
दिवाळीची मेजवानी चिरोटे /खाजा साहित्य:- २ वाट्या मैदा, चिमूटभर मीठ, २चमचे तूप, तळण्यासाठी तूप, पिस्ताचे काप . साटा_बनविण्यासाठी:- २ चमचे साजूक तूप, ४ चमचे कॉर्नफ्लोअर कृती:- प्रथम मैद्यात मीठ व तूप घालून मिक्स करून घ्यावे आणि पाण्याने घट्ट पीठ मळून घ्यावे. मळलेले पीठ अर्धा तास मुरण्यासाठी ठेवावं. अर्ध्या तासानी मैद्याचा गोळा पुन्हा छान मळून घ्यावा व त्याचे समान आकाराचे गोळे करून घ्यावेत. आता एक एक गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. आता साटा बनविण्यासाठी एका छोट्या ताटात साजूक तूप घ्यावं ते हलकं होईस्तोवर हातानी छान फेटून घ्यावे. आता त्यात कॉर्नफ्लोअर घालून छान मिक्स करून साटा तयार करून घ्यावा. आता लाटलेल्या पोळ्यापैकी एक पोळी घेऊन त्यावर आपण तयार केलेला साठा एकसारखा लावून घ्यावा. त्यावर दुसरी पोळी ठेवून पुन्हा साठा लावून घ्यावा. अशा ४ पोळ्या एकावर एक लावून घ्याव्यात. आता शेवटच्या पोळीला साटा लावून छान घट्ट वळकुटी करून घ्यावी व दोन्ही बाजूच्या कडा काढून घ्याव्यात. साधारणपणे १/१ इंचाचे तुकडे करून घ्यावेत व पदर असलेली बाजू हळुवारपणे दाबून हलक्या हातानी लाटून घ्यावी. कढईत तूप गरम करून एक एक चिरोटा सोडावा व झाऱ्यानी तूप उडवाव म्हणजे पदर छान सुटून येतात. (चिरोटे तळताना कधीही उलटू नये) खमंग तळून झाल्यावर टिश्यू पेपर काढून घ्यावे व गरम असतानाच पिठीसाखर भुरभुरवावी व पिस्ताचे काप ठेवावे. पूर्णपणे गार झाले की डब्ब्यात भरून ठेवावेत. असे हे चिरोटे दिसायला जितके सुंदर नाजूक दिसतात तसेच जिभेवर ठेवताच विरघळतात. आवडल्यास लाईक नी कॉमेंट नक्की करा. स्वस्थ राहा. मस्त खा.