पुनर्जन्म

Story Of A Reincarnation
पुनर्जन्म भाग 1
(ही कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजन म्हणून वाचावी)
मंजिरी ची लगबग सुरू होती..शाळेतल्या सर्व शिक्षकांची सहल चंपानेर ला जाणार होती, तिथल्या महाला ला भेट देण्याचे ठरले होते... तसं पाहिलं तर कुणालाही त्या ठिकाणाचा मागमूसही नव्हता, सर्वांसाठी ती जागा नवीन होती...
खूप काळानंतर मंजिरी ला जरा वेगळेपण मिळणार होतं, एरवी शाळेसाठी आणि घरासाठी वेळ देत देत ती कंटाळली होती...तिच्या शाळेतील अत्यंत हुशार आणि कार्यरत शिक्षिका अशी तिची ओळख होती...
का कोण जाणे पण या सहलीबद्दल ती फार उत्सुक होती.. तिला जणू ओढ लागलेली कधी जातेय म्हणून...तसं ती पहिल्यांदा जात नव्हती पण का कोण जाणे तिला कसली ओढ लागली होती...
रविवार चा दिवस होता, मुलांना आणि नवऱ्याला खाऊ डब्यात बांधून तिने त्यांना बाहेर फिरायला पाठवले, तिलाही जरा निवांत वेळ हवा होता...
मंजिरी च्या डोक्यात सहलीचे चक्र चालू होते..

तिने घरातली कामं पटापट आवरून घेतली..आणि मग थोडा वेळ लॅपटॉप ऑन केला..

मंजिरी ने सहलीच्या जागे बद्दल माहिती काढायचा प्रयत्न केला...नेट वरही फार काही माहिती नव्हती..मोठ्या मुश्किलीने तिला एक फोटो सापडला...
फोटो पहिल्या पहिल्या मंजिरी एकदम स्तब्ध झाली..काहीतरी गवसल्यासारखं...काहीतरी भूतकाळातलं.. काहीतरी सुटलेलं.. काहीतरी अपूर्ण... काहीतरी गूढ चक्र तिच्या मनात फिरू लागलं..
घाईत असलेल्या मंजिरी चे मन काही काळ सुन्न झाले, काय होतंय तिला काही कळेना..
"ही जागा, हा महाल...मला असं का वाटतंय की मी हे कुठेतरी पाहिलंय.??"
मंजिरी स्वतःशीच पुटपुटली..
मंजिरी लहानपणापासून या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असे, कधी कधी अचानक ती तिच्या तंद्रीत जात असे, रात्री तिला बऱ्याचदा स्वप्न पडायची की एका महालात ती सारखी धावत आहे आणि धावता धावता अचानक खाली पडते, काही अंधुकसे चेहरे तिच्या डोळ्यासमोर यायचे..काही झाडं, काही भिंती सारख्या तिच्या डोळ्यासमोर यायच्या...
तिने नवऱ्याला बऱ्याचदा सांगायचा प्रयत्न केला पण तो म्हणायचा की सतत tv बघते, हॉरर चित्रपट बघते त्यामुळे हे असं होतं...
शेवटी तिने तेच गृहीत धरून त्या विषयावर विचार करायचा सोडून दिलेला..
पण आज तो एक फोटो पाहिल्यावर तिच्या जाणिवा एकदम जागृत झाल्या...
काहीतरी गवसतंय....हरवलेलं सापडतय...आपण कुठल्यातरी सोडून आलेल्या गोष्टीकडे परत जातोय अशी जाणीव तिला होऊ लागली...आणि ते चंपानेर ला गेल्यावरच कळणार हा समज तिचा पक्का झाला...
शेवटी तो दिवस उजाडला...
तिने सर्व तयारी केली, डबा घेतला, डायरी घेतली, एक कॅमेरा घेतला आणि घरात सर्वांची नीट व्यवस्था लावून ती निघाली...
जातांना सर्वांच्या मनात सहलीचे कुतुहुल होते पण मंजिरी मात्र स्वप्नात येणाऱ्या आणि जाणवणाऱ्या गोष्टींमध्ये बुडाली होती,

बस मध्ये शून्यात नजर भिडवून खोलवर तिचं विचारचक्र सुरू होतं..
अचानक बस थांबली, सर्व शिक्षकांनी ड्रायव्हर ला कारण विचारले, तो म्हटला की "मॅडम ती जागा खूप कमी लोकांना माहीत आहे आणि आपण रास्ता चुकलोय"...
"पुढे 2 किलोमीटर अंतरावरून डाव्या बाजूला टर्न घ्या, तिथून 10 किलोमीटर सरळ पुढे गेलो की आलं.."
मंजिरी ताडकन बोलली,
सर्वजण अचंबित झाले..

मंजिरी ला कसं माहीत??
मंजिरी बोलून गेली पण एकदम भानावर आली..
तिला रस्ता कसा माहीत होता??
ती जे बोलली त्यावर तिचाच विश्वास बसत नव्हता..
काय आहे मंजिरी चा भूतकाळ? पुनर्जन्म आहे का??पूर्वजन्मातील कोणती गोष्ट ती सोडून आलेली?? कोणती गोष्टी पूर्ण करण्यास तिने पुनर्जन्म घेतला होता??
वाचा पुढील भागात..

🎭 Series Post

View all