रेशीमबंध भाग २३

Pravin's Mother Is Not Ready For Pravin And Poonam's Marriage

मागील भागाचा सारांश: पुनमच्या आईला अर्जुनचा फोन आला होता तर त्याने आईला बंगलोरला बोलावले होते. पुनमने आईला विचारले की अर्जुन व रश्मी तिच्या सोबत बोलत का नाहीत? तिची काही चूक नसताना ते तिची विचारपूस सुद्धा करत नाहीत. शेवटी पुनमने आईला सांगून टाकले की तुम्ही दोघे बंगलोरला जा, मी व सानवी इथे राहतो. यावर पुनमच्या बाबांनी आईला सांगितले की तु एकटी बंगलोरला जा, मी इथेच पुनम जवळ राहतो. प्रविणने पुनमला फोन करुन सांगितले की त्याला कोरोना झाला असून त्याला खूप त्रास होतो आहे तसेच त्याने पुनमला डान्स क्लासच्या ऑफर बद्दल विचारले तेव्हा पुनमने त्याला व्यवस्थित सगळं काही समजावून सांगितलं.

आता बघूया पुढे....

प्रविणच्या बाबांचे सर्व विधी पार पडले होते, प्रविणचा quarantine period संपला होता, प्रविणची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती, तो पुण्याला जाण्यासाठी आवरसावर करत होता. प्रविणने अजून पर्यंत पुनमच्या आई बाबांचा निरोप आपल्या आईला दिला नव्हता म्हणून त्याने असं ठरवलं की पुण्याला जाण्याच्या आधी आई सोबत या विषयावर सविस्तर चर्चा करुयात. आई तिच्या रुममध्ये एकटीच बसलेली आहे हे बघून प्रविण आईच्या रुममध्ये गेला.

"आई आत येऊ का?" प्रविणने रुममध्ये जाण्याआधी परवानगी मागितली.

आई प्रविणकडे बघून म्हणाली," ये ना, असा दारात का उभा आहेस?"

प्रविण आई जवळ जाऊन बसल्यावर आईने त्याच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला व ती म्हणाली," माझं पोरगं पार सुकून गेलं आहे, मी दुःख धरुन बसले आणि माझ्या लेकराकडे कोणीच लक्ष दिलं नाही."

प्रविण म्हणाला," आई मी बरा आहे, तु तुझी काळजी घे, बाबा गेल्याचा जास्त त्रास करुन घेऊ नकोस. आई मी उद्या पुण्याला जाणार आहे, बरेच दिवस झाले मी इकडेच आहे. इथे नेटवर्क नसल्यामुळे ऑफिसचं काम इथं बसून करता येत नाही म्हणून मला पुण्याला जावं लागेल नाहीतर माझी नोकरी जाऊ शकते."

आई म्हणाली," तु जायचं असं म्हणतोस, ठीक आहे बाबा. नोकरी धोक्यात का घालतोस? माझ्या जवळ बसून तुझं आयुष्य थोडीच जाणार आहे, तु तुझ्या मार्गाला जा."

प्रविण म्हणाला," आई बाबा एक्सपायर झाले त्या दिवशी पुनमचे आई बाबा तुला फोन लावत होते पण तुझा फोन लागला नाही."

आई म्हणाली," तुझे बाबा गेल्यापासून माझा फोन कुठे आहे? हे मलाच माहीत नाहीये. ते मला फोन का करत होते?"

प्रविण म्हणाला," त्यांचा या लग्नासाठी होकार आहे हे सांगण्यासाठी ते तुला फोन करत होते. मी त्यांना सांगितलं की आपण पुढील दोन तीन महिने तरी पुढची बोलणी करु शकत नाही."

आई म्हणाली," त्यांना सांगून टाक की माझ्या आईला तुमचं स्थळ पसंत नाहीये. माझा या लग्नाला विरोध आहे."

प्रविण आश्चर्य चकीत होऊन म्हणाला," आई पण का? इतक्या दिवस मी लग्नासाठी होकार देत नव्हतो तर तु सतत मागे लागलेली असायची आणि आता मी होकार दिला आहे तर तु नाही म्हणत आहेस का? तुला तर माझ्यासाठी हे स्थळ योग्य वाटतं होतं मग असं अचानक काय झालं?"

