रेसिपीज इन मराठी अनारसे

Anarase

            अनारसे.                                                                   दिवाळी आली की फराळ तयार करण्याची लगबग सुरू होते. त्यातीलच एक पारंपरिक पदार्थ म्हणजे ‘अनारसे’. अधिक महिन्यामध्येही अनारसे तितकेच महत्वाचे असतात. अतिशय कमी साहित्यात तयार होणारा परंतु करायला तितकाच नाजुक आणि गृहीणींची सत्वपरीक्षा घेणारा हा पदार्थ आहे. परंतु कृतीमध्ये कोणतीही तडजोड न करता ही अनारसे केल्यास नक्कीच छान होऊ शकतात. माझी आजी ९४ वर्षांची आहे आणि गेली ७० ते ७५ वर्षे ती असेच अनारसे बनविते. आई सुद्धा हीच पद्धत वापरते. त्यामुळे आज मी आजीची रेसिपी देत आहे.                                              साहित्य:  २ कप तांदूळ (पटनी/कोलम/तुकडा बासमती) ,२ कप किसलेला गूळ (चिक्कीचा गूळ वापरू नये. नेहमीचा पिवळा गूळ वापरावा.) ,१ चमचा तूप ,पिकलेल्या अर्ध्या केळ्याचे काप , २ चमचे दही/ दूध  १ न सोललेले पिकलेले केळे ,खसखस . तळण्यासाठी तूप.                                                    कृती: १) तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे. पाणी बदलले नाही तर पाण्याला घाण वास येतो. २) चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. तांदूळ पंच्यावर किवा स्वच्छ सूती कापडावर पसरवून फॅनखाली कोरडे करून घ्यावेत. तांदूळ सावलीमध्येच सुकवावेत. उन्हामध्ये वाळत घालू नयेत. तांदूळ कोरडे झाले की मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे. ३) किसलेला गूळ आणि १ चमचा तूप, केळ्याचे काप किंवा दही/दूध चाळलेल्या तांदुळच्या पीठामध्ये घालून पीठ घट्ट मळावे. पीठ मळून झाले की पिठाचे २-३ गोळे तयार करावेत. व हवाबंद डब्यामध्ये वरती १ न सोललेले पिकलेले केळे ठेवून भरून ठेवावेत. स्टिलचा डबा वापरू नये शक्यतो प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिक पिशवीत भरून प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवावे. ४) २ दिवसांनी हे पिठ बाहेर काढावे व तयार केलेले पिठाचे गोळे खलबत्त्यामध्ये कुटावेत. व पुन्हा गोळे करून डब्यामध्ये ३ दिवस भरून ठेवावेत. आपण पुरी करण्यासाठी जसे पीठ भिजवतो तसेच अनारसे पीठ झाले पाहिजे. जोपर्यंत गोळे व्यवस्थित फरमेंट होत नाहीत तो पर्यन्त गोळे हवाबंद डब्यात ठेवावेत. हे पीठ ५-६ महीने फ्रीज शिवाय व्यवस्थित राहते, त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही. ५) पीठ व्यवस्थित तयार झाले की त्याचे लिंबाएवढे लहान गोळे करावे. तळण्यासाठी मध्यम आचेवर तूप गरम करावे. बटर पेपरवर किंवा प्लॅस्टिकला तुपाचा हात लावावा व बोटांनीच थापुन पुरी तयार करावी. पुरी तयार करताना गोळ्याला एका बाजूने खसखस लावावी. हि पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये, नाहीतर खसखस जळू शकते. ६) पुरी तळणीमध्ये सोडली की फुलते व थोडी पसरट होते. उलथ्याने/पलीत्याच्या मदतीने अनारसा अलगद झारा वर ठेवून त्यावर चमच्याने किंवा उलथ्याने तूप सोडावे. म्हणजे अनारसा फुलण्याची/जाळी पडण्याची क्रिया चालू राहते. अनारसे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत चाळणीत उभे करून तूप निथळून जाऊ द्यावे. ७) अनारसे तळताना ब‍र्‍याचदा तो फसफसतो (हसतो)/पिठाचे तुकडे होतात. म्हणजे पीठ अनारसे करण्यासाठी तयार नाही असे समजावे,तेव्हा पिठाचा गोळा तसाच ठेवून द्यावा, नंतर वापरावा. ८) तसेच अनारसा बरेच वेळा फुलतही नाही म्हणजेच गुळाचे प्रमाण चुकले आहे असे समजावे. टीप : १) नेहमी जुना तांदूळ वापरावा. कधीही नवीन तांदूळ वापरू नये. नाहीतर अनारसे फसतात. पूर्वी आमच्याकडे गावठी तांदूळ वापरले जायचे, परंतु हल्ली गावठी तांदूळ बाजारात मिळत नाहीत म्हणून जुना कोलम किंवा पटनी आणि तुकडा बासमती तांदूळ वापरावा. तसेच तांदूळ थोडे दमटसर असावेत म्हणजे मिक्सरवर चांगले दळले जातात. २)अनारसे तयार करताना पीठामध्ये केळे किंवा दही घातले तर पिठाचे फर्मेंटेशन चांगले होते. ३)तसेच पीठाला अजिबात पाणी लागू नये. नाहीतर अनारसे होत नाहीत. ४)गोळे डब्यात भरून ठेवताना त्यावर न सोललेले पीके केळे ठेवल्यास त्याच्या उष्णतेने पीठ चांगले तयार होण्यास मदत होते. ५) गुळाऐवजी पिठीसाखर सुद्धा वापरता येते. परंतु गुळानेच अनारसे अप्रतिम होतात. ६) पहिला अनारसा तळून झाला की मगच दूसरा अनारसा थापावा. आधीच पीठ थापून ठेवले तर त्याला पाणी सुटते.                    आवडल्यास लाईक नी कॉमेंट नक्की करा. स्वस्थ राहा. मस्त खा.