रेशीमबंध भाग १९

Story Of A Relationship
मागील भागाचा सारांश: प्रविणने त्याचा होकार कळवल्यावर पुनमने त्याला आपला निर्णय लगेच सांगितला नाही, तिने त्याला सांगितले की मी आई बाबांसोबत चर्चा केल्यावरच माझा निर्णय तुम्हाला सांगेल. प्रविण त्याच्या घरी जायला निघतो त्यावेळी सानवी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते तसेच सानवीची इच्छा असते की प्रविणने कायम त्यांच्यासोबत त्यांच्या घरी रहावे म्हणून. पुनमचे आई बाबा बंगलोरहून परत आले होते. आई बाबांनी पुनमकडे प्रविणचा विषय घेतला असता तिघांची यावर चर्चा झाली मग पुनमने आपला होकार तिच्या आई बाबांना सांगितला. पुनमच्या आई बाबांनी प्रविणच्या आईला पुनमचा होकार कळविण्या करता संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते पण प्रविणच्या आईचा फोन लागत नव्हता म्हणून पुनमने प्रविणला मॅसेज करुन ठेवला होता पण त्याचा रिप्लाय न आल्याने पुनमला त्याची काळजी वाटू लागली होती.
आता बघूया पुढे....
प्रविणने आज लॉगइन न केल्याने पुनम काळजीत पडली होती, दुपार झाली तरी प्रविणचा रिप्लाय आलेला नव्हता म्हणून पुनमने लंच ब्रेकमध्ये प्रविणला फोन लावला, सुरवातीला दोन तीन रिंग वाजल्या तरी फोन उचलला गेला नाही. फोन कट होण्याच्या वेळच्या शेवटच्या रिंगमध्ये प्रविणचा फोन उचलला गेला.
"हॅलो कोण बोलतंय?" समोरुन आवाज एका स्त्रीचा होता.
पुनमला प्रश्न पडला की प्रविणच्या फोनवर एका स्त्रीचा आवाज कसा येऊ शकतो? म्हणून तिने विचारले," हा प्रविण देशमुखचा नंबर आहे ना?"
"हो हा फोन प्रविण देशमुखचाच फोन आहे, आपलं त्यांच्याकडे काही काम होत का?" समोरुन उत्तर आले.
पुनम म्हणाली," मी प्रविण सरांसोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहे, प्रविण सर कुठे आहेत? आणि आपण कोण बोलत आहात?"
"प्रविण सध्या बिजी आहेत. मी त्यांची बायको सोनाली देशमुख बोलत आहेत. प्रविण फ्री झाल्यावर तुमचा फोन आल्याची कल्पना मी त्यांना देईल मग ते तुम्हाला कॉल बॅक करतील." एवढं बोलून सोनालीने फोन कट केला.
सोनालीचं बोलणं ऐकून पुनम जरा जास्तच शॉक झाली. प्रविणचा फोन सोनालीने कसा उचलला? हा प्रश्न पुनमला पडला, शिवाय ती स्वतःला प्रविणची बायको असं का सांगत आहे. नेमका प्रविण आता कशात बिजी असेल? प्रविण माझ्या पासून काही लपवत आहे का? प्रविण मला फसवत तर नाहीये ना? प्रविणवर विश्वास ठेवून मी काही चूक तर केली नाही ना? असे अनेक प्रश्न पुनमच्या डोक्यात येत होते. लंच ब्रेक संपल्यामुळे तिने परत आपल्या कामाला सुरुवात केली. कामात व्यस्त झाल्यावर प्रविणचा विचार तिच्या डोक्यातून गेला होता. संध्याकाळी ऑफिसचे काम संपल्यावर पुनमची आई तिच्या रुममध्ये येऊन म्हणाली," पुनम तुझं प्रविण सोबत काही बोलणं झालं का? प्रविणच्या आईचा व प्रविणचा दोघांचाही फोन लागत नाहीये."
