नातं...तुझं नि माझं ( भाग 5 , अंतिम भाग )

About Husband And wife


नातं ...तुझं नि माझं ( भाग 5 ,अंतिम भाग )

आईवडिलांवर सर्वांचेच प्रेम असते पण ते प्रेम आंधळे नसावे.
सर्वेशचेही आपल्या आईवडिलांवर आंधळे प्रेम होते. जेव्हा त्याची आई प्रांजलशी वागताना चुकत होती, प्रांजलची काही चूक नसताना तिला चुकीचे ठरवित होती,तेव्हा फक्त आईवरील आंधळ्या प्रेमापोटी सर्वेश आईला तिची चूक समजून न सांगता उलट प्रांजललाचं दोषी ठरवत होता.
हे पाहून प्रांजलला सासूबाईंचा राग तर यायचा पण सर्वेशचाच जास्त राग यायचा.
त्याला आपल्या आईच्या डोळ्यातील खोटे अश्रू दिसत होते पण त्याच्या प्रेमासाठी रडणारे प्रांजलचे मन दिसत नव्हते. आणि तो ते जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नव्हता. याचे प्रांजलला वाईट वाटत होते. सर्वेशचा आपल्या भावाबहिणीवर जास्तीचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी जे काही म्हटले,ठरवले ते तो मान्य करायचा. ते अनेकदा आपल्या फायद्यासाठी सर्वेशचा उपयोग करून घेत आहेत , हे प्रांजलच्या लक्षात येत होते आणि तिने हे सर्वेशच्याही लक्षात आणून दिले होते. पण उलट सर्वेश तिलाच स्वार्थी, मतलबी म्हणायचा.
"माझ्या बहिणभावाचे माझ्या वर खूप प्रेम आहे ,त्यांच्या मुळेच आज मी सुखात आहे. मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही.उलट तूचं आमच्या नात्यात फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.."
असे आरोप तिच्यावर करायचा.


प्रांजललाही कळाले होते की, त्याच्या ताईमुळे तो शहरात आला आणि त्यांच्या मदतीमुळे तो चांगला स्थायिक झाला होता. त्यांचे हे उपकारच होते आणि त्याची जाणीव आयुष्यभर ठेवावी. आपणही त्यांच्या अडीअडचणीला मदत करतो ना! नात्यांमध्ये आपण एकमेकांना जी मदत करतो ,ते आपले कर्तव्य म्हणून की उपकार म्हणून ?
जर आयुष्यभर त्या उपकारांच्या ओझ्याखाली दबून राहून त्यांच्या मर्जीने वागायचे म्हटले तर मगं आपल्या जीवनाला काय अर्थ?
आपल्याला स्वतः चे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असावा.
इतरांचे मार्गदर्शन, सल्ले जरूर घ्यावे पण आपल्याला जे पटते,जे योग्य वाटते तेचं करावे ना!
त्यांच्या गोष्टीला विरोध केला म्हणजे नाते तुटते ,असे थोडीचं आहे. नात्यांमध्ये स्पष्टपणा असावा,विचारांचे स्वातंत्र्य असावे तरचं नाते चांगल्याप्रकारे टिकते. नात्यांमध्ये एक पारडे वर व एक खाली नसावे. दोन्ही समसमान असावीत.


मी त्याला बहीण भावाबरोबर नाते तोडायला नाही सांगत आहे. फक्त थोडा हुशारीने वाग, आंधळा विश्वास ठेवू नको.
परिस्थिती बदलली की नातीगोती ही बदलून जातात.
आपले म्हणणारे परके होऊन जातात.
त्याच्याचं भल्याचे सांगते तरी तो आपले ऐकत नाही. या विचाराने प्रांजल निराश होऊन जात होती.

