Aug 16, 2022
कथामालिका

रेशीमबंध भाग १

Read Later
रेशीमबंध भाग १

पुनम कॉम्प्युटर वर काम करत ऑफिस मध्ये बसलेली असते, पुनमला आपले काम मन लावून, लक्ष देऊन करण्याची सवय असल्याने ती पूर्णपणे कामात मग्न होऊन जात असे, आजूबाजूला काय गोंधळ चालू आहे हेही तिच्या लक्षात यायचे नाही. आपलं काम भलं आणि आपण हा तिचा ठरलेला नियम असायचा, पुनमला तिच्या कामात कोणीही येऊन डिस्टर्ब केलेलं चालायचं नाही. नेहमी प्रमाणे पुनम आपले काम करण्यात मग्न होती तोच तिचा फोन वाजला, फोन वायब्रेशन वर असल्याने तिने फोन येत आहे याकडे दुर्लक्ष केले. पुनमच्या शेजारी बसणाऱ्या चैतालीच्या लक्षात आले की हिचा फोन केव्हाचा वायब्रेट होत आहे आणि मॅडम फोन घ्यायला काही तयार नाही म्हणून चैताली फोन उचलून म्हणाली," हॅलो काकू, तुमच्या मुलीला तुमचा फोन घ्यायला वेळ नाहीये, she is so much busy."

"चैताली आईला सांग मी तिला लंच ब्रेक मध्ये फोन करते" कॉम्प्युटर वरील आपली नजर न हटवता पुनमने चैतालीला आपल्या आईला निरोप द्यायला सांगितला.

पुनमने सांगितल्या प्रमाणे चैतालीने तिच्या आईला निरोप देऊन फोन कट केला. चैताली पुनम कडे बघून म्हणाली," अग काकूंच काहीतरी अर्जंट काम असेल ना? तु काम करता करता फोनवर बोलूच शकली असतीस ना? पुनम तु काका काकूंना खूपच गृहीत धरत आहेस."

पुनम आपले काम न थांबवताच बोलू लागली, "चैताली आईचे जर काही अर्जंट काम असते तर तिने तुझ्या फोनवर फोन केला असता आणि दुसरी गोष्ट आई कोणत्या विषयावर व काय बोलणार होती याची कल्पना मला आली आहे, आत्ता जर मी आई सोबत बोलले असते तर माझं कामावरील concentration कमी झालं असतं आणि ते मला परवडणार नाहीये. आपली कंपनी आपल्याला पगार इथे काम करण्याचा देते, फोनवर बोलण्याचा नाही. मी आई बाबांना अजिबात गृहीत धरत नाहीये."

" तुझ्यासमोर बोलण्यात आजपर्यंत मी कधी जिंकले नाहीये, काकूंच्या बोलण्यातून त्या जरा काळजीत असल्या सारख्या वाटल्या म्हणून मी बोलले" चैताली बोलता बोलता फाईल हातात घेऊन निघून गेली.

चैताली निघून गेल्यावर पुनम मनातल्या मनात पुटपुटली, "चैतालीला माझ्या बोलण्याचा राग आलेला दिसतोय, जाऊदेत तिचा राग कसा घालवायचा हे मला माहीत आहे."

लंच ब्रेक झाल्यावर पुनम आईला फोन करण्यासाठी निघून गेली, चैताली आपला आणि पुनमचा डबा घेऊन कंपनीच्या कँटीन मध्ये घेऊन गेली व पुनमची वाट बघत बसली. साधारणतः दहा मिनिटांनी पुनम कँटीन मध्ये जाऊन चैतालीला म्हणाली," अग हे काय अजून तु जेवायला सुरुवात केली नाहीस"

"मी तुझ्या शिवाय कधी जेवेल का? तुझा कितीही राग आला तरी" चैतालीने सांगितले

पुनम हसून म्हणाली," अरे बापरे चैताली मॅडमचा अजून राग गेला नाहीये वाटतं, माझा डबा उघड म्हणजे तुझा राग आपोआप जाईल, तुझ्या आवडती भाजी आहे."

