नात्यांची वीण भाग 2 (अर्चना वसतकार)

मिलन फक्त शारीरिक नसो त्यात मनाचाही सहभाग असावा


इकडे संजना, तिच्या आईला व अनघाला मीरा व समीरचं वागणं, बोलणं विचित्र वाटलं. आईच्या मनात आलं कि दोघात एवढ्यातच कशावरून वाजलं असेल म्हणून असं बोलले. तसंही नवरा बायकोत वादविवाद काही नवीन नाही. पण संजना व अनघाला त्यांच्यात काहीतरी चांगलं बिनसलंय याची खात्री झाली.

"संजू तु या दोघांपासून दूरच रहा बाई लग्न झाल्यावर. त्यांच्यात काहीही वादविवाद झाला तरी तू मध्ये पडायचं नाहीस. तू आपलं रवी आणि सासू-सासऱ्यांकडे लक्ष देत जा फक्त." आईने संजनाला हुशार केलं.

"हो मातोश्री. तू म्हणशील तसंच करेल मी." संजना बोलली खरी. पण संजनाचेही चित्त लागेना विचाराने की त्यांच्यात काय बिनसलं असेल? त्यांच्या वादविवादाला कारणीभूत ती असेल का?

"मला काय वाटतं ना संजना नक्कीच मीराला लहान बहीण असेल जिचे लग्न तिला रवी सोबत करून द्यायचे असेल. म्हणजे दोन्ही बहिणी मिळून त्या घरावर राज करतील. पण मध्येच तू आली. म्हणजे काना मागून आली आणि तिखट झाली. अगं तुझी लग्नानंतरची लाईफ तर खूपच इंटरेस्टिंग राहणार यार. म्हणजे एकता कपूरच्या सिरीयल मध्ये दाखवतात तसं मिरची सुंदर, तरुण बहीण रविला तुझ्यापासून दूर करू पाहणार आणि तू त्याला आपल्या जवळ बांधून ठेवण्याच्या प्रयत्नात असणार. तू कधी बोरच नाही होणार बघ." अनघा खो-खो हसू लागली.तिचे वेगळेच गेसिंग सुरू झाले ज्याने संजनाचं डोकं ठणठण दुखू लागलं.

"अनघा तुझंही लग्न व्हायलाच हव आता. थांब माझ्या आईला सांगते. म्हणजे ती बरोबर काकूजवळ खबर पोहोचवणार." संजना अनघाला म्हणाली

"अरे यार हे काय? मी तर सहजच बोलली." अनघा विनवणी करून म्हणाली.

"जास्त डोकं लावू नकोस मग. जा आता घरी. मी झोपते." संजनाने अनघाला घरी पाठवून दिले. पण तिच्या मनातून मीरा काही जात नव्हती.

"काय अडचण असेल मीरा आणि समीर मध्ये?" या विचारातच तिचा डोळा लागला. झोप उघडली तेव्हा आई बाबाचं संभाषण तिच्या कानावर आलं.

"काय झालं तुम्ही इतके चिंतातुर का दिसत आहात?" संजनाच्या आईने तिच्या बाबांना विचारलं.

"अगं तो नरेश जाधव सांगत होता की त्या घरात पुरुषांनी बाईवर हात उचलण्याची प्रथा आहे. नवऱ्याने बायकोला मारणं सामान्य मानलं जातं अशा घरात मी माझ्या मुलीला कसं पाठवू?" बाबा डोक्याला हात लावून खाली बसले.

"पण मी म्हणते आताच यांना कसा चेव आला हे सांगायला? आतापर्यंत हे कुठे मेले होते?" संजनाची आई म्हणाली, "मला तर वाटतंय आपल्या संजूचं लवकरच लग्न जुळले ना चांगल्या मुलाशी व श्रीमंत घरात म्हणून जळत आहेत ते जाधव. त्यांची मुलगी 28 ची झाली तरी घरातच बसून होती. आता कुठे लग्न झाले तेही दुसऱ्या जातीत. तेव्हा तुम्ही त्यांचं म्हणणं काही मनावर घेऊ नका."

"तू म्हणतेस ती शक्यता मी नाकारत नाही. अगं पण तो कळवळून सांगत होता. त्याला वाटत होतं म्हणे की आपल्याला काय करायचं? आपण बोललो तर हा जळतोय असंच म्हणतील. म्हणून त्याने आतापर्यंत काही सांगितलं नाही. मात्र जसजसे दिवस जवळ येत आहे त्याला काही राहवलं नाही." संजनाच्या बाबांनी त्यांची बाजू मांडली.

"माझ्या मावस बहिणीची पुतणी यांच्या नात्यात आहे. तिच्या करवी चौकशी करते." आई फोन हातात घेऊन म्हणाली.

"तिने सरळ जाऊन रवीच्या आईला आपण आता चौकशी करतोय हे सांगितलं तर?" बाबांनी शंका बोलून दाखवली.

"मग काय करणार आपण आता? लग्न तर पंधरा-वीस दिवसांवर आलं आहे. जवळजवळ सर्वच तयारी झाली आहे." आई काळजीच्या स्वरात म्हणाली.

"असं करतो मी हार्ट अटॅक आल्याचा नाटक करतो. लग्न आपोआप एक दोन महिने पुढे ढकलल्या जाईल व आपल्याला विश्वासाचा माणूस शोधून त्याकरवी रवीच्या घरातल्या सर्वांची चौकशी करता येईल." बाबांनी शक्कल लढवली.

"पाणी प्या दमले असणार दोघेही चर्चा करून." संजना आई-बाबांपुढे पाण्याचे ग्लास धरून म्हणाली.

"अरे बाळ तू कधी उठलीस?" बाबांनी विचारलं.

"जेव्हा तुम्ही जाधव काकांचं बोलणं आईला सांगत होते." संजनाने सांगितलं, "मी सर्व ऐकलं बाबा. तुम्ही प्लीज इतकी काळजी करू नका बरं. नाहीतर खरंच अटॅक यायचा तुम्हाला."

"अगं मग काय करू? मुलीला स्वतःच्या हाताने विहिरीत ढकलून देऊ?" बाबा नाराजीने बोलले.

"तसं नाही बाबा. असतील त्या घरात काही अडचणी. अशा प्रत्येक घरात असतात." संजना बोलली.

"बाळ पैसे अडक्यांची अडचण असती ना तर काही वाटलं नसतं. पण हे बाईवर हात उचलणं वगैरे. मी आजपर्यंत कधी हात उचलला का तुझ्यावर? तुझ्यावरच काय तुझ्या भावालाही कधी चापट मारली नाही." बाबा म्हणाले.

"पण मला तर मारलं होतं ना तेही जेव्हा मी..." आई बोलता-बोलता थांबली.

"तेव्हा अक्कल नव्हती ग. पण जेव्हा लक्षात आलं बाईला मारणं यात पुरुषत्व नाही तेव्हा सोडलं ना सगळं. तुझं दुःख जाणून आहे मी. म्हणूनच संजूची काळजी वाटते मला." बोलता बोलता बाबांचा गळा भरून आला.

"तुम्ही दोघे शांत व्हा बरं. मागील दोन-तीन महिन्यांपासून रवी सोबत बोलत आहे मी. सात आठ वेळा आम्ही भेटलोही आहोत. तुमच्या पासून काही लपलेलं नाही. माझ्या मनात घर केलंय त्याने. मला त्याच्यात काहीच खोट वाटली नाही. काही असलंच तर आम्ही दोघे मिळून सांभाळून घेऊ. त्याला भेटल्यावर त्याच्याशी बोलल्यावर तुम्हाला कधी जाणवलं का बाबा की तो माझ्यावर हात उचलणार?" संजनाने बाबाला विचारलं.