आयुषच्या जन्माने प्रांजलला आई झाल्याचा आनंद झाला व सर्वेशलाही बाबा झाल्याचा आनंद झाला. प्रेमाच्या भावनेने नाही तर शारीरिक गरजेच्या भावनेतून आयुषचा जन्म झाला. आयुषच्या येण्याने सर्वेशमध्ये काहीतरी बदल होईल ,आपल्या प्रेमाची किंमत समजेल अशी आशा प्रांजलला होती. वरवर पाहता सर्वांना त्यांचे नाते चांगलेच वाटायचे कारण सर्वेश तसा सर्वांसमोर वागायचा. पण त्याच्या मनात आपण नाही आहे, हे प्रांजलला ठाऊक होते. तो फक्त घरातल्यांसाठी व समाजात आपली प्रतिष्ठा चांगली रहावी यासाठी प्रांजलबरोबर संसार करत होता. तिच्या मनाची व्यथा ती जेव्हा सासरच्या लोकांना सांगायची आणि ते जेव्हा सर्वेशला असे वागण्याचे कारण विचारायचे तेव्हा तो त्यांना प्रांजलच्या तिने न केलेल्या चुका सांगायचा आणि तिच्या बद्दल गैरसमज निर्माण करायचा.
त्याच्या लोकांनाही सर्वेशच बरोबर वाटायचा किंवा तेही मुद्दामहून प्रांजलवर आपला अधिकार गाजवायचे, जेणेकरून ती दबून राहील.
सर्वेशचे गुणदोष माहित होते पण फक्त त्याचा संसार व्हावा व समाजात आपली इज्जत रहावी यासाठी ते प्रयत्न करत होते.


वडील हार्ट पेशंट होते त्यामुळे माहेरी आपले दुःख सांगून तिला त्यांना अजून दुःखी करायचे नव्हते. तिने फक्त आपल्या ताईला सांगून मन मोकळे केले होते.
माहेरच्या इतर नातेवाईकांना व सासरच्या नातेवाईकांना प्रांजल व सर्वेशचा सुखी संसार दिसत होता.पण खरे दुःख प्रांजलला माहित होते.
प्रांजलने पत्नी या नात्याने आणि माणुसकी म्हणूनही आपले प्रेम त्याला देवू केले. पण त्याने तिच्या प्रेमाचा स्विकार न करता उलट तिची हेटाळणीच केली, तेव्हा तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली. तिच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला.
नातीगोती जपावी पण जिथे आपला अपमान होतो,जिथे आपल्या प्रेमाला काही महत्त्व नाही, त्या नात्यांपुढे लाचार व्हायचे नाही. असे तिचे मत होते आणि त्यामुळेच तिने ठरवले , आता यापुढे सर्वेशकडून कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. त्याच्याकडे प्रेमाची भीक मागायची नाही. आपणही आपला स्वाभिमान जपायचा. समाजासाठी आपण पती-पत्नी म्हणून एका घरात राहत असलो तरी, आता यापुढे फक्त आयुषची आई म्हणून जगायचे. सर्वेश व त्याच्या नातेवाईकांशी ना जास्त जवळीक ना जास्त तुटकपणा. जशास तसे याप्रमाणे जो जसा वागेल त्याच्याशी तसेच वागायचे. त्यांची मला गरज आहे हे दाखवण्यापेक्षा त्यांना माझी गरज भासेल असेच वागायचे. आपल्या मनस्थितीचा आपल्या आयुषवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून आपण स्वतः आनंदी राहून आयुषलाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. सर्वेशचे प्रेम मला भीक म्हणून नको आहे. ज्या दिवशी तो स्वतः हून माझ्याकडे माझे प्रेम मिळविण्यासाठी येईल ,केलेल्या चुकांबद्दल त्याला पश्चाताप होईल ,तेव्हाच मी पण त्याचा पूर्ण मनाने स्विकार करेल . तोपर्यंत तो फक्त आयुषचा बाबा असेल .
असे प्रांजलने ठरवले आणि तसे वागूही लागली व आपली सर्व नातीगोती जपू लागली.


आयुष्यात नातीगोती जपत असताना, सांभाळत असताना , एक नाते जपण्यासाठी आपल्याकडून दुसऱ्या नात्यावर अन्याय तर होत नाही ना ..हे आपल्या लक्षात यायला हवे.
नातीगोती जपणे वाटते तितके सोपेही नाही आणि म्हटलं तर तितके अवघडही नाही !


समाप्त

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all