रेड लाईट 6

Marathi Story


तिलाही अनुभवायचं होतं घर, तिलाही अनुभवायचा होता घरातला दैवी स्पर्श... खिडकीत तिने एका कुंडीत फुलझाड लावलेलं, त्याची 2 फुलं आणून बाप्पा समोर ठेवली, निरांजन घरात नव्हती, मग दिवाळीत कंपनी कडून मिळालेली एक शोभेची पणती तिने आणली आणि बाप्पा समोर लावली. सगळं कसं अगदी जमून आलं होतं, कितीतरी वेळ ती बाप्पाकडे बघत होती..आज पहिल्यांदा तिला काहीतरी समाधान मिळालं होतं. खोलीत पहिल्यांदा एक मांगल्य ती अनुभवत होती..बाहेर dj चा आवाज सुरू होता, मग आरती चा आवाज सुरू झाला...तिला आज समाजात असल्यासारखं वाटत होतं, समाजापासून वेगळं नाही..कारण तीही ऑफिसमध्ये सांगू शकणार होती की माझ्याही घरात गणपती आलेत. तिने हळू आवाजात आरती केली आणि बाप्पाला नमस्कार केला. आपण एकटे नाही, आपल्यासोबत आता बाप्पाही आहे हे समाधान तिला मिळालं. बाप्पा आता काहीतरी चांगलं करेल अशी आशा तिने धरली.

बाप्पा सोबत बराच वेळ घालवल्यावर तिने स्वैपाक करायला घेतला. तिला वाटू लागलं की आधी थोडीशी तयारी केली असती तर मूर्ती मोठी बनवली असती, सजावट केली असती, मोदक बनवले असते, नेवैद्य बनवला असता. पण ऐन वेळी तिच्या मनात बाप्पा आला आणि विराजमान झाला.

इमारतीत एक भाजीवाली यायची, शारदा अधूनमधून तिच्याकडून भाजीपाला घेत असे. शारदाने भाजीला फोडणी दिली आणि दरवाजा वाजला.

"नक्की भाजीवाली असणार.."

असं म्हणत शारदाने जाऊन पटकन दार उघडलं..बघते तर काय, समोर 3 माणसं..त्यांच्या नजरेतील भाव तिने ओळखले, रात्री अपरात्री दार ठोठावणारी हीच ती माणसं.. ती घाबरली, कुठून दुर्बुद्धी झाली अन दार उघडलं असं तिला झालं..तिने पटकन दार लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी इतक्या पटकन दार लोटलं की तिघेही आत आले..बाहेर डीजे चा इतका आवाज होता की आरडाओरडा करूनही उपयोग नव्हता, बरोबर हीच संधी शोधून तिघेही आत घुसले...एकाने तिचं तोंड दाबलं, एकाने तिचे हात पकडले..शारदा सुटकेसाठी जीवाचा आकांत करू लागली..त्या माणसांचे स्पर्श तिला भयानक वाटू लागले..तिची ताकद सम्पली आणि प्रतिकार करणं तिने सोडून दिलं..समोरच्या माणसांचे लालची डोळे ती केविलवाण्या नजरेने बघू लागली आणि अखेर आपल्या अंताची डोळे गच्च मिटून वाट बघू लागली..

काही सेकंदांनी ते स्पर्श अचानक नाहीसे झाले, माणसांची पकड सुटल्यासारखी जाणवली...तिच्या तोंडावरचा हातही सुटला तसा तिने मोकळा श्वास घेतला आणि डोळे उघडले..

समोर एक तरुण मुलगा त्या माणसांना एकेक करून लोळवत होता. पहिल्या माणसाला त्याने डोक्यात बुक्का देऊन खाली पाडलं, दुसऱ्याला पोटात गुद्दे देऊन आणि तिसऱ्याला पळवून लावत तो त्यांना हकलू लागला. एकेक करून सर्वजण तिथून पळून गेले..

आता खोलीत फक्त शारदा आणि तो मुलगा उभा होता. तिने त्याच्याकडे पाहिलं...उंच, भरदार छातीचा, अंगात शेरवानी आणि कपाळावर गंध...त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता.. त्याच्या चेहऱ्यावर असलेलं तेज कुणालाही प्रेमात पाडेल असं होतं..त्याचे गूढ डोळे आणि तरतरीत नाक पाहून शारदा काहीवेळ त्याच्याकडे बघत बसली...ती काही बोलत नाही बघून तो स्वतःहून म्हणाला..

"थँक्स."

"आं?"

"वेलकम.."

ती ओघओघाने म्हटली..तो हसू लागला..

"मॅडम, तुम्ही मला थँक्स म्हणायला हवं.."

शारदा भानावर आली, आलेलं संकट आणि त्यातून सुटका केलेला हा देवदूत तिला दिसू लागला आणि तिने पटकन खाली बसून त्याचे पाय धरले..आणि रडू लागली.

"कसे उपकार फेडू मी हे सांगा मला...तुम्हाला माहीत नाही किती मोठ्या संकटातून वाचवलं तुम्ही मला.."

त्याने हात धरून तिला उठवलं आणि म्हणाला..

"मी माझं कर्तव्य केलं, पुन्हा कधीही गरज लागली तर केव्हाही हाक दे..मी हजर असेन.."

"तू कोण आहेस पण? आणि अचानक कसा आलास?"

"मी वरद... वरच्या फ्लॅट मध्ये आलोय रहायला आजच..मी एका सामाजिक संस्थेसाठी काम करतो, म्हणूनच कोल्हापूरहुन इथे आलो..खाली मंडळाच्या गणपतीसाठी जात होतो आणि इथे गडबड दिसली मला अन आलो.."

त्याने वरद हे नाव सांगताच शारदाने तिने स्थापन केलेल्या गणपतीकडे एक नजर टाकली..आज खरंच बाप्पाच या वरदच्या रूपाने मदतीला धावून आला होता. खरंच त्यानेच वाचवलं मला..

"आता मी येतो, आणि हो..दार लावून घे, आणि माझा नंबर घे बरं.. मदत लागली तर.. ओह, सॉरी...म्हणजे चालेल ना नंबर exchange केलेले?"

"त्यात काय...सांग तुझा नंबर.."

असं म्हणत दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले...त्याने निरोप दिला तसं शारदाने दरवाजा लावून घेतला. तिच्या डोळ्यासमोर सारखा तो प्रसंग येत होता..वरदने कसं त्या तिघांना लोळवलं.. कुणासाठी? माझ्यासाठी? कोण आहे मी? शारदाला आज पहिल्यांदा कुणीतरी असं भेटलं होतं जे तिच्यासाठी लढलं होतं. कांताबाई सोडून काळजी करणारं माणूस तिने आजवर पाहिलंच नव्हतं. तिचं मन आज थाऱ्यावर नव्हतं.. असं वाटत होतं की आयुष्यभर ज्याची कमी जाणवत होती तो हाच! हाच तो, ज्याची मला गरज होती, हाच माझा पहिला आणि शेवटचा शोध, हाच तो जो मला पूर्णत्व देईन..

आपण काय विचार करू लागलो याचं तिला हसू आलं..तिने त्याचा नंबर सेव्ह केलेला..whatsapp वर ती त्याला शोधू लागली..त्याचा dp तिने पाहिला... त्यात तो अजूनच स्मार्ट दिसत होता.. ती पुन्हा एकदा हसली.

तिने बाप्पाला विराजमान काय केलं, बाप्पाने तिच्या आयुष्याला कलाटणीच देऊन टाकली. आज पहिल्यांदा ती सणाचा आनंद घेत होती..असं वाटत होतं की वरच्या मजल्यावर जाऊन त्याला पुन्हा एकदा भेटून यावं, पण तिने स्वतःला आवरलं. आजचा दिवस खूप वेगळा होता शारदासाठी. वरदचा चेहरा डोळ्यासमोर आणून ती स्वतःशीच हसत होती, तोच कांताबाईचा कॉल तिला दिसला, ब्लॉक केल्याने फक्त मिस कॉल दिसत होता. आज तिचा मूड जरा चांगला होता, एकदा तरी कांताबाईसोबत बोलावं या हेतूने तिने तो नंबर unblock केला. मग यावेळी रिंग वाजली, नाही नाही म्हणत तिने तो उचलला, मनात धाकधूक होती आणि सोबतच एक अपराधीपणाची भावना...

