Mar 04, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

नाते बहिण- भावाचे!

Read Later
नाते बहिण- भावाचे!


कथेचे नाव -- नाते बहीण- भावाचे

विषय -- रक्षाबंधन- अतूट बंधन

कॅटेगरी-- गोष्ट छोटी डोंगराएवढी" नितिन, तुला उद्या ताईने घरी बोलावले आहे. नक्की ये बरं." हर्षल नितिनला म्हणाला.

"का..रे ? "- नितिन

" ताईने मला जे सांगितले तेच मी तुला सांगितले. बाकीचे काही माहित नाही. " - हर्षल

" आता ताईची ऑर्डर आहे तर ..यावेच लागेल ना.. नितिन हसत हसत बोलला.

त्याच्या बोलण्यावर हर्षलाही हसू आले.हर्षल व नितिन एकाच कॉलेजात, एकाच वर्गात शिकणारे आणि एकमेकांचे चांगले मित्र!
आईवडील, बहीण सुजाता आणि हर्षल यांचे चौकोनी कुटुंब. खाऊनपिऊन सुखी असे मध्यमवर्गीय कुटुंब.


नितिन एका खेडेगावात राहणारा मुलगा.आईवडील शेती करणारे. नितीन एकटाच..ना बहीण ना भाऊ!
गावात १० वी. पर्यंतच शाळा..त्यामुळे पुढील शिक्षणासाठी शहरात आला होता. होस्टेलला राहत होता.

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी हर्षलशी त्याची ओळख झाली. विचारपूस करता करता छान गप्पा झाल्या. आणि गप्पांतून एकमेकांचे विचार, स्वभाव कळले.भावना जुळल्या आणि ओळखीचे रूपांतर लवकरच घट्ट मैत्रीत झाले.

नितिनला हर्षलच्या घरी आल्यानंतर , त्याच्या आईवडिलांच्या,
सुजाताताईच्या वागण्याबोलण्यातून आपलेपणा जाणवू लागला.
गावात आपला एक परिवार आणि येथे आपल्याला अजून एक परिवार भेटला . असे नितिनला वाटू लागले.

सुजाता ही दिसायला छानच! आणि स्वभाव तर खूपचं चांगला.. पहिल्या भेटीतच समोरच्या व्यक्तीला आपलसं करणारी!
सुजाताचे आपल्या आईवडिलांवर, भावावर खूप प्रेम होते. मोठी ताई म्हणून हर्षलवर हक्कही गाजवायची पण ताई या नात्याने त्याची दुसरी आईचं जणू!


\" मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।
काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।\"

कोणी लेखकाने बहिणीविषयी लिहीलेले अगदी तशीचं हर्षलची ताई होती.हर्षलही आपल्या ताईला आपली जवळची मैत्रीण म्हणून सर्व सुखदुःखाच्या गोष्टी सांगायचा.

नितिनशी मैत्री झाल्यावर हर्षलने ताईला नितिनविषयी सांगितले तेव्हा ताईला थोडे वाईटच वाटले. आईवडील गावी आणि त्याला कोणी भाऊ-बहिण नाही.
परिवारापासून दूर राहून शिक्षणासाठी होस्टेलला राहतो. त्यामुळे तिला नितिनची काळजी वाटायची.
नितिन हर्षल बरोबर घरी आला की त्याच्याशी प्रेमाने वागायची. आवडीने केलेले पदार्थ त्याला द्यायची. नितिनला होस्टेलचे जेवण आवडत नव्हते हे तिला कळले होते. त्यामुळे अधूनमधून घरच्या जेवणाची चव म्हणून जेवायला बोलवायची.

नितिनलाही ताईचा स्वभाव, तिचे वागणे,बोलणे खूप आवडायचे. तिने बनविलेले पदार्थ आवडीने खायचा . त्याच्या मनात यायचे,
\" आपल्याला ही अशीच बहिण असायला हवी होती.\"

पण देवाने आपल्या आयुष्यातील बहिणीची उणीव ताईच्या रूपात भरून टाकली.त्यासाठी देवाचे खूप खूप धन्यवाद .\"


ताईने बोलावल्याप्रमाणे नितिन हर्षलच्या घरी आला. ताईने हर्षल व नितिन दोघांना पाटावर बसण्यास सांगितले. दोघांनाही ओवाळले. स्वतः तयार केलेल्या छान राख्या बांधल्या. मिठाई खाऊ घातली.

नितिन तर बघतचं राहिला... तो इतका इमोशनल झाला होता की काहीही न बोलता डोळ्यातून येणारे आनंदाश्रू सर्व काही सांगत होते.