चैताली डबा उघडून म्हणाली," वाव तुझ्या हातचं वांग्याचं भरीत म्हणजे अप्रतिम असणार, पुनम तुला माहितीये मी यापूर्वी कधीच वांग्याचं भरीत खात नव्हते पण तुझ्या हातचं खाल्ल्या पासून वांग्याचं भरीत माझं फेवरेट झालं आहे. मी मागच्या महिन्यात माझ्या मामाकडे गेले होते तेव्हा मला वांग्याचं भरीत खाताना बघून सर्वजण माझ्या कडे आश्चर्याने बघत होते."

पुनम म्हणाली," हो का, बरं तुला जेवढं खायचं आहे तेवढं भरीत तु खाऊ शकतेस, एवढी बडबड करण्याची काय गरज आहे?"

चैताली राग आल्याचं नाटक करत म्हणाली, "मी ज्या दिवशी नसेल ना, तेव्हा तुला माझी व माझ्या बडबडीची आठवण येईल आणि तो दिवस लवकरच यावा अशी मी आशा व्यक्त करते. पुनम वांग्याच्या भरीताच्या नादात मूळ मुद्दा बाजूलाच राहिला की, काकूंनी तुला फोन कशाला केला होता?"

" संध्याकाळी सहा वाजता एका मुलाला भेटायला कॉफी शॉपमध्ये जायचं आहे, त्याची आठवण करुन देण्यासाठी आईने फोन केला होता" पुनमने जेवण करता करता उत्तर दिले.

चैताली एक्साईटेड होऊन म्हणाली," अच्छा पण हे सगळं तु तोंड लटकवून का सांगत आहेस?"

" चैताली तुला माहीत आहे ना की मला लग्न करायचं नाहीये, आयुष्यात एकदा फसली आहे, आता पुन्हा तेच तेच करायचं नाहीये." पुनमने उत्तर दिले

यावर चैताली म्हणाली," अग वेडाबाई मग अशी एकटी किती दिवस राहणार आहेस? काका काकूंची व्यथा तर तु समजून घे, त्यांचंही वय होत चाललं आहे, त्यांच्या माघारी तु एकटी पडशील म्हणून ते तुला लग्नाचा आग्रह करत आहेत ना? अग एकदा तु फसली म्हणून पुन्हा तसच होईल हे तु गृहीत धरुन का चालली आहेस? I know तु त्या एका incident मुळे खूप बदलली आहेस पण जर मुलगा चांगला असेल तर विचार करायला काय हरकत आहे?"

पुनम म्हणाली," चैताली मला एक सांग, लग्न करणे इतके महत्त्वाचे आहे का? लग्न केलं नाही तर मी आयुष्य जगू शकणार नाही का? आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत, इथे मुली मुलांच्या बरोबरीने काम करुन पैसा कमवत आहेत, मग त्या मुलांच्या आधारा शिवाय एकट्या राहू शकत नाहीत का? का म्हणून आयुष्य जगण्यासाठी आपल्याला एका मुलाचा आधार घ्यावा लागतो. आई बाबांचं बोलणं, त्यांचे विचार मी समजू शकते पण तुझ्या कडून या विचारांची मला अपेक्षा नव्हती."

पुनम व चैताली मधील संभाषण त्यांच्या टेबलच्या शेजारी बसलेल्या पाटील मॅडम ऐकत होत्या. चैताली काही बोलणार इतक्यात पाटील मॅडम म्हणाल्या," सॉरी मी तुमच्या मध्ये बोलत आहे, चैताली पुनमला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देते, जेवण झाल्यावर माझ्या केबिनमध्ये या मग आपण या विषयावर बोलूयात."

