रावण..

विनोदातुन सामजिक रुढिला स्पर्श..
रावण
......कॉलेज एडमिशन चे काम आटोपून वसई फाट्यावर आलो... एक मॅजिक गाडी...नंबर वर थांबली होती.. नंबर अर्थात रिक्षा वाल्यांनी तयार केलेले. त्याला कसलीही सरकारी मान्यता नसलेले.... याचे कारण त्या मॅजिक ड्रायवर च्या चेहऱ्यावर दिसत होते.... त्याची घारीची नजर कुठून कुठून ट्रेफिक हवालदार येऊ शकतो याचा शोध घेत होती.....
ज्या प्रमाणे नील आर्मस्ट्रॉंग ने चंद्रावर पाहिले पाऊल ठेवले होते त्या प्रमाणे मी त्या मॅजिक मध्ये मी पहिले पाऊल ठेवले ... बऱ्याच वेळाने एक गृहस्थ माझ्या बाजुला येऊन बसले..त्यांच्या कपाळाला मोठा टिळा व गळ्यात बोरमाळ होती..आपले धर्मप्रेम कमी आहे अशी लोकांना शंका येऊ नये म्हणून त्यांनी एक टिळा गळ्याला देखिल लावला होता.. त्यांच्या शर्टाच्या खिशाला लावलेला निळा आणि लाल पेन ते फ़ार साक्षर आहेत याची साक्ष देत होते.... मी आपला गुपचुप हाताची घडी घालून सीटच्या कोपऱ्यात बसलो होतो..ड्रायवर ची नजर एकीकडे पोलिस तर दुसरीकडे पेसिंजर शोधत होती..... शेवटी एक कॉलेजच्या मुलामुलींचा दहा बारा जणांचा मोठा ग्रुप आला... त्यांना पाहुन ड्रायवरला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पुर्ण झाल्याचा आनंद झाला.. ... त्या सगळ्याना कोंबून त्याने गाडी चालु केली.....
कॉलेज ग्रुप कुठेतरी नोकरी साठी परीक्षा द्यायला गेला होता हे त्यांच्या गप्पा वरून समजत होते.. त्या मुलांच्या गप्पा मध्ये माझ्या बाजूचे गृहस्थ मध्ये मध्ये टांग अडवत होते.. असते एकेकाला सवय.. मी नेहमीप्रमाणे शांतपणे सगळे पाहत होतो..
त्यांच्या गप्पांचा आस्वाद म्हणजे मारा मी सहन करत होतो.. मारा यासाठी की, त्यांच्या गप्पांत काहीच नाविन्य नव्हते तेच ते.. बाहेरची लोक येतात.. आपल्या राज्यातील मुलांच्या पोटावर पाय देतात वैगरे वैगरे... परीक्षेत त्या मुलांना रामायणावर काहीतरी निबंध आला होता.. त्यांवर ते त्यांचे ज्ञान अज्ञात सगळं पाझळवत होते.. तेव्हा माझ्या बाजुच्या महाशयांनी रामायण हा विषय ऐकताच हनुमंता प्रमाणे त्या चर्चेत सक्रीय उडी घेतली.. रामायण माझा आवडता विषय.. खुप अभ्यास आहे मला रामायणाचा!... मला धार्मिक विषयावर बोलयला फ़ार आवडते..असे ते म्हणाले... अरे! पोरांनो!! तुमच्या सारख्या आजच्या पिढीला रामायणाची ओळख असणे फ़ार गरजेच आहे..रामाचे ते एकपत्नीव्रत.. रामाचे आचार विचार... या सगळ्यांची आज गरज आहे!..अस सांगत त्यांनी माझ्याकडेही पाहिले.. मी देखिल मुलांबरोबर मान हलवली...तसा त्या महाशयांना आणखी चेव आला.. आणि त्यांनी जवळ जवळ सगळे रामायणच सांगायला सुरवात केली... त्या मुलां बरोबर मलाही माहिती मिळत होती.मी देखील त्यांचे व्याख्यान.. कीर्तन.. मन लाऊन ऐकत होतो...