आई म्हणाली," तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही पण पुनमचा पायगुण वाईट आहे."

प्रविण म्हणाला," आई अग तिचा पायगुण वाईट असायला ती आपल्या घरात सुद्धा आलेली नाही मग तु असं का बोलत आहेस?"

आई म्हणाली," हे बघ प्रविण तु ज्या दिवशी तिच्यासाठी होकार दिला त्यादिवशी तुझा अपघात झाला बरोबर. ज्या दिवशी तिने तुला होकार देण्याचे ठरवले त्या दिवशी तुझे बाबा एक्सपायर झाले."

प्रविण म्हणाला," अग आई तु काहीपण लॉजिक का लावत आहेस? माझा अपघात झाला तो माझ्या चुकीमुळे झाला त्यात तिची काय चूक होती. बाबा एक्सपायर झाले कारण त्यांना हार्ट अटॅक आला होता, ह्या सगळ्यात पुनमचा काहीच संबंध नाहीये."

आई म्हणाली," प्रविण मला जे वाटलं ते मी सांगितलं, मला हे लग्न मान्य नाहीये. त्या मुलीने तुझ्यावर काय जादू केली आहे काय माहीत."

प्रविण म्हणाला," आई ती माझ्यावर जादू का करेल? मला एवढंच कळतं की आपण त्यांना एकदा आपला होकार कळवला आहे आणि त्यांना जर आता आपण नकार दिला तर ते नैतिकरित्या चुकीचे ठरेल, आपण त्यांचा विश्वासघात केल्यासारखे वाटेल."

आई म्हणाली," आपण होकार दिला होता पण त्यांनी त्यांचा निर्णय कळवायला उशीर लावलाच ना मग त्या दरम्यान आपला निर्णय बदलू शकतोच ना."

प्रविण म्हणाला," आई मी तुझ्या पासून एक गोष्ट लपवली होती, तुला त्रास होऊ नये म्हणून मी हे तुला सांगितले नव्हते. माझा अपघात झाल्यावर मी तुला सांगितले होते की मला थोडेसे लागले होते म्हणून तर आई त्यावेळी माझा हात फ्रॅक्चर झाला होता. मी एकटा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. हे जेव्हा पुनमला कळालं तेव्हा ती मला भेटण्यासाठी त्वरित आली होती, माझ्या जवळ कोणी नाही हे बघून मी नाही म्हणत असताना तिने दादाला फोन लावून माझा अपघात झाल्याचे व हात फ्रॅक्चर झाल्याचे कळवले तेव्हा दादाने तिला सांगितले की प्रविणचे आई वडील गावाला गेलेले आहेत, आमच्यापैकी कोणीही त्याला भेटायला येऊ शकत नाही, त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत तो त्याची काळजी घेऊ शकतो. 

हात बरा होईपर्यंत मी हॉस्पिटलमध्येच रहायचे ठरवले होते. तेव्हा तर पुनमला मी होकार दिल्याचे माहीत पण नव्हते तरीपण मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या सोबत तिने तिच्या बाबांना थांबवले होते तसेच हॉस्पिटल मधून मला डिस्चार्ज मिळाल्यावर तिचे बाबा मला त्यांच्या घरी घेऊन गेले होते, त्यानंतर अचानक लॉकडाऊन झाल्याने मी तिच्याच घरी अडकलो होतो. मी इतके दिवस त्यांच्या घरी होतो पण त्यांनी मला परक्यासारखी वागणूक दिली. पुनमचे आई बाबा मला बेडच्या खाली उतरु सुद्धा देत नव्हते, सगळं एका जागेवर आणून देत होते. पुनमची मुलगी पण खूप गोड आहे. आई सख्खे नातेवाईक इतकं करत नाहीत जेवढं त्या लोकांनी माझ्यासाठी केलं आहे.आता तु म्हणशील की त्यांनी तुझा होकार मिळवण्यासाठी हे केलं असेल पण मी तर त्याआधीच होकार दिलेला होता. पुनमला तर दुसरं लग्न करण्याची इच्छाच नव्हती त्यामुळे ती असा प्लॅन करु पण शकत नाही."