"हॅलो.."

"हॅलो...हॅलो...हॅलो शारदा...बाळा मी बोलतेय, कांताबाई...हॅलो, ऐकते आहेस ना?"

वर्षभरानंतर कांताबाईचा फोन तिने घेतला होता आणि आज कुठे कांताबाईच्या प्रयत्नाला यश मिळालं होतं. त्यामुळे कांताबाईच्या आनंदाला पारावर उरला नव्हता...त्यांचा आवाज ऐकून शांतीपेठेतील इतर बायकाही जमा झाल्या, त्यातल्या ज्या जुन्या स्त्रिया होत्या त्याही आवाज ऐकून गोळा झाल्या..कांताबाई फोनवर बोलत असतांना बायका जमल्या आणि आवाज होऊ लागला, कांताबाई चिडून शांत बसा असा तोंडावर बोट ठेऊन त्यांना इशारा करत होत्या.. मग हळूच त्यांनी फोन स्पीकरवर टाकला..

"शारदा बाळा कशी आहेस? कुठे आहेस सध्या? आमची आठवण येत नाही का तुला? भेटायला कधी येतेस?"

"कांताबाई मी बरी आहे, चांगली नोकरी आहे मला इथे, पगारही चांगला आहे.."

शारदाने फक्त पहिल्या काही प्रश्नांची उत्तरं दिली..

"भेटायला कधी येतेस?"

कांताबाईंनी कळकळीने विचारलं..

"येईन, पुढल्या महिन्यात.."

शारदाच्या तोंडून आपसूकच निघालं, तिचा तसा काहीही विचार नव्हता तरी ती बोलून गेलेली. पण हे ऐकून कांताबाईला आकाश ठेंगणं झालं..शारदा येणार ऐकताच कांताबाईच्या डोळ्यात नकळतपणे पाणी तरळून गेलं..

मोजकं बोलणं झालं आणि दोघींनी फोन ठेऊन दिला. शारदाला आपण काय बोलून बसलो म्हणून पश्चात्ताप होऊ लागला. शांतीपेठेत जायचं? पुन्हा? तिथून निघताना पुन्हा इथे पाऊल ठेवणार नाही असं सांगितलं होतं, मग आता पुन्हा...जाऊद्या, बघू नंतर, असं म्हणत ती उठली आणि घरातील तिची उरलेली कामं करत बसली.

***

शारदा येणार म्हणून कांताबाईने आधीच एक खोली रिकामी करून घेतली, तिथे तिची सोय व्हावी म्हणून नाना प्रकारच्या वस्तू आणल्या..

"स्वीटी, इथे एक टेबल आण बरं, तिला ऑफिसचं काम करावं लागलं मग? सुनीता, हे जळमट काढ बरं आणि पूर्ण खोली नळी लावून स्वच्छ धुवून घे.."

कांताबाई कमरेवर हात ठेवून उभ्या असतात आणि एकेकीला सूचना देत असतात..तेवढ्यात मागून एक आवाज येतो..

"शांतीपेठेत सण साजरा होतोय की काय??"

कांताबाईने वळून पाहिलं, आणि समोर... कल्पना... आजचा दिवस कांताबाईचा होता..एक तर शारदाचा येऊन गेलेला फोन त्यात भेटायला आलेली कल्पना..

कल्पना अधूनमधून शांतीपेठेत भेटायला येत असायची, ती आली की कांताबाईला खूप आनंद होई..तिला पाहताच कांताबाई म्हणाल्या..

"अगं कल्पने मी फोनवर कुणाशी बोलली माहितीये? शारदाशी.."

कल्पना दोन पावलं मागे झाली,

कांताबाई बोलून गेल्या पण लगेच भानावर आल्या..कल्पनाने शारदाला लहानपणीच स्वतःपासून दूर केलं होतं, कल्पनाचीच तर लेक होती ती..कशी? केव्हा? कल्पना शांतीपेठेत परत आलेली का? शारदाचा जन्म कसा झाला? काय संबंध तिचा शांतीपेठेशी? वाचा पुढील भागात

🎭 Series Post

View all