डोळ्यात वाच माझ्या... 16 (अंतिम)

प्रेम

डोळ्यात वाच माझ्या..16 (अंतिम)


     दोघे बराच वेळ समुद्रकिनारी  पाण्यातून चालत होते.. त्यानी तिचा हात गच्च पकडला होता..  तिला तर एखाद्या स्वप्नात असल्यासारखेच वाटत होते.  काही दिवसांपूर्वी त्याला आपण आवडत नाही, असा विचार करणारी तीv आता त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती.. त्याच्या दूर राहण्याचे, झिडकारण्याचे, कारण कळले होते..  ती ही तशी देवभक्त होती.. आपण मध्यमवर्गीय, खेड्यातली लोकं देवाला किती मानतो,  देवाचा नवस पूर्ण करण्याला किती महत्त्व देतो, हे तिला चांगलेच माहीत होते.. आता तिचा त्याच्यावर कुठलाच राग नव्हता. दोघेही थोडेफार खाऊन मग असेच बाहेर इकडे तिकडे भटकत राहिले..  साधारण पाच सहा च्या दरम्यान रूमवर येऊन जरा वेळ आराम केला, आणि पुन्हा जेवायला बाहेर निघाले... जशी जशी रात्र वाढत होती, तशी तशी दोघांनाही एक वेगळीच हुरहूर जाणवत होती..

   बाहेरचं जेवण करून दोघेही रूमवर आले...  एक अवघडलेपणा होता दोघांमध्ये...

     अनु ने अर्जुनच्या मोबाईल वर व्हिडिओ कॉल केला होता... आई आणि ती दोघीही अर्जुन शी बोलल्यानंतर विभा शी बोलत होत्या.. तिच्या वर रागावलेल्या अनुची विभा कान पकडून माफी मागत होती .. इतके दिवस मोबाईल बंद असल्यामुळे अनुशी बोलणे झाले नव्हते तिचे.. आणि तिने फोन केला नाही म्हणून रागावली होती ती.. शेवटी आल्यावर आपण दोघी मस्त कुठेतरी फिरून येऊ असं खुणे नेच सांगत तिने तिची समजूत काढली... दोघींमध्ये मैत्रीचे नाते छानच फुलले होते... केवळ भावभावनेने एकमेकींची मन ओळखता येत होती ...  त्याला शब्दांची गरज नव्हती...  काही अडले तर टाईप करायला मोबाईल होताच.. शिवाय आपल्या वहिनी चे प्रत्येक म्हणणे आपल्याला समजावे म्हणून अर्जुन प्रमाणेच अनु नेहीं यू ट्यूब वरून साईन लॅग्वेजचे व्हिडिओ बघून समजून घ्यायला सुरुवात केली होती.. बराच वेळ बोलून झाल्यावर शेवटी तिने फोन ठेवला.. आता पुन्हा एक ऑकवर्डनेस होता दोघांमध्ये... दोघे ही गॅलरी मध्ये तसेच बसून राहिले जरा वेळ..

    जरा वेळाने विभा उठून आत आली.. रात्री झोपतांना घालावी म्हणून एक साधीशी साडी काढली सॅक मधून.. ती बाथरूम मध्ये जातच होती की, तिच्या खांद्यावर अर्जुन च्या हाताचा स्पर्श जाणवला.. तीने मागे वळून पाहिले तर अर्जुन डोळ्यात अपार प्रेम घेऊन तिच्याकडे पाहत होता.. तिला खांदयावर पकडतच त्याने आपल्या कडे वळवले.. आणि गच्च मिठीत घेतले.. आणि.. आणि.. त्यांच्यातले सारे अवघडलेपण त्या एका मिठीत गळून पडले.. उरले फक्त प्रेम.. ओढ.. एकरूप होण्याची उत्कंठा...

      दोन दिवस गणपती पुळ्याला राहून, नवीन आयुष्याची सुरुवात करून, एकमेकांच्या रंगात रंगून विभा आणि अर्जुन घरी परतले.. आता त्याचं एक नवं आयुष्य सुरू झालं होतं.. ज्यात प्रेम होत.. समाधान होत.. एकमेकांना समजून घेण्याचा, सांभाळून घेण्याचा समंजस पणा होता..


