Feb 24, 2024
कथामालिका

डोळ्यात वाच माझ्या.. 15

Read Later
डोळ्यात वाच माझ्या.. 15


डोळ्यात वाच माझ्या.. 15      सकाळी प्रवाशांच्या आवाजाने जाग आली दोघांना, तर बस थांबलेली होती... रात्री दोघांनाही जाग आली नव्हती.. तीने डोळे उघडून पाहिले तर ती त्याच्या खांद्यावर तशीच डोके टेकवून झोपलेली होती.. त्यानेही आपल्या हाताचा विळखा पाठीमागून घातलेला होता.. तो तिच्याकडेच बघत होता.. ती ओशाळून पटकन बाजूला झाली..

   साडी सावरत ती उठली, आणि सॅक घेतलेल्या त्याच्या मागोमाग खाली उतरली..

    बाहेर नुकतीच पहाट झाली होती.. आजू बाजूला असणारा निसर्गरम्य परिसर, जवळून येणारा समुद्राच्या लाटांचा आवाज, सुटलेला आल्हाद दायक वारा... दिवसाची अगदी प्रसन्न सुरूवात झाली होती.. आणि कदाचित त्यांच्या आयुष्याचीही...

  " चल.." बस च्या डीकी तून बॅग घेतं त्याने तिला खुणावले.. तशी विभा त्याच्या मागे निघाली..

    मंदिरापासून साधारण आठ दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या एका साध्याशा पण नीटनेटक्या हॉटेल मध्ये रूम होती त्यांची.. तो फ्रेश होऊन आला तो पर्यंत ती गॅलरीत उभी राहून बाहेरचा परिसर न्याहाळत होती..

  "  विभा.."

   " हं..."

   " फ्रेश हो.. ही नवी साडी नेसून घे.. मी आलोच.." तो म्हणाला, तशी आत आली ती.. चेहऱ्यावर जरासे भीतीचे भाव पसरले.. अनोळखी ठिकाणी एकटीने राहायचे या भावनेनेच भीती दाटली मनात..

    "अग.. दहा मिनिटातच आलो मी.. जरा चौकशी करून येतो खालून.. आणि तुझ्यासाठी नाष्टा आणतो.. घाबरु नकोस.. दरवाजा आतून लावून घे.." तिच्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला.. तसे मान होकारार्थी हलवली तीने..

     अर्जुन खाली जावून परत आला तो पर्यंत विभाची तयारी झाली होती.. त्याने दिलेल्या हिरव्या रंगाच्या नव्याकोऱ्या साडीत ती अतिशय सुंदर दिसत होती.. त्याने आणलेला इडली चटणीचा नाष्टा आणि सफरचंद टेबल वर ठेवले.. आणि तिला खाऊन घे सांगितले..

    इडली चटणी चे पॅकेट ओपन करतांना तीने त्याच्याकडे पाहत त्याला खाण्याचा इशारा केला..

    "नको.. तू खा.. माझा मंगळवार आहे.. मंदिरातून आल्यावर फराळ करेल मी.. तू खाऊन घे.. मी सफरचंद खातो एक.. मंदिरात आज मंगळवारची गर्दी असेल.. उशीर होईल दर्शनाला.." त्याने सफरचंद उचलून घेतले.. बॅगेत घरून आणलेल्या छोट्या चाकूने त्याच्या फोडी केल्या.. तसे तिला आठवले, की त्याची आराध्य दैवत गणपती वर नितांत श्रद्धा आहे..आणि लहानपणा पासूनच तो मंगळवारचा उपवास करतो..दोघांनीही नाष्टा केला आणि मंदिरात जायला निघाले..