आई आश्चर्याने म्हणाली," दादा तर याबद्दल माझ्यासोबत काहीच बोलला नाही, हे त्याने खूप चुकीचं केलेलं आहे, मी त्याच्या सोबत या विषयावर नक्कीच बोलेल."

प्रविण म्हणाला," आई तु या विषयावर दादासोबत काहीच बोलू नकोस, मला त्यांच्या कडून कसलीही इच्छा राहिलेली नाहीये. हे सर्व तुला सांगण्याचा माझा एकच हेतू होता की आपण इतक्या चांगल्या लोकांना फसवू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजवर तु माझ्यासाठी बऱ्याच मुली शोधल्या त्यातून मला फक्त हीच आवडली होती."

आई म्हणाली," हे बघ प्रविण ते लोकं नक्कीच चांगले असतील पण मला त्या मुलीचा पायगुण चांगला वाटत नाहीये. माझी या लग्नासाठी परवानगी नाहीये आणि तरीही तुला तिच्यासोबत लग्न करायचे असेलच तर तु तिच्या सोबत लग्न करुच शकतो पण मी तुझ्या लग्नाला येणार नाही. तुझं सुख त्या मुलीत असेल तर माझी त्या बाबतीत काहीच हरकत नाहीये पण मी मनापासून तिला माझी सून मानू शकणार नाही आणि तु प्रयत्नही करु नकोस."

प्रविण म्हणाला," ठीक आहे आई. मी पुनमला शब्द दिलेला आहे सो तो मला पाळावाच लागेल, तुझी इच्छा असो वा नसो मी तिच्या सोबत लग्न करेल. मला एक खात्री आहे की जेव्हा कधी तु पुनम व सानवीच्या सानिध्यात राहशील तेव्हा तु त्यांना आपलं मानशील आणि मी त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असेल."

प्रविण आईच्या पाया पडून रुमच्या बाहेर पडताना म्हणाला," आई उद्या सकाळच्या गाडीनेच मी पुण्याला जाणार आहे, तु झोपली असशील तर आपली भेट होणार नाही. तु स्वतःची काळजी घे, तुझ्या आवडत्या कामात मन रमव. अशी एकटी रुममध्ये बसू नकोस, तुला याचा जास्त त्रास होईल. पुण्याला पोहोचल्यावर मी तुला फोन करतो."

प्रविण आपल्या रुममध्ये जाऊन बॅग भरत होता तोच त्याचा दादा तिथे जाऊन म्हणाला, "प्रविण आत येऊ का?"

प्रविण म्हणाला," अरे दादा तु आज माझ्या रुमची वाट कशी काय चुकलास? एरवी तर तुला माझ्याकडे बघायचंही नसतं."

दादा म्हणाला," प्रविण आपण झाल्या गेल्या गोष्टी विसरुन जाऊयात ना. हे बघ आपले बाबा जसे अचानक गेलेत तसंच आपल्यातील कोणीही केव्हाही जाऊ शकेल. आयुष्य क्षणिक झालं आहे आणि आपण काय त्याच त्याच गोष्टी मनात धरुन बसलो आहोत. माझ्या हातून बऱ्याच चुका झाल्या आहेत. तुझ्या अपघाताबद्दल तुझ्या सोबत काम करणाऱ्या एका मुलीने मला कळवलं होतं पण त्यावेळी तुझ्या बद्दल मनात इतका राग होता की साधी तुझी चौकशी करावी हेही मला वाटलं नाही. माझ्या हातून आजपर्यंत ज्या चुका घडल्या आहेत त्याबद्दल मला माफ कर."

प्रविण म्हणाला," दादा माझा कोणावर रागच नाहीये आणि कधीच नव्हता. मी कोणाकडून काही अपेक्षाच करत नाही त्यामुळे राग हा येतच नाही ना."

