रेशीमबंध भाग २६

Punam's First Day At Pravin's Home

मागील भागाचा सारांश:पुनमचे आई बाबा रजिस्टर लग्न करण्यासाठी परवानगी देतात. प्रविण व पुनमचे रजिस्टर कोर्ट मॅरेज पुनमच्या आई वडिलांच्या उपस्थित होते. चैताली व प्रदीप हे दोघे सुद्धा त्यांच्या लग्नाला उपस्थित असतात. लग्न झाल्यावर पुनम प्रविणच्या घरी जाते तेव्हा तिला थोडे awkward वाटत असते. प्रविणने एक रुम सानवीसाठी सजवलेली असते,त्या रुमला पिंक कलर दिलेला असतो तसेच भिंतीवर बार्बीचे वॉलपेपर लावलेले असते.

आत बघूया पुढे....

प्रविण निघून गेल्यावर पुनम विचारात पडली की आता हे कुठे गेले असतील? आणि ही अशी सांगायची पद्धत असते का? कुठे गेले हे सांगायला काय झाले होते? पुनम आपल्या विचारात असताना सानवी तिच्या जवळ येऊन म्हणाली," मम्मा तुला हे घर कसं वाटलं ग?"

पुनम म्हणाली," घर छानच आहे ग आणि या घरात सानूला सेपरेट रुम सुद्धा आहे त्यात सानू तिच्या सर्व खेळण्या ठेऊ शकते ना, एका मुलीची तर मज्जा आहे."

सानवी म्हणाली," मम्मा तुला एक खरं सांगू, मला हे घर भरपूर आवडलं आहे पण मला आजी बाबांच्या घराची आठवण येत आहे, हे घर आपलं वाटतंच नाहीये."

पुनम मनातल्या मनात म्हणाली," तुला काय मलासुद्धा हे घर आपलं वाटत नाहीये"

पुनम सानवीला म्हणाली," अरे बाळा आपण त्या घरात खूप वर्षांपासून राहत होतो की नाही म्हणून आपल्याला ते घर आपलंस वाटतं होतं. इथे काही दिवस राहिल्यानंतर या घराची सवय होऊन जाईल आणि हेही घर आपल्याला आपलंच वाटेल."

सानवी म्हणाली," मम्मा तु प्रविण अंकल सोबत लग्न करुन खुश नाहीये का?"

पुनम म्हणाली," मी खुश आहे पण तु असं का विचारत आहेस?"

सानवी म्हणाली," मम्मा तु sad दिसत आहेस"

पुनम म्हणाली," अरे बाळा तुला जस हे घर नवीन वाटतंय, आजी बाबांच्या घराची आठवण येत आहे अगदी तसंच मलाही वाटतं आहे. या घरात रुळायला थोडा वेळ जाईल."

"मम्मा तु म्हणाली होतीस की प्रविण अंकल माझे पप्पा होणार आहेत तर आता त्यांना मी काय म्हणू पप्पा की डॅड? सानवीने विचारले.

पुनम म्हणाली," तुला जे म्हणावं वाटतं ते म्हण, हवंतर प्रविण अंकलला विचारुन घे."

सानवी म्हणाली," प्रविण अंकलला विचारायला ते आहे तरी कुठे?"

तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली, पुनमने दरवाजा उघडला तर प्रविण आलेला होता. प्रविणच्या हातात बार्बीचं चित्र असलेलं ब्लॅंकेट होतं. सानवी प्रविणच्या हातातील ब्लॅंकेट बघून म्हणाली," प्रविण अंकल तुम्ही हे माझ्यासाठी आणलं का?"

प्रविण म्हणाला," हो हे तुझ्यासाठीच आहे, तीन दिवसांपूर्वी मी हे ब्लॅंकेट ऑर्डर केलं होतं, तेच घ्यायला आत्ता गेलो होतो."

सानवी म्हणाली," वाव किती मस्त आहे, प्रविण अंकल मी तुम्हाला पप्पा म्हणू की डॅड?"

