रेशीमबंध भाग ३०

Story Of A Relationship
मागील भागाचा सारांश: अर्जुनने पुनमला सांगितल्या प्रमाणे दोन तीन दिवसांनी फोन केला होता, त्याने तिला सांगितले की त्याला पुनमची मदत करायची इच्छा होती पण त्याची अचानक नोकरी गेल्याने आर्थिक संकटात कश्या प्रकारे अडकला गेला होता आणि त्यानंतर रश्मीने पुनमला मदत करण्यापासून अडवले होते. अर्जुनने पुनमला हेही सांगितले की मागील सर्व सोडून देऊन आपण पुन्हा नव्याने सुरुवात करुयात, इथून पुढे मी फोन करुन तुझी चौकशी करत जाईल. अर्जुन प्रविण सोबत पण फोनवर बोलला.
आता बघूया पुढे....
प्रविण व पुनम या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. पुनम प्रविणच्या चेहऱ्यावरुन त्याच्या मनातील भाव समजायला लागले होते तर प्रविणला सुद्धा पुनमच्या मनातील समजायला लागले होते. दोघांचं नातं घट्ट होत चाललं होतं. एके दिवशी चैताली व प्रदीपला पुनमने आपल्या घरी जेवायला बोलावले होते. गप्पा मारता मारता चौघांचे जेवण झाले, त्यानंतर आईस्क्रीम आणण्यासाठी म्हणून प्रविण व प्रदीप सानवीला सोबत घेऊन बाहेर गेले होते. घरी पुनम व चैताली या दोघीच होत्या. चैताली पुनमला म्हणाली," पुनम तुझं व प्रविण सरांचं नातं पुढं गेलं की नाही की अजून जिथल्या तिथेच आहे."
पुनम म्हणाली," अजून जिथे आहे तिथेच आहे असं म्हटलं तरी चालेल."
चैताली म्हणाली," का ग? तुमच्या दोघांचं सूत जुळलं नाहीये का?"
पुनम म्हणाली," आमच्यात चांगली मैत्री झाली आहे, प्रविणला मी न सांगता बऱ्याच गोष्टी माझ्या मनातल्या कळतात. आमचं सूत हळूहळू जुळत आहे असं म्हणायला काही हरकत नाही.पण तु जसं म्हणत आहेस तिथं पर्यंत आमचं नातं अजून पोहोचलेलं नाहीये."
चैताली म्हणाली," तुमचं नातं घट्ट होतं आहे हे बघताना कळत आहे. प्रविण सरांना ऑफिसमध्ये पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा त्यांचा स्वभाव वेगळाच वाटला होता म्हणजे त्यावेळी खरंतर मला प्रविण सर अजिबात आवडले नव्हते पण मी तुला ते डायरेक्ट बोलू शकले नाही पण आज रोजी तुमच्या दोघांकडे बघताना खूप छान वाटत आहे, तुम्ही एकमेकांसाठी एकदम परफेक्ट आहात."
पुनम म्हणाली," आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहोत की नाही हे मला माहित नाही पण आम्ही एकाच परिस्थितीला सामोरे गेलो आहोत म्हणून कदाचित एकमेकांसोबत आम्ही जुळवून घेत असू."
चैताली म्हणाली," ते काहीही असो पण तु एका गोष्टीबाबत प्रविण सरांचे उपकार आयुष्यभर विसरु शकणार नाही ती अशी की प्रविण सरांनी सानवीला अगदी सहजपणे आणि पटकन स्विकारले आहे. असं दुसऱ्याच्या मुलीला स्वतःची मुलगी मानणे हे सोपं नाहीये. सानवी सोबत बोलताना, वागताना ते अजिबात जाणवत नाही."
पुनम म्हणाली," हो ना, त्या बाबतीत मी खरंच स्वतःला खूप नशीबवान समजते. प्रविणने सानवीला स्विकारल्यामुळे सानवीने पण त्यांना लगेच स्विकारले. एखाद्या वेळी तर मी सानवीला रागावते, ओरडते पण प्रविण एकदाही तिला ओरडत नाहीत की रागवत नाहीत,उलट ते मला सांगत असतात की तु तिला ओरडत जाऊ नकोस म्हणून."
