रिडेव्हलपमेंट

कथा डेव्हलपमेंटच्या जाळ्यात अडकलेल्या एका चाळीची

रिडेव्हलपमेंट..



"आयना का बायना घेतल्याशिवाय जायना.. हमको पैसा मिलता है.." चाळीतली मुले सुमित्राकाकूंचा दरवाजा वाजवत होती..

" काय मेला उच्छाद मांडला आहे कार्ट्यांनी.." त्या खूप चिडल्या होत्या..

" अग पण दे ना.. वीसतीस रूपये.. तू तरी का ताणून धरते आहेस?" काकांनी समजवायचा प्रयत्न केला.

" का पैसे द्यायचे? नुसती दारू प्यायला? देणार नाही.." काकू ठाम होत्या..

" काकू.. बस काय? हे शेवटचे वर्ष.. पुढच्या वर्षी थोडीच आम्ही येणार.. देताय का?" बाहेरून परत आवाज आला..

काकूंच्या रागाचा विचार न करता काका उठले. खिशातून शंभरची नोट काढली.. त्या मुलांना दिली.. "काका द ग्रेट.." मुलांनी काकांना पण थोडा रंग लावला आणि म्हणाले.. "पुढच्या वर्षी टॉवर मध्ये भेटू.. मग आहेच.. इट्स सो अनहायजेनिक.."

सगळे हसायला लागले.. मुले पुढच्या घराकडे वळली..

" का दिलेत तुम्ही पैसे? आपल्याकडे का पैशांचे झाड आहे का?" 

" असे नाही ग.. इतर वेळेस तू त्या मुलांना शंभर कामे सांगतेस तेव्हा ते घेतात का पैसे? मग कधीतरी द्यायला काय हरकत आहे? आणि तसेही पुढच्या वर्षी टॉवरमध्ये कोण येणार? मग आहोतच तुला मी आणि मला तू.."

" खरेच आपली बिल्डिंग डेव्हलपमेंटला जाणार का?" काकूंनी विचारले..

" त्या दिवशी होतीस ना मीटिंगला? मी सही पण केली आहे.. आपल्याला याच्या डबल एरिया मिळणार.. तो बिल्डर महिन्याला पंचवीस हजार देणार आहे.. बिल्डिंग होईपर्यंत.."

" खरेच? "

" हो.. आता आपण भाड्याने घर शोधायला घेऊ.."

"मी काय म्हणते, असे केले तर, आपण बदलापूर वगैरे बाजूला घर घेऊ.. आणि उरलेले पैसे जपून वापरू.. मग उरले कि वापरता येतील ना?"

" अग पण तिथेही पोरे नसतील ना? त्यांच्यामुळेच आपल्याला मूलबाळ नाही हे विसरायला होते.."

" पण ते काही आपल्याला पोसणार आहेत का? आपण आपले पैसे नको नको साठवायला? तुमचे पेन्शन ते एवढेसे.. काय पुरणार?"

" बरे.."

आणि खरेच काका काकूंनी भाड्याने घर शोधायला सुरुवात केली.. चाळीतल्या मुलांचा काकांवर फार जीव होता.. काकांनी एरिया सोडून जावे असे त्यांना अजिबात वाटत नव्हते..

" काका, मी काय म्हणतो.. मी तुम्हाला याच भाड्यात आपल्या एरियात टिपटॉप जागा शोधून देतो ना."

" मग काय काका? तुम्ही तर आमची शान आहात.. या एरियाची शान आहात.. तुम्हीच हा एरिया सोडून गेलात तर आम्ही काय करायचे?"

" तसे नाही रे.. तुमची काकू बोलते ते ही बरोबर आहे ना.. दूर गेलो तर भाड्याचे थोडेफार पैसेतरी वाचतील.. नंतर उपयोगी पडतील.."

      पैशांचा विषय निघाला तसे सगळे गप्प झाले.. कारण बरेचजण नोकरी शोधत होते.. आणि ज्यांना नोकरी होती त्यांना पगार कमी होता..

काका काकूंना घर मिळाले.. मुले त्यांचे सामान घेऊन घर लावायला गेले.. चाळ पडली.. सगळे इथे तिथे विखुरले गेले.. खरेतर अठरा महिन्यात बिल्डिंग उभी करतो, असा बिल्डरचा वायदा होता.. बिल्डरने पहिला अकरा महिन्याचा चेक दिला. सगळे चाळकरी खुश होते.. एका झटक्यात एवढे पैसे आले होते.. काहीजणांनी एरियात घर घेतले होते.. तर काही जणांनी काकांसारखे दूर.   

        त्यातही ज्याला जेव्हा जसे जमेल तसे चाळीपाशी येऊन जाई.. मग काय अवस्था आहे हे एकदुसर्याला फोन करून सांगितले जाई.. काकू हट्टाने तिकडे गेल्या खऱ्या.. पण खरेच त्यांना चाळीची आपल्या एरियाची खूप आठवण येत होती..

" मी काय म्हणते, आपण एकदा जाऊन येऊ या का चाळीत? आणि त्या मुलांना पण फोन करा म्हणाव या जरा भेटायला आम्हाला.."

" अग, हा चंद्या घरी बोलवतोय जेवायला.. काय सांगू?"

" त्याला सांगा. घरी नको.. आपण हॉटेलमध्ये जाऊ जेवायला.."

" अग पण पैशाचे?" काकांनी फोनवर हात ठेवत आश्चर्याने विचारले.

" देते मी.. ठेवलेत जपून मी मिळालेले भाड्यातून.."

"मुले किती खुश झाली.. आता जातोच आहोत तर बिल्डर कडून पुढचा चेकही घेऊन येऊ.."

" चालेल.. बघूतरी काम कुठवर आले आहे.."