 
     विभा तर मंदिरा बाहेरचा परिसर अगदी अपूर्वाई ने पाहत होती.. तिथल्याच हार नारळाच्या दुकानातून दुर्वा, जास्वंदीच्या फुलांचा हार घेतला.. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे दुकानदाराने 21 नारळाचे तोरण बनवून दिले पूजेच्या ताटासोबत हे सगळे साहित्य घेऊन तो तिच्यासोबत मंदिरात निघाला ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते एवढ्या नारळाचा हार कशाला हा प्रश्न मनात रेंगाळत होता त्याने नजरेनेच नंतर सांगतो म्हणत तिला समाधान केले..

    मंदिरात ही गर्दी उसळली होती... तिथल्याच एका पुजारी बाबांना त्याने काहीतरी सांगितले, तसे त्यांनी त्या दोघांना वेगळ्या बाजूला उभे केले...  तिथेही गर्दी होतीच पण जरा कमी होती..... आपला नंबर आल्यावरअर्जुन ने हातातील नारळाचा हार, दुर्वा फुलांचा हार, पुजारी बाबांच्या हातात दिला..  त्यांनी तो गणपतीला चढवला तिच्या हातातील पूजेचे ताट घेऊन त्याने गणपतीला पूजा वाहिली.. सोबत तीने ही पूजा केली.. दोघांनी जोडीने नमस्कार केला.. पुजारी बाबांनी प्रसादाचे नारळ आणि मुर्तीवरचा एक हार ताटात ठेवून, ताट त्यांना परत दिले. डोके टेकलेल्या तिच्या डोक्यावर हात ठेवत अखंड सौभाग्यवती हो, चा आशिर्वाद ही दिला..


   मंदिराच्या बाहेर आल्यावर दोघे एका बाजूला जागा बघून बसले..  त्याने तिच्याकडे पाहिले. नजरेत असंख्य प्रश्न होते तिच्या.. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला,
    "  विभा लहानपणापासून माझी गणपतीवर खूप श्रद्धा आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात गणेश पूजनाने करतो मी... ही सवय कदाचित मला बाबांकडून लागली असेल. माझे बाबा हे गणपतीची भक्ती करायचे.. मंगळवारचा उपवास कधी चुकवला नाही त्यांनी.. दर संकष्टीला गणपतीच्या मंदिरात जाऊन हार नारळ वहायचे... बाबा गेल्यानंतर त्यांचा हा नेम मी नेहमी पाळतो..  तेव्हापासूनच मी पण उपवास करायला लागलो मंगळवारचा... माझ लग्न जमत नव्हते, परिस्थितीमुळे असेल किंवा इतर काही दोष असल्यामुळे...  तेव्हा मला एकदा आपल्या गावच्या गणपती मंदिरातल्या पुजारी काकांनी सांगितले, की गणपतीपुळ्याचे गणेशाचे मंदिर म्हणजे जागृत देवस्थान आहे... त्या गणेशाला नमस्कारकरून नवस कर... तुझे लग्न नक्की होईल.. का कुणास ठाऊक पण गावातल्या गणेशाच्या मूर्ती समोरच मी नवस केला होता, जर माझे लग्न झाले तर मी माझ्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात गणपतीपुळ्याच्या गणपतीला 21 नारळाचा हार दिल्यानंतरच करेल...  जोडी ने नमस्काराला येईल...

      पुजारी काकांनी सांगितलं होतं , नवस कुणाला सांगायचा नाही.. आधी पूर्ण करायचा आणि मग सांगायचा.. तुला तर माहीत आहे, आपण लोकं किती श्रद्धा ठेवतो देवावर.. तुला सांगितले आणि काही चुकीचे घडले तर? म्हणून इतके दिवस मी तुला काही बोललो नाही. तू नाराज होतीस,  तुला राग आला होता, हे कळत होते.. पण तुझ्यापासून दूर राहण्याचे कारण तुला सांगता येत नव्हते..  दुकानामुळे किंवा पैशांमुळे थोडासा उशीर झाला येथे यायला...  पण तू समजून घेशील ही खात्री आहे . आता कळले ना का मी दूर राहत होतो तुझ्यापासून?"  त्याने तिच्या डोळ्यात आरपार पाहत विचारले, तसे तिने मानेनीच होकार दिला..  

