Aug 18, 2022
कथामालिका

रेशीमबंध भाग २

Read Later
रेशीमबंध भाग २

मागील भागाचा सारांश: पुनम ऑफिस मध्ये असताना तिला तिच्या आईचा फोन येतो, संध्याकाळी एका मुलाला भेटण्यासाठी कॉफी शॉपमध्ये जाण्याबद्दल आई तिला फोन करुन आठवण करुन देते. पुनमला लग्न करण्याची इच्छाच नसते ती त्या संदर्भात चैताली सोबत चर्चा करत असते, त्यांची चर्चा ऐकून त्यांच्या कंपनीतील पाटील मॅडम स्वतःचा अनुभव सांगून पुनमला पटवून देतात की लग्न करणे का महत्त्वाचे आहे.

आता बघूया पुढे...

पाटील मॅडमच बोलणं संपल्यावर चैताली त्यांना म्हणाली," मॅडम बरं झालं तुम्ही पुनमला या संदर्भात सांगितलं, मी व तिचे आई बाबा लग्ना बाबतच तिचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करुन थकून गेलो आहे पण आम्हाला काही यश आले नाही. तुमचा अनुभव ऐकल्यावर तरी मॅडमचे डोळे उघडतील अस वाटत आहे."

पाटील मॅडम हसून म्हणाल्या," सोनाराने कान टोचावे लागतात हे काही खोटं नाही, काय पुनम माझ्या बोलण्याचा विचार करशील की नाही?"

पुनम म्हणाली," हो मॅडम, मी नक्कीच तुमच्या बोलण्याचा विचार करेन. मॅडम कधी कधी अस होत की कळतंय पण वळत नाही. माझंही अगदी असंच झालंय, आई बाबांची कळकळ समजतेय पण पुन्हा कोणावर विश्वास ठेवायला मन तयार होत नाहीये. आज ज्या मुलाला मी भेटायला जाणार आहे त्याला जरा positive attitude ने भेटेल, बघू पुढे काय होईल ते."

" ऑल द बेस्ट" पाटील मॅडम म्हणाल्या.

पुनम व चैताली पाटील मॅडमच्या केबिन मधून बाहेर पडल्या. पुनम राहिलेले काम संपवण्यात मग्न झाली. ऑफिस सुटण्याच्या वेळी चैताली पुनमला म्हणाली," पुनम चल आपण निघूयात, राहिलेलं काम उद्या येऊन कर, कोणाला वाट बघायला लावणं बरं नाही. उगाच तुझं चुकीचं इम्प्रेशन पडायला नको."

पुनम म्हणाली," चैताली माझं पाच मिनिटांच काम बाकी आहे, तेवढं संपवते आणि मग मी निघते. मी बरोबर वेळेत पोहोचेल तेव्हा माझं चुकीचं इम्प्रेशन पडणार नाही."

आपले काम संपल्यावर पुनम ऑफीस मधून बाहेर पडली, चैतालीही तिच्या पाठोपाठ बाहेर पडली. पुनम पार्किंग मध्ये जाऊन गाडी काढत होती तोच चैताली तिला थांबवत म्हणाली, "पुनम त्या मुलाशी जरा समजदारीने बोल, घाई घाईत कुठल्याही निष्कर्षा पर्यंत पोहोचू नकोस. Anyways त्या मुलाचं नाव काय आहे? तो काय करतो?"

पुनम चैताली कडे रागाने बघत म्हणाली, "चैताली तु माझ्या सोबत येतेस का? आमच्या शेजारच्या टेबलवर बस आणि आमचं बोलण ऐक जेव्हा तुला वाटेल की माझं काहीतरी चुकतंय त्यावेळी मला सांग हं. त्या मुलाचं नाव प्रविण देशमुख आहे याव्यतिरिक्त मला त्याच्या बाबत काहीच माहिती नाही. मी त्याला भेटते आणि त्याचा पूर्ण बायोडाटा तुला पाठवते, चालेल का?"

चैताली हसून म्हणाली," पुनम तु राग आल्यावर अशी भारी दिसतेस ना, बरं चल तु जा, उगाच माझ्यामुळे उशीर व्हायला नको. रात्री मॅसेज ऑर कॉल करुन मला सविस्तर माहिती द्यायची आहे."

पुनम हसून म्हणाली," तुझ्यात काहीच सुधारणा होणार नाही, चल बाय."

पुनम कॉफी शॉपच्या रस्त्याला लागली. पुनमने आपली गाडी कॉफी शॉप जवळ पार्क केली, घड्याळात बघितले तर दिलेल्या वेळेच्या दोन मिनिटे आधी ती पोहोचली होती. पुनम कॉफी शॉपमध्ये जाऊन प्रविण ची वाट बघत बसली तोच एक मुलगा तिच्या जवळ जाऊन म्हणाला, "तुम्ही पुनम कदम आहात का?"

"यस मीच पुनम कदम आहे" पुनमने त्या मुलाकडे बघत उत्तर दिले.

तो मुलगा म्हणाला," हाय मी प्रविण देशमुख"

पुनम म्हणाली," हाय, प्लिज हॅव अ सीट"

" यस थँक यू" असे बोलत प्रविण पुनमच्या समोरील खुर्चीत बसला.

थोडा वेळ पुनम व प्रविण काहीच बोलले नाही, मग पुढाकार घेत प्रविण म्हणाला," आपण ऑर्डर देऊयात का?"

पुनमने मान हलवून होकार दिला. प्रविणने वेटरला बोलावून ऑर्डर दिली. ऑर्डर देऊन झाल्यावर प्रविण म्हणाला," आज माझी एक महत्त्वाची मिटिंग होती त्यामुळे दिवसभर काहीच खाल्लेलं नाहीये आणि सकाळी स्वयंपाक करणाऱ्या मावशीची वेळेत नाही आल्या त्यामुळे नाश्ता पोटभर झाला नाही, आता कडकडून भूक लागली आहे म्हणून मी पहिले ऑर्डर दिली."

पुनम म्हणाली,"इट्स ओके, तुम्ही एवढं एक्सप्लेनेशन का देत आहात?"

"तुम्हाला वाटेल की आपली पहिलीच भेट आहे आणि हा पहिले काय खायचं याचा विचार करतो आहे. मागच्या वेळेस एका मुलीला बघायला गेलो होतो तेव्हा तिने माझ्या फुडी स्वभावाची टिंगल उडवली होती आणि मला खाण्याची खूप आवड आहे ह्या कारणाने मला नकार दिला होता" प्रविणने उत्तर दिले.

पुनम म्हणाली," अरे वा म्हणजे तुम्ही बऱ्याच मुली बघत असतात वाटतं? अनुभव दांडगा दिसत आहे."

प्रविण म्हणाला," माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? मला लग्नासाठी मुली बघायला अजिबात आवडत नाहीत, आजतर मी इतका दमलो होतो की इथे यायची अजिबात इच्छा होत नव्हती पण जर मी मुलगी बघायला नकार दिला तर आई लगेच इमोशनल डायलॉग चालू करते, आईचे डायलॉग ऐकण्यापेक्षा मी मुलींना भेटायला तयार होतो."

प्रविण बोलत असतानाच वेटर ऑर्डर घेऊन येतो, प्रविण आपले लक्ष खाण्यावर केंद्रीत करतो. पुनमने फक्त कॉफी ऑर्डर केलेली असते. पुनम कॉफी पीत पीत प्रविण कडे बघत असते. प्रविणच्या खाण्याच्या स्पीड वरुन त्याला किती भूक लागलेली असेल याचा अंदाज येत होता. पुनम त्याच्या कडे बघून म्हणाली," प्रविण तुम्हाला जर एवढी भूक लागली होती तर पहिले काहीतरी खाऊन घ्यायचे होते. मी पण माझ्या कामाला महत्त्व देतेच पण कामासोबत आपण आपल्या तब्येतीकडेही लक्ष दिले पाहिजे."

