रेड लाईट 10

Marathi Story
घराची वाट चालत असतांनाही डोक्यातून शांतीपेठेतील जुन्या आठवणी जात नव्हत्या. कल्पनाने शांतीपेठेत नव्याने तिचं आयुष्य सुरू केलं होतं. बाकीच्या बायकांसारखं बेभान वावरणं, आपल्या शरीराला पुढे करून पुरुषांना आकर्षित करणं सगळं जड जात होतं. पण हळूहळू ती आणि सविता सगळं एकत्र बघत गेले आणि शिकत गेले. सविताची गोष्टही भयानक होती. तिचं सगळं कुटुंब एका अपघातात गेलं होतं आणि ती एकटी पडली. शांतीपेठेत निदान जगण्याची तरी सोय झालेली. तिच्यात कुठल्याच भावना उरल्या नव्हत्या. सतत आपल्या कुटुंबाला आठवत ती शून्यात बघत बसायची. गिर्हाईक आलं की शरीर त्याच्या ताब्यात द्यायची. एकदा एका गिऱ्हाईकाने तिला बळजबरीने दारू पाजली, तिला नशा चढत गेली. हे घेतलं की डोकं सुन्न होतं आणि येणारे विचार मंदावत जातात हे तिच्या लक्षात आलं. मग दारू आणि शरीर हे दोनच तिच्या जगण्याचे आधार बनले. दिवसभर नशेत सुन्न होऊन ती दिवस काढत असे. पण शेवटी त्या नशेनेच तिचा जीव घेतला. दारू पिऊन पिऊन तिचं हृदय निकामी झालेलं आणि शेवटी attack तिच्या मृत्यूचं कारण बनलं. हे तर होणारच होतं एक ना एक दिवस..!!

ती घरी परतली. गणेश नुकताच घरी आलेला. तो एका ऑफिसमध्ये साधारण कर्मचारी म्हणून कामाला होता. आल्या आल्या त्याने कल्पनाला हाक मारली. त्याला सवयच होती ती, घरी आल्यावर बायको जोवर दिसत नाही तोवर त्याला घरात आल्यासारखं वाटत नसे. कल्पना समोर आली, तिचा अवतार पाहून ती नुकतीच बाहेरून आलीये हे त्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला,

"आज नवीन साडी खरेदी केली वाटतं.."

"नाही ओ.."

"मग, वर्षाबाई सोबत पार्लर मध्ये?"

"नाही.."

"मग कुठे गेलेलीस?"

"शांतीपेठेत.."

राजेशने ते ऐकून हातातलं काम थांबवलं, इतका वेळ मिश्किल मूड मध्ये असतांना मधेच तो गंभीर झाला. का नाही होणार? शांतीपेठेचं नाव तालुक्यात बदनाम झालं होतं, आपली बायको तिथे गेली हे कुणाला सहन होईल?

"तिथे कशाला?"

"कांताबाईला भेटायला.."

राजेशला काय बोलावं कळत नव्हतं. भूतकाळात शांतीपेठेचाच तर आधार घेतला होता त्याने, कल्पनाशी संबंधही तिथेच घडून आलेला. एकीकडे शांतीपेठेबद्दल कृतज्ञ भाव आणि दुसरीकडे आपलं समाजातील स्थान या दोन्हीत तो दोलायमान झाला. म्हणाला,

"ठीक आहे पण सारखी सारखी जात जाऊ नकोस, लोकं बघतात.."

"शांतीपेठेनेच तर आपल्याला सगळं दिलंय, विसरलात?"

"विसरलो नाहीये, पण आता जरा माणसात जगतोय आपण, समाजात जगतोय... तेव्हा..."

एकेकाळी दिवसरात्र शांतीपेठेत पडून असलेल्या राजेशला आता ती जागा खुपू लागलेली. एखादी गोष्ट आपला आधार बनते तेव्हा माणूस त्याला धरून असतो, आणि तोच आधार घेऊन जेव्हा तो आगेकूच करतो तेव्हा मागे वळून पाहायला कचरतो.

"अजून एकदा तरी जावं लागेल असं वाटतंय."

"ते कशासाठी?"

"शारदा येणारे.."

राजेश पुन्हा गोंधळात सापडतो. शारदा कल्पनाची मुलगी आहे हे त्याला माहित होतं. पण ते पाप कुणाचं हे त्या देवालाच ठाऊक..तिचा बाप कोण होता हे शोधण्यातही अर्थ नव्हता..पैसे घेतले आणि शरीर बहाल केलं.. इतकाच तो व्यवहार आणि तिथेच संपणारा. त्यानंतर मागे जे उरतं त्याला स्त्रीच निस्तरणार..!!!