सुजाता-- "नितिन, आज रक्षाबंधन ना.. दरवर्षी मी हर्षलला राखी बांधते. या वर्षापासून तुलाही राखी बांधणार . चालेल ना तुला ? "

नितिन --" अगं, ताई, चालेल का ? हे काय विचारणे झाले ! मला तर खूप आनंद झाला. मी खरचं किती भाग्यवान ! हर्षलसारखा मित्र,तुमच्या घरासारखा परिवार भेटला.आणि तुझ्यासारखी बहीण मिळाली. "

हर्षलने ताईला एक रिस्टवॉच गिफ्ट म्हणून दिले. नितिनला रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाची काही कल्पना नव्हती . त्यामुळे त्याने ताईसाठी काही गिफ्ट वगैरे आणले नव्हते. आपल्या लाडक्या ताईला रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून स्वतः जवळ जेवढे पैसे होते तेवढे ताईला दिले.

ताईला ते पैसे घ्यायला आवडले नाही.
नितिनची परिस्थितीही नाही आणि अजून तो काही नोकरी वगैरेही नाही करत म्हणून ती त्याला म्हणाली,
"नितिन, तू जेव्हा कमवायला लागशील तेव्हा हक्काने घेईल गिफ्ट तुझ्या कडून. पण आता नको . तुझा मान म्हणून फक्त 10 रू. घेते. बाकीचे पैसे तुला खर्चायला राहू दे.
ताईने आपल्या जमवून ठेवलेल्या पैशांतून दोघी भावांना छान शर्ट गिफ्ट म्हणून दिले.
आणि सर्वांनी ताईने बनविलेल्या स्वादिष्ट जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला.सुजाताचे कॉलेज संपल्यानंतर, तिला लग्नासाठी मागणी येऊ लागली. ओळखीतील एका मुलाचे स्थळ सांगून आले. मुलगा ही चांगला होता आणि शहरात मोठ्या कंपनीत नोकरीला होता. सर्व व्यवस्थित होते त्यामुळे सुजाताचे आईवडील लग्नाच्या तयारीला लागले. हर्षल व नितिनलाही खूप आनंद झाला. दोघेही आपल्या ताईच्या लग्नाच्या तयारीत धावपळ करू लागले.

सुजाताच्या लग्नाचा सोहळा छान झाला. ती सासरी जायला निघाली ; तेव्हा आईवडील,हर्षल हे सर्व रडतचं होते पण अजून एक जण खूप रडत होता तो म्हणजे नितिन... ज्याला सुजातासारख्या प्रेमळ ताईची माया भेटली होती आणि आता ती लग्न करून सासरी जात होती. त्यामुळे त्याला रडू येत होते.


लग्नानंतर सुजाता आपल्या संसारात रमली. इकडे हर्षल व नितिन दोघेही कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करू लागले. हर्षल आपल्या आईवडिलांसोबत राहत होताच पण नितिनही गावाकडून आपल्या आईवडिलांना आणून भाड्याच्या घरात राहू लागला.
हर्षल व नितिन दोघेही जीवनात आनंदी होते आणि आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने पाहत होते.
ना भाऊबीज, ना रक्षाबंधन ना काही कार्यक्रम ..ताई अशी अचानक आणि तेही अगोदर काहीही न सांगता घरी आलेली पाहून तिच्या आईवडीलांना व हर्षलला थोडे आश्चर्यच वाटले. ताईला पाहून त्यांना आनंदच झाला;पण नेहमी हसतमुख असणारी,आनंदी असणारी ताई आज दुःखी आहे. हे सर्वांच्या लक्षात आले होते.
ती स्वतः हून काही सांगितल्याशिवाय आपण तिला काही विचारायचे नाही म्हणून त्यांनी तिला काहीच विचारले नाही आणि तिच्याशी अगदी नॉर्मल नेहमीप्रमाणे वागत होते." आई,बाबा,हर्षल तुम्हांला मी येथे अशी अचानक का आली ते सांगत आहे.
गेल्या एक वर्षापासून माझ्या मिस्टरांना नोकरी नाही. त्यांच्या कंपनीने यांच्याप्रमाणे अनेक जणांना नोकरीवरून काढून टाकले. आमच्या सर्वांसाठी खूप मोठा धक्काच होता.
बहिणींच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फेडण्यात सुरूवातीला यांचा पगार खर्ची झाला. त्यानंतर आमचे लग्न, संसार
आणि आताच नवीन घर घेतले यासाठी सर्व बचत खर्च झाली.