चैताली म्हणाली," पुनम तु प्रविण सोबत किती खुश आहेस हे तुझ्या चेहऱ्यावरुन लगेच समजते.तुझ्या चेहऱ्यावर हाच आनंद बघण्यासाठी मी कधीची आतुरले होते. तु जरी कधी बोलून दाखवत नसलीस तरी निलेश एक्सपायर झाल्यापासून तु मनातून नाराज झालेली होती. तु वरवर दाखवायचीस की तुला लग्न करायचे नाहीये, तु एकटी खुश आहे पण पुनम तसं नव्हतं, बरोबर ना?"
पुनम म्हणाली," चैताली तुच माझी खरी मैत्रीण आहेस ग, तुझ्या पासून माझं काहीच लपत नाही. पुन्हा एखाद्या पुरुषावर विश्वास कसा ठेवायचा हा विचार करुनच मी लग्नाला नाही म्हणायचे, प्रविण मला फसवणार नाही याची खात्री तर मला आली आहे."
चैताली म्हणाली," तुमच्या दोघांमध्ये आजपर्यंत एखादं भांडण झालं आहे का? किंवा छोटं छोटे वाद होतात का? म्हणजे जनरली सगळया नवरा बायकोत होतात तसे."
यावर पुनम म्हणाली," अग एका घरात राहताना दोन व्यक्तींमध्ये भांडण होणार नाही असं कधी झालंय का? आमच्यात सुद्धा छोटे मोठे वाद होतंच असतात. उदाहरनार्थ मी सानवीला ओरडले तर त्यांना आवडत नाही, ओला टॉवेल बेडवर टाकणे मला खटकत, जागच्या वस्तू जागेवर न ठेवणे अश्या छोटमोठ्या गोष्टींवरुन चालूच असतं."
चैताली काही न बोलता फक्त हसली, म्हणून पुनम तिला म्हणाली," चैताली तु अशी का हसत आहेस? मी काही विनोदी बोलले का?"
चैताली म्हणाली," काही नाही तुमचं नातं लवकरच पुढे जाईल ही खात्री मला वाटत आहे, अग तुम्ही नवरा बायको सारखे भांडतात आणि तु म्हणतेस की आमच्यात फक्त मैत्री आहे. बरं जाऊदेत जेव्हा कधी तु प्रविण सरांच्या प्रेमात पडशील तेव्हा सर्वांत आधी मला सांगायला विसरु नकोस."
पुनम म्हणाली," चैताली प्लिज तो विषय आता बंद करशील. तु मागे एका स्त्रीरोगतज्ञांकडे गेली होतीस ना? त्याच पुढे काय झालं?"
चैताली म्हणाली," हो त्यांनी आमच्या दोघांच्या सर्व टेस्टस केल्या होत्या आणि पुढील बरेच ऑप्शन सांगितले होते पण त्यानंतर कोरोना आला आणि आम्ही पुढे काही केलंच नाही. प्रदीप म्हणत होते की आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंटला सुरुवात करुयात म्हणून. मला जर ट्रीटमेंट सुरु करायची असेल तर नोकरी सोडावी लागेल.नोकरी सोडण्याच्या बाबतीत माझं मन तयार होत नाहीये."
पुनम म्हणाली," हे बघ चैताली आपल्याला आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावंच लागतं, एक खड्डा भरण्यासाठी दुसरा खड्डा खोदावाच लागतो. सानवी माझ्या आयुष्यात नसतीच तर माझे काय झाले असते? याचा तरी तु विचार करुन बघ. मला कळतंय की ही पूर्ण प्रोसेस तुझ्यासाठी खूप कठीण असणार आहे त्यात तु नोकरी सोडलीस तर अजून तुला ते जास्त जाणवेल पण हे बघ ना की त्याचे फळ किती चांगले भेटणार आहे, थोडा सकारात्मक attitude ठेव, सर्व काही ठीक होईल. आपण जसे एखादे रोपटे, लावतो, त्याला पाणी देतो, खत देतो. आपण हे सर्व का देतो तर त्याचे फळ, फुल आपल्याला पाहिजे असते म्हणूनच ना. लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरु कर आणि त्यासाठी नोकरी सोडावी लागली तरी सोड, काही फरक पडणार नाही. दोन तीन वर्ष गॅप घे आणि त्यानंतर पुन्हा एकदा नोकरीला नव्याने सुरुवात कर."
