रेशीमबंध भाग १३

Story Of A Relationship

मागील भागाचा सारांश: प्रविणने सानवीला पेंटिंग शिकवायला सुरुवात केली होती तसेच तो सानवीचा अभ्यासही घेत असे त्यामुळे पुनमचे एक काम कमी झाले होते. रविवारच्या दिवशी पुनमला सुट्टी असल्याने तिला प्रविण सोबत गप्पा मारायला मोकळा वेळ मिळाला होता. पुनमचे आई बाबा बाहेर गेलेले होते, पुनम प्रविणला दुपारच्या जेवणात काय हवं आहे? हे विचारायला गेली असता त्याने बाहेरुनच जेवण ऑर्डर केले. पुनम व प्रविण मध्ये गप्पा चालू असताना पुनमने त्याला विचारले की तुम्ही तुमच्या आईला काय निर्णय कळवला? तर यावर प्रविणने उत्तर दिले की मी जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत माझा निर्णय मी तुम्हाला सांगणार नाही. ज्या दिवशी या घरातून जाईल त्या दिवशी मी माझा निर्णय सांगेल.

आता बघूया पुढे....

प्रविणने पुनमला चैताली व तिच्या मैत्रीबद्दल विचारले होते म्हणून पुनमने चैताली बद्दल सांगायला सुरुवात केली, " चैताली व मी एकाच शाळेत होतो पण आम्ही एका वर्गात नव्हतो. मी सेमी इंग्रजी मिडीयमला होते तर तिचं संपूर्ण शालेय शिक्षण मराठी मिडीयम मधून झालेलं आहे. चैताली तिच्या वर्गात टॉपर असायची त्यामुळे अशी एक मुलगी आपल्या शाळेत आहे एवढं मला माहीत होतं. शाळेत असताना आमच्यात कधीच बोलणं झालं नव्हतं. अकरावीला आम्ही दोघी एकाच वर्गात आलो मग तेव्हा आमच्यात थोडं फार बोलणं सुरु झालं आणि आमच्यात चांगली मैत्री झाली. पुढे BCA ला आम्ही दोघींनी एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेव्हापासून आम्ही बेस्ट फ्रेंड्स झालो. माझ्या प्रत्येक सुख दुःखात ती सहभागी होती. चैतालीला निलेश अजिबात आवडायचा नाही हे तिने स्पष्ट मला सांगून टाकले होते म्हणजे ती त्याच्या सोबत कधी बोलायची पण नाही. BCA च्या लास्ट इयर ला असताना तिच्या बाबांनी लग्न जमवले आणि कॉलेज पूर्ण झाल्यावर तिचे लग्न प्रदीप सोबत झाले. प्रदीपने MBA केलेलं आहे आणि तो एका चांगल्या बँकेत नोकरीला आहे. चैताली व माझी मैत्री आमच्या दोघींच्या घरी चांगलीच गाजलेली आहे. चैताली जर कधी नाराज वाटली तर तिची आई मला फोन करुन तिची चौकशी करत असे. माझ्या घरीही तीच परिस्थिती होती. मी जर आईची एखादी गोष्ट ऐकली नाही तर आई चैतालीला फोन करुन मला समजून सांगायला लावायची. निलेश गेल्यानंतर किंवा तो मला त्रास द्यायचा त्या काळात चैताली माझ्या पाठीमागे भक्कम उभी होती, त्या काळात बऱ्याच अश्या गोष्टी घडत होत्या की त्याबद्दल मी आईला सर्व काही सांगू शकत नव्हते, तेव्हा मी माझं मन चैतालीकडे मोकळं करायची.