दोघे स्टेशनवर उतरले.. त्यांना घ्यायला चंद्या टॅक्सी घेऊन आला होता..

" काय रे एकदम टॅक्सी?" काकूंनी आश्चर्याने विचारले..

" मग काय? स्वतःची आहे.. येणारे भाडे हप्ता म्हणून फेडत होतो.. आणि मिळालेल्या पैशात घर चालवतो.."

" फेडत होतो म्हणजे रे?" काकांनी विचारले.

" अहो त्या बिल्डरने दोन महिने झाले चेक कुठे दिला आहे.. रोज फेऱ्या मारतोय.."

" का रे? काही झाले आहे का?"

" हो.. त्याचा कसलातरी संप चालू आहे.. म्हणतो काम बंद आहे.. नुकसान होते आहे.. कसे पैसे देऊ.. माझेच अडकले आहेत.. खोटारडा साला.." चंद्या अजून शिव्या घालणार होता.. पण काकूंना पाहून त्याने राग गिळला.. काका काकू तरिही बिल्डरकडे गेले.. चाळीच्या जागी मोकळे मैदान दिसत होते.. कसलेही काम चालू नव्हते..

" काय ओ.. हा तर अठरा महिन्यात टॉवर बांधणार होता.. इथे तर एकही वीट रचलेली दिसत नाही.."

" थांब मी जाऊन विचारतो.."

दोघेही तिकडे तात्पुरत्या उभारलेल्या ऑफिसमध्ये गेले.. 

" अरे या.. काका काकू.. आज काय येणं केलेत?"

बिल्डरचा प्रेमळ आवाज ऐकून काका काकूंना हायसे वाटले.

" काही नाही.. सहज आलो काम कुठवर आले आहे ते पहायला.."

" अच्छा, अरे यांच्यासाठी कोल्ड्रिंक मागव रे.."

" मी काय म्हणतो.. जरा चेक पण दिला असता तर.. आम्हाला परत परत यायला जमणार नाही.."

" त्याचे काय झाले आहे काका, त्या संपामुळे माझे काम अडकले आहे.. खूप पैसा गुंतलाय.. थोडे दिवस धीर धरा ना..मी दोन महिन्यात पैसे देतो.."

" आम्ही म्हातारी माणसे.. एवढ्या लांबून सतत यायला नाही जमणार.." काकू म्हणाल्या..

"अरे मी काय तुम्हाला त्रास देणार? ना.. दोन महिन्यांत पैसे अकाउंटला जमा करतो. "

निराश झालेले काका काकू कोल्ड्रिंक न घेताच तिथून निघाले.. सगळी मुले जमली होती.. कोणाला नोकरी लागली. कोणाचे काय चालू आहे.. सगळे सांगत होते.. पण चाळ कधी बांधून होणार? प्रत्येकाच्या बोलण्यातून हि काळजी जाणवत होती.. दोनाचे तीन महिने झाले.. पण बिल्डरकडून एक पैसा अकाउंटला आला नव्हता.. तो बिल्डर फोनही उचलत नव्हता. शेवटी इकडच्या घराचे पैसे भरण्यासाठी काकांनी आपले एफ. डी. तोडायला सुरुवात केली.. मुले टचमध्ये होती.. पण प्रत्येकाच्या आवाजात निराशा जाणवत होती. जिथे त्यांची घरे होती तिथे आता फक्त माती होती..

" काका, एक वाईट बातमी आहे.."

" काय रे काय झाले?"

" आपल्या चंद्याने आत्महत्या केली.. "

" काय?"

" हो ना.. त्याने टॅक्सीचे हप्ते फेडले नाहीत म्हणून त्याची टॅक्सी घेऊन गेले. खूप निराश झाला होता तो.. घरातल्यांना खायला घालायला पैसा नव्हता.."

"त्या बिल्डरने भाडे दिलेच नाही का?"

" नाही ना.. काय बोलू आता.. तुम्ही येताय ना? चंद्याचा खूप जीव होता तुमच्यावर.."

" नाही रे.. कसे बघवणार मला.. अंगाखांद्यावर खेळवलेली तुम्ही मुले. कसे बघू तुम्हाला असे?"

काका फोन ठेवून जोरजोरात रडायला लागले..

" काय झाले? का रडताय तुम्ही?"

" चंद्या , आपला चंद्या.."

ती खबर ऐकून काकूही हादरल्या..


"किती वर्ष झाली ग आपल्याला इथे येऊन?"

" साताठ?"

"तुला वाटते आपण आपल्या घरी जाऊ परत?"

" असे का विचारताय?"

" बघ ना.. इतकी वर्ष झाली इथे येऊन. ना भाडे मिळते आहे.. ना बिल्डिंग तयार होते आहे. साठवलेले सगळे पैसे संपत आले आहे.. पुढे काय हा प्रश्न सतावतो आहे.. "

" हो ना.. मलातर चाळीतल्या कोणाला फोन करायची पण भिती वाटते.. आज काय तो गेला उद्या काय त्याने आत्महत्या केली.. जीव नुसता घाबरा होतो.."

"माझ्याकडे एक उपाय आहे.. साथ देशील मला?"

" मी नेहमीच तुमच्यासोबत आहे.."

काकांनी बिल्डींगमधल्या मुलांना थरथरत्या हाताने फोन लावला..



दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये बातमी होती.."बिल्डरच्या फसवणुकीला कंटाळून वृद्ध दांपत्याची आत्महत्या.."





हि कथा सत्यघटनेवर आधारित आहे.. रिडेव्हलपमेंट मध्ये अडकलेल्या अनेकजणांनी वेळेत घरे न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत.. त्या सर्वांना समर्पित हि कथा..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई