रेशीमबंध भाग ३४

Story Of A Relationship

मागील भागाचा सारांश: पुनम चैतालीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली होती. पुनमला सरीता ताईंनी फोन करुन सांगितले की त्यांची आई खूप आजारी असल्याने त्या अर्जंट गावी गेल्या होत्या. आता प्रविणच्या आईची कामे सर्व पुनमला करावी लागणार होती. प्रविणच्या आईला पुनमच्या हातचं जेवण जेवल्या शिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता. प्रविणची आई पुनम सोबत थोडं फार बोलायला लागली होती तसेच प्रविणची आई सानवीला सांभाळू लागली होती.

आता बघूया पुढे....

दोन दिवसांनी प्रविणच्या आईची अँजिओग्राफी ठरली होती. गावावरुन प्रविणचे दादा वहिनी येणार होते कारण हॉस्पिटलमध्ये प्रविणच्या आईजवळ थांबायला कोणी तरी पाहिजे होते. दोन दिवसांनी आपली अँजिओग्राफी आहे हे कळाल्यावर प्रविणची आई मनाने थोडी खचली होती, त्या दिवशी दुपारी त्यांनी जेवण कमीच केले होते, त्यांची मनस्थिती बिघडल्याचे पुनमच्या लक्षात आले होते म्हणून पुनम त्यांच्या रुममध्ये जाऊन म्हणाली," आई तुम्हाला बरं वाटतं नाहीये का?"

प्रविणची आई म्हणाली," नाही मी बरी आहे."

पुनम म्हणाली," मग तुम्ही जेवण कमी का केलं?"

प्रविणची आई म्हणाली," मला प्रविणने सांगितलं की परवा माझी अँजिओग्राफी आहे तर का कुणास ठाऊक पण मला मनातून भीती वाटत आहे."

पुनम म्हणाली," आई भीती वाटण्याचं काहीच कारण नाहीये, जशी आपण ब्लड टेस्ट, सोनोग्राफी करतो तशीच ती एक हृदयाची तपासणी असते, त्यात घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. तुम्ही जर घाबरलात तर तुमचा ब्लड प्रेशर कमी जास्त होईल आणि पुन्हा तुमची तब्येत बिघडेल, डॉक्टर अँजिओग्राफी पुन्हा पुढे ढकलतील."

प्रविणची आई म्हणाली," समजा अँजिओग्राफी मध्ये ब्लॉकेज निघाले तर ऑपरेशन करावं लागेल ना, मला त्याचीच जास्त भीती वाटत आहे, या ऑपरेशन दरम्यान मला काही झालं तर."

पुनम म्हणाली," आई आपण नेहमी चांगल्याचाच विचार करायचा. ब्लॉकेज निघाले तरी ऑपरेशन करता येईल,ते खूप मोठं ऑपरेशन नसतं. ऑपरेशन दरम्यान तुम्हाला काहीही होणार नाही. आई ज्याची त्याची जायची वेळ ठरलेली असते, कोण कधी जाईल? हे आपण सांगू शकत नाही. आता आपल्या बाबांचंच घ्या ना, कोणाच्याही ध्यानात मनात नसताना ते अचानक गेले. आपण काहीच करु शकलो नाही. कोरोनामध्ये किती जणांच्या घरातील एकजण तरी एक्सपायर झालं आहे, ते तर स्वतःच्या पायाने घरातून हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि पुन्हा घरी परतले सुद्धा नाही. आई आजकाल मृत्यू सुद्धा खूप सोपा झाल्यासारखा वाटत आहे. तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही जाणारच आहात पण त्यासाठी आजचा हा आनंदी क्षण वाया का घालवत आहात? आई जन्माला आलेला प्रत्येक जण हा जायलाच आला आहे, आपल्या सगळयांना हे माहीत आहे की आपण सगळे जण एक ना एक दिवस मरण पावणार आहोत म्हणून आपण जगणं तर सोडून देत नाही ना? आई तुम्ही तुमच्या मुलांकडे बघा, मला दादांबद्दल, त्यांच्या स्वभावाची मला एवढी कल्पना नाहीये पण तुम्ही बऱ्या व्हाव्यात ही त्यांची सुद्धा मनापासून इच्छा आहे. तुमच्या मुलांकडे बघून खुश रहा, त्यांनी जर तुम्हाला असं खचलेलं बघितलं तर तेही मनातून खचतील. तेव्हा प्रसन्न मनाने हॉस्पिटलमध्ये जा, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट रहावं लागलं तर रहा. मी तुम्हाला डबा देत जाईल, तुम्हाला जे खायची इच्छा होत असेल ते मला सांगा. तुम्ही लवकर बऱ्या होण्यासाठी मी देवाला प्रार्थना करणार आहे."