    *#*#*#*#*#*


     विभा आणि अर्जुन च्या लग्नाला दीड वर्ष उलटून गेले होते.. या एक दीड वर्षात विभा चांगलीच रुळली होती संसारात..  अनु चे शिक्षण पूर्ण झाले होते..ती एका बँकेत नुकतीच जॉब ला लागली होती.. आता तिच्या लग्नाचे बघत होते..एक दोन चांगले स्थळ ही आले होतें तिच्या साठी.. पण अजून सहा महिने तरी थांब, मला नीट सेटल होऊ दे, अस म्हणून तीने अर्जुन ला लग्नासाठी थांबायची गळ घातली होती.. त्याने ही ते मान्य केले होते..

     विभा चा ही चांगला जम बसला होता.. ऑनलाईन फॉर्म भरणे, क्लायंट चे अकाउंट चेक करणे, त्यांच्या प्रीमियम ची माहिती त्यांना वेळोवेळी व्हॉट्स अप च्या माध्यमातून कळवणे.. ही सर्व कामे ती न चुकता करत होती.. हल्ली हल्ली तर आठवड्यातून एक दोनदा एकटीच ऑफिस मध्ये जात होती..

    अशातच एके दिवशी तिला प्रेग्नेंट असल्याचे कळले.. आणि घरात आनंद पसरला.. आत्या होणारं म्हणून अनु खुपचं खूश होती.. अर्जुन आणि आई ही तिला खूप जपत होते.. पण..? पण ती मात्र काहीशी हरवलेली दिसायची.. अस नव्हत की तिला आनंद नव्हता आई होण्याचा.. अशी कोणती स्त्री असेल, जीला आईं व्हावं वाटतं नाही.. एका बाईसाठी दुसरा जन्म असतो आई होण म्हणजे.. जगातली सगळ्यात सुखद अनुभूती असतें ती.. पण जेंव्हा पासून आपण आई होणारं हे कळले होते.. ती नेहमी विचारात गुंतलेली वाटायची.. आता आता तर घरातल्यांच्या ही लक्षात आले होते..

    अनु ने, आई ने विचारले ही एक दोन दा.. पण तीने हसून च काही नाही म्हटले.. आईने अर्जुन ला सांगून तिला काही दिवस माहेरी ही पाठवले राहायला.. या काळात मुलीला आपल्या आईची आठवण येत असते.. तिच्या जवळ राहावेसे वाटतं असतें, हे स्वानुभवाने माहित होते त्यांना.. पण तिथे ही तीचे वागणे तसेच होतें.. आईने पण विचारलें पण ती काही सांगत नव्हती..

   सातव्या महिन्यात सोनोग्राफी करायला गेले, तेंव्हा अर्जुन ने डॉक्टरांच्या कानावर तिच्या नकळत तीचे एकट्यातच हरवणे घातले.. तेंव्हा डॉक्टरांनी अर्जुन ला बाहेर औषधी आणायला पाठवले आणि तिला, 'तुला कसले टेन्शन आहे का?' विचारले..

    त्यांच्या अचानक अशा विचारण्यावर ती बावरली जराशी..घाबरली ही.. पण डॉक्टरांनी विश्वास दिला की, तुला खरंच काही टेन्शन असेल तर मला सांग. तू जे काय विचारशील, सांगशील ते तुझ्या घरी किंवा इतर कुठे अजिबात कळणार नाही... फक्त तू अशी चिंतेत असण, बाळासाठी योग्य नाही..  म्हणून मनात काहीही शंका असतील तर तू बिंदास विचार.  डॉक्टरांनी विश्वास दिल्यावर तिने एकदा दरवाजा बाहेर डोकावून अर्जुन तर नाही येणार ना याची खात्री केली.. आणि मोबाईलवर मेसेज टाईप करून त्यांना दाखवला..

