रेशीमबंध भाग ३५

Story Of A Relationship

मागील भागाचा सारांश: प्रविणच्या आईची अँजिओग्राफी दोन दिवसांनी असणार हे त्यांना कळाल्यावर त्या घाबरल्या होत्या, म्हणून पुनमने त्यांना काळजी करण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगितले. पुनम व प्रविणच्या आईमध्ये बऱ्याच गप्पा झाल्या. प्रविणच्या आईने स्वतः केलेल्या चुका मान्य केल्या तसेच तिला तिच्या तिन्ही मुलांना एकत्र आणण्याची इच्छा असल्याचे तिने पुनमला सांगितले. प्रविणच्या दुसऱ्या भावाला शोधण्याचे चॅलेंज पुनम पुढे उभे राहिले होते. सविता व पुनम त्यांच्या सासूबाईला त्यांची फॅमिली एकत्रित आणण्यासाठी मदत करणार होत्या.

आता बघूया पुढे....

प्रविणच्या आईला अँजिओग्राफी साठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं, त्यांची अँजिओग्राफी झाल्यावर डॉक्टरने रिपोर्ट सांगितला की त्यांना दोन मायनर ब्लॉकेजेस आहेत तरी अँजिओप्लास्टी करुन घ्या, त्याच दिवशी प्रविण व त्याचा दादा आईला घरी घेऊन आले. आईला थोडा अशक्तपणा आलेला होता. सविता व पुनमने आईला एका रुममध्ये नेऊन झोपवले होते. पुनम किचनमध्ये प्रविण व त्याच्या दादासाठी चहा बनवत होती. सविता आईंच्या रुममधून बाहेर हॉलमध्ये आली व तिने प्रविणला विचारले," प्रविण भाऊजी आईंची अँजिओप्लास्टी कधी करावी लागणार आहे?"

प्रविण म्हणाला," डॉक्टर म्हणाले की ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली तरी चालेल. आई पूर्णपणे शुद्धीत आल्यावर तिला विचारुन ठरवूयात."

प्रविणचा दादा म्हणाला," आपण दोघे उद्या गावाला परत जाऊयात आणि अँजिओप्लास्टीच्या वेळी परत येऊयात."

सविता म्हणाली," मी काय म्हणते? इथे सरीता ताई नसल्याने पुनमची खूप धावपळ होत आहे तर मी इथेच थांबू का? म्हणजे आईंना तेवढंच बरं वाटेल आणि पुनमला माझी मदतही होईल."

प्रविणचा दादा म्हणाला," ठीक आहे,तु इथे थांबल्याने आईला बरंच वाटेल. मग मी उद्या गावाकडे जातो आणि तेथील शेतीची कामे उरकून येतो, कांदे विकून येतो म्हणजे आईच्या अँजिओप्लास्टीचं बिलं भरता येईल."

यावर प्रविण म्हणाला," दादा आईच्या हॉस्पिटलच्या बिलाची तु काळजी करु नकोस. जे काही हॉस्पिटलचं बिल होईल ते मी भरतो."

प्रविणच्या दादाने मान हलवून होकार दिला. पुनम प्रविण व त्याच्या दादासाठी चहा घेऊन बाहेर आली व ती सविताला म्हणाली," ताई तुम्हाला इथं रहायचं असेल तर रहा, मी आईंचं सगळं मॅनेज करुन घेईल, तसंही सरीता ताई चार दिवसांनी येणारच आहेत, तुमच्या शिवाय गावाकडची काही कामे अडत असतील तर तुम्ही जा, उगाच मुलांची गैरसोय व्हायला नको."

सविता काही बोलणार इतक्यात प्रविणचा दादा म्हणाला," नाही नको, सविताला इथेच राहूदेत, नाहीतर पुढे जाऊन तुम्ही म्हणाल की आईचं सर्व तुम्हीचं केलं म्हणून. आई जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत सविता इथेच राहील."

सविता म्हणाली," अहो आता यावरुन उगाच वाद उकरुन काढू नका. मी इथेच राहणार आहे तेव्हा तुम्ही भळत्याच दिशेला जाऊ नका. सगळं शांततेत चालू आहे तर चालुद्या."

प्रविणच्या दादाने सविताकडे रागाने पाहिलं. सविता किचनमध्ये निघून गेली. पुनम व सविता रात्रीच्या स्वयंपाकाला लागल्या होत्या. प्रविण सानवी सोबत खेळत होता तर त्याचा दादा खाली फिरायला म्हणून गेला होता. स्वयंपाक करता करता पुनम म्हणाली, "सविता ताई तुम्ही दादांपुढे अश्याप्रकारे बोलण्याची हिम्मत कशी काय केली? तुम्हाला दादांची भीती वाटली नाही का?"

सविता म्हणाली," मला एक माहीत होतं की तुमच्या दोघांसमोर ते मला काहीच बोलले नसते आणि घरी जाऊन बोलायला मी खूप दिवसांनी घरी जाणार आहे, त्यामुळे मी काही विचार न करता मनात जे आलं ते बोलून गेले. पुनम मी मागच्या वेळी इथून गेल्यावर विचार केला की ह्या एका माणसामुळे माझी इमेज पूर्ण बिघडली आहे, कोणालाच माझं बोलणं, वागणं खरं वाटतं नाही. सर्वांच्या नजरेत मी चुकीची व्यक्ती आहे तर माझी इमेज मलाच बदलावी लागणार आहे. मला ह्यांच्या सर्व खेळी कळत असून सुद्धा मी ह्यांच्यापुढे काहीच बोलत नव्हते कारण मला घरात वादविवाद नको होते, आपल्यामुळे आपल्या मुलांचं नुकसान नको व्हायला म्हणून मी शांत बसत होते. मी बोलत नव्हते म्हणजे मला बोलताच येत नाही असा यांनी समजच करुन घेतला होता. मला इतक्या दिवस त्याच काही वाटतंच नव्हतं. 

काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाला मी रागवायला गेले तर तो मला म्हणाला की तु मला काहीच बोलायचं नाही, तु बाबांसमोर काही बोलू शकत नाही तर माझ्या पुढेही काहीच बोलायचं नाही. बाबा जसे म्हणतात की तुला अक्कल नाहीये, तुझं डोकं चालवायचं नाही ते खरं आहे, तु माझ्यापुढे सुद्धा काहीच बोलायचं नाही. तुझं शिक्षण कमी झालेलं आहे तेव्हा मला जास्त शिकवायला जायचं नाही.

पुनम त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं म्हणून सांगू म्हणजे आजपर्यंत मी ह्याचं जे सहन करत आले होते ते माझ्या मुलांसाठीच आणि ही मुलंच जर मला किंमत देत नसतील तर मी का हे सर्व सहन करु? म्हणून मग मी ठरवलं की आता बास झालं. इतकी वर्ष ह्याचं खूप ऐकून घेतलं, आता ह्याचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. मला त्या सर्वांतून थोडा ब्रेक पाहिजे होता म्हणून मी ह्यावेळी तुमच्या घरी राहणार आहे, कारण आईंचं सांगितलं आहे पण मी स्वतःसाठी इथे राहणार आहे. पहिले मुलं लहान असताना माहेरी राहणं तरी व्हायचं, आता तर दोन दिवसांच्या वर तिथे रहायला भेटत नाही आणि जास्त दिवस रहायचं जरी ठरवलं तरी वहिनीचे नाक डोळे फिरतात. माहेर आणि सासर ही दोन ठिकाणे सोडली तर मी कुठेच गेलेली नाहीये, हे बऱ्याच ठिकाणी फिरुन येतात पण मला सोबत न्यावे असं त्यांना कधीच वाटलं नाही. आताही गावचं इलेक्शन जवळ आलं आहे आणि ह्यांना प्रचारासाठी फिरावं लागतं, मी असल्यावर घरी उशीरा आल्यावर मी बडबड करते ना, म्हणून त्यांनी मला इकडे रहायची परवानगी दिली आहे. मी नसल्यावर त्यांना रान मोकळं मिळेल."

पुनम म्हणाली," ताई हे घर तुमचं समजूनच इथे रहा, तुम्ही कितीही दिवस इथे राहिलात तरी चालेल. तुम्ही इकडे, दादा घराबाहेर राहिल्यावर मुलांसोबत कोण राहील? त्यांना भीती वाटणार नाही का?"

सविता म्हणाली," गाई म्हशी सांभाळण्या करता दोन गडींच्या जोड्या ठेवलेल्या आहेत, त्या दोघीजणी घरातील कामही करतात आणि ते घराशेजारीच राहत असल्याने घराचं राखणं सुद्धा करतात, मग भीतीचा काही प्रश्नच उरत नाही. इतके दिवस मी मुलांचा विचार करुनच कुठे दुसरीकडे जाऊन जास्त दिवस राहत नव्हते पण त्यांना माझी किंमत कळायला पाहिजे आणि म्हणूनच मी इथे राहत आहे. माझ्या गैरहजेरीत त्यांना माझी किंमत कळेल अशी मला अपेक्षा आहे. पुनम बाई माणसाचं आयुष्यच अवघड असतं, आधी वडिलांच्या मर्जीप्रमाणे वागायचं, त्यानंतर भाऊ जे म्हणेल ते ऐकायचं. लग्न झाल्यावर नवऱ्याला देव मानायचं आणि नंतर मुलं मोठी झाली की त्यांचं ऐकायचं. आपल्याला आपलं असं अस्तित्व नाहीच का? आपण आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने कधी जगायचं? असं किती दिवस बाकीचे जसं म्हणतील तसं जगायचं."

पुनम सविताकडे कौतुकाने बघत म्हणाली, "ताई तुमच्यात जो हा बदल झाला आहे, तो एका दिवसात झालेला नसेल ना, कारण मागच्या वेळी ज्या सविता ताईंना मी भेटले होते त्या आज पूर्णपणे बदलल्या आहेत. मला तुमच्यातील हा बदल खूप आवडला आहे."

सविता म्हणाली," माझ्यात झालेला बदल हा एका दिवसातील नाहीयेच. आपण बदलायचं असं मनापासून ठरवलं होतं पण हिम्मत होत नव्हती. आता माझ्यात हिम्मत आली आहे. माझं राहूदेत उमेश भाऊजींचा काही शोध लागला की नाही?"

पुनम म्हणाली," ताई अजून शोध घ्यायला सुरुवात केली नाहीये. दररोजच्या कामातून मोकळा वेळ तर भेटला पाहिजे. उद्या संध्याकाळी थोडा मोकळा वेळ मिळणार होता तर आत्ताच माझ्या एका मैत्रिणीचा मॅसेज आला आहे की ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तर उद्या तिला भेटायला जावे लागेल."

सविता म्हणाली," हो का? तुझ्या मैत्रिणीला काय झालंय?"

पुनम म्हणाली,"तिची लॅप्रोस्कोपी झाली आहे, पुढील दोन दिवस ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणार आहे."

दुसऱ्या दिवशी प्रविणचा दादा गावी निघून गेला. सविता मात्र पुनमच्याच घरी थांबली होती. सविता घरातील काम करत असल्याने पुनमवरील कामांचा भार हलका झाला होता. संध्याकाळी घरातील कामं लवकर आटोपून पुनम चैतालीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली. सानवीला तिने घरीच ठेवलं होतं. चैताली ज्या रुममध्ये ऍडमिट होती त्या रुममध्ये पुनम गेली होती, त्या रुममध्ये चैताली व प्रदीप हे दोघेच होते. पुनमला आलेलं बघून प्रदीप म्हणाला," चैताली पुनम आहे तोपर्यंत मी जरा बाहेर जाऊन येतो."

चैतालीने मान हलवून होकार दिला. प्रदीप बाहेर निघून गेला. 

