रील्सचे वेड ३ अंतिम

सामाजिक कथा


तुषार पुण्याला आदल्या दिवशी रात्रीच आला होता. त्याने तेव्हाच मोनिकाला फोन करून सांगितले आणि सकाळी भेटण्याची वेळ तसेच पत्ता तिला पाठवून दिला. मोनिका नेहमीप्रमाणे सकाळी तिचे सगळे काही आवरून नवरा आणि मुलगा घराबाहेर गेल्यानंतर ती स्वतः तयार होऊ लागली. आज रील्स एकदम परफेक्ट व्हायला हवे असे तिने मनाशी ठाम ठरवले होते, शिवाय तुषारसमोर पहिली इम्प्रेशन चांगली पडायला हवी असे वाटल्यामुळे तिने स्वतःला छान आवरण्याला महत्त्व दिले.

मोनिका आज पहिल्यांदाच तुषारला भेटायला जाणार होती त्यामुळे ती थोडीशी नर्वस होती. शिवाय तिला त्याला भेटण्याची उत्सुकता देखील होती. ती आवरून घराबाहेर पडली आणि तुषारने दिलेल्या पत्त्यावर गेली. तो पत्ता एका लॉजचा होता. ती त्या लाॅजसमोर जाऊन उभी राहिली आणि तिने तुषारला फोन केला. फोन आल्याबरोबर तुषार खाली आला आणि तिला त्याच्या रूममध्ये येण्यास सांगितले. लॉजवर मोनिका अनोळख्या व्यक्तीसोबत पहिल्यांदाच जाणार होती त्यामुळे तिला खूप भीती वाटत होती. सुरुवातीला आढेवेढे घेऊन ती लॉजवर जाण्यास तयार झाली.

"अरे तुषार, मी पहिल्यांदाच लॉजवर येत आहे. मला खूप भीती वाटत आहे. त्यापेक्षा आपण एखाद्या बागेमध्ये व्हिडिओ बनवला तर?" मोनिका म्हणाली.

"अगं वेडी आहेस का? बागेत वगैरे व्हिडिओ बनवायला लागलो तर तिथे खूप सारे लोक असतात. शिवाय ते ठिकाण ओळखीचे असेल तर आजूबाजूची लोकदेखील ओळखतात. त्यापेक्षा इथे रूममध्ये व्हिडिओ बनवला तर ते बेस्ट होईल. शिवाय मला तुला चार गोष्टी सांगता येतील. बागेत हे सगळं मी तुला कसं सांगणार? शिवाय मी सांगितलेले तुला ऐकू यायला हवे तिथे किती लहान मुले खेळायला येतात. या सगळ्याचा विचार कर ना?" तुषार म्हणाला.

"हो रे. पण मी पहिल्यांदाच येत आहे त्यामुळे थोडीशी भीती वाटत आहे." असे म्हणून शेवटी मोनिका रूमवर जाण्यास तयार झाली. रूमवर गेल्यावर तिने कॅमेरा लावला आणि ती व्हिडिओ बनवू लागली. व्हिडिओ बनवताना तुषार तिला काही चुका असतील ते सांगू लागला. काही वेळाने चूक सांगताना त्याने तिचा हात हातात घेतला. तुषारचा स्पर्श होताच मोनिका मोहरून गेली. तो अनोळखी स्पर्श पण तिला अल्हाददायक वाटत होता. ती लगेचच त्याच्या मिठीत शिरली. बराच वेळ ती त्याच्या मिठीतच होती. त्याला तेच हवे होते. मोनिका तुषारच्या मिठीत आल्यावर त्याने देखील अलगद तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि मोनिका आणखीनच मोहरून गेली. तिला हवाहवासा वाटणारा तो स्पर्श. आता तुषारने अलगदच तिच्या कपाळावर चुंबन केले आणि दोघांचे ओठ एकमेकांना टेकणार इतक्यातच मोनिका भानावर आली. तिने पटकन कॅमेरा बंद केला आणि झालेला व्हिडिओ लगेच डिलीट केला.

"कमऑन मोनिका, इतकं काय घाबरायला झाले? इतक्या मोठ्या शहरात अशा गोष्टी नेहमी घडत असतात. त्यात नवीन असे काहीच नाही. उलट हा व्हिडिओ खूप गाजेल." तुषार म्हणाला.

"तुझ्यासाठी हे नवीन नसेल, पण माझ्यासाठी हे पाप आहे. मी एक हाउसवाइफ आहे आणि माझ्या नवऱ्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या विश्वासाला मला तडा जाऊ देणार नाही. हे रील्सचे वेड मला लागले, पण काही अनर्थ होण्यापासून मी बचावले." असे म्हणून तिने मोबाईल घेतला आणि तडक बाहेर पडली. तेव्हापासून तिने सोशल मीडियाचे सगळे ॲप डिलीट केले. आता ती नवरा आणि मुलगा यांच्यात ती रमू लागली. आता तिचा संसार पूर्वीपेक्षा आणखी सुखकर झाला.
समाप्त.

🎭 Series Post

View all