रामकथा सांगताना त्यांनी रावणाचा उल्लेख केला. रावण म्हणजे अतिशय क्रूर दहा डोक असलेला राक्षस... सर! रावणाला खरंच दहा तोंडे होती? इतक्या कधीपासून शांत असलेल्या मुखातून माझा प्रश्न....या प्रश्नातुन माझ्या चेहऱ्यावर दिसणारे अज्ञात पाहून.. महाशयांना अजुन हुरूप आला.. अरे! म्हणजे काय?होतीच दहा तोंड... म्हणूनच तर रावणाला दशानन ही पदवी मिळाली... त्याच जरी चित्र बघितले तरी लगेच समजते की!... त्यांचे सडेतोड आणि आभ्यासपुर्ण उत्तर ऐकून.. बाकीच्यांनी... न जाने कहाँ कहाँ चले आते है यार।... या नजरेने माझ्याकडे पाहिले..... सर! पण या गोष्टीचा त्याला त्रास होत असेल ना?.. माझा पुढचा बालिश प्रश्न... त्रास कसला त्रास?.. उलट अभिमान वाटायचा त्याला त्या दहा डोक्यांचा... त्याला कसला त्रास होईल त्या डोक्यांचा सांग बरं?....
प्रथमच त्या धार्मिक सभेची सुत्र माझ्या हातात आली.बाकीच्या सद्स्स्यानी अनिच्छेने का होईना माझ्या कडे कान दिले...
सर!.. मी देखिल कॉलेजचा विद्यार्थी असल्याने मला रामायण.. रावण.. या विषयी फारशी माहिती नाही.. थोडंफार रामानंद सागर यांचे टीव्ही वर पाहिले इतकंच.... मात्र रावणाला दहा तोंडे असतील तर त्याला सकाळी उठल्या पासुन रात्री झोपे पर्यंत बऱ्याच अडचणींना सामोरे जाव लागत असेल अस मला वाटते.... उदा: रावण सकाळी उठला तर त्याला बाथरूमला जायला मोठा दरवाजा लागत असेल... कारण दहा तोंडे छोट्या दरवाज्यात घुसवने म्हणजे या ड्रायवर ने जशी आता माणस गाडीत घुसवली इतक सोपे तर नक्कीच नाही.... झाल!.. बाथरूम झाल!!...आता दात घासायची वेळ.. आता दहा डोकी म्हंटल्यावर दहा ब्रश... (त्याकाळी दात घासायचे जे साधन असेल ते)...घाई असेल तर एकच ब्रश ग्रुहीत धरू... एका तोंडात ३२ दात... म्हणजे ३२×१०=३२० दात... इतके दात घासायचे म्हणजे किती वेळ?...३२ दात घासायला किमान १० मिनिटे धरली तर..१० ×१०=१०० मिनिटे...१०० मिनिटे म्हणजे १ तास ४० मिनिटे... आपण दीड तास धरू... चला!.. रावणाने दात तर घासले...आता गूळन्या..जीभ साफ करणे तोंड धुणे.... यासाठी साधारण वीस तीस मिनिटे... म्हणजे दोन तास तर गेले की!...काय?... बरोबर ना सर?.. या प्रश्नावर त्यांचा चेहरा कसा दिसत होता हे मला नक्की सांगता येणार नाही.. पण बाजुच्या सर्व मुलांचे कुतूहल मात्र जागृत झाल हे मात्र त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.... हा! सर तर पुढे आंघोळ...
सकाळचा सर्वात महत्वाचा विधी..म्हणजे आंघोळ... आता त्यासाठी सगळ्या तोंडाला साबण लावणे ( त्या काळात जे सुगंधी द्रव्य वैगरे असेल ते).....केसांना लावणे... या साठी त्याला किती वेळ द्यावा लागत असेल त्याचा आपण अंदाज करू... आपल्याला आंघोळ करायला किमान दहा १० मिनिटे लागतात......तर रावणाला १० ×१०= १०० मिनिटे... म्हणजे आधीचे दोन तास आणि आताचा दीड तास... एकूण साधारण साडेतीन तास तर नुसते प्रात विधी साठी गेले........
त्या नंतर नाष्टा चहा (त्या काळातले जे काही असेल ते मधुर पेय ).....म्हणजे दहा कप आणि दहा थाळ्या... दहा तोंडे म्हणजे दहा जिभा... आता त्या दहा जिभांचे चोचले पुरवायला वेळ तर जाणाराच.....झाला!.. नाष्टा झाला!!.... आत्ता दरबारी काम.. सिंहासनावर..जाऊन बसला की, वारा घालणारे पण एकास एक म्हणजे दहा सेवक सेविका....कारण एखाद्या डोक्याला वारा कमी लागला तर.. उगाचच घाम येईल ना त्या डोक्याला!..... मग...दुपारचे जेवण (थोडक्यात दुपार नंतर चे.. कारण आधिच किती वेळ झाला आहे.. हे आपण जाणता.)... ते जेवण करता करता साधारणतः रात्र होईल..( सकाळ पासुन फारच घाई केली तर संध्याकाळ पर्यत)... मग रात्रीच जेवण कधी?... आणि झोपनार कधी?.... झोपनार कधी.. म्हणण्या पेक्षा झोपनार कसा हे जास्त सायुक्तीक ठरेल... कारण डाव्या किंव्हा उजव्या कुशीवर झोपणे तर दहा डोक्या मुळे अशक्य..... मग पर्याय.. दोनच उताणे किंव्हा उबडेच..झोपावे लागेल... सर!.... मी ज्ञानी महाशयांना म्हणालो... सरांचे काय ते माहिती नाही... पण गाडीतील बाकीचे माझ विश्लेषण ऐकून शॉक झाले....