पुनम व चैताली या दोघींनी मान हलवून होकार दिला. एवढं बोलून पाटील मॅडम त्यांच्या केबिनमध्ये निघून गेल्या.पाटील मॅडम ह्या कंपनीतील सीनिअर पोस्टवरील अधिकारी होत्या, पाटील मॅडमचं वय चाळीशीच्या आसपास असेल. पुनम व चैताली आपलं जेवण संपवून पाटील मॅडमच्या पाठोपाठ केबिन मध्ये गेल्या. पाटील मॅडमने दोघींना आपल्या समोरील खुर्चीत बसायला सांगितलं. पाटील मॅडम म्हणाल्या," पुनम तुझ्या आयुष्यात पहिले काय घडून गेलं आहे? याची मला कल्पना नाही, पण तु जे काही प्रश्न आत्ता चैतालीला विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तरे मला द्यायला नक्कीच आवडतील. मी माझ्या अनुभवाचे बोल तुला सांगत आहे. मी शक्यतो माझ्या वैयक्तिक आयुष्या बद्दल कंपनीतील कोणाशीच फारस काही बोलत नाही पण तुझी परिस्थिती बघता तुला हे सांगावं अस मला वाटतं आहे कारण तु यातून काहीतरी बोध घेशील अशी मला आशा आहे.

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच नोकरी करण्याचे स्वप्न मी पाहिले होते, कॉलेज संपल्यावर लगेच मी एका छोट्या कंपनीत नोकरीला सुरुवात केली, पगार कमी असला तरी अनुभवा करता मी ती कंपनी जॉईन केली होती. नोकरी लागल्यानंतर सहा महिन्यांतच माझे लग्न जमून साखरपुडा झाला होता. साखरपुडा व लग्न यात सहा महिन्यांचा अवधी होता, या काळात मी व माझा होणारा नवरा आमच्यात अनेक गाठी भेटी झाल्या, मी माझ्या स्वप्नांबद्दल त्याला आधीच पूर्ण कल्पना दिली होती, सुरवातीला त्याला माझे सर्व स्वप्न मान्य होते, मलाही त्याचा स्वभाव आवडला होता, त्याची नोकरी चांगली होती, दिसायलाही छान होता. लग्न करताना आपण हेच बघतो ना ग. स्वभाव तर हळूहळू कळू लागतो. आमच्या नंतरच्या भेटीत मला अस जाणवलं की त्याला माझ्या नोकरीची अजिबात किंमत नव्हती, कमी पगाराची नोकरी म्हणून तो कायम मला हिणवत असायचा. माझ्या तत्वांना तो फारसं महत्त्व द्यायचा नाही, माझ्या वेळेची किंमत त्याला नव्हती, तो माझ्यावर अति अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करु लागला होता. माझे त्याच्यावर प्रेम असल्याने मी त्याला समजून घेत होते पण कालांतराने त्याचा विचित्र स्वभाव माझ्या समोर येऊ लागला होता, माझ्या आई वडीलांसमोर तो अगदी आज्ञाधारक व्यक्तीप्रमाणे वागायचा आणि माझ्या समोर मात्र जरा जास्तच विचित्र वागू लागला होता. लग्नाला पंधरा दिवस राहिले असतील तेव्हा त्याने जे काही कृत्य माझ्या सोबत केले होते ते मी तुम्हाला सांगू सुद्धा शकणार नाही. माझी सहनशक्ती त्याच दिवशी संपली होती आणि मी दुसऱ्याच दिवशी मला लग्न करायचे नाही हे आई वडीलांना सांगून टाकले. सगळ्या नातेवाईकांनी मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की तु अस करु नकोस, यात तुझीच बदनामी होईल, पुन्हा तुझ्याशी लग्न कोणी करणार नाही, त्याच लग्न होऊन जाईल पण तु तुझ्या आयुष्याचा विचार कर. अश्या विविध पद्धतीने मला समजवण्यात आले, पुढे काही दिवस मला सतत टोमणे ऐकून घ्यावा लागायचे पण माझा निर्णय ठाम असल्याने तो बदलवण्यात कोणालाही यश आले नाही.