दुसऱ्या नोकरीसाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत.मिळेलही त्यांना नोकरी. पण तोपर्यंत मी काहीतरी करावे असे मला वाटते .
तुम्हांला आमची समस्या सांगून टेंशन द्यायचे नव्हते म्हणून अगोदर सांगितले नाही.
आताही मी तुमच्याकडे प्रॉब्लेम म्हणून आलेली नाही तर तुमची मदत हवी आहे त्यासाठी आले आहे.

मला वेगवेगळे पदार्थ बनविण्याची आवड आहे आणि मी बनविलेले पदार्थ सर्वांना आवडतातही. त्यामुळे मी माझ्या या आवडीचा उपयोग करण्याचे ठरविले आहे.

मी स्नॅक्स सेंटर सुरू करायचे ठरविले आहे आणि त्यासाठी भांडवल म्हणून आमच्याकडे पैसा नाही. फक्त प्राथमिक गरजा भागवित आहोत आम्ही .आणि काही दिवसात त्यासाठी ही पैसे राहणार नाही आमच्या कडे.

आता तुम्हीच माझ्या जवळचे ..म्हणून तुमच्याकडे मदत मागायला आली आहे.
तुम्ही मला भांडवलापुरते पैसे द्या . मी ते तुम्हांला काही दिवसांनी परत करते. माझा व्यवसाय चांगला सुरू झाला की आणि यांना चांगली नोकरी लागली की पटकन परत करतो पैसे."

ताईचे हे बोलणे ऐकून आई,बाबा,हर्षल यांना धक्का बसला आणि वाईटही वाटले.
पण सुजाताच्या निर्णयामुळे सुखावलेही.

जीवनात संकटे येतात पण त्या संकटांना घाबरून न जाता त्यातून मार्ग काढणे म्हणजेच खरे जीवन जगणे होय.

सुजाता च्या संकटकाळात तिची मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे. यामुळे आईबाबा, हर्षल तिला पैशांची मदत करायला तयार झाले.

नेमका त्यावेळी नितिनही घरात येत असतो आणि तो सर्व बोलणे ऐकतो.
त्यालाही ऐकून वाईट वाटते.

" ताई, तुझ्या कठीण प्रसंगात मीही माझ्या कडून तुला काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतो. तू नको म्हणू नकोस.
हर्षल तुझा रक्ताचा भाऊ असला आणि मी तुझा रक्ताचा भाऊ नसलो तरी भाऊच आहे ना...
रक्ताची नाती ही तर जन्मतःच मिळतात पण आपल्याला नंतर जी नाती मिळतात,भेटतात ती तर फक्त भावनांमुळेच बनतात ना ? मी तर कोण ,कुठला ?
पण तुम्ही सर्वांनी मला जे प्रेम दिले ते मी कधीही विसरणार नाही.
तु मला भेटल्यापासून दरवर्षी राखी बांधते आहे. तू माझ्या कडून कधीचं काही घेतले नाही. तू तुझे बहिण म्हणून सर्व कर्तव्य व्यवस्थित पार पाडत आली आहे. आता मलाही तुझा भाऊ म्हणून काही तरी करू दे. म्हणजे मलाही बरे वाटेल."


नितिनला आपल्यामुळे त्रास नको म्हणून ताई त्याच्याकडून पैसे घेणारच नव्हती. पण नाही म्हणून त्याला नाराज करू नये असे वाटून तिने नितिनला हो म्हटले.

नितिन आपली सर्व सेविंग ताईला आणून देतो.

" ताई, या पैशांची गरज आता तुला आहे. तुझ्या स्नॅक्स सेन्टर साठी माझ्या कडून छोटीशी भेट."

आईबाबा, हर्षल, ताई आणि नितिन सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.
एकमेकांच्या भावना गहिवरून आल्या.
आणि सर्वांच्या मनात एकच भाव होता..\" नाती रक्ताची असो की मानलेली , फक्त नाती निभवता आली पाहिजे.\"


सुजाताच्या हाताच्या चवीमुळे तिच्या स्नॅक्स सेन्टरला लवकरच चांगले यश मिळाले. थोड्याच दिवसांत तिच्या मिस्टरांनाही मनासारखी नोकरी मिळाली. तिने हळूहळू हर्षल व नितिनचे पैसे परत केले ते नको म्हणत असतानाही.

हर्षलने व नितिनने आपल्या लग्नाची जबाबदारी आपल्या लाडक्या ताईला दिली..अगदी मुलगी शोधण्यापासून.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//