Feb 24, 2024
प्रेम

डोळ्यात वाच माझ्या..2

Read Later
डोळ्यात वाच माझ्या..2      "बघ बाई तूच अर्जून शी बोलून.. तो तयार असेल तर माझी काही हरकत नाही.. मला फक्त त्याला सुखी झालेलं बघायचाय.. त्याच्या वयाच्या पोरांची पोर खेळताना दिसतात तेंव्हा जीव जळतो ग माझा.. लेकराच सुख कुठ दडून बसले काय माहीत? बाप गेल्या पासूनच पोरगा कष्ट करतोय.. स्वतः शिकला नाही पण बहिणी ला शिकवतोय... त्याच्याच नशिबात सुख नाही.." कमल बाईंनी डोळ्याला पदर लावला..

  " हो बाई.. वाईट तर वाटतच.. आम्हीं पण किती तरी वेळा हळहळतो.. माझ्या निकिता आणि वेदिका तर कित्ती जीव लावतात त्याला.. सख्खा भाऊ नाही त्यांना. पण अर्जून ने कधीही जाणवू दिले नाही.. जशी अनुजा तशाच त्या दोघी त्याच्यासाठी.. तिन्ही बहिणींचा एकटा लाडका भाऊ आहे तो.." रमा ताई ही पाणावल्या डोळ्यांनी म्हणाल्या..

   " रमा ताई.. आता दुपारी जेवायला येईलच तो.. तेंव्हा तूच विचार.. मला तर बाई भीती वाटते तो काय म्हणेल याची... हल्लीं लग्नाच्या नावाने फारच चिडतो तो.. तू मोठी आई आहेस ना? तुला काही म्हणणार नाही.."

   " बरं बाई... जेवण झालं की म्हणते त्याला.." रमा ताईंनी म्हटले तसे कमल बाईंनी सुस्कारा सोडला..

  रमा आणि कमल दोघी जावा जावा.. रमा मोठी होती.. गावातच राहत होती.. अर्जून आणि अनुजा दोघेही तिला मोठी आई म्हणायचे.. मोठे बाबा आणि मोठी आई दोघांचा ही त्यांना आधार होता.. त्यांच्या दोन्ही मुलींचा ही तो लाडका भाऊ होता.. दोघींचीही लग्न झालेली होती.. अनुजा आणि अर्जून मध्ये बारा वर्षाचे अंतर होतें.. अर्जून च्या पाठीवरची दोन मुले जन्मतःच दगावली होती.. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी नवसाने अनुजा चा जन्म झालेला होता.. त्यामुळे ती लाडकी होती अर्जून ची..

     बाबांच्या वेळे पासूनच दुकान होते किराणा मालाचे... दिवसभर ते सांभाळून अनुजा ला मात्र शिक्षण देत होता तो.. अनुजा आता बीकॉम च्या लास्ट इयर ला होती.. अभ्यासात बऱ्यापैकी हुशार होती.. बँकेच्या परीक्षा देऊन बँकेत नोकरी करायचे स्वप्न होते तीचे... एम एस सी आय टी चा कॉम्प्युटर कोर्स बारावी नंतर च केला होता तीने.. डिप्लोमा करायची इच्छा होती. पण फि च्या पैशांसाठी भावाला त्रास द्यायची इच्छा नव्हती..
   
  " अरे.. आज लवकर आलीस तू??" अचानक अनु ला घरी आलेले बघून कमल बाईंनी विचारले..

   " हो.. आज शेवटची दोन लेक्चर ऑफ होती.. निघून आले मग..! मोठी आई, निकी दीदी येणार होती ना?"

   " येणार होती ग... पण सासू बाईना बर नाहीये तिच्या म्हणून पुढच्या आठवड्यात येते म्हणाली.."

  "  दादा नाही आला अजून.."

  "  येईलच इतक्यात... हातपाय धुवून घे.. जेवायला घेते.. मोठ्या आईने दादाच्या आवडीची आंबाडीची भाजी करून आणलीय बघ.."

  " अरे वा! मज्जा आहे मग दादाची.." अनु म्हणाली आणि हात पाय धुवायला आत गेली..

     " आला बघ दादा.. कमल जा, जेवायला घे.." रमा ताई म्हणाल्या.. तशा कमल बाईंनी हसतच आत येणाऱ्या अर्जून कडे पाहिले आणि स्वयंपाक घरात शिरल्या.. त्यांच्या घरातला एकटा मुलगा होता तो.. लहान पणापासून सगळे दादाच म्हणायचे.. मग तेच नाव रूढ झाले...

  " आलोच मोठी आई.." म्हणत अर्जून ही हात पाय धुवायला स्वयंपाक घरात शिरला..

