Feb 24, 2024
वैचारिक

बाकी..

Read Later
बाकी..

तो बाप झाल्यापासून जबाबदार बनला होता आणि हळवाही. कुशीत दोन गोंडस मुलं खेळवताना त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मुलं म्हणजे मोठी जबाबदारी! आता मुलांचं खाणं -पिणं, शिक्षण सगळं काही वेळेत आणि रीतसर व्हायला हवे.
मग त्याने झपाटून कामाला सुरुवात केली. आता कुणाच्या वाट्याला येत नव्हता तो.
'आपल्या कुटुंबाला काही कमी पडायला नको ' ही काळजी सतत उरात घेऊन काम करत होता.

त्याला कुणासाठी वेळ मिळेनासा झाला. घरी कोणी आले- गेले हा कधीच नसायचा. कार्यक्रमात सण - समारंभातही त्याची उपस्थिती नसायची.
बायको ओरडू लागली.."माझ्यासाठी नको निदान मुलांसाठी तरी थोडा वेळ काढा." पण हा ढिम्मच. कामाव्यतिरिक्त काहीच दिसेनासे झाले त्याला. त्याने आपल्या बायकोला प्रश्न केला. "कुणासाठी पैसे मिळवतो आहे मी? तुमच्यासाठीच ना? रोज मर -मर कष्ट करायचे,आणि वर तुमच्या हौस -मौजा पूर्ण करायच्या. तुमचे तुम्ही बघा काय ते. वेळ नाहीच मुळी माझ्याकडे."

मुलं हळूहळू मोठी होत गेली आणि बायको मुलांत रमत गेली. त्याचे अस्तित्व आता केवळ नावापुरतेच होते घरासाठी. मुलांवर संस्कार, त्यांचा अभ्यास, त्यांच्या तब्येती, हट्ट सगळे बायकोने पुरवले. हा फक्त पैसा पुरवत राहिला.

काळानुसार मुलाचा अठरावा वाढदिवस झाला. आता त्याच्या चेहेऱ्यावर 'मी आता काहीही करू शकतो,' ही भावना तरळू लागली. तसा त्याच्यातला बाप पुन्हा जागा झाला. त्याने आपल्या मुलावर अटी , बंधन घालायला सुरुवात केली.

मात्र आता तो आपल्या मुलासाठी व्हीलन झाला. 'बाबा मला काहीच करू देत नाहीत' अशी तक्रार मुलगा आईकडे करू लागला. आईही आपल्या मुलासाठी त्याच्याशी भांडू लागली.
"इतकी वर्ष तुम्ही घराकडे, आमच्याकडे लक्ष दिले नाही, की वेळही दिला नाही. मग आताच का ही बंधन?"

मुलगी म्हणजे त्याचा हळवा कोपरा. आपल्या मुलीसाठी मात्र तो हिरो झाला. 'बाबा घरासाठी किती कष्ट करतात, जे हवं ते सगळं काही आणून देतात.' त्याच्या कष्टाची जाणीव मुलीला होती. आपसूकच मुलगा त्याच्यापासून दूर गेला आणि मुलगी जास्त जवळ आली.

आता मध्यम वयात आलेला बाप पुन्हा एकदा हळवा झाला. इतकी वर्ष कष्ट केले, पण 'याची जाणीव कुणालाच नाही' असे वाटू लागले त्याला, 'मी म्हणजे फक्त पैसे कमवायचे मशीन आहे?'

त्याला आपल्या गेलेल्या आईची आठवण येऊ लागली. तिच्या कुशीत शिरून मन मोकळं करावं वाटू लागलं. 'आपले आण्णा काही चुकलंच तर कसा जोर लावून कान पिळायचे!' त्याने आपला कान चाचपून पाहिला.
"आपल्या मुलाचा कान पकडायची वेळ कधी आलीच नाही, खरं तर मीच कधी येऊ दिली नाही." असा विचार करून स्वतः शी उगीचच हसू आलं त्याला.

आता त्याला बायकोसाठी वेळ काढावासा वाटू लागला त्याला. तिच्याशी प्रेमाच्या दोन गोष्टी बोलू वाटू लागल्या. पण आता बायकोही शिकली होती, त्याच्याविना जगायला.

आपल्या दूरवर असणाऱ्या मोठ्या बहिणीची माया त्याला आठवू लागली. 'तिला जवळ करावी तर आता बायको नाक मुरडणार', म्हणून त्याने हा विचार सोडून दिला.
त्याचा भाऊही आता रिटायर होऊन मजेत भारत भ्रमण करीत होता आणि वहिनी...कधीची बोलवतो आपल्या लाडक्या दिराला!' आपण किती वर्षात गेलोच नाही तिकडे.

'काय काय गमावलं आपण इतक्या वर्षात.' त्याचे डोळे भरून आले. जबाबदाऱ्या पार पाडत आपण कुटुंबासाठी वेळ देऊ शकत होतोच की, पण दुर्लक्ष केले आपण.
त्यांच्या मनातलं आपलं स्थान हरवून गेलं कुठेतरी..आपला आनंद गमावला.
स्वतः साठीचा वेळही गमावला. स्वतः वर प्रेम करणं विसरून गेलो आणि इतरांसाठी जे प्रेम मनात होतं, ते मनातच ठेवलं.
इतकी वर्ष कष्ट करून थोडं थकायलाही झालं होतंच.
'नुसता पैसा कमवून चालत नाही, आपली माणसं ही तितकीच महत्त्वाची असतात.' हे जरा उशिराच कळालं. 'असो, 'आणखी उशीर व्हायच्या आत सगळं परत मिळवायला हवं. वेळ द्यायला हवा या सगळ्यांसाठी.'

या निर्णयाने मनातून तो खुश झाला. 'झालं गेलं सगळं विसरू आणि नव्याने सुरुवात करू!'

सर्वात आधी त्याने आपल्या कामाचा भार कमी केला. मुलाला आपल्या बंधनातून मुक्त केलं. थोडी मोकळीक दिली. आपल्या बायकोला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करू लागला, आणि दूर गेलेली नाती जपण्याचाही. ही तर सुरुवात होती..अजून खूप काही कमवायचं  'बाकी ' होतं.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//