नात्यांची वीण भाग 1 (अर्चना वसतकार)

मिलन फक्त शरीरांचे नसावे त्यात मनाचाहि सहभाग असावा
पहिली रात्र

आपली पहिली रात्र
सुखाचा पाऊस सर्वत्र.

पापण्यांची हालचाल उगाच होई जास्त
तशी हृदयी वाढती स्पंदनं.

अधीर झाले बावरे श्वास
ओठांमधून फुटेना शब्द.

दोन ओळी प्रेमाच्या तु बोलतो
पेटून उठती माझी कानशीलं.

गाली खळी पडली,
अंतरी कळी उमलली,
शृंगार रसात मी चिंब भिजली.

मनी गुलमोहर मोहरला
तनी वणवा पेटला.

होताच एकमेकाचा स्पर्श
किती गं होईल त्या रात्रीस हर्ष?

स्वतःच लिहिलेली कविता परत परत वाचून तारुण्य सुलभ भावनांची जाणीव होऊन संजना स्वतःशीच लाजली. तिच्या डोळ्यांमधे चमक आली.

"पहिल्या रात्रीचं पहिलं पत्र, असं म्हणून ऐकवायची का ही कविता त्याला, आपल्या पहिल्या रात्री म्हणजेच मधुचंद्राच्या रात्री?" संजनाने स्वतःलाच प्रश्न विचारला.

"छे! नको काय म्हणेल तो, किती ही अधीर. पण तो नसेल का अधीर आपल्या मिलनासाठी. एकमेकात एकरूप होण्यासाठी?" संजनाची स्वतःशीच बडबड सुरू होती तेवढ्यात तिची मैत्रीण अनघा तिथे आली.

"अय्या संजू किती गं सुंदर लिहिलेस." अनघा संजनाच्या हातातील कागद घेऊन वाचत म्हणाली, "तो मदनही लाजेल गं इतकं शृंगारिक लिहिलेस आणि काय ते यमक जुळून आलेत."

"अनघा माझी कविता मला परत दे." संजना लटका राग दाखवून अनघाला म्हणाली.

"अजिबात नाही. मी तर ही कविता भाऊजी जवळ पोहोचवणार. त्यांनाही कळायला हवं कि त्यांची होणारी बायको शहर की लडकी असली तरीही किती शृंगारिक आहे ते." अनघा कविता लिहिलेला कागद घडी करून तिच्या वहीत लपवत म्हणाली.

"अनघा दे म्हटलं ना." संजना अनघा कडून वही हिसकावून घ्यायचा प्रयत्न करू लागली. त्या दोघींची ओढतान सुरू होती तेव्हाच संजनाची आई कोणाला तरी घेऊन तिथे आली.

"संजू, अनघा काय करताय तुम्ही दोघी?" आईने विचारलं.

"काही नाही काकू." अनघा
"आई ते आम्ही, आम्ही ते असंच." संजना

दोघीही एक सुरात म्हणाल्या. त्या दोघींनीही पकडलेली वही सोडली तशी ती वही खाली पडली. तिच्यातील घडी केलेला कागद बाहेर आला. ही काय भानगड म्हणून बघण्यासाठी संजनाची आई पुढे होणार त्या आधीच सोबत आलेल्या व्यक्तीने कागद उचलून वाचायला सुरुवात केली. संजनाने रागानेच अनघाकडे बघितलं.

"छान आहे लिहिलेलं." मीरा, संजनाची होणारी मोठी जाऊ म्हणाली, " म्हणजे अप्रतिम म्हणावं. पण इतकंही गुरफटून नका जाऊ. आमचे हे म्हणा की भाऊजी किंवा आणखी कोणी पुरुष. त्यांची तहान जास्त करून शारीरिक असते. पण आपल्या बायकांची त्याहूनही पुढे जाऊन मनो मिलनाची असते. जेव्हापर्यंत आपली मानसिक तहान भागत नाही ना आपलं चित्त थार्‍यावर राहत नाही. अन हेच 99% पुरुषांना कळत नाही. कळलं तरी त्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. कारण ते व्यस्त असतात, त्यांच्या कामात, त्यांच्या मित्रात, नातेवाईकांच्या गराड्यात, घरच्या भानगडीत आणि किती काही महत्त्वाचं असतं त्यांच्याकडे करायला, आपल्या बायकोकडे लक्ष देण्याशिवाय. त्यात समाजालाही पटत नाही पुरुषाने सतत त्याच्या बायको भोवती गिरक्या घेणं. कारण रात्रभर तर ती त्याच्या शेजारीच, एकाच पलंगावर असणार आहे. पण समाजाला हे माहीत नसतं की रात्री तोही थकलेला असतो. तीही दमलेली असते. त्याला हवं असलेलं (तिची इच्छा असो किंवा नसो) घेऊन तो निद्राधीन होतो. तीही रोजच्याच कामातील एक भाग समजून झिजलेल्या तन मनाला कसंतरी सांभाळत डोळे मिटते ताकत एकत्र करण्यासाठी येणाऱ्या उद्याच्या कामांसाठी."