त्या माणसाचे एका मुलीसोबत लग्न झाले आणि विशेष म्हणजे ती मुलगी आमच्याच नातेवाईकांतील होती, लग्नानंतर सहा महिन्यांतच त्या मुलीने आत्महत्या केली आणि चिठ्ठीत त्याने काय काय अत्याचार केले याबद्दल लिहून गेली तेव्हा माझे नातेवाईक मला म्हणाले की तु घेतलेला निर्णय अगदी योग्य होता. माझ्या आई वडिलांनी त्यानंतर माझ्यासाठी अनेक स्थळ शोधली पण मला लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट उरलेला नव्हता, माझा कोणावर विश्वास बसायलाच तयार नव्हता. आई वडील होते तोपर्यंत त्यांनी माझ्या लग्नासाठी अतोनात प्रयत्न केले पण माझा निश्चय ठाम होता. आता माझे आई वडील या जगात नाहीयेत, भाऊ बहीण त्यांच्या जगात व्यस्त आहेत, सगळेजण मला ओळख देतात पण माझ्या सोबत कोणीच राहत नाहीये. कंपनीतून घरी जावेसे वाटत नाही कारण एकटी असल्याने घर खायला उठतं. मागच्या महिन्यात माझं प्रमोशन झालं, आनंद भरपूर झाला पण माझं कौतुक करणार कोणीच नव्हतं, माझ्या आयुष्यात अस कोणीच नाही की ज्याच्या सोबत मी माझा आनंद सेलिब्रेट करु शकेल. पगार भरपूर आहे पण खर्च कोणावर करावेत असा प्रश्न पडतो. मैत्रिणी आहेत पण त्या त्यांच्या आयुष्यात व्यस्त असतात, दररोज आपल्या साठी कोण वेळ काढेल, त्यासाठी आपलं माणूस असायला पाहिजे. आई वडील होते तोपर्यंत माझी विचारपूस करणारे, काळजी घेणारे कोणीतरी आहेत असं वाटायचं पण ते गेल्या पासून कोणीही मी कशी आहे? असं विचारत नाही. मी एकटी फिरायला जाते तेव्हा सर्वजण म्हणतात की तु किती लकी आहेत की एकटी फिरू शकते, तुझं आयुष्य कोणावर अवलंबून नाही पण मी काय सांगू की मला हा एकटेपणा सहन होत नाहीये. या एकटे पणाला मी कंटाळले आहे.

पुनम माझी वेळ निघून गेली आहे पण तुझ्याकडे अजून वेळ आहे. यापूर्वी काय घडलं होतं याचा विचार करत बसली तर आयुष्य पुढे जाणारच नाही. आपल्यातील प्रत्येकाला आपण मरणार आहोत हे माहीत आहे पण मरण्याच्या भीतीने आपण जगणं तर सोडून देत नाही ना? बघ विचार कर आणि आई बाबांनी ज्या मुलाला भेटायला सांगितले आहे त्याला डोकं शांत ठेऊन भेट, त्याच्यावर विश्वास ठेऊन बघ, आयुष्याला एक संधी देऊन बघ, कदाचित यामुळेच तुझं आयुष्य बदलू शकते. मला ज्या दुःखाला सामोरे जावे लागले त्या दुःखाचा तुला सामना करावा लागू नये ही माझी इच्छा आहे. कोणत्याच आई बाबांना वाटत नाही की आपण गेल्यावर आपली मुलगी एकटी रहावी म्हणून ते आपल्यामागे लग्नाचा तगादा लावत राहतात. आयुष्याला एक संधी तर देऊन बघ, इतकही सुंदर आयुष्य असू शकेल की तु त्या आयुष्याचा कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल."

पुनम काय निर्णय घेईल? हे बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Digheईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now