सानवीने अचानक हा प्रश्न विचारल्यावर प्रविण जरा गोंधळलाच, त्याने पुनमकडे बघितले. पुनम म्हणाली," सानवीच्या प्रश्नाचं उत्तर द्या."

प्रविण म्हणाला," तुला काय म्हणायला आवडेल."

सानवी म्हणाली," मी माझ्या मम्माला मम्मा म्हणते तर मम्मा आणि डॅड छान वाटेल तर मी तुम्हाला डॅडच म्हणेल."

प्रविण म्हणाला," चालेल."

पुनम म्हणाली," मला इथल्या किचनमध्ये कुठे काय ठेवलेलं आहे? हे काहीच माहीत नाहीये. रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी बनवावं लागेल ना?"

प्रविण म्हणाला," पंकजच्या घरुन आपल्यासाठी जेवणाचा डबा येणार आहे, तुम्ही या घरात नवीन असल्याने पहिल्याच दिवशी स्वयंपाक करायला तुम्हाला जमणार नाही म्हणून पंकजची आई म्हणाली की त्यांना डबा घेऊन जा म्हणून."

पुनम म्हणाली," पंकजला तुम्ही लग्नाला बोलावलं नव्हतं का?"

प्रविण म्हणाला," मी बोलावलं होतं पण त्याला वेळेवर पोहोचता आलं नाही, अचानक काहीतरी इमर्जन्सी आली होती."

पुनम म्हणाली," ओके, माझे कपडे कोणत्या कपाटात ठेऊ?"

प्रविण म्हणाला," तुम्ही बघितलंच असेल या घरात ३ बेडरुम आहेत तर त्यातील एका रुममध्ये जे कपाट आहे त्यात माझे कपडे आहेत, सानवीच्या रुममध्ये एक छोटं कपाट आहे त्यात तिचे कपडे ठेवता येतील आणि तिसऱ्या रुममध्ये जे कपाट आहे त्यात तुम्ही तुमचे कपडे ठेवू शकतात आणि समजा कपडे खूप जास्त असतील तर माझ्या कपाटात ऍडजस्ट होऊ शकतील."

पुनम म्हणाली," ठीक आहे तर मग मी माझे कपडे लावून घेते."

पुनम बॅगमधून आपले कपडे काढून कपाटात रचत होती. सानवी तिच्या रुममध्ये खेळत होती. पुनम ज्या रुममध्ये कपडे आवरत होती तिथे प्रविण येऊन म्हणाला," मी काही हेल्प करु का?"

पुनम म्हणाली," नाही नको."

प्रविण म्हणाला," सानवीने मला खूपच लवकर accept केलं."

पुनम म्हणाली," लहान मुलांचं मन निरागस असतं, त्यांच्या डोक्यात आपल्या इतके विचार नसतात. आपण समंजस असताना सुद्धा आयुष्यात झालेला बदल आपल्याला पटकन स्विकारता येत नाही."

प्रविण म्हणाला," हो ना, तुम्ही अगदी खरं बोलताय, आता हेच बघा ना, मी माझ्या घरात आहे तरीपण तुम्ही दोघी इथे रहायला आल्यामुळे मला जरा अवघडल्यासारखे झाले आहे."

पुनम म्हणाली," हम्मम इट्स नॉर्मल. बरं मी काय म्हणत होते? सानवीचा अतिलाड करत जाऊ नका. कसं आहे ना की तिला प्रत्येक गोष्टीची किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. आपण तिला सर्व काही देऊयात पण असं सहजासहजी दिलं तर मुलांना त्याची किंमत राहत नाही. तुम्ही हे सगळं ती या घरात रुळावी म्हणून करत आहात याची कल्पना मला आहे पण अति करायला नको."

प्रविण म्हणाला," हो नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेल. आई बाबा बंगलोरला कधी जाणार आहेत?"

पुनम म्हणाली," उद्या सकाळी जाणार आहेत."

प्रविण म्हणाला," आपल्याला त्यांच्याकडे जावे लागेल का?"

पुनम म्हणाली," नाही नको, सानवी पुन्हा त्यांच्या आठवणीने रडारड सुरु करेल. आई बाबा स्वतःहूनच नको येऊ असं म्हणाले."

