नातं...तुझं नि माझं ( भाग 3 )

About Husband And Wife


नातं ...तुझं नि माझं ( भाग 3 )

नात्यांमध्ये आपले सुख शोधणाऱ्या प्रांजलचे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होते ,तिची ताई लग्न होऊन सासरी गेली तेव्हा माहेर सोडून सासरी जाताना ताई जेवढी रडली नाही ,तेवढी तिची प्राजूच जास्त रडली होती..आपल्या ताईसाठी.
दादाचेही लग्न होऊन वहिनी घरात आली होती. त्यामुळे प्राजूला अजून एक नवीन नाते मिळाले होते. वहिनीचे आणि तिचे खूप छान जमत होते. प्राजू नात्यांच्या बाबतीत खूप हळवी होती,भावनिक होती त्यामुळे तिचे पटकन नाते जमायचे आणि ती ते नाते जपण्याचा प्रयत्नही करायची.

घरात प्राजूच्या लग्नाचा विषय सुरू झाला होता.
लग्नानंतर आपल्याला आपल्या जीवलग व्यक्तिंना सोडून सासरी जावे लागेल , या विचाराने तिला वाईट वाटायचे.आणि दुसरीकडे तिने कथा कादंबऱ्यातून वाचलेले,चित्रपटांमध्ये पाहिलेले आणि आपल्या मैत्रीणींचे लग्नानंतरचे आयुष्य पाहिलेले होते. पत्नीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीचे चित्र तिने या सर्व गोष्टीतून साकारलेले होते.
आपल्यावर प्रेम करणारा ,आपल्याला समजून घेणारा आपला जीवनसाथी आपल्यालाही असाचं सुखात ठेवणार . अशी स्वप्नेही ती पाहत होती.

"प्रांजलसाठी खूप चांगले स्थळ आणले आहे."

असे एका नातेवाईकाने प्रांजलच्या आईवडिलांना सांगितले.

आपला नातेवाईक आपल्याला फसवणार नाही. असा त्यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे त्यांनी जास्त चौकशी न करता , पाहण्याचा, साखरपुड्याचा आणि लग्नाचा कार्यक्रमही पार पाडला.
लग्नाची तारीख जवळचीच निघाल्याने, प्रांजलला आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलण्यास,त्याला समजून घेण्यास वेळच मिळाला नाही.

सर्वेशने आपल्या मेहनतीच्या जोरावर व्यवसाय चांगला वाढवला होता. लग्नाचे वय झाल्याने त्याचे लग्न करण्याचे घरातल्यांनी ठरवले. दोनतीन मुली पाहिल्याही. त्यातील एक मुलगी सर्वेशला आवडली होती. पण ताईला व दादाला आवडली नव्हती. अशातच प्रांजलचे स्थळ एका नातेवाईकाने दाखविले. प्रांजलला पाहून , आपल्या सर्वेशसाठी हीचं मुलगी योग्य आहे, असे त्याच्या ताईला व दादाला वाटले आणि सर्वेशचे प्रांजलशी लग्न झाले.
चित्रपटातील हिरोप्रमाणे सर्वेश इतका हँडसम नव्हता, साधारण होता. पण \"आपली बायको सुंदर असावी.\" असे वाटणाऱ्यांमधील तो एक होता. आपल्याला जी मुलगी आवडली होती, तिच्याशी लग्न न होता प्रांजलशी लग्न झाल्याने तो मनाने आनंदी नव्हता.
कथांमध्ये दाखविलेल्या नायिकेसारखी प्रांजलही खूप सुंदर नव्हती पण तितकी वाईटही नव्हती. तिचा प्रेमळ स्वभाव, तिचे स्वच्छ मन तिचे सौंदर्य वाढवत होते. तिच्या बोलण्यातून तिचे विचार, तिची बुद्धिमत्ता कळत होती. आणि हीचं गोष्ट सर्वेशच्या ताईदादाला जाणवली आणि आपल्या सर्वेशला चांगली सांभाळेल या हेतूने त्यांनी प्रांजलचे सर्वेशशी लग्न केले.
नात्यांचे वेड असलेली प्रांजल माहेर सोडून सासरी आल्यावर सर्वांशी प्रेमाने ,आदराने वागत होती. नवीन नात्यांना ओळखत होती आणि प्रत्येक नाते दृढ करण्याचा प्रयत्न करत होती.सुरूवातीला सर्व नवीन होते, त्यामुळे अनेक गोष्टी प्रांजलच्या लक्षात येत नव्हत्या पण हळूहळू तिला अनेक गोष्टी समजायला लागल्या होत्या.
तिच्याशी सर्व जण चांगलेच बोलत होते ,वागत होते. पण तरीही तिला काही तरी ,कुठेतरी चुकीचे होते आहे. हे कळत होते.आपल्याला जशी आपल्या जीवनसाथीला समजून घेण्याची व त्याच्या प्रेमाची गरज वाटते आहे, तसे सर्वेशला वाटत नाही. असे सर्वेशचे वागण्यातून तिला कळायला लागले होते.

क्रमशः

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all