मीरा कळवळून, अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या डोळ्यांनी खाली बघत बोलतच होती. संजना आणि अनघाच्या मात्र सगळं डोक्यावरून जात होतं. संजनाच्या आईलाही होणाऱ्या देरानी समोर मीराचं असं बोलणं पटलं नाही. ती आणखी काही बोलणार त्या आधी संजनाची आई बोलली,

"संजना ह्या तुझ्या जाऊबाई, मीरा."

"नमस्कार !" संजना तिला म्हणाली.

"हाय म्हटलं तरी चालेल." मीरा भानावर आली. तिने हलकेच रुमालाने डोळ्यातील अश्रू टिपले, "खेड्यातील असली तरीही अहोंच्या संगतीत राहून बरेच काही शिकली. कारण एक खेडूत बायको कोणालाच मिरवायची नसते."

"तुझ्या सासूने काही दागिने पाठवले आहेत यांच्यासोबत." संजनाची आई मधेच बोलली, "थोडी व्यवस्थित तयारी करून बाहेर ये. तुझे जेठ वाट बघत आहेत." इतकं बोलून आईने एक कटाक्ष अनघावर टाकला, "तिची मदत करून तुही जरा केस वगैरे विचरून स्वयंपाक खोलीत ये पोहे बनवू."

संजना व अनघा दोघींनी होकारार्थी मान हलवली. संजनाच्या होणाऱ्या सासूबाईंनी मोजकेच पण खूप सुंदर कलाकुसर असलेले सोन्या चांदीचे दागिने तिच्यासाठी पाठवले होते. नुकताच कोरोना कमी होऊ लागला होता. दुकानात जाऊन गर्दी करण्यापेक्षा घरीच सोनाराला बोलवून त्यांनी दागिने पसंत केले. मीरा, तिचा नवरा समीर यांच्यासोबत संजनाला दाखवायला पाठवून दिले.

"तुला काही आवडलं नसेल तर बिनधास्त सांग." समीर संजनाला म्हणाला.

"आवडी निवडीचं काय? किती सुंदर दागिने पाठवले तुमच्या आईने. माझ्या मुलीचा इतका विचार करणारी सासू मिळतेय तिला यातच मी धन्य झाले." संजनाची आई संजनाकडे बघून म्हणाली.

"हो पण संजना काहीच बोलत नाहीये. घाबरू नको संजना तुला आई काहीच म्हणणार नाही." समीर बोलला.

संजनाच्या आईने तिच्याकडे बघितलं तशी आईचा इशारा समजून संजना बोलू लागली, "हो हो छानच आहेत सर्व दागिने. तसंही मी काही इतके दागिने घालत नाही कधी. त्यामुळे मला काही समजत नाही यातलं. आईंनी जे निवडलं ते योग्यच."

"बघितलंस मीरा किती समजदार आहे ही. तू म्हणत होतीस की शहरच्या मुलींना त्यांच्या आवडीनिवडीने जगायला आवडतं. पण मला वाटतं तुम्हा गावठी मुलींच्या डोक्यातच शिजत असतं ते छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करून एका घराची दोन घरं करणं." शेवटच्या दोन ओळी समीर जोर देऊन बोलला.

मीरालाही खूप काही बोलावसं वाटत होतं. पण तिला खात्री होती की तिचा प्रत्येक शब्द नकारात्मक तर्हेने घेतला जाईल म्हणून ती अपमान सहन करून गपचूप बसली.

क्रमश:

धन्यवाद.

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

🎭 Series Post

View all