रेशीमबंध भाग २८

Conversation Between Punam And Arjun
मागील भागाचा सारांश: प्रविणच्या घरातील पुनमची पहिली सकाळ झाली होती, पुनमला त्या घरासोबत आता मैत्री करुन घ्यावी लागणार हे कळले होते म्हणून तिने सरीता ताईंच्या मदतीने किचनमधील भांडी, डबे आपल्या हिशोबाने लावून घेतले. पुनमला चैतालीचा फोन आला होता,त्या दोघींमध्ये बऱ्याच वेळ गप्पा झाल्या. प्रविण मार्केट मधून आल्यावर त्याचा चेहरा उतरल्याचे पुनमच्या लक्षात आले होते. पण त्याने स्वतःहून पुनमला काही सांगितले. सानवीने प्रविणला नाराज असल्याचे विचारल्यावर त्याने पुनमला आईचा फोन आल्याचे सांगितले, तसेच आईला त्यांच्या लग्नाबद्दल कुठून व कसे कळाले आणि यावर तिची प्रतिक्रिया काय होती? हे सांगितले.
आता बघूया पुढे....
आई व दादासोबत बोलणं झाल्यापासून प्रविण पुढील दोन तीन दिवस डिस्टर्ब होता. प्रविण जास्त बोलत नव्हता, शांत शांतच राहत होता. सानवी सोबत तेवढ्या पुरता खेळायचा. प्रविणला त्याचा वेळ घेऊ द्यावा ह्या विचाराने पुनम प्रविण सोबत त्या विषयावर पुन्हा काहीच बोलली नाही, पण दोन तीन दिवस झाले तरी प्रविण त्याच झोनमध्ये होता तेव्हा मात्र पुनमला राहवले गेले नाही. सानवी समोर काही बोलता येणार नसल्याने रात्री सानवी झोपल्यावर पुनमने प्रविणच्या बेडरुमच्या दरवाजावर नॉक करुन विचारले, "आत येऊ का?"
प्रविण म्हणाला," ये ना"
पुनम बेडरुममध्ये जाऊन बेडवर बसत म्हणाली," तुमची झोप डिस्टर्ब नाही झाली ना?"
प्रविण म्हणाला," नाही, तुझं माझ्याकडे काही काम होतं का?"
पुनम म्हणाली," हो थोडं बोलायचं होतं, सानवी जागी असल्यावर बोलता येत नाही."
प्रविण म्हणाला," अच्छा, बोल काय म्हणतेस? Anything serious?"
पुनम म्हणाली," सिरिअस असं नाही पण मला राहवत नाही म्हणून बोलते. गेल्या दोन तीन दिवसांपासून मी तुम्हाला observe करत आहे, तुम्ही तुमच्याच जगात आहात, सानवी सोबत थोडं फार बोलतात, माझ्या सोबत तर कामाव्यतिरिक्त काही बोलतच नाहीयेत. एवढं शांत का राहत आहात? पहिले तुम्ही ह्या घरात एकटे राहत असाल तेव्हा तुम्ही असे शांत राहत असल्यावर तुम्हाला कोणी विचारत नसेल पण आता आम्ही दोघीही या घरात राहतो. तुमच्या डोक्यात नक्की काय चालू आहे? हेच मला कळत नाहीये. मला तुमच्या अश्या वागण्याचा अर्थ लागत नाहीये."
प्रविण म्हणाला," मी जरा जास्तच इमोशनल आहे. आई व दादाच्या बोलण्याचा माझ्या मनावर खोल परिणाम झालेला आहे त्यामुळे मी असा शांत झालो आहे. मला कोणाशी बोलायचीच इच्छा होत नाहीये."
पुनम चिडून म्हणाली,"तुम्ही वेडे आहात का? मी तुम्हाला एक स्टेबल माणूस समजत होते पण तुम्ही तर फारच वेगळे निघालात. दादा व आई जे बोलले त्याचा इतका विचार का करत आहात? ते दोघेजण कदाचित हे सर्व विसरुन सुद्धा गेले असतील आणि तुम्ही तेवढंच धरुन बसला आहात. या सगळयात माझा व सानवीचा काही दोष आहे का?"