प्रविण आपलं खाणं थांबवत पुनम कडे बघून म्हणाला,"तुम्ही आत्ता अगदी माझ्या आई सारख बोललात, एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम सुरु होतं त्यामुळे जेवणाचा ब्रेक स्कीप केला. खरंतर मला भूक सहन होत नाही पण कामापुढे मी सर्व काही विसरुन जातो "

पुनम म्हणाली," तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारते, तुम्ही मघाशी म्हणालात की तुम्हाला मुली बघायला जाण्याची अजिबात इच्छा नसते पण तुम्ही आईच्या इच्छेखातर मुलींना भेटतात तेव्हा तुम्ही बोअर होत नाहीत का?"

प्रविण मिश्किल हसून म्हणाला," आता कसा बरोबर प्रश्न विचारलात, मला हा प्रश्न आजवर कोणीच विचारला नाही, सुरवातीला प्राथमिक बोलणं होईपर्यंत काही वाटत नाही पण जेव्हा मला जाणवत की ह्या मुलीचं आणि आपलं सूत काही जुळणार नाही तेव्हा खूप बोअर होतं पण मी मघाशी बोललो ना की मी अतिशय फुडी आहे, मला वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे पदार्थ खायला, त्यांची चव घ्यायला खूप आवडते तेव्हा मी भेटीचं ठिकाण अस निवडतो की तिथे मी पहिल्यांदा भेट देणार असतो व तिथल्या पदार्थांची चवही चाखायला भेटणार असते."

प्रविणचं बोलणं ऐकून पुनम हसायला लागते, प्रविणला आपल्याच बोलण्याचं हसू येतं. प्रविण म्हणाला," मी काहीतरीच बोललो ना, मलाही काहीच कळत नाही "

पुनम म्हणाली," अरे नाही, तुम्ही खर तेच बोलला आहात. आज पर्यंत अश्या किती मुलींना तुम्ही भेटला आहात?"

" महिन्यातून एखादी मुलगी बघण्याचा प्रोग्राम ठरलेला असतोच, एक मिनिटं तुम्ही अस समजू नका की मी खूप मुली बघितल्या आहेत, मागच्या सहा महिन्यां पासून आई मागे लागली आहे म्हणून आतापर्यंत चार पाच मुली बघितल्या आहेत" प्रविणने उत्तर दिले

" चार पाच मुलींमधील एकही मुलगी तुम्हाला आवडली नाही का?" पुनमने विचारले

प्रविण म्हणाला," मला पुन्हा लग्न करण्याची भीती वाटत आहे पण आईच म्हणणं आहे की मी गेल्यावर तुझी काळजी कोण घेईल? तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या बोलण्याचा तुम्हाला कदाचित राग येईल पण मुली लग्न करताना फक्त मुलाची श्रीमंती, त्याचे घर या बाह्य गोष्टींकडे लक्ष देतात, तो मुलगा स्वभावाने कसा आहे याकडे कोणी लक्षच द्यायला तयार नाहीये. मुली रडतात म्हणून त्यांच्या वरील अत्याचार समजतो पण मुलांना रडता येत नाही म्हणजे कायम चुकी मुलांचीच असते असं नाही ना?"

यावर पुनम म्हणाली," सगळया मुली अशा असतीलच अस नाही ना? तुम्हाला अनुभव वाईट आला असेल याबाबत माझं काहीच म्हणणं नाहीये पण प्रत्येकाचे अनुभवाचे बोल वेगवेगळे असतात. मी म्हणेन की लग्न करताना मुलगा व त्याच्या घरचे काय बघतात? तर मुलगी दिसायला नाजूक, सुंदर आहे का? तिला स्वयंपाक येतो का? ती नोकरी करत असेल तरी तिने घरची कामे स्वतः करावी अशी त्यांची इच्छा असते. मुलीच्या मनाला, तिच्या स्वप्नांना आपल्याकडे प्राधान्य दिले जातच नाही. हा माझा अनुभव आहे."