पुनमचं बोलणं ऐकून प्रविणच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं, त्या पुनमला म्हणाल्या," पुनम मला माफ कर, मी तुझ्या बद्दल खूप मोठा गैरसमज करुन घेतला होता. मी तुझ्या सोबत नीट बोलले नाही की तुझ्या हातचं जेवण सुद्धा मला चाललं नव्हतं, आणि तु मात्र माझं एवढं सगळं मनापासून करत आहेस."

पुनम म्हणाली," आई मी तुमच्या पेक्षा खूप लहान आहे, तुम्ही माझी माफी का मागत आहात? त्याची काहीच गरज नाहीये. माझ्यावर रागावण्या मागे तुमच्या मुलाचं सुख हाच एकमेव तुमचा हेतू होता, बरोबर ना. मी तुमच्यावर अजिबात रागावलेली नव्हते. तुमच्या बोलण्याचा, वागण्याचं मला वाईट वाटलं होतं. मी ते केव्हाच विसरले आहे. तुम्हीही विसरुन जा."

प्रविणची आई म्हणाली," पुनम तु खूप मोठ्या मनाची आहेस. मला प्रविणचीच काळजी लागून राहिली होती. एकतर आधी तो लग्न करायलाच तयार होत नव्हता, आणि नंतर लग्नाला तयार झाला तर मी नाही म्हणत होते, त्याने मला न सांगता लग्न केले तर मला त्याचा खूप राग आला होता. तुमचा संसार बघून माझं मन भरुन पावलं. आता मला प्रविणची काळजी करण्याची काही गरज नाहीये, तु आणि सानवी त्याला त्याच्या वाट्याचं प्रेम देऊ शकता. सानवी त्याला मुलीचं प्रेम देत आहे. तु त्याच्या सोबत भक्कमपणे उभी आहेस. प्रविणचं व त्याच्या भावाचं काही बरं नाहीये, दोघांच्यात सतत वाद विवाद चालू असतात, दोघेही माघार घेत नाहीत म्हणून मला प्रविणची खूप काळजी वाटायची."

पुनम म्हणाली," आई तुम्ही विषय घेतला आहेच म्हणून विचारते. ह्या दोन भावांमध्ये चुकी कोणाची आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? चूक कोणाची हे कळालं तर दोघांना एकत्र आणणं सोपं जाईल."