   मोठ नाही पण बऱ्यापैकी जागा असलेलं घर होत त्यांचं.. स्वयंपाक घर, बैठकीची खोली आणि त्या बाजूला असलेल्या अजून दोन खोल्या.. त्यापैकी एक खोली अर्जून ची होती आणि दुसरीत अनु आणि आई.. शिवाय किराणा सामानाच्या जादा आणलेल्या थैल्या ही ठेवलेल्या असायच्या.. स्वयंपाक घरातच बाथरूम केलेली होती.. टॉयलेट मात्र घराच्या मागच्या बाजूला होती.. तीन बाजूंनी थोडी मोकळी जागा होती त्यातच छोटी मोठी फुलझाड, काही भाज्यांचे वेल लावलेले असायचे.. बैठकीच्या खोलीच्या एका बाजूला छोट देवघर बनवलेले होते.. घरावर पत्रा च होता. त्यामुळे गरम व्हायचं उन्हाळ्यात. पण त्यालाइलाज नव्हता..

    वरती स्लॅब टाकायची किती ही इच्छा असली तरी पैशांअभावी ते शक्य नव्हते.. सध्या अर्जून ला अनु ला शिक्षणं द्यायचे होते. तीच्या लग्नासाठी पैसे जमवून ठेवायचे होते.. त्यामुळे घराचा विचार स्टॉप केला होता..

 "  दादा.. ये बस जेवायला.." आईने बोलावले तसे तो जेवायला बसला.. सोबत मोठ्या आईशी गप्पा ही सुरु होत्या.. आईचे मोठ्या आईंना खुणवणे चालू होते.

  " मोठी आई.. भाजी खूप छान झालीय.."

  " हम्म... दादा.. एक मुलगी बघितलीय तुझ्या साठी.." रमा ताई म्हणाल्या तस खाता खाता त्याने त्यांच्या कडे पाहिले..

  " दिसायला सुंदर आहे.. शिकलेली आहे.. घरकाम वैगेरे सगळ येतं.. " तो काहीच बोलत नाही पाहून त्या पुढे म्हणाल्या.. आई आणि अनु ही तो काय म्हणतो ते पाहायला उत्सुक होत्या.. अनु तर कधीपासून आपल्या वहिनी साठी एक्साईटेड होती..

    "काय करायचं.. करू का पुढे बोलणी..? म्हणजे तुझ्या मोठ्या बाबांनी आधीच शब्द टाकलाय त्यांच्याकडे.."

   "हम्म.. अजून एक नकार.." तो रिकाम्या ताटाला नमस्कार करत उठला..

  " दादा.. काही काय बोलतो?" आईला वाईट वाटले त्याच्या बोलण्याचे..

   "मग काय आई? आपल्याला नवे आहे का हे? गेले चार वर्ष हेच सुरु आहे.. आपला होकार असतो तिथे मुलींचा नकार येतो.. आणि ज्या मुली तयार असतात त्यांची पत्रिका जुळत नाही.."

    "हो पण दादा.. इथे पत्रिका अगदीं उत्तम जुळलीय... आणि मुली कडच्यांचा ही होकार आहे??"

  "  काय???"  त्याला धक्काच बसला हे ऐकून..

   " हो.. कालच तिच्या बाबांचा होकार आलाय.. गोड आहे मुलगी.. तुझ्या मोठ्या बाबांनी तुझा फोटो दाखवला होता.. शिवाय ते ओळखितलेच आहेत.. त्यामुळे प्रश्न नाही.."

 "  पण मोठी आई..! म्हणजे त्या मुलीला विचारलय ना तुम्ही नीट? आपल्या परिस्थितीची कल्पना दिलीय ना? "

   "हो हो.. तिला काही प्रश्न नाहीये... फक्त.." मोठ्या आई सांगता सांगता जराश्या अडखळल्या..

  " फक्त काय?"

    "फक्त.. म्हणजे मुलगी छानच आहे.. वय ही फारसे नाही.. पण.."

   "पण काय मोठी आई.. लंगडी, लुळी आहे का? कारण ती आणि तिच्या घरचे फक्त फोटो पाहून तयार आहेत म्हटल्यावर तिच्या तही काहीतरी कमी असेलच.."

  " हं... फोटो पाहून नाही.. त्यांनी पाहिले आहे तुला.. म्हणून तयार झालेत.. आणि तू म्हणतोस तसे व्यंग नाही काही.. पण.. पण मुलीला बोलता येत नाही.."

  " म्ह.. म्हणजे?"

  " म्हणजे मुकी आहे मुलगी...!"क्रमशः


काय रियाक्ट करेल अर्जून?? होकार देईल का लग्नाला..??

खरंच लग्नाची समस्या जटील झालीय काही समाजात.. अगदीं साधारण असलेल्या गरीब मुली ही चांगल्या होतकरू तरुणाला नकार देतात.. केवळ त्याच्याकडे नोकरी, फ्लॅट आणि बँक बालन्स नाही म्हणून... कित्येक तरुणांची योग्य वयात लग्न होत नाहीत...

  या उलट खरच थोडे फार अपंगत्व असलेल्या मुलींना ही लग्नासाठी तडजोड करावी लागते.. इच्छांना मुरड घालावी लागते..

सर्व दूर असे असते असे नाही.. पण काही ठिकाणी अशी परिस्तिथी आहे.. त्यावर च प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न...

कसा वाटतोय नक्की सांगा..

   

 

  


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Archana P.

Teacher

वाचनात गुंतायला, निसर्गात रमायला आणि स्वप्न पहायला आवडते मला.....

//