प्रविण म्हणाला," जसा तुम्हाला पहिल्या नात्यात अनुभव आला आहे तसा मलाही वाईट व चुकीचा अनुभव आला आहे, मी एक खरं सांगू का? पुन्हा एकदा एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवायला माझं मन तयार होत नाहीये."

पुनम म्हणाली," माझंही सेम म्हणणं आहे, मला पुन्हा चुकीच्या व्यक्ती बरोबर अडकायचं नाहीये म्हणून तर मी पुन्हा लग्न करायला नाही म्हणत आहे.पण मला कोणी समजून घ्यायला तयारच नाहीये, सर्वजण त्यांचे अनुभव सांगून माझं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत."

प्रविण हसून म्हणाला," चला माझ्या सारखी विचार करणारी कोणीतरी मला भेटलं. हे बघा आता आपण भेटलोच आहोत तर आपापली बेसिक माहिती ऐकून घेऊ, जर आपल्या गप्पांमधून आपल्याला positive वाटलं तर मग अजून एक दोनदा भेटून पुढे जाऊयात. तुम्हाला माझ्या भूतकाळा बद्दल, माझ्या बद्दल काही माहिती आहे का?"

पुनम म्हणाली," मला तुमच्या नावा खेरीज काहीच माहिती नाहीये."

प्रविण म्हणाला," ठीक आहे, आता मी सुरवाती पासून सर्व काही सांगतो. माझं नाव प्रविण देशमुख, माझी जडणघडण एका खेडेगावात झालेली होती, माझे आई वडील शेती करत असायचे, मी शाळेत हुशार होतो आणि मला पुढे शिकायची इच्छा असल्याने माझ्या आई वडिलांनी मला दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी इकडे पुण्यात पाठवले. इथल्याच एका कॉलेजमध्ये माझे इंजिनिअरिंग झाले, कॅम्पस मध्ये सिलेक्शन होऊन मला चांगल्या कंपनीत नोकरी लागली.आमचं मूळ गाव इथून बरंच लांब आहे, तिथे माझे आई वडील आणि दोन मोठे भाऊ राहतात. चांगल्या पगाराची नोकरी लागल्याने घरच्यांचा लग्न कर म्हणून आग्रह सुरु झाला. लग्न करताना मुलीचे आई वडील मुलाला रहायला पुण्यात स्वतःचे घर आहे की नाही हे बघतात म्हणून पुढील एका वर्षात मी 2 बी एच के फ्लॅट बुक केला. 

नातेवाईक दररोज माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी मुली सुचवायचे, माझी एकच अट होती की मुलगी इंजिनिअर असावी आणि तिने नोकरी करणे आवश्यक आहे कारण विचार केला तर हल्ली एकाच्या पगारावर पुण्यासारख्या शहरात survive करणे कठीण आहे. दिवाळी साठी मी घरी गेलो तेव्हा दोन तीन मुली बघितल्या, त्यातील एक मुलगी माझ्या मोठ्या वहिनींच्या नात्यातील होती, दिसायला स्वभावाने चांगली वाटली म्हणून मी होकार दिला तसेच मुलीच्या घरची मंडळी संस्कारी असल्याने आई वडिलांनी होकार दिला, मुलगी वहिनीच्या बघण्यातील असल्याने दुसरंही काहीच टेन्शन नव्हतं. पुढील दोन तीन महिन्यांत आमचं लग्न झालं आणि मी तिला घेऊन पुण्याला आलो. माझा नवीन फ्लॅट ताब्यात न भेटल्याने तोपर्यंत एक भाड्याचा फ्लॅट मी घेतला होता. आमच्या घरातील सामान लावून देण्यासाठी माझी आई आमच्या सोबत काही दिवसांसाठी आली होती."

प्रविण बोलत असतानाच पुनमला तिच्या आईचा फोन येतो म्हणून त्यांचं बोलणं अर्धवट राहतं.

प्रविणच्या आयुष्यात पुढे काय होतं हे बघूया पुढील भागात....

©®Dr Supriya Dighe

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now