दादा म्हणाला," प्रविण असा एकटा किती दिवस राहणार आहेस? असं एकटं राहून आयुष्य कटणार नाही. तुला कोणाच्यातरी सोबतीची गरज आहे. सोनाली पण आता बरीच बदलली आहे. बाबा गेल्याचं कळताच स्वतःहून घरी आली, तुझ्या वहिनीला प्रत्येक कामात तिने मदत केली, तीच म्हणणं आहे की तिला तुझ्या सोबत पुन्हा लग्न करायचं आहे. सोनाली म्हणत होती की तु जसं म्हणशील तशी ती वागेल, बोलेल. तुझ्या म्हणण्या प्रमाणे ती नोकरी करायला सुद्धा तयार झाली आहे. प्रविण घटस्फोट झालेल्या माणसासोबत कुठलीच मुलगी लग्न करायला तयार होत नाही, सर्वजण माणसालाच दोषी ठरवतात. सोनाली आता तयार झाली आहे तर ही संधी हातातून जाऊ देऊ नको."

प्रविणने जोरात हसून टाळी वाजवली व तो म्हणाला," दादा ही माफी वगैरे यासाठीच वाटतं. दादा ज्या मुलीमुळे मी कष्टाच्या पैश्यांतून घेतलेला फ्लॅट मला विकावा लागला, मानसिक त्रास तर किती झाला हे शब्दात मी सांगू शकत नाही. तिच्यामुळे मला कोर्टाची पायरी चढावी लागली, तुमच्या सकट सर्व नातेवाईकांचे टोमणे सहन करावे लागले. माझी काहीही चूक नसताना मी समाजाच्या नजरेत गुन्हेगार ठरलो होतो. तिच्यामुळे माझे वडील जिवंत असेपर्यंत माझ्या सोबत बोलले नाही. अश्या मुलीसोबत पुन्हा संसार थाटायला मी काय डोक्यावर पडलो आहे का? मी एकटा सुखी आहे. मला त्या मुलीचे नाव सुद्धा घ्यायची इच्छा होत नाही आणि अश्या मुलीसोबत मी कसा राहू शकतो. दादा हे सर्व शक्य नाहीये. मी मोठा भाऊ म्हणून तुझा मनापासून आदर करतो त्या आदराचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस आणि माझ्याकडून उगाच तुझ्याबद्दल चुकीचे शब्द निघतील, तु त्या मुलीचं नावं पुन्हा माझ्या समोर घेऊ नकोस. मला उद्या सकाळी लवकर निघायचं आहे तर मला आता झोपायचे आहे, तु जाऊ शकतोस."

प्रविणचं बोलणं पूर्ण झाल्यावर त्याचा दादा म्हणाला," सोनालीने तुझ्याकडून जी रक्कम घेतली होती ती रक्कम व्याजासकट ती तुला देऊन टाकणार आहे तसेच पूर्ण गावासमोर ती तुझी जाहीररीत्या माफी मागणार आहे आणि सोनालीच्या वडिलांनी आपल्या शेतजमिनी शेजारी दहा एकर जमीन घेतलेली आहे, ती जमीन ते तुझ्या नावावर करायला तयार आहेत."

प्रविण चिडून म्हणाला,"दादा तुला माझं बोलणं कळतच नाहीये का? मी नात्यात व्यवहार करत नाही आणि ज्या नात्यात व्यवहार आला ते नातं निस्वार्थीपणे टिकू शकणार नाही. मला त्या जमिनीत किंवा तिच्या पैश्यांमध्ये काहीच रस नाहीये."

दादा म्हणाला," तुला जमिनीत रस नाहीये म्हणतोस मग पुढे जाऊन आपल्या जमिनीत बरोबर वाटा मागायला येशील तेव्हा म्हणणार नाहीस की मला जमिनीत रस नाही म्हणून."

प्रविण म्हणाला,"दादा प्लिज मला खरंच आपल्या काय पण कोणाच्याच जमिनीत रस नाहीये आणि आपली जमीन म्हणतो आहेस ना, मग ती माझी तुझी हे कुठून आलं. मी इथे येऊन शेती कधीच करु शकत नाही तेव्हा मी जमिनीत वाटा का मागेल? आणि दादा मला ना आता सध्या या विषयावर बोलायचं नाहीये."

©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all