     डोळ्यात त्याच्याबद्दलचे प्रेम ओतप्रोत भरलेले होते.  शिवाय मनात एक प्रश्न होताच, पण तो विचारायचा कोणता पद्धतीने हे कळत नव्हते..  खुणेने विचारता येईना, म्हणून ती एकटक तसेच त्याच्याकडे पाहत राहिली...

   "अजून काही प्रश्न आहे का तुझा? "  तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत त्यानेच विचारले.  त्यावर वरून खाली मान हलवली तीने..

    " विचार मनात ठेवू नकोस. काय विचारायचे असेल ते विचारून घे.."

    तिने आपला मोबाईल काढला आणि त्यावर टाईप केले आणि तिचा तो मेसेज वाचून त्याला हसायला आले. "अग हे काय? खेड्यात असलो तरी बऱ्यापैकी शहराच्या जवळ राहतो आम्ही... सातवी नंतर शाळा सोडावी लागली तरी वाचनाचा खूप नाद आहे मला..  सतत वाचत असतो..  दुकानात जसा वेळ मिळेल, जेव्हा वेळ मिळेल,  पुस्तक हातात असते..  त्यामुळे माझी भाषा शुद्ध आहे.. बाबा ही चांगले शिकलेले होते..  तेही शुद्धच बोलायचे त्यामुळे लहानपणापासूनच ती सवय पडली..  तू पाहिल असेल घरातले सगळेच आम्ही असेच बोलतो..  कधी कधी गावातले शब्द येतात तोंडात.. पण ठीक आहे!  ती भाषा आहे आपली..  पण सतत पुस्तक वाचल्याने माझी भाषा मात्र सुधारली.. आता संपले का सगळे प्रश्न ? का आहेत अजून?" त्याने विचारले तसे गोड हसत तिने नकार दिला..

     आकाशाप्रमाणेच तिचं मनही आता निरभ्र झालं होतं.. समोर असलेल्या समुद्राच्या लाटांचा आवाज तिला खुणावत होता.. तिने त्याच्याकडे पाहिले, आणि लाटांकडे नजर वळवली.. तसे तो समजून गेला.

   " चल जरा वेळ जाऊया आपण किनाऱ्यावर , आणि मग जेवण करूया..  भूक लागली असेल ना तुला?" तसे तिने खुणेने त्याला विचारले, ' तुमचं काय?'

    माझं..?  माझा उपवास आहे.. मी थोडा फराळ करेन.. संध्याकाळी सोडेल उपवास.." तो म्हणाला आणि पुढे चालू लागला..

    दोघे बराच वेळ समुद्रकिनारी  पाण्यातून चालत होते.. त्यानी तिचा हात गच्च पकडला होता..  तिला तर एखाद्या स्वप्नात असल्यासारखेच वाटत होते.  काही दिवसांपूर्वी त्याला आपण आवडत नाही, असा विचार करणारी तीv आता त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती.. त्याच्या दूर राहण्याचे, झिडकारण्याचे, कारण कळले होते..  ती ही तशी देवभक्त होती.. आपण मध्यमवर्गीय, खेड्यातली लोकं देवाला किती मानतो,  देवाचा नवस पूर्ण करण्याला किती महत्त्व देतो, हे तिला चांगलेच माहीत होते.. आता तिचा त्याच्यावर कुठलाच राग नव्हता. दोघेही थोडेफार खाऊन मग असेच बाहेर इकडे तिकडे भटकत राहिले..  साधारण पाच सहा च्या दरम्यान रूमवर येऊन जरा वेळ आराम केला, आणि पुन्हा जेवायला बाहेर निघाले... जशी जशी रात्र वाढत होती, तशी तशी दोघांनाही एक वेगळीच हुरहूर जाणवत होती..

   
क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Archana P.

Teacher

वाचनात गुंतायला, निसर्गात रमायला आणि स्वप्न पहायला आवडते मला.....

//