चैताली म्हणाली," हम्मम, बघू आता पुढे काय होईल ते."
पुनम व चैतालीच्या गप्पा चालू असतानाच प्रविण व प्रदीप आईस्क्रीम घेऊन येतात, सर्वजण आईस्क्रीम खातात, आईस्क्रीम खाऊन झाल्यावर प्रदीप व चैताली आपल्या घरी निघून जातात. सानवी आता पाच वर्षांची पूर्ण होणार होती, पुढील काही दिवसांतच सानवीचा पाचवा बर्थडे येणार असतो म्हणून प्रविणने सानवीला विचारले की तुला तुझ्या बर्थडेला काय गिफ्ट हवं आहे? आणि तुला बर्थडे कसा साजरा करायचा आहे?
यावर सानवी म्हणाली," मला कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि माझा बर्थडे हॉटेलमध्ये मोठा करायचा आहे."
पुनम म्हणाली," सानू बाळा कोरोनामुळे आपण तुझा बर्थडे यावेळी मोठा व हॉटेलमध्ये करु शकणार नाही. पुढच्या वेळी कोरोना गेला की आपण तुझा बर्थडे मोठा करुयात."
सानवी म्हणाली," ओके मम्मा पण आपण कुठेतरी फिरायला जाऊयात."
प्रविण म्हणाला,"आपण इमॅजिकाला जाऊयात मग तर तु खुश होशील ना?"
पुनम म्हणाली," नाही नको, प्रविण अजून कोरोना गेलेला नाहीये आणि अश्या वातावरणात सानवीला तिकडे घेऊन जाणं मला पटतं नाहीये."
सानवी म्हणाली," डॅड तुम्हीच बघा ही मम्मा नेहमी अशीच करते."
प्रविण म्हणाला," मी ऑनलाईन चेक केलं आहे, इमॅजिकाला सगळे precautions घेतले जात आहेत. सानवीची बऱ्याच दिवसांपासून इमॅजिकाला जाण्याची इच्छा आहे तर तिला घेऊन जाऊया ना, काही होणार नाही."
पुनम चिडून म्हणाली," तुम्हाला जे करायचं ते करा पण काही इन्फेक्शन झालं तर मला सांगू नका."
सानवीच्या इच्छेखातर प्रविण व पुनम तिला घेऊन इमॅजिकाला गेले, सानवी तिथे मनसोक्त खेळली. प्रविण सोबत सगळया राईड्स सानवी खेळली. इमॅजिकाला जाऊन सानवी खूप खुश झाली होती. सुरवातीला पुनमला कोरोनाचे टेन्शन आले होते पण नंतर सानवीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून ती कोरोना विसरुन गेली होती. इमॅजिकाला जाऊन आल्यावर प्रविणचा फ्रॅक्चर झालेला हात दुखायला लागला होता म्हणून प्रविण डॉक्टरांकडे गेला होता, नेमका त्याच हॉस्पिटलमध्ये प्रविणला त्याचा दादा दिसला. प्रविण विचारात पडला की दादा इकडे ह्या हॉस्पिटलमध्ये कसा काय? म्हणून प्रविण दादाच्या पाठीमागे गेला तर त्याला समजले की त्याची आई त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. प्रविणची आई एका स्पेशल वार्डमध्ये ऍडमिट होती, प्रविण आईच्या रुममध्ये जाऊन उभा राहिला, त्याची आई बेडवर झोपलेली होती तर दादा व वहिनी तिथेच एका बेडवर बसलेले होते.
"वहिनी आईला काय झाले आहे?" प्रविणने त्याच्या वहिनीला विचारले
वहिनी प्रविणकडे बघून म्हणाली," आईंच्या छातीत दुखायला लागलं होतं,तसेच त्यांना श्वास घ्यायला त्रास होता, गावातील डॉक्टरांना दाखवलं होतं त्यांनीच या हॉस्पिटलमध्ये आईंना घेऊन जायला सांगितले होते."
प्रविण म्हणाला," आईला कधी ऍडमिट केलं आहे? आणि डॉक्टर काय म्हणाले?"
वहिनी म्हणाल्या," दोन दिवसांपूर्वी ऍडमिट केलं होतं. डॉक्टरांनी अँजिओग्राफी करायला सांगितली आहे. आईंना सध्या खूप अशक्तपणा आलेला आहे म्हणून अँजिओग्राफी पुढे ढकलली आहे."
प्रविण दादाकडे बघून म्हणाला," दादा तुला मला एकदा कळवावे असं पण वाटलं नाही."
दादा प्रविणकडे न बघता म्हणाला," ज्या मुलाला आपल्या आईची काळजी नाहीये त्या मुलाला आईची तब्येत बिघडल्याचं सांगून काय फरक पडणार आहे."
प्रविण म्हणाला," दादा प्लिज असं बोलू नकोस. दादा ही वेळ वादविवाद करण्याची नाहीये, आईची ट्रीटमेंट जर येथील हॉस्पिटलमध्ये घ्यायची असेल तर तिने माझ्याकडे राहिलेलंच योग्य ठरेल, प्रत्येक वेळी एवढ्या लांबून येणं आईच्या तब्येतीसाठी चांगलं नसेल."
दादा म्हणाला," आईला तुझ्या घरी घेऊन जाण्याआधी तुझ्या बायकोची परवानगी घे नाहीतर तु आईला घरी घेऊन जाशील आणि तुझ्या बायकोला ते पटणार नाही."
प्रविण म्हणाला," दादा असं काही होणार नाही.पुनम इतकीही वाईट नाहीये असो मी तुझ्या समोर तिची बाजू का मांडत आहे? आज रात्रीचं जेवण मी घरुन घेऊन येतो. डॉक्टर जे सांगतील त्यानुसार पुढे काय करायचं ते ठरवू."
यावर प्रविणचा दादा म्हणाला," आईला तुझ्या घरचं जेवण चालणार असेल तरच तु डबा घेऊन ये नाहीतर उगाच तिला अजून मनस्ताप होईल आणि तिची तब्येत बिघडेल."
प्रविण आईकडे बघून म्हणाला," आई मी जेवणाचा डबा घेऊन आला तर चालेल ना?"
आई हळू आवाजात म्हणाली," मी तुझ्या बायकोच्या हातचं काही खाणार नाही, एखाद्या खाणावळीतून डबा आणलास तरी चालेल. इथल्या जेवणाला काही चवच नसते, त्यामुळे ते जेवण घशाच्या खाली सुद्धा उतरत नाही."
प्रविण म्हणाला," आई आमच्याकडे स्वयंपाक करायला बाई आहे, मी तिच्याकडून तुझ्यासाठी डबा घेऊन येतो.( वहिनीकडे बघून म्हणाला) वहिनी तुम्हाला जर फ्रेश व्हायचे असेल तर तुम्ही माझ्या सोबत चला म्हणजे तुमचा थोडा फार आरामही होईल, डबा घेऊन येईल तेव्हा तुम्हाला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन येईल."
प्रविणच्या वहिनीने त्याच्या दादाकडे म्हणजेच तिच्या नवऱ्याकडे बघितले तर त्याने जा म्हणून सांगितले पण त्याआधी प्रविणच्या दादाने वहिनीला काहीतरी कानात सांगितले आणि मग प्रविण सोबत जाण्यास होकार दिला. प्रविणची वहिनी त्याच्या सोबत त्याच्या घरी गेली.
 प्रविणच्या दादाने वहिनीला काय सांगितले असेल, पुनमची प्रविणच्या वहिनीला अचानक बघून प्रतिक्रिया काय असेल हे बघूया पुढील भागात...
©®Dr Supriya Dighe

 


🎭 Series Post

View all