डोळ्यात वाच माझ्या..5

प्रेम


    'अरे बापरे! उशिर झाला वाटतं!' तिने घड्याळात पहिले..अजून साडे सहा वाजले होते.. असेही घरी ती सात वाजताच उठायची. पण हे आईचे नाही, सासू चे घर होते. लवकर उठायचे, देवपूजा, झाडझुड, नाश्ता तयार करणे ही सर्व कामं आता तूच करायची. सासू आणि नणंदेला बोलायची संधी द्यायची नाही.. नवऱ्याला चांगल चुंगल खाऊ घालायचे.. त्यानेच तुमच्यातले नाते घट्ट होईल.. कितीतरी सूचना डोक्यात फेर धरून नाचू लागल्या.. आणि पहिल्याच दिवशी तीने माती खाल्ली होती.. तिच्या आधीच तिचा नवरा उठून बाहेर गेला होता..

    पण.. पण ते रात्री आले कधी? आणि झोपले कुठे? तीने आजूबाजूला नजर फिरवली.. तिच्या पायाच्या बाजूलाच दुसऱ्या ब्लँकेट ची घडी घालून ठेवली होती. म्हणजे ते रात्री इथेच झोपले होते, आपल्या बाजूला. आणि आपल्याला जाग ही आली नाही.. रागावले असतील का??

    ती उठून बाहेर किचन मध्ये गेली. आई ने चहा ठेवलेला होता.. बाजूच्या बाथरुम मधून पाण्याचा आवाज येतं होता..

    "अरे, आलीस तू?" आई ने विचारले तसे होकारार्थी मान हलवली तीने..

  " जा दात घास.. चहा ठेवलाय.." त्यांनी तिथल्या भिंतीत असलेल्या रॅक मधल्या कोलगेट कडे इशारा करत म्हटले तिने पुन्हा मान हलवली आणि उठून कोलगेट घ्यायला गेली... लक्षात आले तसे खुणेने, 'मी आलेच' असे म्हणून ती खोलीत गेली.. बॅगमधून ब्रश काढला आणि बाहेर घेऊन आली.. त्यावर कोलगेट घेऊन दात घासू लागली

    बाथरूमचा दरवाजा उघडला आणि टॉवेल गुंडाळलेला अर्जुन बाहेर आला.. समोरच तिला दात घासताना पाहून गांगरला... तिनेही पटकन मान फिरवून घेतली.. तो पटकन तिच्या बाजूने रूम मध्ये गेला..

    तोंड धुतल्यावर तिने अंघोळ करून घेतली.. अर्जून चहा चा कप घेऊन बाहेर जाऊन बसला होता..

    अंघोळ वैगरे आटोपल्यावर आईने तिला देव पूजा करायला सांगितले. गॅस ची पूजा करून तिच्या कडून गोड शिरा बनवून घेतला.. सोबत पोहे ही..

    नऊ ला नाश्ता केला की अर्जून दुकानात जायचा. ते दुपारी जेवायला घरी यायचा. परत संध्याकाळी जायचा ते घरी यायला रात्री चे नऊ दहा वाजायचे..

      केवळ नजर भेट, समोरासमोर आले तरी काय बोलावे हा संभ्रम, तिला विचारता येईना आणि त्याला काय हवे हे समजावता येईना.. नाश्ता देतांना, जेवायला वाढतांना ती द्यायची आणि तो घ्यायचा.. नको असेल तर हात आडवा करायचा... त्याला काही हवे असले तर आईला नाहीतर अनुला सांगायचा.. कधी कधी तर ती अधिरतेने तो काय सांगतो हे समजून घ्यायला पुढे यायची. आणि तो आईला आवाज द्यायचा.. आणि ती हिरमुसून जायची..रात्री ही खोलीत गेली तर दुकानाचा हिशोब वैगेरे झाला की तो एका कडेला झोपून जायचा..

      आठ दहा दिवस झाले तरी असेच चालू होते.. आईं आणि अनु ही काळजीत पडल्या होत्या. यांच्यात नवरा बायको सारखा संवाद कधी होईल.. शब्दांनी नव्हे पण नजरेनी तरी..

