नात्यांची वीण भाग 3 (अर्चना वसतकार)

मिलन फक्त शारीरिक नसो त्यात मनाचाही सहभाग असावा


कुठून सुरुवात करावी काय बोलावं असा विचार करतच रवी तिच्या जवळ जाऊन बसला.
"हाय हाऊ आर यू?" त्याने विचारलं.
"हे असं कोण विचारतं पहिल्या रात्री आपल्या बायकोला?" या विचारातच संजना स्वतःशी हसली. रवीने डोक्यावर हात मारला.

"यार माझी ही पहिली वेळ आहे. तसं मित्रांनी खूप काही सांगितलं पण काय बोलावं काहीच आठवत नाही आता." रवि म्हणाला.

"ओ साहेब माझी पहिलीच वेळ आहे बरं." संजना लटका राग दाखवत त्याला म्हणाली.

"हो ग माझी चिऊ. आपल्या दोघांचीही पहिलीच वेळ आहे." रवी म्हणाला.

"चिऊ? तुला सांगितलं ना मी. मी काही तुझं पाळीव प्राणी नाही. माझ्या आई-वडिलांनी माझं नाव संजना ठेवलं आहे. तेव्हा लाडाने म्हणायचं आहे तर संजू म्हण." संजना गंमत गंमत रागवली. त्याचा असा गेम घ्यायला तिला खूप मजा येत होती.

"बरं संजू, आपका हुकुम सर आखो पर. और कुछ फर्माईश मेरे आका?" तोही तिच्या खेळात समाविष्ट झाला.

"नही, इतनाईच काफी है|" ती लाजली.

तिला न्याहाळत तो म्हणाला, "खूप सुंदर दिसतेय तू. वाटतेय की आताच मिठीत घेऊन घ्यावं." तिला आपल्या बाहुपाशात घ्यायला रवीने हात पसरले.

"नाही अजिबात नाही. असं नाही चालणार. आधी माझं गिफ्ट." संजना हात पुढे करून म्हणाली.

"अरे हो ते विसरलोच मी. हे घे." रवीने खिशातून एक छोटीशी सुंदर डबी काढून तिच्या हातावर ठेवली.

संजनाने डबी उघडून बघितली. हिरे जडीत नाजूक कानातले डूल होते.

"अय्या किती सुंदर! ही नक्कीच तुझी पसंत नाही. कोणी घेतले सांग?" संजनाने त्याला विचारलं.

"बरोबर हेरलं तु. मीरा वहिनीने पसंत केले हे तुझ्यासाठी हे." रवी उत्तरला.

संजनाला मीराची आठवण झाली. सत्यनारायणाची तयारी करताना तिने तिला बघितलं होतं. पण त्यानंतर पूजा, आरती करताना, जेवताना, कुठेही मीराला बघितल्याचं तिला आठवत नव्हतं.

"कुठे असेल ती? कशा परिस्थितीत असेल? तिला परत समीर भाऊजींनी मारलं असेल का?" या विचाराने संजनाचं मन कासावीस झालं. तिच्या चेहऱ्यावरची चिंता रवीला स्पष्ट दिसून आली.

"काय झालं कशाचा विचार करतेय तू? तब्येत ठीक आहे ना तुझी?" रविने तिचा हात हातात घेऊन विचारलं.

"समीर दादा मीरा ताईला मारतात का?" संजनाच्या या सरळ प्रश्नाने रवि गोंधळला.

"हा काय विचारतेय तू? तेही आता या वेळेस?" त्याने प्रती प्रश्न केला.

"मला समजतं रवि आपल्या घरातील गोष्टी घरातच ठेवणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणूनच आतापर्यंत मी तुला काहीच विचारलं नाही. पण आता मी या घराची सदस्य आहे. त्यामुळे मला या घरात काय सुरु आहे ते माहित असायलाच हवं. म्हणून मी परत विचारतेय. समीर दादा, मीरा ताईला मारतात का?" संजना मागेच पडली.

"संजना आता मी काय बोलू? मला चिडचिड होतेय आता. मी लग्नाच करायला नको होतं. अरेंज मॅरेज तरी नकोच नको." रवि बोलला. तोच मीराची किंचाळी त्यांच्या कानावर आली. ती ऐकताच संजना हातातली डबी पलंगावर ठेवून सरळ खोली बाहेर पडली. मधुरा दाराशी कान लावून त्यांचं बोलणं ऐकत होती.

"मीरा ताई कुठे आहे?" संजनाने तिला विचारलं. मधुराने मीराच्या खोलीकडे बोट दाखवलं.

दार उघडंच होतं. रवीची आई मीराला अद्वात तद्वा बोलत होती तर समीर तिला मारत होता. संजनाने आत जाऊन मीराला जवळ घेतलं.
"किती मारलं या माणसाने तुम्हाला?" संजना तिचा हात पकडून म्हणाली, "यांच्या सोबत नाही राहायचं आता. चला माझ्यासोबत."

"हा काय असंस्कृतपणा लावला आहेस संजना? आणि तू ग थेरडे तिला नाही म्हणत नाहीस." लग्नाच्या पहिल्या रात्री साज शृंगार केलेली नवीन सून अशी तावातावात आलेली बघून सासूबाई खवळल्या, "आणि तु रवि तोंड काय बघतोय? घेऊन जा खोलीत तिला."

"आई !" आपल्या घरातील लोकांचं हे रूप बघून रवी पार बावरला होता.

"काय आई आई करतोय? इतकी वर्ष झाले शिकला नाहीस बायकोला ताब्यात कसं ठेवायचं ते? दोन लाव ऐकत नसेल तर." रवीची आई त्याला म्हणाली.

काय वाटतं काय करेल रवि?

क्रमश :

धन्यवाद.

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

🎭 Series Post

View all