आपल्या घरात,आजूबाजूला,आपल्या संपर्कात , सहवासात विविध स्वभावाची माणसे असतात. प्रत्येकाची मते, दृष्टिकोन वेगवेगळे असतात. आणि त्यातील काही जण तर असे असतात की , तुम्ही त्यांच्याशी कितीही चांगलं वागा, ते तुमच्यापासून कधीच आनंदी नसतात.
तुमच्या जवळची अनेक माणसे असतात.त्यांचा आणि तुमचा जवळचा संबंध असतो.काही जण तर रोजचीच असतात. चांगले संबंध टिकून राहण्यासाठी आणि ते नाते कधीच तुटू नये म्हणून तुम्ही त्यांच्याशी सदैव चांगलेच वागत असता. त्यांच्याकडून काही चूकभूल झाली तरी ती तुम्ही सांभाळून घेत असता.त्यामुळे काही नाती टिकतात देखील.
पण यातील सगळेच असे नसतात. तुम्ही त्यांच्याशी किती जरी चांगले वागले तरी ते तुम्हाला नावेच ठेवतात किंवा तुमच्याबरोबर असताना ते कधीच आनंदी नसतात.याला अनेक कारणे कारणीभूत आहेत.मुख्य म्हणजे अशा लोकांची मानसिकता आणि दृष्टिकोन.
तुमचे काही मित्र-मैत्रिणी असतील ते जरी तुमचे जवळचे असले तरी देखील त्यांचा दृष्टिकोन मात्र खूप वेगळा असू शकतो. कित्येकदा तुमच्या ते लक्षात देखील येत नाही.तसेच आपल्या स्वतःच्या घरी सुध्दा अर्थात जर ते एकत्र कुटुंब असेल तर . जसे की , तुम्ही त्या व्यक्तीची कितीही मदत केली तरी तो समाधानी नसतो.कारण तो त्याच्याच दृष्टिकोनातून त्याकडे बघत असतो. काय झाले केले तर असाच सूर असतो.तुम्ही मात्र आपले म्हणून त्याला मदत करता पण किती जरी मदत केली तरी तो तुमच्यापासून आनंदी कधीच होत नाही.
या मानसिकतेला कारणीभूत असतो तो त्यांचा स्वभाव , विचार आणि मानसिकता. कदाचित तुम्ही त्याचा स्वभाव तर बदलू शकत नाही. पण तुम्ही एक करु शकता ते म्हणजे, मदत करीत राहणे आणि त्या बदल्यात कोणतीच अपेक्षा न ठेवणे.
कधी कधी तुम्ही काही लोकांसाठी इतके करता की काही वेळासाठी स्वतःचा ‘स्वाभिमान’ देखील बाजूला ठेवता. एखाद्याचे भले व्हावे असेच तुम्हाला वाटत असते.पण हे सर्व करीत असताना , ज्या लोकांसाठी तुम्ही हे करीत आहात त्यांना मात्र त्याची काहीच किंमत नसते. किंमत नसणे म्हणजे काय तर ती व्यक्ती तुमच्याशी प्रेमाने बोलत सुद्धा नाहीत त्याच्या नजरेत त्याच्या नजरेत तुम्ही फक्त घरातला एक मेंबर असता. हे सर्वच लोकांबाबत लागू होत नाही. काही लोकांना तुमची किंमत असते .कारण तुम्ही त्यांना जितके जवळचे मानता तितकेच जवळचे ते तुम्हाला मानत असतात. पण काही लोकांना कदाचित नात्यांचा अर्थच कळत नसतो.
तुम्ही आयुष्यात नाती जपू पाहत. असता.पण कदाचित समोरच्या व्यक्तीला ते नाते एक प्रकाराचे ओझे वाटत असते.म्हणजेच तुमच्या जशा भावना त्या व्यक्तीबद्दल आहेत तशाच भावना त्या व्यक्तीच्या असतीलच असे नाही.आणि इथेच गोंधळ उडतो आणि त्यामुळे तुम्ही किती जरी इतर जणांबद्दल भावनिक असलात तरी ते तुमच्यापासून लांबच राहतात.
आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘विश्वास’. विश्वासावर अनेक नाती, संबंध अवलंबून असतात.जरी तुमचा इतर लोकांवर पटकन विश्वास बसत असला तरी त्यांचा तुमच्यावर तितकाच विश्वास असेलच असे नाही.त्यांचा जर तुमच्यावर कसलाच विश्वास नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी तुमचे संपूर्ण आयुष्य जरी वेचले तरी देखील ते तुमच्यापासून कधीच आनंदी होणार नाहीत.
कधी कधी योग्य संवाद नसल्यामुळे किंवा संवादातून गैरसमज झाल्यामुळे देखील अशा गोष्टींना तोंड द्यावे लागते.तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून लोकांशी बोलता .व्यक्त होता पण लोक त्याचा अर्थ त्यांना जसा घ्यायचा आहे तसाच घेतात.तुम्ही त्यांच्या काळजीपोटी अनेक गोष्टी त्यांच्याशी बोलता पण ते लोक त्याचा वेगळा अर्थ देखील घेऊ शकतात. आणि यामुळेच तुम्ही त्यांचे सगळे करून देखील ते लोक तुमच्यापासून कधीच आनंदी होत नाहीत.