पुनम म्हणाली,"आई प्रविणने आमच्या प्रोजेक्टच्या लिंकला लॉगइन नव्हतं केलेलं म्हणून मी दुपारी त्यांना फोन लावला तर त्यांचा फोन त्यांच्या बायकोने उचलला होता, तिने सांगितलं की प्रविण बिजी आहेत."
पुनमची आई म्हणाली," काय? अग पण आता तिचा आणि प्रविणचा काय संबंध? प्रविणचा फोन तिच्याकडे कसा काय?"
पुनम म्हणाली," आई मला जर या प्रश्नांची उत्तरे माहीत असतात तर मी अशी विचार करत बसले असते का?"
पुनमची आई म्हणाली," तु यावर जास्त विचार करु नकोस आणि निगेटिव्ह विचार मनात येऊ देऊ नकोस, कदाचित परिस्थिती थोडी वेगळी असू शकते. प्रविणचा फोन येण्याची वाट बघूयात, उद्या पर्यंत त्यांचा फोन नाही आला तर ज्यांनी प्रविणचं स्थळ आम्हाला सुचवलं होतं त्यांच्या कडे फोन करुन मी चौकशी करते."
एवढं बोलून आई पुनमच्या रुममधून निघून गेली. आई जरी सांगून गेली की यावर जास्त विचार करु नकोस म्हणून पण पुनमच्या डोक्यातून प्रविणचे विचार काही जात नव्हते, ती आपल्या रुममध्येच बसून होती. साधारणतः एक तासाने पुनमचा फोन वाजला, बघते तर काय? प्रविणचा फोन होता. एक रिंग पूर्ण व्हायच्या आत पुनमने फोन उचलला. प्रविणचं काहीच बोलणं ऐकून न घेता पुनमने बोलायला सुरुवात केली,
"हॅलो तुम्ही कुठे आहात? रात्री मॅसेज केला होता त्याला अजून रिप्लाय आलेला नाही, आज तुम्ही प्रोजेक्टला लॉगइन पण केलेलं नव्हतं, फोन केला तर दुसऱ्याच कोणीतरी फोन उचलला, तुमचं नेमकं काय चालू आहे? तुम्ही मला फसवत तर नाही आहात ना?"
प्रविण हळुवार म्हणाला," एवढं सगळं बोलण्या आधी माझं म्हणणं एकदा ऐकून घ्याल का?"
प्रविणचा आवाज भरलेला येत होता, त्याला काय झाले असेल या काळजीने पुनम म्हणाली, "तुमचा आवाज असा का येत आहे? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तुम्ही ठीक आहात ना?"
प्रविण म्हणाला," मी तुम्हाला सगळं सांगतो, काल मी माझ्या घरी गेल्यावर घरातील पसारा आवरता आवरता माझा फोन खाली पडून फुटला, त्याचा डिस्प्ले गेला होता. माझ्याकडे एक जुना फोन होता त्यात मी माझं सिम टाकलं आहे पण तुमचा फोन नंबर जुन्या फोनमध्ये राहिल्याने मला तुम्हाला संपर्क करता आला नाही. माझ्या ह्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप नाहीये तेव्हा तुम्ही जो मॅसेज केला असेल तो माझ्या पर्यंत आलाच नाहीये मग मी रिप्लाय कसा देणार? काल संध्याकाळी मला माझ्या दादाचा फोन आला होता. माझे बाबा एक्सपायर झाले म्हणून मला ताबडतोब गावाला यायला लागले, रात्री मला पोहचायला खूपच उशीर झाल्याने बाबांचा अंत्यविधी सकाळी करण्यात आला, इकडे सकाळपासून लाईट गेलेली असल्याने फोन डिस्चार्ज झाला होता शेवटी दुपारी इथे जवळच आमचे एक नातेवाईक राहतात त्यांच्या घरी फोन चार्जिंगला लावला होता. कदाचित तेव्हाच तुमचा फोन आला असेल. आत्ता मी फोन बघितला तेव्हा तुमचा फोन नंबर ओळखीचा वाटला म्हणून लावून पाहिला."
पुनम म्हणाली," ओह गॉड, बाबांना कोरोना झाला होता का?"
