रेशमी घरटे.. (भाग २)

नात्यांचा सुंदर प्रवास

(जलद कथा मालिका)

हळूहळू घरातलं रुटीन पहिल्यासारखं झालं आता .

फरक एवढाच की चालत्या फिरत्या नानी आता व्हीलचेअरवर होत्या पण ही परिस्थिती आता सगळ्यांनीच स्वीकारली .

रविवार त्यातल्या त्यात निवांत . माधुरीसाठी तर जास्तच कारण मिलिंदला सुट्टी . मानसला शाळा , डे केअरला सुट्टी त्यामुळं दोघांची सकाळची घाई गडबड , डबे काही नाही .

माधुरीनं नानींना अंघोळ घातली .मग तिनं न्हाऊन घेतलं .

 रविवारी मानसची अंघोळ , आवरणं सगळं बाबाकडे .

 उशिरा उठणं , मस्ती करत आवरणं त्यामुळं स्वारी एकदम खुश‌.

" मानस आवर , नानी अण्णा थांबलेत नाश्त्याला . "

माधुरीनं हाक मारली . तोवर तिनं अण्णांना इडली सांबर वाढलं . 

"नानी मी भरवते तुम्हांला . "


" काय गं माधुरी . तूही बस आमच्याबरोबर आता . मी खाते हळूहळू  उजवा हात दुखतोय पण डावा आहे की नीट .तू तरी काय काय करशील . त्यांना बाप लेकांना खाऊ दे मागाहून ."

नानी असं म्हणाल्या आणि मानस उड्या मारत हॉलमध्ये .

"आई भूक लागली ."

" मलासुद्धा खूप भूक लागली ."

मिलिंदही आलाच .

" आला का लाडोबा ?"

" हो नानी ." 

मानसनं नानी अण्णांना पापी दिली ."

नानी तुझा बर्थडे आलाय ना आता ?"

" तुला कसं माहिती रे लबाडा ?"

"मला सांगितलं ना काल अण्णांनी .

 आपण तुझ्या बर्थडेला मोठ्ठा केक आणायचा आणि पावभाजी , आईस्क्रीम ."

"मनू यावेळी माझा वाढदिवस नको करायला बाळा . मला बरं नाहीये ना ."

" नाssही , करायचा म्हणजे करायचा . तू छान आहेस आता ."

"बरं , पण घरातल्या घरात आपण पाच जणंच ."

 मिलिंद आणि अण्णांनी समजावलं पण मानस काही ऐकेना .

 मग माधुरीच म्हणाली ,

" करू आपण दरवर्षीसारखा वाढदिवस नानींचा सोसायटीतल्या सगळ्यांना बोलवू .तेवढंच त्यांनाही बरं वाटेल आणि आपल्यालासुद्धा ."

 एवढं ऐकलं मात्र आणि मानस उड्या मारतच शेजारी पळाला सांगायला .

" माधुरी कशाला गं उगाच ."

" नानी आता काही बोलू नका . आमचं जाऊ दे पण मानससाठी तरी.."

" बरं बाई , तूम्ही म्हणाल तसं ."

" बघितलंस नशीबवान आहोत आपण . आता आयुष्याच्या या टप्प्यावर आणखी काय सुख हवं यापेक्षा ."

 माधुरीनं लगेचच वाढदिवसाला काय काय करायचं याची यादी तयार करायला घेतली .

 आठ दिवसांत केटरिंगची ऑर्डर , केकची ऑर्डर , लहानांना मोठ्यांना रिटर्न गिफ्ट्स सगळी तयारी केली .

 तरी तिला अजूनही काय करू आणि काय नको असे झालं .

 अन वाढदिवसाचा दिवस उजाडला .

 " नानी हॅपी बर्थडे . "

"वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा नानी ."

 मानस माधुरी मिलिंद सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या . शनिवार असल्यामुळं मानसला अर्धी शाळा .त्याला बळेच शाळेत पाठवला तिनं .

 मिलिंदसुद्धा हाफ डे घेऊन येणार होता .

 ते दोघं गेल्यावर माधुरीनं नानींचं आवरलं . नवा गाऊन , केसांचा पोनी , पावडर , टिकली ..

आवरून झाल्यावर त्यांना औक्षण केलं .

" इडा पिडा टळो आणि दीर्घायुष्य मिळू दे नानी तुम्हांला ."

"माधुरी मी तुझ्यासाठी काही करावं तर तुलाच करावं लागतंय माझं."

"इतकी वर्ष केलंत ना . आता मलाही करू द्या काहीतरी ."

" अरे व्वा ! झालं का आवरून ?" 

अण्णांनी तेवढ्यात जाऊन गजरे आणले .

"माधुरी घे हे ."

" अण्णा तुम्हीच माळा ना नानींच्या केसांत . बघा तरीच मी म्हटलं काहीतरी कमी वाटत होतं .मी आलेच नाश्ता घेऊन."

 ती हसली .

"नानी किती करतात ना ही पोरं आपल्यासाठी . उर भरून येतो अगदी ."

" खरंच हो . हल्ली रक्ताची नाती दुरावतात आणि मिलिंदा तर.."

" नानी असं नका बोलू . आपलाच आहे मिलिंदा ." (क्रमशः)

©® कांचन सातपुते हिरण्या

फोटो क्रेडिट गुगल


वरील कथा लेखिकेच्या नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. धन्यवाद.