रेशमी घरटे.. (भाग ३)

नात्यांचा सुंदर प्रवास

(जलद कथा मालिका)

मिलिंद आणि माधुरीनं लिफ्टमधून नानींची व्हिल चेयर हळूच टेरेसवर आणली . सोसायटीतली लहान मोठी सगळी मंडळी जमली होती .

" हॅपी बर्थडे नानी . "

"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नानी ."

 सगळेच नानींच्या भोवती जमले .

 केक कटिंग झालं ."

काही आणू नका ,"असं सांगितलं होतं माधुरीनं , तरी भेटवस्तू दिल्याच सगळ्यांनी .

पावभाजी ,पुलाव , केक , आईस्क्रीम सगळेच खुश होते . मोठ्यांच्या गप्पागोष्टी रंगल्या , लहानाचं खाताखाता खेळणंही सुरू होतं .

नानींच्या मैत्रिणी त्यांच्या बाजूला खुर्च्या घेऊन बसल्या .

" काहीही म्हणा नानी नशीबवान आहात . हौसेनं करतात सून आणि मुलगा सगळं . नाहीतर आजकाल कोणाला वेळही नसतो आणि आवडही . आपले वाढदिवस साजरे करायला ."


"हो ना , आम्हाला व्हिडिओ कॉल येतो लेकाचा सुनेचा अमेरिकेहून वाढदिवसाला . तेही नसे थोडके .आता फार अपेक्षा नाहीत ."


" मी काय म्हणते नानी . वर वर दाखवत नसले तरी त्यांना अडचण होतच असणार . सोपं नसतं अशा माणसाचं वर्षानुवर्षे करत राहणं . त्यापेक्षा तुम्हीच स्वतःहून सांगा की मिलिंदाला . तो आधार आश्रम झालाय ना नवीन , तिथे ठेवायला तुम्हांला आणि अण्णांना . पैसे घेतात जरा जास्त पण सगळं जिथल्या तिथं करतात . कशाला यांच्या संसारात उगाच अडचण ,नाही का ? "


मैत्रिणीच्या बोलण्यानं नानींचा हसरा चेहरा उतरलाच . डोळ्यांत खळकन पाणी आलं आणि नेमकं हे सगळं बोलणं मघापासून मिलिंदच्या कानावर पडलं होतं . त्यानं पटकन येऊन नानींच्या खांद्यावर हात ठेवला .

" हॅलो , तुम्हांला सगळ्यांना आज या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी सांगायचंय मला ."

सगळेच बघायला लागले उत्सुकतेनं आणि मिलिंद जे काही बोलला ते ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव . 

"हे नानी आणि अण्णा माझे जन्मदाते आई वडील नाहीत .

क्षणभर शांतता..

 शरद , मिलिंदचा मित्र म्हणाला ,

"मिलिंद म्हणजे तू अनाथ .."

"म्हणायला गेलं तर अनाथ आहे आणि नाही पण . म्हणजे मी सहा वर्षांचा असताना माझे आई वडील अपघातात गेले . मी वाचलो .  नातेवाईक आले पण जगरितीसाठी .

सगळं आटोपल्यावर सगळ्यांपूढे मोठा प्रश्न होता माझं पुढे काय ? माझ्या आईला माहेरचं जवळचं कोणी नव्हतं आणि बाबांकडं जे नातेवाईक होते त्यांच्यातल्या कोणाचीही मला सांभाळायची अजिबातच तयारी नव्हती . मोठा पेचप्रसंग .

तेव्हा आमच्या शेजारी राहणारे हे नानी अण्णा पुढं आले . लग्नानंतर बरीच वर्ष होऊनही त्यांना मूल नव्हतं .


" आजपासून हा मिलिंद आमचा ."

 अण्णांनी मला जवळ घेतलं . नातेवाईकांच्या चेहऱ्यावर अचानक मोकळेपणाचे भाव . 

" कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन मी नानी अण्णांचा झालो आणि ते माझे . देवानं जसं काहि आधीच ठरवून ठेवलं होतं हे .

काकू आता तुम्हीच सांगा . खरंच कसं ठेवू मी या दोघांना वृद्धाश्रमात."

 मिलिंदनं जे काही सांगितलं ते ऐकल्यावर तिथे असलेल्या प्रत्येकाचे डोळे भरून आले .

नानी अण्णांसाठी आदर आणि मिलिंद माधुरीसाठीचं कौतुक सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं ..

नानींचा वाढदिवस अगदी आठवणीत राहण्याजोगा साजरा झाला

" नानी झोपा आता शांत ."

माधुरीनं पांघरूण एकसारखं केलं . नानींनी तिचा हात हातात घेतला . तेवढ्यात अण्णा आणि मिलिंदही आलेच .

" नानी, आपलं हे मायेच्या धाग्यांनी विणलेलं रेशमी घरटं कायम असंच राहणार ."

माधुरीनं तिचा हात नानींच्या हातावर ठेवला . समाप्त..

©® कांचन सातपुते हिरण्या

फोटो क्रेडिट गुगल

वरील कथा लेखिकेच्या नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. धन्यवाद.