    तिचा तो मेसेज वाचून, इतके दिवस ही मुलगी हा नसता विचार करून स्वतःला त्रास करून घेते हे कळले आणि त्यांनी तिला असे काहीही होणार नाही असे समजावले...  ही मुलगी इतके दिवस आपले बाळ ही आपल्यासारखे मुके असेल का? आयुष्यभर बोलू शकणार नाही का?  या चिंतेने स्वतःशीच झगडत होती ..  त्यांना तिच्याबद्दल वाईट वाटले.. त्यांनी तिला समजावले,  आतापर्यंतच्या तपासणीत बाळाची वाढ छानच आहे..  असं काही होण्याची शक्यता नाही...  आणि तुला बोलता येत नाही म्हणून त्यालाही येणार नाही असं अजिबात नाही... तुला बोलता येत नसले तरी बाळाचे बाबा तर बोलतात ना...  कशावरून बाळ तुझ्यावर जाईल आणि मुळात दोघेही नवरा बायको मुके असले तरी बाळ चांगले बोलू शकते...  त्यामुळे तुझ्या मनातून ही शंका काढून टाक आणि आनंदी राहा.. जास्त विचार करू नकोस.. त्याचा बाळाच्या वाढीवरही परिणाम होईल. तू आनंदी राहिलीस तर बाळही आनंदी होईल.. डॉक्टरांनी समजावल्यावर तिला हायस वाटलं...  आपण उगाच इतके दिवस असा विचार करून स्वतः सोबतच दुसऱ्यांनाही टेन्शन देत होतो हे जाणवले..

    अर्जुन ने आणि त्याच्या घरच्यांनी तिचे डोहाळे जेवण यथोचित प्रकारे केले आणि त्यानंतर विभा आपल्या माहेरी आली.. दोन महिने माहेरी कोडकौतुक झाले. आणि बाळराजांचे आगमन झाले.. जन्म झाल्या झाल्या बाळाचे ते मोठ्ठयानें रडणे ऐकले आणि भरुन पावली ती.. मनात मधून मधून डोकावणारी शंका काही प्रमाणात मिटली होती..

    बाळ सव्वा महिन्याचे झाले आणि आपल्या घरी परतली ती.. अनु तर घरी असली की बाळा भोवतीच असायची.. आईं ही आपल्या नातवाला जवळ घेऊन खेळवत बसायच्या..

     अर्जुन तर खूपच खूश होता. आधी आधी लग्न होईल की नाही, ही चिंता सतवणाऱ्या त्याला विभा सारखी सुंदर आणि सुशील बायको मिळाली होती..  आणि आता एक गोडूला ही होता त्यांच्या आयुष्यात.. अर्जुन आणि विभा चा अविश..

   जसा जसा अवीश मोठा होत होता.. आपल्या बाळ लीलांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता.. आई तर सतत काही ना काही बोलतं असायच्या त्याच्याशी.. तो ही हुंकार देत प्रतिसाद द्यायचा.. विभा ही गुंतून जायची त्याच्यात.. पण कधी कधी डोळे भरून यायचे.. बऱ्याच वेळेस एकटी असताना रडायची ती.. अविश चे लाड करतांना त्याच्याशी बोलता येतं नाही म्हणून तिला रडू यायचे... पण ती त्याच्यासमोर मात्र हसतमुखं राहायची.. टाळ्या वाजवून, खेळणी दाखवून त्याचे लक्ष वळवांयची.. आणि तो लब्बाडही तीचे हावभाव ओळखून चेकाळायचा.. आपल्या आईला ओळखण्यासाठी, तीचे प्रेम समजून घेण्यासाठी शब्दांची गरज पडलीच नाहीं त्याला.. नाहीतरी मुलांना शब्दापेक्षा स्पर्शाची भाषा अधिक कळते म्हणतात.

   आता अविश अकरा महिन्यांचा झाला होता.. घरभर रांगत रांगत पसारा करायला शिकला होता.आज्जी ला तर अजीबात आवरला जात नसायचा.. त्याच्या ओढीने अर्जुन ही लवकरच घरी परतायचा.. दिवसभर विभा च्या मागे मागे असणारा अविश अर्जुन आला की मात्र त्याला सोडायचा नाही..  बाहेर जरासे फिरवून आणले की त्याचे समधान व्हायचे... हसत खेळत दिवस चालले होते.. प्रेग्नेंट असताना मनात असणारी चिंता हल्लीं पुन्हा विभा ला सतवायला लागली होती.. अकरा महिन्यांचा झाला तरी अविश हुंकारा शिवाय काही बोलतं नव्हता.. जे काही असेल ते फक्त तोंडातून वेगवेगळे आवाज काढून सांगायचा... त्याच्या एव्हढी असणारी मुले बा बा, मा मा असे शब्द बोलायची.. पण हा मात्र फक्त हुंकार देत लक्ष वेधून घ्यायचा.. तीने एकदोन वेळा अर्जुन ला सांगण्याचा प्रयत्न ही केला.. पण काही मुले उशिरा बोलायला लागतात, असे म्हणून त्याने तिची समजूत काढली होती.. दिवसेंदिवस अविश बोलेल की नाही ही काळजी विभा ची वाढतच चालली होती..


    "विभा.. विभा.. अग कुठे हरवलीस पुन्हा..? अवि रडतोय बघ.. घे त्याला.." दरवाज्यात जाऊन बाहेर बघत रडणाऱ्या अवि ला बघून आईने तिला आवाज दिला.. आईं, अनु.. कोणालाच तो हात लावू देत नव्हता.. स्वतःला त्या घ्यायला गेल्या की मानेने नाही म्हणायचं, आणि बाहेर हात दाखवून रडायचा... गेले दहा-पंधरा मिनिटे हेच चालू होते..

      विभा किचन मधून बाहेर आली आणि त्याला घ्यायला लागली. तसे तिलाही नाही म्हटले त्याने.

  " वहिनी अग दादाला उशीर झालाय ना यायला आज..  त्याचीच वाट बघतोय तो...  ही त्यांची फिरायला जायची वेळ.. त्याला बरोबर कळतं..  दादा आला नाही म्हणून बाहेर बघून रडतोय.." अनुने म्हटले आणि आईनेही हसून मान हलवली..  लहान मुलांना घड्याळ समजत नसले, तरी आपल्या माणसांची येण्याची वेळ मात्र नक्की कळते...

   "घे.. आला बघ तुझा बाबा.." दरवाजा बाहेर अर्जुन दिसला तसे अनु ने त्याला सांगितले.. आणि आपल्या बाबाला बघून रडता रडता अविश हसू लागला..  बसल्या जागी उड्या मारत स्वतःला 'घे' म्हणून खुणावू लागला..

      "दोन मिनिटे थांब, बाळा!  हात पाय धुतो आणि तुला घेतो." असे म्हणून अर्जुन आत आला..  त्याच्या मागे मागे रांगत रांगत अविश ही आला.. आई ,अनु आणि विभा तर त्याचे हे चाळे बघून हसत होत्या..

     "बा...बा... बा...बा " अर्जुन हात पाय पुसत बाहेर आला, तसे अविश ने त्याच्या अंगावर झेप घेतली.. आणि त्याच्या तोंडून "बाबा" हा शब्द ऐकून विभा शॉक झाली .. अर्जुनही स्तब्ध झाला..  आपल्या बाळाने पहिल्यांदा मारलेली हाक ऐकून, त्याचा आनंद गगनात मावेना... त्याने अविश ला पटकन उचलून घेतले. आणि छातीशी घट्ट कवटाळले... विभाच्याही डोळ्यातून अश्रू झरू लागले...  त्याच्या त्या एका हाकेने कितीतरी दिवसांपासून तिच्या मनात असणारी शंका गळून पडली होती.. तो बोलेल का? ही चिंता सरली होती..  तिने पटकन देवाजवळ  जाऊन हात जोडले..  तिथला अंगारा घेऊन बाहेर आली .. आणि आपल्या बाळाच्या कपाळावर लावला.. आपल्या बाळाच्या तोंडून बाहेर पडलेला पहिला शब्द ऐकून झालेला आनंद तिच्या डोळ्यात मावत नव्हता.. आणि अश्रूंच्या रूपाने झरझर वाहत होता... तिने अर्जुन कडून त्याला घेतले...  आणि भराभर त्याच्या पाप्या घेऊ लागली..सगळेच त्या दोघा मायलेकांकडे आनंदून बघत होते... किती मोठे टेन्शन आज तिच्या डोक्यावरून उतरले होते..  यांची त्यांना  जाणीव होती..

"  विभा देवाजवळ साखर ठेव... बघ... अर्जुन म्हणत होता ना नेहमी.... काही मुलं उशिरा बोलतात , त्याचा विश्वास सार्थ ठरला..  बाळाने आज पहिल्यांदा बाबा म्हणून हाक मारली.. चला देवाचे आभार मानूया..  आणि आता अजिबात काळजी करू नकोस..  उशिरा का होईना पण तो सगळं काही व्यवस्थित बोलेल.. आईने आकाशाकडे पाहत हात जोडले आणि म्हणाल्या...  तिने ही आनंदातच मान डोलावली.. आणि देवापुढे साखर ठेवायला गेली...

     तिला असणारे एकमेव टेन्शन आता दूर झाले होते जगातली सगळ्यात सुखी स्त्री होती ती आता...


समाप्त.


कथा कशी वाटली आवर्जून सांगा..