प्रविण म्हणाला," मला वाटलं होतं की अर्जुन दादा लग्नाला येईल म्हणून."

पुनम म्हणाली," मी अर्जुन दादाकडून काहीच अपेक्षा ठेवलेली नाहीये, तो का आला नाही? हे सुद्धा मी आईला विचारले नाही."

प्रविण म्हणाला,"सॉरी माझ्या मनात आलं म्हणून मी बोलून गेलो."

पुनम म्हणाली," इट्स ओके मला त्याच वाईट वाटलं नाही. तुम्ही तुमच्या आईंना आपण लग्न केल्याचं सांगितलं का?"

प्रविण म्हणाला," अजून नाही सांगितलं, ती कशी रिऍक्ट होईल माहीत नाही आणि त्यामुळे माझा मूड खराब होऊन जाईल."

पुनम म्हणाली," मला वाटतंय की तुम्ही त्यांना लगेच आपल्या लग्नाबद्दल कळवावे, कधीना कधी हे त्यांना कळणारच आहे आणि समजा दुसऱ्या कोणाकडून त्यांना हे कळालं तर त्यांना जास्त वाईट वाटेल. त्या तुमच्या आई आहेत आणि तुमच्या आयुष्यात होणारी महत्त्वाची प्रत्येक घटना त्यांना माहीत असावी हा त्यांचा हक्कच आहे."

प्रविण म्हणाला," हो मी आई सोबत उद्या बोलतो."

प्रविण बोलत असतानाच दरवाजावरची बेल वाजते म्हणून प्रविण जाऊन दरवाजा उघडतो तर पंकज जेवणाचा डबा घेऊन आलेला असतो. प्रविण पंकजला घरात बोलवून सोप्यावर बसायला सांगतो आणि तो पुनमला बोलावण्यासाठी आत जातो. पुनम हातातील काम बाजूला ठेऊन बाहेर येते. पुनम पंकजकडे बघून स्माईल देते. प्रविण पंकजसाठी पाणी घेऊन आला. प्रविणच्या हातातून पाण्याचा ग्लास घेत पंकज म्हणाला, "तुमच्या घरात जरा पद्धत वेगळी आहे का?"

"कसली पद्धत" प्रविणने विचारले

पंकज म्हणाला," तु पाणी घेऊन आलास आणि पुनम नुसती उभी आहे म्हणून."

प्रविण म्हणाला," अरे बाबा त्यांचा ह्या घरातील पहिलाच दिवस आहे, रुळायला जरा वेळ लागेल."

पुनम म्हणाली,"पंकज चहा घेणार की कॉफी?"

पंकज म्हणाला," अग काही नको, मी जस्ट गंमत केली. Anyways congratulations to both of you."

प्रविण म्हणाला," थँक्स"

पुनम उभीच होती म्हणून प्रविण म्हणाला, "तुम्ही उभ्या का? बसा ना"

पुनम एका खुर्चीत बसते. पंकज त्या दोघांकडे बघून खळखळून हसतो. 

"तुला असं हसायला काय झालंय?" प्रविणने विचारले

पंकज म्हणाला," तुम्ही दोघे किती फॉर्मल वागत आहात, एकतर पुनम आता तुझी बायको असून सुद्धा तु तिला आहो काहो करत आहेस. आपल्या बायकोला कोणी आहो काहो करत का? पुनम तुझ्या शेजारील खुर्चीत सुद्धा बसायला मागे पुढे पाहत होती. तुम्ही हे फक्त मला दाखवण्यासाठी तर करत नाहीये ना?"

पुनम म्हणाली," पंकज तुझं लग्न झाल्यावर आम्ही तुझ्या घरी येऊन तुला असाच त्रास देऊ म्हणजे तुला आमची परिस्थिती कळेल."

पंकज म्हणाला," अरे यार आपले फ्रेंड्स एकमेकांना चिडवणार नाही तर कोण चिडवणार? प्रविण सरांना माझा राग येणार नाही कारण त्यांना माझा स्वभाव माहीत आहे पण प्लिज तु रागावू नकोस."