चैतालीला नवरा मात्र मस्त भेटला आहे, त्याचा स्वभाव चैतालीच्या एकदम विरुद्ध आहे. चैताली जेवढी बडबडी, आघाऊ आहे तेवढाच तो शांत व संयमी आहे.चैतालीने कितीही चिडचिड केली तरी तो शांत राहतो. लांबून जेव्हा त्यांच्याकडे कोणी बघत तेव्हा म्हणत असेल की किती सुखी जोडपं आहे. पण त्यांच्या आयुष्यात वेगळाच प्रॉब्लेम उभा राहिला आहे. चैतालीच्या लग्नाला आता सात ते आठ वर्ष झाले असतील पण त्यांना मुलंबाळं होत नाहीये. डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर समजले की चैताली मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हा चैतालीची सासू प्रदीपला म्हणाली की चैतालीला घटस्फोट दे तेव्हा प्रदीपने आईला स्पष्ट नकार दिला. चैतालीची सासू तिला सतत टोमणे मारायची म्हणून प्रदीपने दुसरा फ्लॅट घेतला व ते त्यांचं घर सोडून दुसरीकडं रहायला निघून गेले. प्रदीप चैताली सोबत खंबीरपणे उभा राहिला. प्रदिपच म्हणणं आहे की नशिबात असेल तर त्यांना मुलंबाळं होईल त्यासाठी चैतालीला घटस्फोट द्यायची काय गरज आहे?. वर्षातून एकदा तरी तो चैतालीला घेऊन बाहेर फिरायला घेऊन जातो. चैतालीच्या सर्व इच्छा पूर्ण करतो, त्यांच्या घरात सर्व वस्तू आहेत, कसलीच कमी नाहीये. प्रत्येक विकेंडला मूव्ही बघणं, रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवण करणं हे त्यांचं ठरलेलं असतं.

सानवीचा जन्म झाल्यानंतर मी नोकरी शोधत होते तेव्हा ही नोकरी मला मिळवून देण्यासाठी चैतालीने अतोनात प्रयत्न केले. मला ही स्टेबल नोकरी तिच्या मुळेच भेटली असे म्हणावे लागेल."

प्रविण म्हणाला," प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळं दुःख असतं. चैताली कडे बघून असं वाटतं नाही की तिच्या आयुष्यात एवढं मोठं दुःख असेल. चैतालीच्या नवऱ्याचे विचार चांगले असल्यामुळे तिला ते तरी टेन्शन नाहीये."

दोघांचं बोलणं चालू असताना दरवाजाची बेल ऐकू येते. पुनम म्हणाली," आपली दाळबाटीची ऑर्डर आली असेल, मी घेऊन येते."

प्रविण म्हणाला,"माझ्या वॉलेट मधून पैसे घेऊन जा ना"

पुनम म्हणाली," नाही नको, तुम्ही आता आमच्या घरी आहात, मी तुमच्या घरी आले की मग तुम्हाला जे मागवायचं असेल ते मागवा."

पुनम दरवाजा उघडण्यासाठी निघून गेली. पुनमने आधी सानवीला जेऊ घातले मग तिला झोपी लावले आणि त्यानंतर पुनमने प्रविण साठी व स्वतःसाठी जेवणाचे ताट वाढले आणि प्रविणला बाहेर जेवण करण्यासाठी बोलावले. प्रविण म्हणाला,"मी रुममध्येच जेवायला बसतो ना, दररोज मी इथेच जेवण करतो."

यावर पुनम म्हणाली," आज थोडी जागा चेंज करुन बघा म्हणजे दोन घास जास्त जेवण जाईल."

पुनमच्या आग्रहास्तव प्रविण जेवणासाठी हॉल मध्ये आला. दाळबाटीचा एक घास खाल्ल्यावर पुनम म्हणाली," वाव दाळबाटी खूप टेस्टी आहे, मागच्या वेळी कधी खाल्ली होती तेही मला आठवत नाहीये."

प्रविण म्हणाला," माझी आई दाळबाटी घरीच बनवते.आम्ही लहान असताना आमच्या भावा भावांमध्ये बाटी खाण्याची स्पर्धा लागायची."

