रेड लाईट 2

Marathi Story


स्वीटी, चांगल्या घरातली मुलगी..लग्न ठरलं, छान स्वप्न पाहत असतानाच नवऱ्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला, कुणीही वाचलं नाही. अपशकुनी म्हणून तिचं पुन्हा कधीच लग्न जमलं नाही, आई वडिलांनीही तिची जबाबदारी उचलण्यास नकार दिला..सर्वांनी जेव्हा नाकारलं तेव्हा दोन वेळच्या जेवणासाठी शांतीपेठेचा सहारा तिला मिळाला..

अश्या अगणित कहाण्या, शांतीपेठेच्या... इथल्या महिलांच्या...इथल्या घटनांच्या...

सकाळी 11 ची वेळ.. दलाल मेहता त्याच्यासोबत एका 15 वर्षाच्या मुलीला घेऊन आलेला..तिला घेऊन तो तडक कांताबाईंकडे गेला.


कांताबाई, नुसतं नाव ऐकताच चाळीतील सगळी कापत असत..कांताबाई..!!! अंगभर जरीची साडी, दाट काळभोर केसांचा अंबाडा, त्यावर भरगच्च फुलांचा गजरा, हातभर बांगड्या, टवटवीत नयन आणि त्यात काजळ घालून अधिकच उठून दिसणारे डोळे, ऐटदार चाल आणि आवाजात करारीपणा...

चाळीची राणी, संपुर्ण चाळीचा व्यवहार कांता बाईच बघत.. तरुपणात आपलं सगळं विकून टाकलेलं, आता उतारवयात भाकड शरीर घेऊन कुठे फिरणार? म्हणून दलालाने चाळीचा व्यवहार बघण्याचं काम त्यांच्याकडे दिलं...कांताबाई म्हणजे अगदी कडक स्वभावाची बाई, आलेल्या गिऱ्हाईकाशी जशी गोड बोलायची तशीच जर त्याने पैसे द्यायला टाळाटाळ केली तर त्याची कातडी सोलून काढायची..सर्वांना एकमेव धाक कांताबाईंचा. कित्येक वर्ष या चाळीत कांताबाईने काढले होते, इथले ऊन पावसाळे तिने पाहिलेही आणि झेललेही होते.

चाळीच्या मध्यभागी असलेल्या मोकळया जागेत कांताबाई खुर्ची टाकुन बसलेल्या आणि त्यांच्या खिदमतीला काही बायका आजूबाजूला होत्या. त्यांचा दलाल मेहता त्या मुलीला घेऊन आला आणि म्हणाला..

"या मुलीला आणलं आहे, चारपट किंमत लावत जा हिची..आजकाल कोवळ्या मुलींना फार डिमांड आलीये..".

कांताबाईने त्या मुलीकडे पाहिलं, ती काहीशी भेदरलेली होती.. मेहताला तिने विचारलं..

"काय हिस्ट्री हिची?"

"आई वडील गावाला असतात, मामाकडे राहते इथे..मामी फार त्रास देते हिला, म्हणून रडत होती एका ठिकाणी..म्हणून आणलं हिला इथे.."

कांताबाईने त्या मुलीकडे पाहिलं, तिला काहीच समजत नव्हतं काय चाललंय ते..

"पोरी, तुला माहितीये का इथे काय करायचं आहे ते?"

"हो, काका म्हणाले इथे काम मिळेल..मला लिहिता वाचता येतं.. इंग्लिश पण थोडंफार येतं, चार पैसे मिळाले तर मामी खुश होईल आणि मला संध्याकाळी पोटभर वाढेल तरी.."

कांताबाई उठली, मेहता समोर जाऊन उभी राहिली आणि खाडकन त्याच्या गालावर तिने थप्पड लगावली..

"नालायका..कितीदा सांगितलं आहे तुला..असल्या कोवळया जीवांना यात अडकवायचं नाही म्हणून? इथे जी बाई येते ती स्वखुशीने, कुणालाही इथे बळजबरीने आणलं जात नाही..हा नियम माहितीये ना तुला? जा निघ इथून.."

मेहता घाबरून निघून गेला..तेवढ्यात काही पुरुष चाळीत शिरले, त्या मुलीकडे बघत त्यांनी तिच्याजवळ पाय वळवले...."कांताबाई, हिच्यासाठी डबल किंमत देऊ आपण.."

कांताबाई संतापली..

"नालायका तुझ्या मुलीच्या वयाची आहे ती, जरा तरी लाज बाळग.."

कांताबाईने त्या मुलीला जवळ घेतलं, तिच्या हातात पैसे टेकवले आणि म्हणाली,

"बस पकड आणि गावी निघून जा तुझ्या आई बाबांकडे, मामी काय त्रास देते हे न घाबरता सांग सगळ्यांना. शाळा कॉलेज कर आणि मोठी हो..कुणालाही घाबरू नको..,"

ती मुलगी खुश झाली आणि पैसे घेत निघून गेली. संतापाने लाल झालेल्या कांताबाईच्या डोळ्यात पाणी आलं, तिने ते मोठ्या खुबीने लपवलं. खिदमतीला असलेल्या बायका कौतुकाने त्यांच्याकडे बघू लागल्या तशी ती ओरडली..."ती पोर लहान होती, तुम्ही तर मोठ्या आहात ना? जा बाहेर, शोधा गिऱ्हाईक..आज किमान 5000 चा गल्ला जमला पाहिजे.."

बायका नाराजीनेच उठल्या, आरशा समोर जाऊन अवतार नीट करू लागल्या. खरं तर शृंगार हा प्रत्येक स्त्रीचा आवडता विषय, स्त्री जन्माचा तो एक अविभाज्य घटकच..पण अख्ख आयुष्य त्या शृंगारातच जात असेल तर घृणा वाटू लागते. खरखरीत त्वचेवर केवळ तात्पुरता मुलामा चढवायचा...शरीर कसंही असो, बेढब, शिडशिडीत... त्याला सजवून बाजारात न्यायचं...बाजारात वस्तू घेतांना त्याचं आवरण कसं लक्षवेधी ठेवलं जातं.. तसंच काहीसं..शरीराची ईच्छा असो व नसो, मनाची स्थिती कशीही असो..दोन वेळच्या जेवणासाठी पैसा कमवायचा म्हणून सगळी धडपड. नवीन नवीन शांतीचाळीत प्रत्येकीला कुतूहल होतं, अंगात रग होती..पण आता, फक्त मजबुरी...

नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता कांताबाईंनी फोन काढला आणि शरूला लावला, नेहमीप्रमाणे फोनवरचा आवाज..

"आपण ज्याला कॉल करू इच्छिता तो आपला नंबर स्वीकारू शकत नाही.."

गेली वर्षभर कांताबाईंनी समज करून घेतलेला..

"पोर कामात असेल.."

त्यांना काय माहीत शारदाने त्यांचा नंबर कधीच ब्लॉक केलेला ते..
पण कांताबाईने आशा सोडली नव्हती, एक ना एक दिवस ती फोन उचलेल असं त्यांना वाटत होतं. लहानपणापासून शरू अंगा खांद्यावर खेळलेली...लहानाचं मोठं केलेलं तिला...पण, शेवटी चाळीचं गालबोट तिलाही लागलं होतंच..
_____

"शारदा अगं काय झालं आत सांगशील का? मिटिंग चांगली झाली ना?"

वर्षा तिला विचारून विचारून हैराण करत होती पण शारदा धक्क्यातच. मौन सोडता येईना अन मनातलं सांगताही येईना..

खान सर शारदाजवळ आले आणि तिचं कौतुक केलं. शारदाने फक्त कृत्रिम हसून प्रतिसाद दिला, वर्षाला तिच्या अश्या वागण्याचं नेहमीच कोडं पडायचं. ऑफिस सुटल्यावर ती घरी गेली. जेव्हापासून तिला सत्य समजलं होतं तेव्हापासून शांतीचाळीशी तिने संपर्क तोडला होता. पण जुन्या आठवणी अजूनही तश्याच होत्या.लहानपणी चाळीत ते बागडनं, शीला मावशी, शिल्पामावशी सोबत ते खेळणं..सगळं अगदी तसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहत होतं. जुन्या आठवणींनी बैचेन होणं आता नित्याचं झालेलं. पुन्हा त्या आठवणी आठवायच्या, मग पुन्हा सत्याशी प्रतारणा करायची आणि सगळं विसरून जायचं असं ठरवून ती एकेक दिवस पुढे ढकलत असे.

🎭 Series Post

View all