पुनम म्हणाली," ऑफिसमध्ये तर असं दाखवायचा की तु प्रविणला खूप घाबरतो म्हणून आणि आता तर त्यांना चिडवत आहेस."

पंकज म्हणाला," प्रविण सरांना मी फक्त ऑफिस मध्ये असतानाच घाबरतो, ऑफिसच्या बाहेर आम्ही चांगले मित्र आहोत. बरं आईने तुमच्या तिघांसाठी जेवण दिले आहे, ते खाऊन घ्या आणि तुम्हाला आमची काही मदत लागली तर हक्काने फोन करा. मी निघतो आता, तुमचं चालूदेत. मी जास्त वेळ तुम्हाला डिस्टर्ब नाही करत."

प्रविण म्हणाला," तुला थांब असंही मी म्हणणार नाही कारण तु थांबलास तर अजून चिडवत बसशील."

पंकज म्हणाला," हे वर्क फ्रॉम होम कधी संपेल काय माहीत? घरी बसून काम करण्याचा खूप कंटाळा आला आहे. ऑफिसला खूप मिस करतो आहे."

प्रविण म्हणाला," हो ना, कोरोना जेव्हा जाईल तेव्हाच आपलं रुटीन सुरळीत होईल असं वाटतं आहे."

पंकज म्हणाला," हो आता काय वाट बघण्याखेरीज आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये, चला मी निघतो आता."

पुनम म्हणाली, "पंकज आईला डब्यासाठी थँक्स सांग."

पंकज निघून गेल्यावर पुनम प्रविणला म्हणाली, "प्रविण पंकज म्हणत होता ते बरोबर आहे, तुम्ही मला आहो काहो नका करत जाऊ, ते दुसऱ्यांना ऐकताना बरोबर वाटणार नाही. लोकं आपल्याला चिडवत बसतील."

प्रविण म्हणाला," ठीक आहे पण मला एकदम जमणार नाही, हळूहळू प्रयत्न करेल."

पंकजने आणून दिलेल्या डब्यातील जेवण पुनमने गरम केले व त्यानंतर पुनम, प्रविण व सानवी तिघे एकत्र जेवायला बसले. जेवण करताना सानवी म्हणाली," मम्मा आत्ता आपली फॅमिली complete झाल्यासारखी वाटत आहे ना, मम्मा, डॅड आणि सानवी, मस्त आहे. मनवा जेव्हा मला भेटेल तेव्हा मी तिला सांगणार आहे की मलाही डॅड आहेत आणि ते मला खूप गिफ्ट्स देतात."

पुनम हसून म्हणाली," हो बाळा तुला जेव्हा मनवाची आठवण येईल तेव्हा मी तुला तिला भेटण्यासाठी घेऊन जाईल मग तुला तिला काय काय सांगायचं असेल ते सर्व सांग."

प्रविण म्हणाला," सानवीला मनवाची खूपच आठवण येते."

पुनम म्हणाली," हो लहानपणापासून त्या दोघी एकत्रच आहेत ना."

जेवण झाल्यावर पुनमने किचनमधील पसारा आवरुन ठेवला. प्रविणने किचनमध्ये कुठे कोणते सामान ठेवले आहे हे पुनमला दाखवले. सानवीला झोप आली होती म्हणून ती लवकर झोपी गेली. 

"मी सानवीच्या रुममध्ये झोपते, चालेल ना?" पुनमने विचारले

"हो चालेल ना,माझी काहीच हरकत नाहीये. प्लिज या घराला आपलंच माना आणि जिथे झोपायचं असेल तिथे झोपा, सतत माझी परवानगी मागत बसू नका."प्रविणने सांगितले

पुनम म्हणाली," हो पण असंच विचारावं वाटलं म्हणून मी विचारलं."

"सरीता ताईंना उद्यापासून इकडे बोलावलं आहे का? की दुसऱ्या कोणाला शोधायचं नाहीये?" प्रविणने विचारले

पुनम म्हणाली," सरीता ताई येणार आहेत, मी त्यांना इकडचा पत्ता दिला आहे."

प्रविण म्हणाला,"ओके गुड नाईट."

©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all