अश्या नाजायज मुलीचा बाप बनण्याची त्याला हौस नव्हती, त्याचं फक्त कल्पनावर प्रेम होतं..आणि कल्पना स्वतः त्या मुलीला स्वीकारत नव्हती म्हटल्यावर राजेशला वेगळे प्रयत्न करावे लागले नाही..

*****

"गुडघा वाकव, एका पायावर खाली बस आणि माझा पाय पटकन पुढे खेचून घे.."

वरद शारदाला सेल्फ डिफेन्सचे धडे देत होता..शारदाला मजा वाटत होती. त्या दोघात ठरल्याप्रमाणे ती वरदच्या फ्लॅट वर गेलेली..

आत शिरताच तिला एक वेगळंच मंगलमय वातावरण अनुभवायला मिळालं. घर हे कधीच निर्जीव नसतं, तिथे वावरणाऱ्या माणसांच्या सकारात्मक लहरी त्या घराला प्रसन्नता देत असतं. ते खरंच \"घर\" वाटत होतं, \"फ्लॅट\" किंवा \"खोली\" नव्हे. हॉल मध्ये एक सोफा, टेबल खुर्ची.. एक छोटासा tv.. किचन सुद्धा स्वच्छ, टापटीप...एवढंच नाही तर छोटासा देव्हाराही होता..एका श्रीमंत पण धार्मिक कुटुंबातला असा तो वरद होता.

तो तिला लांबूनच सगळं शिकवत होता आणि ती हसत हसत वेडेचाळे करत शिकत होती.

"अगं असं नाही, ताकद हवी.."

"अरे असं हवेत कसं दाखवणार?"

"मग?"

"तू हल्ला कर माझ्यावर म्हणजे मी दाखवते सेल्फ डिफेन्स.."

वरद तिला शिकवताना तिच्यापासून लांबच होता, तिला स्पर्श करण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. वरदला तिला स्पर्श करायला संकोच वाटत होता हे शारदाने ओळखलं होतं..

"वरद, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे...आणि हे सगळं माझ्या भल्यासाठीच आहे, नाही का?"

"बघ हा..नंतर म्हणू नकोस मी चान्स मारला म्हणून.."

"नाही रे.."

"बरं हे बघ, तू अशी उभी आहेस..आणि मागून येऊन कुणितरी तुला असं घट्ट कमरेभोवती हात टाकून पकडलं तर मी सांगितलं ते करायचं.."

असं म्हणत वरदने तिच्या मागे येऊन तिच्या कंबरेभोवती हाताने पकड घेतली..

त्याचा तो स्पर्श झाला आणि शारदा त्या स्पर्शाने हुरळून गेली.. पहिल्यांदा त्याचा निरागस स्पर्श तिला झालेला..वरदच्या मनात कसलीही वाईट भावना नव्हती, शारदा मात्र त्या स्पर्शाने पुरती घायाळ झाली..

"आता बघतच बसणार का? काय सांगितलं मी तसं कर.."

शारदाला ती पकड सुटावी असं वाटतच नव्हतं. ती मुद्दाम कमी जोर लावायची...

"सोड..तू मलाच फोन करत जा काही बेतलं तर..काही जमत नाहीये तुला.."

पकड सैल करून वरद तिला म्हणाला..तो असं म्हटला तसं शारदा मागे फिरली आणि त्याच्या पोटाला गुदगुल्या करू लागली. वरद हसून हसून स्वतःची सुटका करायचा प्रयत्न करू लागला..

"ही माझी स्टाईल.सेल्फ डिफेन्स ची.."

"शारदा सोड मला..सोड...अगं बस.."

वरदला गुदगुल्या खूप असह्य होऊ लागल्या..तो स्वतःची सुटका करू पाहत होता. या झटापटीत दोघेही एकमेकांच्या किती जवळ आले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. जेव्हा कळलं तेव्हा दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले..दोघेही लाजले..काही वेळ कुणीच काहीही बोलत नव्हतं.. मग वरद हळूच म्हणाला..

"झाला आजचा क्लास..बाकीचं उद्या.."

"Ok सर..उद्या किती वाजता येऊ?"

"नेहमीच्या वेळेत.."

तेवढ्यात वरदच्या किचन मधून काहीतरी जळण्याचा वास आला आणि दोघेही त्या दिशेने पळाले..वरदने गॅस वर भाजी शिजवायला टाकलेली असते पण यांच्या मस्तीत गॅस बंद करणं तो विसरूनच गेला...

क्रमशः

🎭 Series Post

View all