काही लोक तुमच्यापासून आनंदी नसतात म्हणजे कोणीच तुमच्यापासून आनंदी नसते असे कधीच नसते.कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.फक्त एक विशिष्ट व्यक्ती तुमच्यापासून आनंदी नाही , म्हणजे कोणीच तुमच्यापासून आनंदी होऊ शकत नाही असे नाही.हे जग विविध रंग असलेल्या लोकांनी भरलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव ,गुण, दृष्टिकोन वेगवेगळे असतात.
व्यक्ती कुठलीच वाईट नसते .पण सगळ्यांचे आयुष्य मात्र वेगवेगळे असते. त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या परिस्थितीमुळे , आलेल्या अनुभवांमुळे काही व्यक्ती कोणावर पटकन विश्वास ठेवत नाही.किंवा जरी तुमच्या सानिध्यात असली तरी तुमचे आणि त्या व्यक्तीचे मन कधीच जुळू शकत नाही.
प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात.आणि ‘आनंद’ ह्या गोष्टीची संकल्पना देखील.काही जण फारच वेगळ्या स्वभावाची असतात. त्यांना त्यांचेच विश्व आवडते.त्यामुळे कोणी त्यांच्या जवळ जाऊ लागले की ते तितक्या लवकर त्यांना स्वीकारत नाहीत. काही अंशी ‘हट्टी’ स्वभाव असतो अशा लोकांचा.आणि त्यामुळे तुमच्यापासून ती आनंदी होतीलच असे नाही.
ह्या सर्व गोष्टींबाबत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो.पण तरी देखील तुम्ही हे सत्य पूर्णपणे, मनापासून स्वीकारले पाहिजे की , “तुम्ही कितीही चांगलं वागा, काही लोकं तुमच्यापासून कधीच आनंदी नसतात.” आणि ह्यात वाईट असे काहीच नाही. खरे तर असे लोक तुमच्या आयुष्यात असणे खूप गरजेचे असते.
कारण अशा लोकांमुळेच तुम्ही स्वतः मध्ये सुधारणा करू शकता आणि योग्य ते बदल देखील करू शकता. कायम एक गोष्ट लक्षात ठेवली पहिजे, प्रत्येक वेळी प्रत्येकाला तुम्ही तुमच्यापासून आनंदी ठेवू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला चांगले म्हणेलच असे नाही. काही लोकांसाठी तुम्ही कायम वाईटच असता.त्यामुळे प्रत्येक वेळी सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा अट्टहास कधीच करू नका. आणि कोणत्याच बाबतीत कोणावरही ही जबरदस्ती करू नका की , “तुम्ही माझ्यापासून आनंदी झालेच पाहिजे”.
प्रत्येक व्यक्ती एकमेव असते.एका व्यक्तीची तुलना दुसऱ्या व्यक्तीबरोबर चुकून देखील करू नका.प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचा आदर करा.त्यांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागू द्या आणि तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे वागा. कारण असेच वेगवेगळे धागे जुळलेच तर आयुष्यभर टिकून राहतील अशी नाती जन्मास येतील, यात काहीच शंका नाही.
ज्यांना तुम्ही त्यांच्या आयुष्यात खरोखर हवे आहात ते काहीही झाले तरी तुमची साथ सोडणार नाहीत. आणि ज्यांना तुम्ही कधीच त्यांच्या आयुष्यात नको आहात ते काहीही झाले तरी देखील तुमच्या जवळ येणार नाहीत.त्यामुळे कोणावरही ते तुमच्या आयुष्यात कायम राहवेत अशी जबरदस्ती करू शकत नाही.ज्यांना खरोखरच तुम्ही हवे आहात ते उशीर का होईना तुमच्या आयुष्यात येतीलच.त्यामुळे संयम ठेवा. विश्वास ठेवा.वेळेमध्ये खूप ताकद असते.
पण अपेक्षा विरहित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.समोरच्या व्यक्तीची देखील मानसिकता ओळखायला शिका, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.प्रत्येक जण तुमच्या सारखाच असेल असा दृष्टिकोन अजिबात ठेवू नका. तुम्ही जसे आहात तसेच लोकांपुढे सादर व्हा.उगाच बळजबरीने कोणतीच गोष्ट करू नका आणि कोणाला एखाद्या गोष्टीची जबरदस्ती देखील करू नका.
आयुष्य हे कसे जगायचे हा प्रत्येकाचा वेगवेगळा विषय आहे. त्यामुळे शांतपणे स्वतःचे आयुष्य जगा.वास्तविकता स्वीकारून नेहमी वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा.कितीही मानसिक त्रास झाला तरी जे आहे ते स्वीकारा, स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करा. चुकांमधून शिकत राहा. मात्र चुकांची पुनरावृत्ती टाळा. आणि एक एक अनुभव घेत पुढे जात राहा.
थांबू नका.कारण ‘आयुष्य हा एक प्रवास आहे’.जोपर्यंत हा प्रवास सुरू आहे तोपर्यंत भरभरून या जीवनाचा आनंद घ्या आणि तो घेणे फक्त आपल्याच हातात आहे . प्रत्येकाला आपापल्या विचारावर सोडून आपल्या सुंदर आणि निरपेक्ष विचारांनी हा प्रवास असाच करीत राहा. मात्र कृत्रिमरीत्या कधीच आयुष्याला ‘ब्रेक’ लावू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा