रेड लाईट 16 अंतिम

Marathi Story
कल्पना आणि राजेश दुपारची जेवणं उरकून सोफ्यावर बसली होती. ती दोघे बाहेर सहसा कमीच पडायची, कारण लोकांपासून त्यांची कहाणी लपून नव्हती, मग या दोघांकडे बघताना त्यांच्या नजरा बदलून जात..आणि नातेवाईकांनी तर कधीच पाठ फिरवली होती..

तरुणपणाचा जोश उतरत जसजसं वय वाढत जातं तसतसं माणूस हळवा बनत जातो..माणसांच्या ऊबेची त्यांना जास्त गरज वाटू लागते, आपली माणसं सतत आपल्या जवळ असावीत असं त्यांना वाटू लागतं. पण त्यांना जवळ होतं तरी कोण?

दाराची बेल वाजली आणि दोघेही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले..घरी कोण येईल? सकाळी पेपरवाला आणि दूधवाला तेवढा येतो, त्यानंतर कुणीही नाही..

कल्पना दार उघडते..समोर शारदा उभी..!!!

कल्पना कितीतरी वेळ बघतच राहते..तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना..

"मी आत येऊ शकते का?"

कल्पना दारातच तिला मिठी मारते आणि हात धरून आत आणते..

"अहो.. शारदा आलीये.." आवंढा गिळत कल्पना राजेशला सांगते. राजेश हातातला पेपर बाजूला ठेऊन तिच्याकडे बघतो.. क्षणभर त्याला वाटलं की आपलंच प्रतिबिंब आपण पाहतोय की काय..!!!

"आई, मी जास्त वेळ घेत नाही. एवढंच सांगायला आलीये की मी लग्न करतेय..तुला माझ्या सासरच्यांना भेटावं लागेल.. एकदा बोलून घे त्यांच्याशी.."

"शारदा..मी?? मी बोलू त्यांच्याशी? आणि कोण मुलगा आहे?"

"आई...त्यांना सगळं सांगितलं आहे मी..मी कोण, कुठून..त्यांना सगळं मान्य आहे..मुलगा चांगला आहे, श्रीमंत आहे.."

त्याक्षणी कल्पनाच्या मनावरचं एक ओझं कमी झालं..इतर लोकांप्रमाणेच आपली लेक रीतसर लग्न करतेय, संसाराला सुरवात करतेय हे पाहून कल्पनाला खूप बरं वाटलं..नाहीतर लग्न, संसार या गोष्टी तिच्यासाठी इतक्या गुंतागुंतीच्या होत्या की त्यातून अजूनही बाहेर पडता येत नव्हतं..

"बरं कधी येऊ भेटायला सांग.."

"मी पत्ता देते माझा..तिथे ये उद्या.."

एवढं बोलून शारदा तिथून निघते..

"थांब पोरी..कितीतरी वर्षांनी भेटली आहेस मला, थांब की इथे..तुला डोळे भरून पाहू तरी दे..तुझे लाडकोड करू दे.."

हे ऐकताच शारदाचा आईवर असलेला राग उफाळून आला..

"कशाला हे सगळं? तुला माझ्यापेक्षा महत्वाचं लग्न होतं ना? मला वाऱ्यावर सोडून स्वतः दुसरं लग्न केलंस आणि आता का इतकं प्रेम उतू जातंय??"

कल्पनाच्या काळजावर एकच आघात झाला..किती सहजपणे आरोप केले गेले तिच्यावर,

"तुला अजूनही असंच वाटतंय? काय मिळालं असतं तुला माझ्यासोबत राहून? सांग...वेश्येची मुलगी सुद्धा एक वेश्याच..हेच पदरी आलं असतं ना? कुठेही गेले असते तरी समाजाने मला हिनवलं असतं आणि त्याची झळ तुला पोचली असती. तू दूर राहून शिक्षण घेतलंस, नोकरी केलीस, एक प्रतिष्ठित आयुष्य जगतेय..हे सगळं मिळालं असतं तुला?"

शारदाला ते काहीसं पटलं, पण अजून प्रश्न तिच्या मनात थैमान घालतच होते..

"मला सोडून एकटी राहिली असतीस तर कुठे बिघडलं असतं? त्यासाठी लग्नच करायला हवं होतं का?"

हे ऐकून राजेश पुढे झाला..

"जर मी पुढे आलो नसतो तर तुझी आई आज जिवंत नसती..तुझ्या विरहापायी ती जीव द्यायला निघाली होती..तिच्या मनावर परिणाम झालेला, अशक्त झालेली ती..स्वतःला पाण्यात झोकून देणार तोच मी तिला वाचवलं...त्याक्षणी एकमेकांचा आधार बनणं आम्हाला भाग होतं.. नाहीतर आज ती जिवंत असती ना मी.."

राजेशने तिला सत्य परिस्थिती सांगितली आणि शारदाचे डोळे उघडले..इतके दिवस आईबद्दल किती मोठा गैरसमज करून बसलेलो आपण? पण खरं कारण हे आहे तर..

दोघीही मायलेकी रडू लागल्या, शारदाच्या मनात पश्चात्तापाची भावना होती..एका गैरसमजापायी आपण आपल्या माणसाच्या प्रेमाला कितीतरी वर्ष मुकलो याची तिला जाणीव झाली..

____
लग्नाची तयारी सुरू झाली..कल्पना रीतसर वरदच्या आई वडिलांना भेटली, त्यांचा यथोचित सन्मान झाला..कल्पनाला असं कुटुंब बघून भरून आलं. लेकीने नशीब काढलं असंच ती म्हणू लागली..

____

इकडे कांताबाई जुने रजिस्टर चाळत असताना एक विचित्र गोष्ट त्यांना दिसली...कॅलेंडर घेऊन त्या काहीतरी ताळमेळ करू लागल्या..तारखा, वार, वर्ष यांचा हिशेब जमवू लागल्या..आणि मोठ्या प्रयत्नांनी त्यांना एका गोष्टीचा खुलासा झाला..ते पाहून त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला..!! लवकरात लवकर जाऊन कल्पनाला हे कळवायला हवं...!!!

____

लग्नाचा दिवस उजाडला...साध्या पद्धतीने लग्न करायचं ठरवलं गेलं..शांतीपेठेतुन कांताबाईला निमंत्रण देण्यात आलं..लग्नाची गडबड सुरू होती, शारदा छानपैकी तयार होत होती..तिकडे वरदसुद्धा खुश होता..सर्वजण खुश होते..लग्नविधी सुरू झाले..कल्पना आणि राजेश दोघेही लग्नात हवं नको सगळं पाहत होते..कांताबाई अजूनही आलेल्या नव्हत्या...

कन्यादानाच्या वेळेस कल्पना आणि राजेश ला बोलवण्यात आलं..कल्पना जाऊन बसली पण राजेशचा गोंधळ उडाला, ही कल्पनाची मुलगी आहे..आपण हिला कधी बापाचं प्रेम दिलं नाही..स्वीकारलं सुद्धा नाही, मग आपण कन्यादान कसं करणार?? राजेश चे पाय हलेना..

तेवढ्यात कांताबाई मागून आल्या..

"जा राजेश...कन्यादान कर..ती तुझीच मुलगी आहे.."

सर्वजण कांताबाईकडे बघतच राहिले...

"माझी मुलगी??"

"होय.."

कांताबाई म्हणाल्या खरं, पण आजूबाजूला असलेली शारदाच्या सासरची मंडळी बघून तिला पुढे काही बोलायला संकोच वाटू लागला..तेवढ्यात वरदची आई म्हणाली,

"कांताबाई, मोकळेपणाने सांगा जे सांगायचं ते.."

कांताबाईला धीर आला..त्या म्हणाल्या..

"बऱ्याच वर्षांपूर्वी कल्पना मानसिक आजाराने ग्रस्त होती..आपल्यासोबत कोण आहे कोण नाही तिला काहीच समजत नसे..तिची औषधं बंद केली तेव्हा कुठे ती पूर्वपदावर आली..या दोन्ही काळात राजेश तिच्याकडे यायचा...जेव्हा राजेश ने कल्पनाला घरी नेलं होतं आणि लग्नाची मागणी घातली होती त्यानंतर कल्पनाने कुणाशीही संबंध ठेवला नव्हता..आणि त्या आधी ती मानसिक आजारी असल्याने कुणी तिच्याकडे जायचं नाही.शारदाच्या जन्माअगोदर 6 महिने कल्पना राजेश सोडून कुणाच्याच सहवासात नव्हती...पण कल्पना औषधांच्या गुंगीत असल्याने तिला काहीच समजायचं नाही आणि काही आठवायचं नाही..तिला हेच वाटायचं की आपण नेहमीप्रमाणे माणसांच्या रोज सहवासात जातोय...म्हणजे शारदा ही फक्त कल्पना आणि राजेशच्या बहरलेल्या प्रेमाचा अंश होती.."

राजेशच्या डोळ्यात पाणी आलं..इतकी वर्षे असं विरहात राहिलो..नात्यांची ओळख नसल्याने पोटच्या मुलीला दूर ठेवलं..तरीच त्याने जेव्हा तिला पाहिलं तेव्हा त्याला त्याचं प्रतिबिंब दिसे..शारदाने ज्या विषयात प्राविण्य मिळवलं तो राजेशचाही आवडता विषय होता...राहून राहून राजेश ला शारदा बद्दल अपराधी वाटायचं...

शारदाला आपले वडील मिळाले तेही थेट कन्यादानाच्या वेळी..आज तिचे दोन्ही कुटुंब पूर्ण झाले होते..तिच्या आयुष्याला पूर्णत्व मिळालं...आणि हे सगळं शक्य करणाऱ्या कांताबाईला सर्वांनी मनापासून प्रणाम केला..कल्पनाला रडू आवरत नव्हतं..कारण ज्या क्षणी ती पूर्ण आपली झाली तो क्षण तिला निरोप द्यायचा होता...

अश्या अनेक कहाण्या..अनेक शांतीपेठेतल्या...अनेक स्त्रियांच्या...वेश्या म्हटलं की दृष्टिकोन बदलतो..पण त्या पलीकडे जाऊन तिच्यातला माणूस बघितला तर त्या बिरुदामागच्या अगणित कहाण्या ऐकून जीवाची घालमेल झाल्याशिवाय राहणार नाही..

समाप्त

***

नाजूक अश्या विषयावर लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न, ईरा वर लिहून खरोखरच एक समाधान मिळालं..इथला वाचकवर्ग खरोखरच प्रगल्भ आहे..सुरवातीला धाकधूक होती पण नंतर प्रतिसाद बघून हुरूप आला...कथा कशी वाटली नक्की नक्की कळवा...

🎭 Series Post

View all