"चैताली बरं वाटतंय का?" पुनमने चैताली जवळ जाऊन विचारले

चैताली म्हणाली," पुनम ह्या सर्वच प्रोसिजर खूप pain full आहेत ग, लॅप्रोस्कोपी होण्याच्या कितीतरी वेळ आधी पाणी प्यायचं नव्हतं की काही खायचं नव्हतं. लॅप्रोस्कोपी झाल्यानंतर सुध्दा जवळजवळ बारा तास पाणी पिलं नव्हतं त्यात भूल उतरेपर्यंत होणारा त्रास, आता तर ह्या टाक्यांना पुढच्या दहा दिवस जपायचं. सर्व कठीण आहे."

पुनम म्हणाली," चैताली तु या सर्व प्रोसिजरचा जेवढा त्रास करुन घेशील ना, तेवढा अधिक त्रास तुला जाणवेल, आपण हे सर्व एका चांगल्या कामाकरता करत आहोत की नाही. चैताली ह्या सर्वांतून प्रत्येक स्त्रीला जावंच लागतं, त्याला दुसरा पर्यायच नाहीये. एवढा मेंटल स्ट्रेस घेऊ नकोस, त्याने तुला अधिक त्रास होईल. रात्री तुझ्याजवळ काकू होत्या ना?"

चैताली म्हणाली," हो आई सकाळपर्यंत होती. प्रदीप आल्यानंतर आई निघून गेली, आईला इथे राहिल्याने चक्कर यायला लागली होती मग ती घरी निघून गेली."

पुनम म्हणाली," आज रात्री तुझ्यासोबत कोण राहणार आहे?"

चैताली म्हणाली," प्रदीपची एक दूरची मावस बहीण आहे, ती इथून जवळच राहते, तिच्या अडचणीच्या काळात प्रदीपने तिला व तिच्या नवऱ्याला भरपूर मदत केली होती, काल अचानक प्रदीप व तिची भेट इथे हॉस्पिटलमध्ये झाली होती, आज रात्री साठी तिलाच बोलावले आहे."

पुनम म्हणाली," अच्छा बरं आहे."

"तुझ्या सासूबाईंची अँजिओग्राफी झाली का? त्यांची तब्येत कशी आहे?" चैतालीने विचारले

पुनम म्हणाली," कालच आईंची अँजिओग्राफी झाली, त्या बऱ्या आहेत. दोन मायनर ब्लॉकेज आहेत, अँजिओप्लास्टी करावी लागणार आहे. माझ्या जाऊबाई सविता ताई आमच्याकडे रहायला आल्या आहेत. प्रविणचा दोन नंबरचा भाऊ बऱ्याच दिवसापासून घर सोडून गेला होता, त्याला शोधण्याचे काम माझ्यावर आले आहे, त्यांना कसं शोधावे हेच कळत नाहीये. माझ्या सासूबाईंना त्यांची तिन्ही मुलं एकत्र आल्याचे बघायचे आहे. मी त्यांची मदत करण्याचे ठरवले आहे."

चैताली म्हणाली," अग मग सोशल मीडियावर तु त्यांना शोधू शकतेस ना? तुला त्यांचं नाव माहीतच असेल ना?प्रविण सरांनी त्यांना बघितलेलं असेलच ना, म्हणजे फोटो वरुन ते त्यांना ओळखतील."

पुनम म्हणाली," प्रविणला मी अजून याबद्दल सांगितलेलं नाहीये, ते मला त्यांच्या फॅमिली मॅटरमध्ये पडू देत नाहीत, actually प्रविणचा हेतू चांगलाच असतो पण मला त्यांच्या आईची मदत करण्याची खूप इच्छा आहे."

पुनम चैताली सोबत बोलत असतानाच प्रदीपची दूरची मावस बहीण तिथे येते. चैताली तिची व पुनमची ओळख करुन देते.पुनम प्रदीपची वाट बघत बसलेली असते, तो परत आल्यावर पुनम घरी जाण्यासाठी निघणार होती. थोड्या वेळात प्रदीप तिथे येतो मग पुनम आपल्या घरी निघून जाते.

©®Dr Supriya Dighe







🎭 Series Post

View all