"नाही ग. तुझ्यासाठी मला हवा होता असाच राजकुमार वाटला तो. पण आता एक अनामिक भीती वाटतेय." बाबा म्हणाले.

"मी समजू शकते असं म्हणणार नाही. कारण अजून आई बाबा झाली नाही. पण तुम्हाला वचन देते तुमच्या पासून कधीच काही लपवणार नाही.

दुसरं असं कि आता मला जास्तच ओढ लागलीय त्या घरात जायची. त्या बिचाऱ्या मीराला माझा आधार होईल. मला वाटतं मी लग्न झाल्यावर हक्काने समीर भाऊजींना समजवून सांगू शकेल. त्यांच्या नात्याची जाणीव करून देऊ शकेल. पण तरीही माझ्या अवाक्या बाहेर वाटलं तर सगळं सोडून येणार मी तुमच्याजवळ." संजनाने तिच्या आई-बाबांना आश्वासन दिले.

संजना 23 वर्षाची इंजिनियर झालेली साधी सरळ मुलगी. बाबांची परी असल्यामुळे आतापर्यंतचं आयुष्य खूप बिनधास्त जगलं होतं तिने. कुटुंबातील डावपेच, कट कारस्थान हे तिने तिच्या घरात कधीच बघितले नव्हते.

इंजीनियरिंगच्या चौथ्या वर्षाला असताना संजनाचे प्लेसमेंट पुण्याच्या इन्फोसिस कंपनीत झाले. चौथ्या वर्षाचा निकाल आल्यावर दोन महिन्या नंतर तिला कंपनीत रुजू व्हायचं होतं. एकदा नोकरी लागल्यावर तिचं नातेवाईकात येणं जाणं होणार नाही. म्हणून तिच्या बाबांनी तिला हे दोन महिने सर्व लग्न समारंभात हजेरी लावायला सांगितलं. असंच एका लग्नात रवीच्या आईने संजनाला बघितलं. संजनाच्या बाबाची इच्छा नव्हती इतक्यात तिच्या लग्नाचं बोलायची. पण रवीला भेटल्यावर, त्याचं बोलणं वागणं बघून त्यांचं मन परिवर्तन झालं. त्यात रवीही पुण्यालाच मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर पदावर नोकरीला होता.

"आज ना उद्या मुलीचे लग्न करायचं आहे. मग चांगला मुलगा हातातून कशाला जाऊ द्यायचा?" संजनाच्या आईच्या या प्रश्नाला उत्तर बाबांजवळ नव्हतं. शेवटी आई-बाबांचं भांडण मिटवण्यासाठी संजनाने रवीला भेटून तिचा निर्णय द्यायचं ठरवलं. यावर दोघांनीही संमती दिली. रवीच्या आई-बाबांनाही काही हरकत नव्हती.

मध्यम बांध्याचा, कुरळे केस असलेला, गौर वर्णीय रवि संजनाला तिच्यासारखाच भासला. तिलाही वाटलं इंजिनिअरिंगच्या चार वर्षात किती मुलं आली तिच्याशी मैत्री करायला, पण तिला त्या अर्थाने कुणी भावलाच नाही. रवी मात्र पहिल्याच भेटीत हवा हवासा वाटला. कोरोना असल्यामुळे दिवाळीनंतर लग्नाची तारीख काढण्यात आली.

संजनाचं लग्न धुमधडाक्यात झालं. शेवटी तिला वाट होती तो दिवस उजाडला. सत्यनारायणाची पूजा झाली. त्यांच्या पहिल्या रात्रीसाठी सजवण्यात आलेल्या खोलीत संजनाची ननद मधुरा तिला घेऊन गेली. थोड्यावेळाने रवीलाही खोलीत ढकलून देण्यात आले.

क्रमश:

धन्यवाद.

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

🎭 Series Post

View all