ऐका क्षुधालक्ष्मी तुमची कहाणी

Breakfast Recepies


ऐका ऐका क्षुधालक्ष्मी तुमची कहाणी ! एक अमरावती नगर होतं.तिथे एका छोट्याश्या महालात वैशालीराणी तिच्या राजासह आणि राजपुत्रासह राज्य करीत होती.

राणीला आणि राजपुत्राला रोज त्याच-त्या भाज्या खाण्याचा कंटाळा येत असे.राणीला कुणीतरी सुचवलं की क्षुधालक्ष्मीची आराधना करावी म्हणजे ह्या समस्येचं निराकरण होईल.

राणीनं ते ऐकलं आणि क्षुधालक्ष्मीची मनोभावे पूजा केली.क्षुधालक्ष्मी प्रसन्न झाली.राणीला "वर माग म्हणाली"

राणीनं देवीला साष्टांग नमस्कार केला."तुझी कृपा अखंड राहू देत" अशी प्रार्थना केली."आम्हाला रोज तोच तो स्वैपाक जेवायला आवडत नाही.उपाय सुचवावा" असं गाऱ्हाणं घातलं.

देवीनं सांगितलं, "रोज सकाळी खाण्यासाठी नाष्टा बनवावा.सकाळी छान खमंग खाल्लं की नावडत्या भाजीसाठी चिडचिड होणार नाही"

"नाष्ट्याला काय बनवावं?"

"नाष्ट्याला सगळं काही बनवावं. पण नाष्टा करायचा म्हणजे आधीचं उरलेलं अन्न वाया घालवू नये.रात्रीच्या पोळ्या उरल्या असतील तर फोडणीची पोळी (कुस्करा) किंवा पोळीचा लाडू बनवावा.अथवा पोळीचे चतकोर तुकडे शॅलोफ्राय करून त्यावर कांदा, टमाटा, कोथिंबीर आणि बारीक शेव घालून मुलांना आवडेल असा खस्ता तयार करावा.

रात्रीचा भात/ खिचडी उरली असेल तर फोडणीचा भात/खिचडी करावी. घरात सायीचं गोड दही असेल तर दहीभात एकत्र करून तेलात चणाडाळ, हिंग,गोडलिंब, मिरची अशी फोडणी देऊन कर्डराईस बनवावा आणि घरच्या मंडळींची वाहवा मिळवावी !

वरण उरलं असेल तर आंबटगोड वरण करून त्यात भिजवलेल्या कणकेचे छोटेछोटे शेंगोळे घालून उकळवून घ्यावे.खूप छान लागतात.नाहीतर वरणात कांदा, कणिक, डाळीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ असं घालून खमंग थालीपीठ लावावं!

कांदेपोहे म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान !! पण अश्या कांदे पोह्यांव्यतिरिक्त काकडीपोहे सुद्धा करावेत !"

"काकडीपोहे कसे करावेत?"

नावाप्रमाणे काकडी सोलून,किसून त्याचे पाणी न पिळता त्यात मावतील इतके पोहे भिजवावे,चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी आणि त्यात तेल,शेंगदाणे, हिंग, हळद, गोडलिंबाची पानं ह्याची चुरचुरीत फोडणी घालून एकत्र मिसळून घ्यावं, वरून लिंबू पिळावं आणि कोथिंबीर-खोबरं घालावं!घरातील सर्वांनी काकडीपोह्यांचा आस्वाद घ्यावा"

घरी रवा उपलब्ध असेल तर उपमा किंवा गोडाचा शीरा करावा ! गव्हाचा जाडसर रवा घरात असेल तर चवदार आणि पचायला हलकी अशी सोजी करता येईल !

रवा-पोहे घरात नसतील तर कणिक खमंग भाजून भरपूर कांदा घालून उकडपेंडी करावी आणि काही खास प्रयोजन असेल तर तिखट-मिठाच्या पुऱ्या !! काही नाही तर पालक, मेथी, मुळा, काकडी, बीट अश्या भाज्या घालून दशम्या कराव्या.अगदी कणकेचा भरपूर तूप घालून शीरादेखील बनवावा !

घरात भरपूर बटाटे असतील तर बटाट्याचे बटाटेवडे किंवा आलू टिक्की/पॅटिस करावी.जेवण कम नाश्टा हवा असेल तर आलूपराठे हासुद्धा एक पर्याय वापरावा.
आलूपराठ्याप्रमाणेच मेथी, पालक, मुळा ह्याची भाजी भरून पराठे करावेत !

ह्याशिवाय बाजारात फ्रायम्स सारखे फिंगर्स मिळतात (आमच्याकडे पोंगे म्हणतात)ते तळावे आणि उकडून कुस्करलेल्या बटाट्यात तिखट, मीठ, चाटमसाला मिसळून त्यासोबत खावेत.

घरात ब्रेड असेल तर सँडविच करावं किंवा ब्रेड पकोडे तळावेत ! फारच कंटाळा आला तर कॉफी-ब्रेड सुद्धा नाष्टा म्हणून चालतो !

छान पावसाळी वातावरण असेल तर त्या वातावरणात कांदाभजी किंवा मस्त चकल्या बनवाव्यात !! चकलीची भाजणी नसली तरी ज्वारीच्या पिठाच्या कराव्यात !!

विदर्भातील रितीनुसार उन्हाळ्यात पाच-एक किलो जाड शेवया बनवून घ्याव्यात.जिरं,कांदा,हिरवी मिरची आणि  आणि गोडलिंबाची फोडणी शेवया परतून घ्याव्यात आणि बेताचं पाणी घालून वाफवून घ्याव्यात!

इडलीचे पीठ भिजवून, फर्मेंट करून घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रीझमध्ये ठेवावं.अन्यथा इडलीचे कोरडे रेडीमिक्स घरी बनवावं.हे पीठ भिजवून त्यात इनो घालून इडली,डोसा,उत्तपा जे हवं असेल ते तयार करावं.तसंच ह्या पिठात बेसन कालवून मिरची, आलं, गोडलिंब आदि जिन्नस घालून ढोकळा, अप्पे किंवा हांडवो बनवावेत! तसं ढोकळ्याचं वेगळं पीठ ही घरात असू द्यावं.ऐनवेळी ढोकळा करता येतो!

घरात कुणीही उपास करत नसलात तरी फराळाचे पदार्थ खायला हरकत नसावी.सहा-सात तास आधी साबुदाणा भिजवून साबुदाण्याची उसळ नाष्ट्यासाठी करावी आणि फारच मूड झाला तर साबुदाण्याचे वडे तळावेत!

त्याचप्रमाणे सहा तास आधी उडदाची डाळ भिजवून दहीवडे किंवा सांबारवडेदेखील करावेत! विशेष म्हणजे दहीवडे, बटाटेवडे, सांबारवडे नेहमी आप्पेपात्रात करावेत त्यामुळे ते नावाला वडे असले तरी तेल नाममात्रच लागतं ! मात्र आप्पेपात्रात हे वडे बनवताना खायचा सोडा अवश्य घालावा.

घरात तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने नाश्त्याच्या पदार्थात भात हा प्रमुख घटक ठेवून दहीभात, कोबीभात, कैरीभात, लिंबूभात हे पदार्थ करावेत ! गाजर, कांद्याची पात, ढोबळी मिरची उपलब्ध असेल तर कधीतरी शेजवान मसाला घालून फ्राईड राईसही करावा !!!

घरात चिवडा, भडंग, शेव असं बरंच काही असेल तर ते सर्व एकत्र करून त्यात कांदा आदि पदार्थ घालून, चटणी किंवा टोमॅटो सॉस घालून टोपलंभर चटकदार भेळ बनवावी आणि एकाच बैठकीत फस्त करावी !!

श्रावणात ज्वारीच्या लाह्या मिळतात तेव्हा त्यात पोहे, आणि इतर जिन्नस घालून गोपाळकाला बनवावा आणि मनोभावे प्रसाद ग्रहण करावा !!

हक्का नूडल्स आणून कधीकाळी रुचिपालट म्हणून नूडल्स ही बनवाव्यात.विकतच्या नूडल्स आवडत नसतील तर ज्वारीच्या पिठाची उकड घेऊन शेवेच्या सोऱ्याने नूडल्स पाडून वाफवाव्यात.

असे रुचिपालट करणारे पदार्थ आलटून पालटून करत राहिल्याने जेवणाचा कंटाळा नाहीसा होईल, जिभेला चव येईल.ह्यातले जास्तीत जास्त पदार्थ कमी तेलाचे असल्याने आणि जास्तीत जास्त जिन्नस घरगुती असल्याने नेहमी खाल्ले तरी हरकत नाही.ह्या पदार्थांसाठी लागणारे जिन्नस फार महाग नाहीत आणि घरात सहज उपलब्ध असतात.हे पदार्थ बनवायला अतिशय सोपे आहेत.शिवाय असे पदार्थ घरीच करत असल्याने बाजारचे खायची खोड खात्रीनं मोडेल ."

वैशाली राणीने क्षुधालक्ष्मीचे म्हणणे ऐकून घेतले आणि पूर्णपणे अमलात आणले.त्यामुळे तिच्या राज्यात आनंदीआनंद पसरला तसा तो तुमच्याही राज्यात पसरो आणि जशी खाद्यलक्ष्मी वैशाली राणीला पावली तशी तुम्हा-आम्हाला सर्वाना पावो !

IIही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्णII

तळटीप :-ह्या कहाणीतील वैशाली राणी कोण हे कंमेंटमध्ये जरूर कळवा !