प्रविणची आई म्हणाली," तुला सविता हे सर्व बोलली असेल ना? तिची दाट इच्छा आहे की आपल्या फॅमिलीने मिळून मिसळून रहावं म्हणून, ती याबद्दल माझ्या सोबत अनेकदा बोलली आहे. पुनम या सगळयात जर चूक असेल तर ती आमच्या दोघांची होती. आम्हाला हे तीन मुलं आहेत, एकाला तु भेटली आहेसचं, दुसरा मुलगा असाच रागाने घरातून दूर कुठेतरी निघून गेला आहे, तो त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीला सुद्धा आला नव्हता. सविताचा नवरा हा माझा मोठा मुलगा आणि प्रविण सगळयात लहान मुलगा. यांनी पहिल्या पासून सगळं मोठ्याच्या कलाने घेतलं, तो जे म्हणेल ती पूर्व दिशा, यांनी जरा जास्तच लवकर व्यवहाराची सूत्रे मोठ्या मुलाच्या हातात टेकवली. साहजिकच होतं की याचा राग दुसऱ्या मुलाला येऊच शकत होता, त्याचंही लग्न झालं होतं पण त्याला घरात काही मानपानचं नव्हता,मी किंवा त्याचे बाबा सुद्धा मोठ्या मुलालाच प्राधान्य द्यायचो, हे दुसऱ्या मुलाच्या बायकोला खटकत होते, तिने त्याचे कान भरायला सुरुवात केली होती, त्याच्या मनात आमच्या बद्दल आधीच राग होताच, बायकोने त्याला दुजोरा दिल्यावर तो भयंकर चिडला होता. एके दिवशी त्याने आमच्याकडे वाटा मागितला तेव्हा यांनी मागचा पुढचा विचार न करता कितीतरी पैसे त्याला दिले व घरातून जायला सांगितले, तो ही पुढील काही तासातच घराबाहेर पडला ते आजपर्यंत तो घरी कधीच परतला नाही. मला त्याची अधूनमधून आठवण यायची पण यांनी त्याला मृत समजून आयुष्य जगायला सुरुवात केली होती.

प्रविण शिक्षण करत असल्याने बाहेर गावी होता, त्याचा व गावातील जमिनीचा, व्यवहाराचा काहीच संबंध नव्हता,त्याला कधी आमच्या प्रॉपर्टीची हाव सुद्धा नव्हती. दादाच्या नात्यातील मुलगी म्हटल्यावर आम्ही साधा तपास सुद्धा केला नाही आणि तिचं लग्न प्रविण सोबत लावून दिलं. प्रविण घटस्फोट घ्यायचा म्हटल्यावर यांनी व दादाने व कडकडून विरोध केला पण प्रविणला सगळं असह्य झाल्याने त्याने शेवटी घटस्फोट घेतलाच,त्याचे बाबा त्याला घालून पाडून बोलायचे म्हणून त्याने गावी येण बंद केलं होतं. आताही तुमचं लग्न होण्याआधी त्याच्या दादाने सोनाली सोबत लग्न करावे म्हणून त्याला आग्रह करत होता, का तर म्हणे तिचे वडील जमीन देणार होते. प्रविणने तुझ्या सोबत लग्न केल्यावर दादाचा एवढा जळफळाट त्यामुळेच झाला होता आणि त्याने मला प्रविणच्या विरोधात खूप भडकवले होते. 

मी तुमच्या घरी राहत असताना आजपर्यंत सर्व घटनांचा विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी व यांनी दादावर, त्याच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तो जे सांगेल ते खरं मानलं. बाकी दोन मुलांचा, त्यांच्या मनाचा विचारच केला नाही. दादाला आता असं वाटतं होतं की त्याने जसा दुसऱ्या भावाचा पत्ता कट केला, तसा त्याला प्रविणचा पत्ता सुद्धा कट करायचा होता. दादाला प्रॉपर्टीत कोणालाच वाटा द्यायची इच्छा नाहीये आणि म्हणूनच तो हे सर्व करतो आहे.

पुनम मला ऑपरेशनची सुद्धा भीती त्यामुळेच वाटत आहे, मला इतक्यात मरायचं नाहीये. मला माझ्या बाकीच्या दोन्ही मुलांना त्यांचा हक्क द्यायचा आहे, दुसऱ्या मुलाला शोधून पुन्हा घरी परत आणायचे आहे."

पुनम म्हणाली," आई या तुमच्या लढाईत मी व सविता ताई तुमच्या सोबत असणार आहोत, आपण तिघी मिळून ह्या घरातील सर्वांना एकत्र आणू. तुम्ही असं खचून जाऊ नका. तुम्ही लवकर बऱ्या होणार आहात. आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे."