प्रविण म्हणाला," तुमच्या दोघींचा यात काहीच दोष नाहीये. मी माझा काय दोष होता? हे शोधत आहे."
पुनम म्हणाली,"प्रविण मला एक प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही माझ्या सोबत लग्न करुन पस्तावला आहात का? किंवा माझ्या सोबत लग्न करण्याचा निर्णय चुकल्यासारखा तुम्हाला वाटत आहे का?"
प्रविण म्हणाला," नाही असं अजिबात नाहीये. तुझ्या सोबत लग्न करण्याचा निर्णय बरोबरच आहे, त्यात काहीच चुकलं नाहीये."
पुनम म्हणाली," मग या सगळयात तुमची चूक काय आहे?"
प्रविण म्हणाला," मी लग्न करण्याआधी आईला सांगायला हवं होतं."
पुनम म्हणाली," समजा तुम्ही आईला लग्नाआधी हे सर्व सांगितलं असतं तर आईने नकार दिलाच असता बरोबर त्यामुळे तुमचा मूड अजून खराब झाला असता आणि तुमच्या दादाला हे कळालं असतं तर त्याने अजून अडचणी निर्माण केल्या असत्या तर तुम्ही काय केले असते?"
प्रविण म्हणाला,"तु म्हणते ते एकदम योग्य आहे पण आई जे बोलली त्यामुळे माझं मन मला खात आहे."
"आई असं काय बोलली?" पुनमने विचारले
प्रविण म्हणाला," आई म्हणाली होती की मी तुला जन्म दिला, नऊ महिने पोटात वाढवले, शिकवलं, मोठं केलं, आम्ही कष्ट केले म्हणून ती शिकू शकलास. तुझं नेहमी कल्याण कसं होईल? याचाच मी सतत विचार करत असते आणि तु लग्नासारखा इतका मोठा निर्णय घेतलास आणि मला सांगितलं सुद्धा नाही, त्या मुलीचा पायगुण आपल्या घरासाठी चांगला नाहीये हे मी तुला सांगून सुद्धा तुला पटत नाहीये. तु स्वतःहून विहिरीत उडी मारायला गेला आहेस. आता हेच बघ तुझं तिच्या सोबत लग्न झालं नी ते आम्हाला एका बाहेरच्या व्यक्ती कडून समजले त्यामुळे आमच्या मनात तुझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाला, याचाच अर्थ असा होतो की त्या मुलीचा पायगुण चांगला नाहीये, त्याला याची हळूहळू प्रचिती येईल मग तुला माझं बोलण आठवेल पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. मी तुला जन्माला घालून चूक तर केली नाही ना, असंच राहून राहून वाटत आहे, माझे चांगलेच पांग फेडले आहेस."
पुनम म्हणाली," तुम्हाला माझ्या पायगुणा बद्दल काही शंका आहे का? तुमच्या मनात अढी तर नाहीये ना?"
प्रविण म्हणाला," नाही माझ्या मनात अजिबात शंका नाहीये पण आईला कसं समजावू हेच कळत नाहीये. मी आईला खूप दुखावलं आहे का?"
पुनम म्हणाली," तुमची इच्छा असेल तर एक दोन दिवस गावी जाऊन या आणि प्रत्यक्ष आई सोबत बोलून घ्या म्हणजे तुमचं मन समाधान होईल."
प्रविण म्हणाला," आत्ता लगेच गेलो तर दादाची नको ती बडबड ऐकावी लागेल, गावात आधीच वेगळी चर्चा सुरु आहे त्याला अजून वेगळं वळण मिळेल."
पुनम म्हणाली," मग डोक्यातून हे सर्व विचार काढून टाका. दोन तीन महिन्यांनी गावी जाऊन आई सोबत प्रत्यक्ष बोलून घ्या. तोपर्यंत पुन्हा या झोनमध्ये जाऊ नका प्लिज.असं शांत राहू नका. मला घरात शांतता असलेली सहन होत नाही मग मला आईची आठवण येते."
प्रविण म्हणाला," आईची आठवण का येते? आईचा व घरातील शांततेचा काय संबंध?"
पुनम म्हणाली," ऑफिसमधून आल्यावर दररोज मी आईला ऑफिसमध्ये काय घडलं ते सांगायचे आणि आई सानवीने दिवसभर काय केले हे सांगायची. मला सतत बडबड करायची सवय आहे. घरात सानवीचा गोंधळ चालूच असतो पण तुम्ही काहीच बोलत नाही हे मला आवडत नाही. तुम्हाला वाईट वाटत असेल तर माझ्या सोबत तुम्ही हक्काने बोलू शकता."
प्रविण म्हणाला," तु कॉफी घेणारेस का? कॉफी पिता पिता आपण गप्पा मारुयात, चालेल ना?"
पुनम म्हणाली," तुमच्या हातची कॉफी अशी रोज मिळाली तर फारच चांगले होईल, तुम्ही कॉफी तयार करा तोपर्यंत सानवी झोपलेली आहे की नाही हे मी बघून येते."
प्रविण कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये गेला व पुनम सानवी झोपली आहे की नाही हे बघण्यासाठी तिच्या रुममध्ये गेली, त्यानंतर प्रविण व पुनम या दोघांनी कॉफी पिता पिता बऱ्याच गप्पा मारल्या. प्रविण दुसऱ्या दिवसापासून नॉर्मल वागायला लागला होता. प्रविण व पुनम एकत्र ज्या प्रोजेक्टवर काम करत होते त्या प्रोजेक्टचे काम संपले होते. प्रविण व पुनम आता वेगवेगळ्या टीमसोबत काम करत होते. दिवसभर काम करुन झाल्यावर रात्री सानवी झोपल्यावर प्रविण व पुनम मध्ये प्रोजेक्टच्या कामाबद्दल चर्चा व्हायची. दोघांनाही एकमेकांसोबत गप्पा मारणे आवडू लागले होते. पुनम प्रविणच्या घरात आता रुळू लागली होती, तिला प्रविणच्या राहणे आवडू लागले होते, पहिल्या इतका परकेपणा आता जास्त जाणवत नव्हता.
एके दिवशी पुनमला आई सोबत बोलायचे होते म्हणून तिने आईला फोन लावला, दोन तीन रिंग झाल्यावर पण आईचा फोन उचलला गेला नाही, पुनमने पुन्हा एकदा प्रयत्न केला मग आईचा फोन उचलला गेला, अर्जुनने आईचा फोन उचलला होता.
"हॅलो दादा आई आहे का?" पुनमने विचारले
"आई रश्मी सोबत हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे आणि आईचा फोन घरीच राहिला आहे." अर्जुनने उत्तर दिले
"रश्मी वहिनीला बरं नाहीये का?"पुनमने विचारले
अर्जुन म्हणाला," रश्मी बरी आहे, मी जरा बिजी असल्याने त्या दोघी रुटीन चेकअप साठी गेल्या आहेत."
पुनम म्हणाली," ठीक आहे, आई आल्यावर तिला मला फोन करायला सांग."
अर्जुन म्हणाला," हो सांगतो, पुनम एक मिनिटं थोडं बोलायचं होतं."
पुनम म्हणाली," बोल ना"
अर्जुन म्हणाला," आई मागे मला म्हणाली होती की तुला माझा राग आला आहे म्हणून, तुला माझा कसला राग आला आहे?"
पुनम म्हणाली," दादा मला तुझा राग आलेला नव्हता, मला तुझ्या वर्तना बद्दल वाईट वाटलं."
अर्जुन म्हणाला," माझं काय चुकलं आहे? तुला कसलं वाईट वाटलं?"