   त्यातल्या त्यात अनुची आणि विभाची गट्टी जमली होती.. विभा चे खुणेने बोलणे ती समजून घेत होती.. केंव्हा केंव्हा विभा मुक्याने हळुवार काही विचारत होती, तेंव्हा बोलतांना ओठांच्या हालचाली वरून तीच्या बोलण्याचा अर्थ लावत होती.. शिवाय मोबाईल वर मेसेज द्वारे देवाण घेवाण ही होतीच..

    आधी आधी हिच्याशी आपल्या दादाचे लग्न का करावे? हा प्रश्न पडलेल्या अनुला आता मात्र विभा वहिनी म्हणून आवडली होती.. तिच्या मैत्रिणींच्या गप्पांवरून नणंद भावजय भांडणे थोडीफार माहित होती. निदान तसे इथे होणार नव्हते.. शिवाय एक मुकेपण सोडले तर विभा हुशार होती.. घरकामात चपळ होती. तसे स्वयंपाकात ही सुगरण होती.. पूजेच्या दुसऱ्या दिवसा पासूनच किचन हातात घेतले होते तीने.. त्यामुळे आई ही खूश होती.. फक्त अर्जून च दूर दूर राहत होता.. आणि याचा विभा ला जास्त त्रास होत होता..


   लग्न ठरल्या पासून घरातल्या प्रत्येकाच्या बोलण्यात अर्जून होता.. तिच्या बाबांनी त्याची पूर्ण माहिती मिळवली होती..आणि त्या वरून त्याचा स्वभाव समजला होता..शिवाय आई चे सारखा त्याचा उल्लेख करून तिला संसाराच्या गोष्टी शिकवणे यामुळे लग्ना आधी पासून तीला तो आवडू लागला होता.. आपल्या मैत्रिणींप्रमाणे आपले ही सुखी कुटुंब असेल. आणि ते आपल्यावर आणि आपण त्यांच्यावर खूप खूप प्रेम करू. हे स्वप्न अनेकदा रंगवून झाले होते. सासू आणि नणंद यांचे प्रेम मिळत होते. परंतु अर्जून अजून स्वतः हून बोलला नव्हता.. उलट ती समोर गेली तर लक्ष नसल्या सारखे दाखवत होता..
    
   आपण बोलू शकत नाही म्हणून त्याला आवडत नाही.. कदाचित आपल्या सोबत जाण्याची लाज वाटते म्हणून तो आपल्याला कोठे नेत नाही, कोणी मिळाली नाही म्हणून आपल्याशी लग्न करावे लागले हा समज जास्तच दृढ होत होता.. कारण आईने जेंव्हा नातेवाईकांकडे जोडीने जाऊन या म्हटले तेंव्हां त्याने नकार दिला होता. शिवाय त्याच्या मित्रांनी जेवायला बोलावले तेंव्हाही नाही म्हटले होते.. ती एक दिवसा साठी माहेरी गेली तेंव्हा ही दुकानाचे कारण च देत तिला घ्यायला देखील गेला नव्हता..

    आता ही दुपारी टीव्ही बघता बघता तिच्या मनात हेच विचार येत होते.. अनु कॉलेज मध्ये गेली होती. आणि आई आणि ती दुपारच्या सीरियल बघत होत्या.. आज अडीच वाजले तरी अर्जून जेवायला आला नव्हता.. त्याची वाट पाहून दोघी सासू सुनेने जेवून घेतले होते

    "विभा.. मी पडते जरा वेळ आत.. अर्जून आला तर वाढ त्याला.." आईने सांगितले आणि तीने मान डोलवून होकार दिला..

   बसल्या बसल्या तिला ही डुलकी येतच होती की त्याच्या ॲक्टिवा चा आवाज आला.. तशी तीने पटकन टीव्ही बंद केला आणि दरवाज्यात आली..

    त्यानें दरवाज्यात उभ्या तिला पाहिले. आणि न कळेल शी स्मित रेषा उमटली चेहऱ्यावर त्याच्या.. तिचा ही चेहरा खुलला.. निदान त्याने पाहिले तरी आपल्याकडे...


   क्रमशः


आता तरी बोलेल का अर्जून विभा सोबत?
होईल का त्यांचा संसार सुरळीत सुरु??

कथा आवडत असेल तर दोन तीन शब्दांची का होईना समीक्षा नक्की लिहा..