वाचाल तर वाचाल

प्रस्तुत स्वानुभवामध्ये मी वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व थोडक्यात पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

" और ये रहा आपके सामने अगला सवाल.."

        कौन बनेगा करोडपती बघत असताना मी प्रश्न वाचू लागले.तसा टीव्ही जास्त बघायला वेळ नसतो,पण दिवसाच्या शेवटी थोडं मनोरंजन व्हावं म्हणून आम्ही सहकुटुंब दररोज हा कार्यक्रम बघतो. १००० पासून सुरुवात करत १०००० पर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे मला रोजच देता येत होती.मनाला खूप समाधान वाटायचं. 

        पण काही दिवसातच यातील काही प्रश्न सुद्धा अवघड वाटू लागली. तसेही या खेळात प्रश्नांचे शफलिंग चालते.म्हणून त्या त्या खेळाडूचे नशीबच चांगले नाही म्हणून त्याला या टप्प्यातील प्रश्न सुद्धा अवघड आली असतील असा प्रांजळ समझोता मी माझ्या मनाशी केला.

        मग मनाचे विचारचक्र जोऱ्यात फिरवले. तसे पाहिले तर आज इंटरनेटचे मायाजाळ एवढे फोफावले आहे की कुठलीही माहिती,प्रश्न गूगल वर अगदी सहज उपलब्ध आहे.पण जेव्हा कुठलीही स्पर्धा असते,तेव्हा अशीच प्रत्येक क्षेत्रातील ही गूगल वरील माहिती वाचून, ती मेंदूच्या असंख्य न्यूरॉन्स मध्ये साठवून ठेवली तरच आपण कौन बनेगा करोडपती सारख्या कुठल्याही स्पर्धांमध्ये यश मिळवू शकतो,ही गोष्ट ध्यानात आली.म्हणजे माहिती असंख्य उपलब्ध असली तरीही ती व्यवस्थित वाचून मेंदूत साठवली तरच आपण यशाचा डोंगर सर करू शकतो,हे मग मला मनोमन पटले.शेवटी वाचाल तर वाचाल ही म्हण खरीच आहे,हे प्रकर्षाने जाणवले.

        एकूणच काय ,तर माहितीचा अफाट स्रोत हा काळजीपूर्वक वाचला तरच आपण यशाची अनेक शिखरे पार करू शकतो.म्हणूनच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि ज्ञान वाढवण्यासाठी मोबाईल किंवा पुस्तके खूप खूप वाचावी आणि आपली ज्ञान संपदा वाढवावी असे मला नव्याने उमगले.

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे 

नाशिक


फोटो : साभार गूगल