....मित्रांनो!... हे तर मी वर वर संगितले.. युद्दाच्या वेळेस तर.. युध्दात जाण्यासाठी त्याला सकाळ पासुन किती धावपळ करावी लागत असेल....युध्दावर जातांना राणी मंदोदरीला तर दहा तोंडाना...म्हणजे दहा वेळा ओवाळायला..लागत असेल... कधी केस कापायला... दाढी करायला तर हालत खराब होत असेल बिचाऱ्याची...थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की, रावणाला दहा तोंडे नव्हती.. तर.. रावण हा इतका शक्तिशाली आणि हुशार होता की,दहा जणांचे बळ त्याच्या अंगात होते.. दहा पटीने तो बुद्दीवान होता... चारही वेद त्याचे कंठस्थ होते.. त्याची लंका सोन्याची होती.म्हणजे त्याचे राज्य समृद्ध होते.. असा अर्थ होतो... पुराणांतील कथांतील शब्द किंव्हा पदव्या ह्या बऱ्याच वेळा प्रतीकात्मक असतात.. त्याचा शब्दशः अर्थ घेणे चुकीचे आहे... अश्या वेळेस आपल्या विवेक बुद्दीचा वापर करून आपण त्याचा अर्थ लावायचा..
आणि हो!... अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे... रावण शक्तिशाली.. बुद्दीवान होताच.. आपल्या लाडक्या बहिणीच्या प्रेमा खातर किंव्हा तीच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्याने सीतेचे अपहरण केले.. मात्र त्याने तिच्यावर कोणतीही जबरी किंव्हा बलात्कार केला नाही.. हे सीताच्या अग्निपरीक्षे मुळे सिध्द झाले.....तरी दुसऱ्याच्या पत्नीचे तीच्या इच्छे विरुध्द अपहरण करणे हे चुकीचे आहे म्हणून त्या चुकीची शिक्षा त्याचा वध करून रामाने एकदा त्याला दिली आहे.... तरिही आपण दरवर्षीच त्याचा पुतळा जाळतो.... तुम्ही सांगाल की, बुराईचे प्रतीक म्हणून त्याचा पुतळा जाळला जातो....ठीक आहे.. मग या वर्षी त्याचा पुतळा जाळल्याने बुराई संपते का?.... शेवटी पुढच्या वर्षी त्याचा पुतळा आपण परत जाळतोच ना?.... तेव्हा नाही विचार करत.. अरे!.. गेल्यावर्षी तर आपण बुराई संपवली होती.. मग या वर्षी ही परत कशी आली?.... बुराई कमीच करायची असेल तर दरवर्षी रावणाच्या.. पुतळ्या ऐवजी.. त्यांचा पुतळा जाळा ना!..जे खरोखरच लहान -लहान मुलींचे.... खालच्या जातीतील तरुणींचे बलात्कार करून त्यांना हलहाल करून मारतात....जे लाखो कोटीचा भ्रष्टाचार करतात .....जे भ्रष्टाचार करून गोर गरिबांचे पैसे घेऊन विदेशात पळतात...जे पैसे घेऊन एडमिशन देतात....त्यांचा पुतळा जाळा....मला माहिती आहे असे केल्याने बुराई संपणार नाही... पण.. समाजात एक संदेश तरी जाईल.. आणि असे पाप करणारे थोडा तरी विचार करतील... काय मित्रांनो पटतंय का?.... त्या ज्ञानी महाशयांसोडुन सगळ्यांनी माना हलवल्या... मला चांगलेच माहिती होत.. ... चाकोरीबद्ध विचार करणाऱ्या ज्ञानी महाशयांना हे कधीच पटणार नाही... कारण अशी लोकं चाकोरी बाहेर पडायला कधी तयार नसतात... अश्या लोकांना समजावणे म्हणजे उडणाऱ्या मच्छरला चड्डी घालण्यासारखे कठीण काम आहे.......
लेखन: चंद्रकांत घाटाळ
संपर्क: ७३५०१३१४८०