"तुमचं लहानपण तर खूपच भारी गेलेलं दिसतंय." पुनमने विचारले

प्रविण म्हणाला," हो आमचं लहानपण खूपच मस्त गेलं होतं. लहानपणी आपण निष्पाप मनाचे असतो ना, आपल्यात इगो नावाचा घटक तेव्हा नसतो, मान अपमान काही समजत नाही. भांडण, मारामारी झाल्यावर पुढच्या पाच ते दहा मिनिटांत पुन्हा एकमेकांशी बोलायला लागायचो आणि आत्ता बघा तो बोलला नाही तर मी पण बोलणार नाही. उगाच इगो जागा होतो आणि नात्यांमधील अंतर वाढायला लागते."

पुनम म्हणाली," हो ना, आपलं जसं वय वाढलं तशी आपल्याला जास्त अक्कल आली आणि मग आपल्यात स्वाभिमान निर्माण झाला, तिथंच सर्व बिघडलं. तुमच्या भावांमध्ये अस काय झालं होतं की त्या दिवशी तुमच्या भावाने इतक्या तुटक भाषेत उत्तर दिलं होतं. तुम्हाला जर सांगायचं असेल तर सांगा."

प्रविण म्हणाला," तुम्हाला सांगायला मला काही प्रॉब्लेम नाहीये. सोनाली म्हणजे माझी पहिली बायको माझ्या वहिनीच्या नात्यातील होती, मी तिला घटस्फोट देतोय हे कळल्यावर दादा वहिनीने मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला पण मी काही त्यांचे ऐकले नाही तेव्हा दादाने माझ्याशी बऱ्याच वेळा वाद घालण्याचा प्रयत्न केला पण मी कोणापुढेही झुकलो नाही. सोनालीने माझ्यावर पोलिस केस केल्यावर गावात आमची बदनामी झाली, मला त्याने काही फरक पडला नव्हता पण माझ्या भावांना अपमानित झाल्यासारखे झाले होते म्हणून त्यांना माझा खूप राग आला होता. पोलिस केस मागे घेण्याच्या बदल्यात सोनालीच्या घरच्यांनी बऱ्याच पैश्यांची मागणी केली होती तेव्हा माझ्या दोन्ही भावांनी सांगून टाकलं होतं की तु जो तमाशा उभा केला आहेस तो तुच मिटव, आमच्या कडून तुला एक रुपयाची मदत सुद्धा मिळणार नाही त्यामुळे मला माझा फ्लॅट विकावा लागला होता त्यानंतर मी जेव्हा जेव्हा घरी जायचो त्यावेळी माझे भाऊ मला सतत टोमणे मारत असायचे, माझ्यामुळे त्यांच्या नावाची किती बदनामी झाली आहे हे ते सांगत बसायचे मग एक दिवस आमच्यात खूप मोठं भांडण झालं त्यादिवशी त्यांनी मला सांगितलं की आमच्या दारात परत तु यायचं नाहीस. माझ्या बाबांना सुद्धा मी घटस्फोट घेतलेला पटलेला नव्हता त्यामुळे त्यांनी माझ्या भावांना पाठिंबा दिला. माझी आई सोडून आमच्या घरातील एकही व्यक्ती माझ्याशी बोलत नाही. त्या दिवसानंतर मी गावी गेलो नाही व मला कोणी बोलावले सुद्धा नाही. तुमच्या घरासोबत माझं काही नातं नसताना सुद्धा सगळेजण माझी किती आपुलकीने काळजी घेत आहेत आणि याउलट माझे भाऊ ज्यांच्या सोबत माझं रक्ताचं नातं आहे त्यांना माझी काही पडली सुद्धा नाही. आईला जर मला भेटायचं असलं तर ती इकडे येऊन मला भेटते. आई मला सतत म्हणत असते की घरी ये म्हणून पण मलाच जायची इच्छा होत नाही."

पुनम म्हणाली," अरे बापरे एवढं सगळं घडून गेलं आहे तर. तुम्ही पहिल्यांदा हे सर्व सांगितलं नव्हतं तेव्हा मला वाटलं होतं की तुमची फॅमिली खूप चांगली असेल, तुम्हाला सपोर्ट करत असतील."