पुनम म्हणाली," दादा आत्ताचंच बघ ना, तु साधं मी कशी आहेस? हे सुद्धा तु मला विचारलं नाहीस. दादा निलेश एक्सपायर झाल्यापासून तु माझ्या सोबत बोलला तरी आहेस का? तु माझ्या सोबत का बोलत नाहीस? आता तुच स्वतःहून विषय काढला आहेस मग आता माझ्या ह्या प्रश्नांची उत्तरे देऊन टाक."
अर्जुन म्हणाला," पुनम तुझा माझ्या बद्दल गैरसमज झाला आहे, तो पहिले तुझ्या मनातून काढून टाक. निलेश एक्सपायर झाल्या पासून मी तुझ्या सोबत बोललो नाहीये हे खरं जरी असलं तरी मला तुझी काळजी नाहीये असं होतं नाही ना. लहानपणापासून माझं communication skill कमकुवत आहे हे तुला माहीत नाही का?"
पुनम म्हणाली," दादा communicatiom skill कमकुवत आहे म्हटल्यावर समोरच्या व्यक्ती सोबत बोलायचंच नाही असं होतं नाही ना. या आधी जे घडून गेलं ते आपण सोडून देऊयात पण आता माझं दुसरं लग्न झालं, मी नवीन आयुष्याला पुन्हा एकदा सुरुवात केली तेव्हा तु आला नाहीसच पण साधं एक फोन करुन अभिनंदन सुद्धा केलं नाहीस की प्रविण कसा आहे? याची चौकशी सुद्धा केली नाहीस."
अर्जुन म्हणाला," पुनम तु पुन्हा लग्न केलंस, तुझं आयुष्य नव्याने सुरु केलं आहेस, याचा मला आनंदच आहे. प्रविण बद्दल डिटेल मध्ये माहिती मला आई बाबांकडून कळालीच होती म्हणून मी तुला फोन करुन याबद्दल विचारलं नाही. रश्मी प्रेग्नन्ट असल्याने मी तुझ्या लग्नाला उपस्थित राहू शकलो नाही. पुनम मी मार्केटिंग मध्ये जॉब करतो त्यामुळे बाहेरच्या लोकांसोबत मला फोनवर इतकं बोलावं लागतं की मी त्याव्यतिरिक्त कोणासोबतच फोनवर जास्त बोलत नाही. पुनम सध्या कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, मला नोकरी आहे तर ती टिकवावी लागणार आहे. पुनम मला सर्वांना वेळ देता येत नाही. नशीब आई बाबा इथे रश्मी जवळ आल्यापासून मी निवांत बाहेर जाऊन कामं करु शकत आहे नाहीतर मला खूप प्रॉब्लेम व्हायचा."
पुनम हसून म्हणाली," दादा जाऊदेत आपण या विषयावर बोलायला नकोच. तुझं communication skill कमकुवत नाहीये, आपल्या दोघांमध्ये communication gap आहे. तुला माझं बोलणं समजत नाहीये की तुला ते समजून घ्यायचं नाहीये हेच मला कळत नाहीये. तुझं communication skill कमकुवत असतं तर तु मार्केटिंग मध्ये टिकलाच नसता. दादा तुला माझ्या सोबत बोलायचे नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये पण त्याचे कारण मला जर एकदा सांगून टाकलेस तर मी त्याचा जास्त विचार करणार नाही."
अर्जुन म्हणाला," पुनम मी आत्ता घरी आहे, बाबा पण घरातच आहेत. तुला जे कारण ऐकायचं आहे ते मी आई बाबांसमोर सांगू शकत नाही. मी बाहेर गेल्यावर तुला फोन करुन सविस्तरपणे सगळं सांगेल. आता फक्त एवढंच सांगेल की माझ्या बद्दल तुझ्या मनात जे काही गैरसमज असतील ते सर्वांत आधी काढून टाक. पुढील एक दोन दिवसांत मी तुला फोन करतो."
पुनम म्हणाली," ठीक आहे, मी तुझ्या फोनची वाट बघेन."
©®Dr Supriya Dighe





 

🎭 Series Post

View all