नात्यांची वीण भाग 4 (अर्चना वसतकार)

मिलन फक्त शारीरिक नसो त्यात मनाचाही सहभाग असावा



"मी मीरा ताईला सोडून कुठेच जाणार नाही." संजना खंबीरपणे म्हणाली.

"संजना चल. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे आपण त्यात पडायला नको." रवी तिला म्हणाला.

"एखादी व्यक्ती प्रताडित होतेय आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही. काय हमी कि उद्या तुही असंच वागणार नाही. तुला राग आला असं म्हणून तु माझ्यावर हात उचलणार नाही?" संजनाने त्याला प्रश्न विचारला.

"नाहीच वागणार मी यांच्या सारखं रानटी. मी नाही उचलणार तुझ्यावर हात काहीही झालं तरीही. यांच्यापायी मी लग्न न करण्याचाच निर्णय घेतला होता. पण तुला भेटल्यावर त्यावर कायम राहता आलं नाही. म्हटलं नवख्याचे नवीन चार पाच दिवस तरी हे आपलं खरं रुप दाखवणार नाहीत. पण यांच्याकडून तेही झालं नाही.
तसंही मी यांच्यासोबत राहणार नव्हतोच या घरात म्हणून आधीच फ्लॅटही बुक करून ठेवलाय. तिथेच घेऊन जायला हवं होतं तुला यांच्या सावली पासून दूर."

"काय बोलतोय रवी तू दुसरा फ्लॅट बुक केलास? इतका राग तुझा माझ्यावर? अरे मी तर तेच करत आहे जे माझ्या सोबत झालं आहे. जे मला शिकवलं गेलं आहे." रवीची आई साडीचा पदर तोंडाला लावून खाली बसून रडू लागली, "तुम्ही नव्हता रे जेव्हा माझ्या सासूबाईंनी केवळ ताट धुतांना त्याला थोडीशी राख राहिली म्हणून माझ्या हाताला चुलीतील जाळाचा चटका दिला होता, जेव्हा अर्धी भाकर जास्त खाल्ली म्हणून दोन दिवस उपाशी ठेवलं होतं, बाबाला घरी आल्याबरोबर प्यायला पाणी दिलं नाही म्हणून मला दिवसभर पाणी प्यायला मिळालं नव्हतं आणि किती काय झालं माझ्यासोबत."

"आई तेव्हा आम्ही नसणार. पण बाबा जेव्हा जेव्हा तुझ्याशी वाईट वागले, छोट्या छोट्या गोष्टींवरून तुला मारत होते. तेव्हा आम्ही बघायचो तुझं दुःख. तेव्हाच मी ठरवलं होतं मी कोणत्याही स्त्रीशी असा वागणार नाही." रवि म्हणाला.

"आणि मला वाटलं असंच वागतात स्त्रीसोबत. खास करून आपल्या बायकोसोबत. मी बाबांच्या संगतीत जास्त राहलेलो. पुढे आईनेही बाबाच्या वागण्याला दुजोराच दिला. बायकोला वस्तू सारखंच वागवायचं असतं असं माझ्या मनावर बिंबवलं गेलं म्हणून कि काय मला त्या बुरसटलेल्या विचारसरणीतून बाहेर पडताच आलं नाही." समीर खाली मान घालून म्हणाला, "मला माफ कर मीरा मी परत असा कधीच वागणार नाही."

"हो बापा तुम्ही तुमच्या जागी बरोबर. मी चूक, मीच बुरसटलेल्या विचारांची. तुम्ही कशाला जाता या घरातुन. मलाच द्या सोडून एखाद्या वृद्धाश्रमात. म्हणजे सर्व आपापल्या मर्जीने आनंदाने जगायला मोकळे." रविची आई म्हणाली.

"सासुबाई तुम्ही वाईट आहात असं मी म्हणत नाही. पण तुम्ही तुमच्या सोबत जे झालं त्या पलीकडे जाऊन नात्यांना बघायचा कधी प्रयत्न केला नाही. आता समाज वस्तुस्थिती खूप बदलली आहे. त्यासोबत बदलून हा विचार करायला हवा होता की जे काही तुमच्या सोबत झालं, जे दुःख तुम्हाला सहन करावं लागलं, ते तुम्ही तुमच्या सुनांसोबत किंवा जगातल्या कोणत्याही मुलीसोबत कधीच होऊ देणार नाही. आपल्या मुलांना व आपल्या सुनांना तुम्ही प्रेमाने, वेळ पडल्यास कधी रागावून योग्य मार्ग दाखवायला हवा. शेवटी आपण सगळे वेगवेगळ्या नात्यांमध्ये गुंफलो गेले आहे. आपल्या नात्यांची ही वीण व्यवस्थित गुंफली जायला हवी. यात एक जरी गाठ पडली तर व्यक्ती रवी सारखा निर्णय घेऊ शकतो. जे योग्य नाही." इतकं बोलून संजना रविकडे वळली,
"पळवाट काढणे खूप सोपी असतं. कठीण असतं तिथेच थांबून ती परिस्थिती व्यवस्थित करायचा प्रयत्न करणे. म्हणून आपण हे घर सोडून कुठेच जाणार नाही. इथेच आई, समीर दादा व मीरा ताई सोबत राहुन एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करू."

"नक्कीच." रवी म्हणाला.

"माझ्यामुळे तुमची पहिली रात्र खराब झाली." मीरा अपराधीपणाने म्हणाली.

"असं काही नाही हो वहिनी. जेव्हा मनोमिलन होतं तेव्हा प्रत्येक रात्र ही पहिल्या रात्री सारखीच असते." रवी संजना कडे बघून म्हणाला.

"हो तेव्हा आता आपण मस्तपैकी अंताक्षरी खेळू." संजना म्हणाली.

"तुम्ही खेळा रे लेकरांनो मी थकली. मी जाते झोपायला. चल ग मधुरा." रविची आई झोपायला गेली.

"मग आता तुम्ही तुमच्या खोलीत जाता की आम्ही इथून बाहेर जाऊ?" समीरने हसून विचारलं, "काय आहे ना मलाही मीराशी खूप काही बोलायचं आहे, तिचं ऐकून घ्यायचं आहे. एका नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे."

"हो मग तर आम्ही मुळीच डिस्टर्ब करायला नको. शुभ रात्री." संजना व रवि एकसुरात म्हणाले, "पहिल्या रात्रीच्या खूप खूप शुभेच्छा."

समाप्त.

धन्यवाद.

©® अर्चना सोनाग्रे वसतकार

🎭 Series Post

View all