प्रविण म्हणाला," हे सगळं मी तुम्हाला पहिल्या भेटीत सांगूच शकलो नसतो. मी त्या सगळयाचा विचार करणंच सोडून दिलं आहे. कधी कधी वाटतं की आपण स्वतः जाऊन भावांसोबत बोलावं पण पुन्हा डोक्यात विचार येतो की आपल्यात अजून भांडणं झाली तर आईच्या डोक्याला ताप होईल म्हणून मग मी जायचं नाही हेच ठरवतो. आता त्या दिवसाचंच घ्याना, तुम्ही माझ्या अपघाता बद्दल सांगण्यासाठी फोन केला तर त्याने कसं उत्तर दिलं."

पुनम म्हणाली," हम्मम जाऊद्यात, काही दिवसांनी हळूहळू सर्व काही ठीक होईल. नात्याचं गणितं असंच असतं, एकदा बिघडलं की बिघडलंच. आपण कितीही समजदारी घेण्याचा प्रयत्न केला तरी ते बिघडतंच."

प्रविण म्हणाला," तुमचं आणि अर्जुन दादाचंही काही बरं नाही असंच दिसत आहे, सकाळी अर्जुन दादाचा फोन आल्यावर तुमचा मूड का खराब झाला होता? म्हणजे बघा हं तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा."

यावर पुनम म्हणाली," आता तुम्ही इतकं काही सांगितलं आहे तर मी एवढं सांगू शकणार नाही का? आज आई बाबा घरात नाहीये म्हणून मनातील एवढं सगळं बोलायला तरी भेटेल. आई बाबांना आम्ही दोन्ही मुलं सारखीच आहोत, त्यांनी मुलगी मुलगा असा भेदभाव कधीच केला नाही. अर्जुन दादाने सुद्धा लव्ह मॅरेज केलेलं आहे, माझी रश्मी वहिनी व तो एका कंपनीत जॉबला होते, तिथेच त्यांची ओळख झाली. आमची रश्मी वहिनी दुसऱ्या कास्टची आहे. आई बाबांना काही अडचण नसल्याने त्यांच्या संमतीनेच दादाचं लग्न झालं होतं. आई बाबा दादासोबत कायमचे बंगलोरला रहायला जाणार होते. रश्मी वहिनीचं व आईचं बऱ्यापैकी पटतं त्यामुळे आई बाबांना तिकडे जायला काहीच अडचण नव्हती. नेमकं त्यात निलेश एक्सपायर झाला आणि मी प्रेग्नंट असल्याने आई बाबा दादाकडे गेलेच नाही, त्यानंतर तर सानवी झाल्याने आई बाबा मला सोडून कुठेही जायला तयार होत नाही तर यात दादाचं म्हणणं आहे की पुनम एकटी राहू शकते, सानवीला पाळणाघरात ठेवून ती नोकरी करु शकते. दरवेळी दादाचा फोन आला की त्याचं तेवढंच बोलणं चालू असतं, इथे आल्यावर पण तेच तेच ऐकून मला कंटाळा आला आहे आणि त्यात आई बाबा सतत पुण्यात राहून कंटाळले आहेत, त्यांना काही दिवस तरी जागा बदल करायची आहे. दादाला वाटतं की आई बाबांना फक्त माझीच काळजी आहे म्हणून ते त्याच्याकडे जात नाहीत. आता रश्मी वहिनी प्रेग्नंट आहे, तिची काळजी घेण्यासाठी घरात कोणीतरी वडीलधारी व्यक्ती आवश्यक आहे. मी आईला म्हटलं होतं की तु एकटी जा, बाबा दिवसभर सानवीला सांभाळतील आणि हवंतर सानवीला सांभाळण्यासाठी आपण एखादी बाई ठेऊ शकतो पण आई बाबांना एकटं सोडून जायला तयार नाहीये. आजही अर्जुन दादा तेच म्हणत होता की रश्मी वहिनीला डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली आहे, आता काही दिवसांसाठी रश्मी वहिनीची आई आलेली आहे पण त्यानंतर किमान आईने तरी त्याच्याकडे जाणं त्याला अपेक्षित आहे."

©®Dr Supriya Dighe