा या जगात सर्वांनाच कष्ट करावे लागतात. तुम्ही केलेल्या कष्टाची पोचपावती तुम्हाला मिळाली आहे. तुम्ही ज्या लोकांमध्ये जायचं नाही असं म्हणतात त्या लोकांमध्ये तुमचे दोन भाऊ आहेत, एका भावामुळे तुम्हाला घराबाहेर जावं लागलं तरी दुसऱ्या भावाचा यात काहीच दोष नव्हता. या लोकांमध्ये तुमची आई सुद्धा आहे जिने तुम्हाला नऊ महिने पोटात ठेऊन जन्म घातला आहे, त्या स्त्रीमुळे तुम्हाला हा जन्म मिळाला आहे आणि हे सुंदर जग बघायला मिळालं आहे,तिचे उपकार फेडणं तुम्हाला या जन्मात तरी शक्य आहे का? दादा आपलं कौतुक करायला, पाठीवर शाबासकीची थाप द्यायला आपलेच लोकं लागतात. जेव्हा तुमची ही प्रगती तुमचे भाऊ, आई बघतील तेव्हा त्यांच्या डोळयात तुमच्या बद्दल नक्कीच अभिमान असेल. दादा मी तुमच्या पेक्षा खूप लहान आहे, मी तुम्हाला काही सांगावं आणि तुम्ही ते ऐकावं असं कदाचित होणार नाही. पण एकच गोष्ट ऐका, शेवटचं त्या माऊलीला भेटा, तिची इच्छा पूर्ण करा."

उमेश म्हणाला," मी लगेच काही सांगू शकणार नाही, मला विचार करावा लागेल."

पुनम म्हणाली," नक्कीच तुम्ही विचार करुन निर्णय घ्या पण शेवटचं एकच सांगेन की समजा तुमच्या वडिलांनी तुम्हाला घराबाहेर काढले नसते तर तुम्ही त्या एका छोट्याशा गावात शेती करत असता पण आज पुण्यासारख्या शहरात तुमचं आलिशान घर आहे, तुमचा स्वतःचा बिजनेस आहे, इथे तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे सर्व त्या गावात झाले असते का? याचा एकदा विचार करा म्हणजे तुम्हाला तुमचा निर्णय घेता येईल."

एवढं बोलून पुनम उमेशच्या घरुन निघून जाते. पुनम घरी जात असताना वाटेतच तिला अर्जुनचा फोन येतो,

"हॅलो पुनम गाडीवर आहेस का? गाडी जरा साईडला घेते का?" 

पुनम गाडी साईडला घेऊन म्हणाली," बोल काय म्हणतोस?"

अर्जुन म्हणाला," पुनम अभिनंदन तु आत्या झाली आहेस, its a baby boy."

पुनम खुश होऊन म्हणाली," वाव congrats दादा, वहिनी बरी आहे ना?"

अर्जुन म्हणाला,"हो रश्मी व बाळ दोघेही सुखरुप आहेत, बरं ऐक ही बातमी तु प्रविणला सांगशील, मी मॅसेज करेल पण फोन करायला वेळ नाही मिळणार."

पुनम म्हणाली," नो प्रॉब्लेम, मी प्रविणला सांगते."

घरी गेल्याबरोबर अर्जुनला मुलगा झाल्याचे पुनमने प्रविणला सांगितले. अर्जुनने सानवीला दाखवण्यासाठी बाळाचे फोटो पाठवले होते. अर्जुनने स्वतः फोन करुन आपल्याला ही बातमी दिल्याबद्दल पुनमला मस्त वाटले होते. अर्जुनच्या बोलण्यातील, वागण्यातील बदल पुनमला अनुभवायला मिळाला होता. उमेश घरी येईल की नाही याचं टेन्शन पुनमला आलं होतं, तिने तिचे प्रयत्न केले होते पण त्या प्रयत्नांना यश येईल की नाही ही शंका राहून राहून पुनमच्या मनात येत होती.

शनिवारी प्रविणला सुट्टी असल्याने तो घरीच होता. पुनम व सविता किचनमध्ये काम करत होत्या. प्रविण सानवीला पेंटिंग शिकवत होता. रुममध्ये बसून बसून कंटाळा येत असल्याने आई हॉलमध्ये येऊन बसली होती. दरवाजावरची बेल वाजल्याने प्रविण दरवाजा उघडण्यासाठी उठला व त्याने दरवाजा उघडला तर समोर उमेश व गीता होते त्यांना अचानक आपल्या घरी बघून प्रविण आश्चर्याने बघून म्हणाला,"तुम्ही दोघे आणि इथे?"

प्रविण असं बोलल्यावर पुनम कोण आलंय हे बघण्यासाठी दरवाजाजवळ आली, समोर उमेश व गीताला बघून ती हसतमुखाने म्हणाली," तुम्ही आत या ना."

उमेश व गीता घरात आले तर आई समोरच सोप्यावर बसलेली होती. आई उमेश व गीताकडे बघतच राहिली. उमेश आईच्या शेजारी जाऊन बसला तर गीता आईच्या पाया पडली. उमेशला बघून आईच्या डोळयात पाणी आलं होतं. उमेश व गीता घरी आल्यामुळे पुनम मनातून खूप जास्त खुश झाली होती. बाहेर कोण आलंय हे बघण्यासाठी सविता किचन मधून बाहेर येऊन आली, उमेश व गीताला बघून ती आश्चर्याने म्हणाली," उमेश भाऊजी, गीता तुम्ही इथे कसे काय आलात?"

उमेश म्हणाला," मला माझ्या आईला भेटायचं होतं, म्हणून मी आलो."

पुनम उमेश व गीता साठी पाणी घेऊन आली. प्रविण एका खुर्चीवर येऊन बसला होता, उमेशला बघून आईला काय बोलावं? हेच कळत नव्हतं. उमेश आईकडे बघून म्हणाला, "आई तु कशी आहेस? तुझी तब्येत इतकी खराब कशी काय झाली?"

आई म्हणाली,"मी बरी आहे, आता इतक्या वर्षांनी तु मला बघितलं आहेत म्हणून माझी तब्येत तुला खराब वाटत आहे."

"उमेश तुला माझा पत्ता कुठून मिळाला?" प्रविणने विचारले

यावर गीता म्हणाली," उमेशने तुमच्या सोबत पुनमला बघितले होते आणि माझी व पुनमची ओळख चैतालीच्या इथे झाल्याने तुमचा पत्ता या ठाऊक होता."

आई म्हणाली," ते काहीही असो पण तुम्हाला दोघांना मला भेटायला यावे वाटले हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे. उमेश तु पुन्हा मला सोडून तर जाणार नाही ना?"

उमेश म्हणाला,"नाही ग आई, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. आई मी इथून जवळच राहतो, तु माझ्याकडे येऊन राहतेस का? आई तु माझ्या घरी आलीस तर मला खूप बरं वाटेल."

आई म्हणाली," माझी अँजिओप्लास्टी झाली की मग मी तुझ्या घरी येईल, तोपर्यंत मी इथेच बरी आहे."

उमेश व आईमध्ये बऱ्याच गप्पा झाल्या, एवढी वर्षे आईच्या जे मनात साचलं होतं ते आईने उमेश व प्रविण समोर मोकळं केलं. आईने प्रविण व उमेशची हात जोडून माफी मागितली. उमेशने घरातील सर्वांनाच माफ केले होते. प्रविण सोबत भेट होऊन सुद्धा उमेश बोलला नव्हता त्याबद्दल त्याने प्रविणला सॉरी म्हटलं. 

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all