प्रविणची आई म्हणाली," सविता आल्यावर तिचं व माझं बोलणं होईल की नाही हे मी आत्ता सांगू शकत नाही पण तु मात्र हे सर्व तिला सांग म्हणजे तेवढंच तिच्या मनाला बरं वाटेल."

पुनम म्हणाली," आई तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, मी तुमच्या दुसऱ्या मुलाचा शोध घेते."

प्रविणची आई म्हणाली," तु त्याला कसं आणि कुठे शोधशील? तु तर त्याला बघितलेलं सुद्धा नाही."

पुनम म्हणाली," आई इच्छा तेथे मार्ग. मला त्यांचं नाव, त्यांच्या बायकोचं नाव सांगा, मी बरोबर त्यांना शोधून काढते, हल्ली सोशल मीडियावर सर्वांना शोधता येतं. मी माझे प्रयत्न करते."

प्रविणचा दादा व सविता वहिनी आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याच्या आदल्या दिवशी प्रविणच्या घरी येतात. दुसऱ्या दिवशी प्रविण व त्याचा दादा आईला हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी साठी घेऊन जातात. आई सोबत सविताला जायची गरज नसल्याने ती पुनम सोबत घरीच थांबते तेव्हा पुनम सविताला म्हणाली," सविता ताई मी आईंसोबत फॅमिलीला एकत्र आणण्याबद्दल बोलले होते."

सविता म्हणाली," हो का? मग आई काय म्हणाल्या?"

"आईंना पण सगळया मुलांना एकत्र आलेलं बघायचं आहे. आईंनी त्यांच्याकडून झालेली चूक मान्य केली, त्यांनीच सगळया मुलांना एकसमान वागवले नाही म्हणून त्यांच्या मुलांमध्ये फूट पडली आहे तसेच दादांना अतिमान दिल्याने ते कोणाचं ऐकत नाही की कोणाला जुमानत नाहीत." पुनमने सांगितले

सविता म्हणाली," बरं झालं, आईंना त्यांची चूक उमगली, मी बोलायला गेले असते तर त्यांना राग आला असता. तुला माझ्या बोलण्यावर आत्ता विश्वास बसला असेल ना?"

पुनम म्हणाली," ताई मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही पण पहिले माझा तुमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नव्हता. मी आईंना सांगितलं आहे की आपण दोघी त्यांना त्यांची फॅमिली एकत्र आणण्यासाठी मदत करणार आहोत म्हणून."

सविता म्हणाली," बरं मग पुढे काय करायचं ठरवलं आहेस?"

पुनम म्हणाली," आता सर्वात पहिले प्रविणच्या दोन नंबरच्या भावाला शोधावे लागणार आहे. तुम्हाला त्यांच्या बद्दल काही आयडिया आहे का?"

सविता म्हणाली," उमेश भाऊजींना तु कशी शोधणार आहेस कारण उमेश भाऊजी गीता सोबत घरातून निघून गेल्यापासून त्यांचा कोणालाच थांगपत्ता नाहीये."

पुनम म्हणाली," उमेश भाऊजींना गावात एकतरी मित्र असेल ना किंवा गीता ताईंच्या माहेरच्या कोणाचा तुमच्या कडे फोन नंबर नाहीये का?"

सविता म्हणाली," पुनम मी कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही हे सर्व हे ठरवत आले आहेत तेव्हा त्यांच्या पैकी कोणाचाच माझ्याकडे फोन नंबर नाहीये. एखाद्या नातेवाईकाकडून गीताच्या माहेरचा फोन नंबर मिळवता सुद्धा येईल पण पुन्हा सर्व नातेवाईकांमध्ये एकच चर्चा सुरु होईल, आपण करायला जाऊ एक आणि होईल एक असं होईल."

पुनम म्हणाली," बरं मी माझ्या पातळीवर उमेश भाऊजींना शोधायचा प्रयत्न करते."

पुनम उमेश व गीताचा शोध घेण्यात यशस्वी होईल का? बघूया पुढील भागात....

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all