Dec 01, 2023
जलद लेखन

नातं.. तुझं नि माझं ( भाग 4 )

Read Later
नातं.. तुझं नि माझं ( भाग 4 )


नातं...तुझं नि माझं ( भाग 4 )

आपण सर्वेशला आवडलो नव्हतो फक्त त्याच्या ताई व दादाच्या सांगण्यामुळे त्याने आपल्याशी लग्न केले. हे जेव्हा प्रांजलला कळाले तेव्हा तिला खूप वाईट वाटले. लग्न झाले की,सर्वेश आपोआपच संसारात रमेल. या अपेक्षेने त्याच्या ताईदादाने त्याचे लग्न प्रांजलशी केले होते.
आपल्या भावाच्या भविष्याचा विचार त्यांनी केला पण बिचाऱ्या प्रांजलचे काय ? तिच्या भविष्याचे काय ?
तिचा काही दोष नसतानाही तिला शिक्षा भोगावी लागत होती.
सर्वेश आपल्याशी कधीही मनमोकळे बोलत नाही. नवीनच लग्न झालेल्या नवरा बायकोमध्ये जी भावना, जी ओढ असायला हवी , ती प्रांजलला सर्वेशमध्ये कधी जाणवलीच नाही. त्याच्या आयुष्यात आपले काही स्थान आहे, हे त्याच्या वागण्यातून दिसत नव्हते. उलट तो आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करत असतो. हे तिला कळत होते.
सर्व प्रयत्न करूनही ती सर्वेशच्या मनात आपल्याबद्दल प्रेम निर्माण करू शकली नाही. नाते म्हणजे सर्व काही मानणारी,नाते जपण्यासाठी प्रयत्न करणारी प्रांजल जीवनातील महत्त्वाचे नाते जपण्यात हारत चालली होती.

सर्वेश आईवडिल, दादावहिनी,ताई व इतर सर्व नातेवाईक या सर्वांशी चांगले बोलतो,वागतो, सर्वांची काळजी घेतो, कोणालाही त्याच्या बद्दल काही तक्रार नसते, त्यांच्या एका हाकेला तो त्यांच्या मदतीला धावून जातो, आईवडिलांचा चांगला मुलगा, भावाबहीणीचा चांगला भाऊ,नातेवाईक व समाजासाठी तो एक चांगला व्यक्ती असतो. सर्व नातीगोती अगदी आपुलकीने जपत असतो.
फक्त प्रांजलला तिच्या हक्काचे प्रेम तो देत नव्हता. पती म्हणून आपले काहीतरी कर्तव्य आहे ,हे तो विसरत होता.
आपण पैसे कमवत आहोत आणि प्रांजलला घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता ठेवत नाही म्हणजे आपण पतीचे कर्तव्य पूर्ण करत आहोत ,असे त्याला वाटत होते पण तो प्रांजलला वेळ व प्रेम काहीच देत नव्हता.

याउलट प्रांजल ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानणारी होती. नात्यांमध्ये पैसा जास्त महत्त्वाचा नसतो तर प्रेम व विश्वास असणे महत्त्वाचे असते.
आपल्या आयुष्यात प्रत्येक नात्याचे एक स्थान असते. नात्यांशिवाय आपले जीवन अपूर्ण असते. नाते रक्ताचे असो की मानलेले...नाते हे नातेचं असते. व्यक्ती बदलतो ..व्यक्ती नात्यांना बदनाम करतात..पण प्रत्येक नाते हे पवित्र असते. नाते वाईट नसते ..ते न जपणारे लोक वाईट असतात.
नात्यांचे महत्त्व प्रांजलला चांगलेच माहित होते. त्यामुळे सर्वेश त्याच्या नातेवाईकांशी प्रेमाने वागतो ,याचा तिला आनंदच होता पण त्याचे आणि तिचे जे पवित्र नाते होते त्याचे काय ?
नवरा बायकोचे नातं म्हणजे असं एक नातं असतं..ज्यात फक्त तू आणि मी एवढीचं भावना असते.एकमेकांसाठी एक हक्काचं स्थान असतं ..जे आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं वाटत असतं.
लग्न झाले म्हणून आपण इतर नातेसंबंध तोडत नाही. आईवडील,भाऊबहीण यांच्यावरील प्रेम कधी कमी होत नाही.
तरीही लग्नानंतर आपला मुलगा आपला राहिलेला नाही, तो आपल्या बायकोचा बैल झाला आहे , असे काही आयांना का वाटत असते ? त्यांचे प्रेम इतके तकलादू असते का ? आपल्या प्रेमावर त्यांचा विश्वास नसतो का? आपला मुलगा सुखात रहावा ,असे प्रत्येक आईला वाटत असते पण लग्न झाल्यानंतर ,त्याच्या आयुष्यात त्याची काळजी घेणारी,त्याला सुख देणारी त्याची हक्काची व्यक्ती आल्यावरही आया कारण नसताना मुलांच्या संसारात जास्तीचा हस्तक्षेप करत असतात. तुम्हांला जर आपल्या मुलाच्या सुखाची एवढी काळजी असते मग त्यांचे लग्नचं करू नये ना..

प्रांजलही आपल्या प्रेमाची नाते माहेरी सोडून सासरी आली होती . याचा अर्थ तिचे त्यांच्यावरील प्रेम कमी झाले होते ,असे नाही ना.
नवीन नाती जोडताना ,जुनी नाते विसरता येतात का?
सासरी नव्या नात्यांमध्ये रूजण्यासाठी तिला सर्वेशच्या प्रेमाची,त्याच्या भक्कम आधाराची गरज होती. पण तो तिचा स्विकारच करत नव्हता. ज्या व्यक्तीमुळे आपण या घरात आलो, ज्याच्यामुळे इतरांशी आपले नाते तयार झाले, जर तोचं आपल्याला आपलं मानतं नाही तर इतर नात्यांशी आपला काय संबंध? हा प्रश्न प्रांजलला त्रास देत होता.


क्रमशः


नलिनी बहाळकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//