प्रविण म्हणाला," नाही त्यांना हार्ट अटॅक आला होता. आई सोबत बोलता बोलताच त्यांनी मान टाकली म्हणे. सगळं कसं अचानकच घडलं आहे त्यामुळे सर्वांनाच शॉक बसलेला आहे. माझ्या सोबत बाबा बोलायचे नाही पण ते कुठेतरी सुखरुप आहेत हेच माझ्या साठी जास्त महत्त्वाचे होते. बाबा गेल्यापासून आयुष्य एकदम क्षणिक असल्यासारखं वाटत आहे."
पुनम म्हणाली," अच्छा, आई ठीक आहेत ना? त्यांना मोठा धक्का बसला असेल ना?"
प्रविण म्हणाला," हो ना, आईला खूपच मोठा धक्का बसला आहे, एक समाधानाची गोष्ट म्हणजे त्यांची सोबत चारधाम यात्रा तरी होऊन गेली होती. आई trauma मध्येच आहे, तिला सावरायला थोडा वेळ अजून लागेल."
पुनम म्हणाली," Actually काल माझे आई बाबा तुमच्या आईला फोन लावत होते पण फोन लागला नाही."
प्रविण म्हणाला," हो ते आईचा फोन इकडे तिकडे पडलेला असेल आणि तसंही इकडे रेंजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काका काकू आईला फोन का करत होते?"
पुनम म्हणाली," आमचा होकार कळविण्या करता."
प्रविण म्हणाला," अच्छा तर फायनली तुम्ही होकार दिलात तर. आई जेव्हा ठीक असेल तेव्हा मी आईला तुमचा निरोप देतो, काका काकूंना सांगून टाका की पुढचे दोन तीन महिने तरी आपण पुढे जाऊ शकत नाही कारण आमच्या गावाकडे तशी पध्दतच आहे. मी पुण्यात आल्यावर काका काकूंना भेटून जाईल म्हणजे उगाच त्यांच्या मनात काही शंका यायला नको."
पुनम म्हणाली," ओके चालेल, तुम्ही तिकडे किती दिवस राहणार आहात?"
प्रविण म्हणाला," अजून पंधरा दिवस तरी मी इकडेच राहील, सगळे विधी उरकूनच मी पुण्याला येईल."
पुनम म्हणाली,"Actually हे सर्व विचारण्याची ही योग्य वेळ नाहीये पण माझ्या डोक्यात तिचं टिक टिक चालू राहील म्हणून विचारते. तुमचा फोन तुमच्या बायकोने म्हणजे सोनालीने उचलला होता, ती तिथे का होती?"
प्रविण म्हणाला,"तुमचा फोन सोनालीने उचलला होता? मला तर माहीत नव्हतं. ती माझ्या नात्यातील असल्याने आमचे बरेच कॉमन नातेवाईक आहेत, बाबांचं कळल्यावर पॉलिसी करण्यासाठी म्हणून अंत्यविधीला आली होती, माझा फोन इथे चार्जिंगला असतांना ती इथेच असेल म्हणून तिने फोन उचलायचा शहाणपणा केला असेल."
पुनम म्हणाली," ते काहीही असो पण ती म्हणाली की ती तुमची बायको आहे म्हणून."
प्रविण चिडून म्हणाला," ती सोनाली एक नंबरची मूर्ख मुलगी आहे, ती कधीही कुठेही काहीही बोलू शकते. तीच बोलणं तुम्ही एवढं मनावर घेऊ नका. एक मिनिट तुमच्या मनात माझ्याबद्दल काही शंका आली होती का?"
पुनम म्हणाली," शंका तर येणारच ना? सोनाली म्हणाली की तुम्ही कामात बिजी आहात म्हणून तुम्ही फोन घेऊ शकत नाही आणि तिने छाती ठोखपणे सांगितलं की ती तुमची बायको आहे म्हणून मग मला शंका येऊच शकते ना?"
प्रविण म्हणाला," कदाचित तुमच्या जागी मी असतो तर मलाही असंच वाटू शकलं असतं. मी तुम्हाला फसवत नाहीये, तुम्हाला माझ्या आयुष्यातील अशी सिक्रेटस माहिती आहेत जे दुसऱ्या कोणालाही माहीत नाही. मी तुमचा विश्वास तुटू देणार नाही हा या प्रविण देशमुखचा शब्द आहे."
पुनम म्हणाली,"ठीक आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि वेळ मिळाला तर तुमची ख्याली खुशाली कळवत जा. मी तुमचा निरोप आई बाबांना देते."
प्रविण म्हणाला," हो मी फ्री असल्यावर तुम्हाला फोन करेल कारण इथे बऱ्याच अश्या गोष्टी होतील की त्याने माझं डोकं खराब होणार आहे तेव्हा मन मोकळं करण्यासाठी मला तुम्हाला फोन करावाच लागेल."
पुनम म्हणाली," पुढे काहीही घडो पण तुम्ही स्वतःला शांत ठेवा, कोणी काही बोललं तरी स्वतःला चूक मानू नका. तुमचं काहीही चुकलेलं नाहीये. आणि आईंना सांभाळा, त्यांना सध्या तुमच्या आधाराची गरज आहे."
एवढं बोलून पुनमने फोन कट केला, त्यानंतर पुनमने आई बाबांकडे जाऊन सदर परिस्थिती सांगितली. यावर पुनमचे बाबा म्हणाले," अरे देवा हे तर फारच वाईट झालं."
पुनम म्हणाली," हो ना बाबा, त्यांच्या घरचे सर्वच शॉक मध्ये आहेत. अचानक घरातील माणूस असं गेल्यावर खरंच किती वाईट वाटतं असेल ना?"
पुनमची आई म्हणाली," हो वाईट तर वाटतंच पण त्यामुळे आता तुमच्या लग्नाची पुढची बोलणी लवकर होऊ शकणार नाही याचं मला जास्त वाटतं आहे."
पुनम म्हणाली," आई तु हे काय बोलत आहेस? अग प्रविणचे वडील वारले आहेत आणि तु लग्नाचं काय घेऊन बसली आहेस?"
पुनमची आई म्हणाली," आता पुन्हा अर्जुन माझं डोकं खात बसेल, मला वाटलं होतं की प्रविणच्या आई सोबत बोलून पुढील दोन तीन आठवड्यात तुमचं लग्न लावून देऊ म्हणजे मला व तुझ्या बाबांना अर्जुनकडे जाऊन राहता येईल, त्याची बडबड तरी कायमची बंद होऊन जाईल पण आता पुढील दोन तीन महिने काहीच करता येणार नाही. तुला एकटीला इथे ठेऊन जाणंही योग्य वाटतं नाहीये आणि अर्जुनला दुखवावं असं वाटतं नाहीये. आणि त्यात आता तुझं घरुन काम चालणार आहे, सानवीची शाळाही ऑनलाईन होणार आहे म्हणजे डोक्याला अजून एक ताण वाढला आहे. सानवीची शाळा संपेपर्यंत तिच्या सोबत एका माणसाला थांबावं लागेल आणि हे काम एखादी कामवाली बाई करु शकत नाही. काय करावं काहीच कळत नाहीये, माझा जीव तुझ्याजवळही तेवढाच अडकला आहे जेवढा रश्मीजवळ. रश्मीला वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होत असते आणि तिच्या आईला स्वयंपाकाची अजिबात गोडी नाहीये. रश्मी मला तर इकडे परत येऊच देत नव्हती."
पुनम म्हणाली," आई मला थोडा वेळ दे, मी यावर विचार करुन काहीतरी तोडगा काढते. पण आई सध्याचं वातावरण कोरोनामय आहे, या वातावरणात बंगलोरला जाणं योग्य ठरेल का? याचा विचार करुन ठेव. तुम्हाला दादाकडे जाण्याची एवढी इच्छा असेल तर तुम्ही जा, पण त्याआधी मला सानवीची काय सोय करता येईल ते बघूदेत, मग तुम्ही बिनधास्त जा."
©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all