रील्सचे वेड 1 (जलद कथामालिका स्पर्धा)

सामाजिक कथा


मोनिका भराभर तिचे घरातील सगळे काम आवरून मुलाचा आणि नवऱ्याचा डबा बनवून द्यायची. दहा वाजता दोघेही घरातून बाहेर पडायचे आणि नंतर घरात मोनिका एकटीच असायची. सोशल मीडियाचा वापर करताना तिला रील्स पाहायचा जणू छंदच जडला. रील्स पाहता पाहता आपणही एकदा करून पहावे असे तिला सारखे वाटू लागले. त्याप्रमाणे एक दिवस धाडस करून तिने एक रील्स बनवले आणि थोड्याच कालावधीत तो इन्स्टावर अपलोड केला. त्या रील्सला खूप सारे लाईक्स, व्ह्यूज, कमेंट्स तिला मिळाले ते पाहून ती हुरळून गेली. तिला खूप आनंद झाला. इतके वर्ष घरात असणाऱ्या अर्थातच हाऊसवाईफ असणाऱ्या मोनिकाचा आज आपण काहीतरी करू शकतो असा आत्मविश्वास वाढला.

आता मोनिका रोजच तिचा मुलगा आणि नवरा गेल्यावर हे काम करू लागली. रोज वेगवेगळे ड्रेस घालून नवनवीन रील्स बनवायची. अर्थातच वेगवेगळे डायलॉग मधून अथवा गाण्याचा बॅकग्राऊंड ठेवून ती रील्स बनवत होती. चेहऱ्यावर छान छान एक्सप्रेशन देऊन ती हे सर्व करत होती. मुळातच सुंदर असलेली मोनिका अशा एक्सप्रेशनमध्ये आणखीनच सुंदर दिसत होती. तिला तो जणू छंदच जडला होता. शिवाय आपण खूप काही मोठे करत आहोत असे तिला वाटत होते. हळूहळू तिचे व्ह्यूज आणि लाईक कमेंट्स वाढत गेले. आता आपण प्रसिद्ध होत आहोत हे तिला जाणवले.

एक दिवस मोनिका कोणाकोणाचे कमेंट आले आहेत हे पाहत बसली होती. इतक्यात तिला एका व्यक्तीचे खूप सुंदर कमेंट दिसले. ती कमेंट वाचून ती क्षणभर स्तब्ध झाली कारण इतकी सुंदर कमेंट तिला याआधी कोणी दिली नव्हती. तिने आधीच्या रील्समधील कमेंटमध्ये पाहिले तर त्यामध्ये देखील त्या व्यक्तीने खूप सुंदर कमेंट दिली होती. प्रत्येक रील्समध्ये त्या व्यक्तीचा कमेंट हा होताच. ते पाहून तिला आश्चर्य वाटले. कोण असेल ही व्यक्ती? मला इतकी सुंदर कमेंट कशी काय करत असेल? असा विचार ती करत होती. इतक्यात तिने नाव वाचले आणि फेसबुकवर सर्च केले. सर्च करताना तिला जाणवले की या व्यक्तीची तिला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. अर्थातच तिने ती एक्सेप्ट केली. मोनिकाने फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर लगेचच मेसेंजरवर तिला मेसेज आला.

"तुमचे रील्स खूप सुंदर असतात. एक्सप्रेशन तर अप्रतिम असतात." त्या व्यक्तीचा मेसेज आला.

असा मेसेज वाचून मोनिकाने "थँक्यू सो मच" असा रिप्लाय दिला.

"पण मला यामध्ये थोडी कमी जाणवली." पुन्हा त्या व्यक्तीचा मेसेज.

"कमी जाणवली? ती कोणती? मी तर अगदी व्यवस्थित जवळ जवळ वीस पंचवीस वेळा ट्राय करून रील्स अपलोड करते." मोनिका म्हणाली.

"हो. एखादा रिल्स बनवण्यासाठी एक दोन प्रयत्नात कधीच होत नाही. त्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत ही घ्यावीच लागते. मी पण बनवतो रिल्स, मला तर तीस पस्तीस वेळा प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठे ते साध्य होते आणि परफेक्ट होते. मी मनासारखे रिल्स झाल्याशिवाय अपलोड करतच नाही." असा समोरून मेसेज आला.

"अरे वा! तुम्ही सुध्दा रील्स बनवता." मोनिका म्हणाली.

"हो मग. त्याशिवाय तुझ्यातील चुका सांगतोय का?" आता तो एकेरी बोलू लागला आणि असे मेसेजवर मेसेज करून दोघे बोलू लागले. काही वेळाने त्या व्यक्तीने मोनिकाला व्हाट्सअप नंबर मागितला. तेव्हा मोनिका द्विधा मनःस्थितीत होती. या अनोळख्या व्यक्तीला आपण आपला नंबर देऊया की नको असा ती विचार करत होती.

मोनिका तिचा नंबर देईल का? आणि ती व्यक्ती कोण असेल? या रील्सच्या वेड्याने मोनिकाचे काही नुकसान होईल का? तिच्या नवऱ्याला समजले तर काय होईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all