रौद्रशंभू !

.
मध्यान्हीचा प्रहर चालू होता. छत्रपती शंभूराजे सदरेतल्या मुख्य बैठकीवर विराजमान होते. त्यांचे रूप ते काय वर्णावे ? धिप्पाड शरीर , मजबूत अंगकाठी , सूर्यासम तेजस्वी मुखश्री , रेखीव चेहरा , कोरीव दाढीमिश्या , कपाळावर चंद्रकोर , मस्तकावर सह्याद्रीचा स्वाभिमान असलेला जिरेटोप , गळयात कवड्यांची माळ , बोटांमध्ये हिऱ्यांच्या मोजक्याच पण मौल्यवान अंगठ्या आणि मनगटी सोन्याचे जाडजूड कडं असा तो पेहराव होता. साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आपली सावली मागे सोडून गेलेत ऐसेच वाटत. महत्वाची कामे आधीच पार पडली होती. राजा रामसिंगला पाठवायचे पत्रही लिहून तयार झाले होते. नुकताच पुत्ररत्न प्राप्त झाल्याने छत्रपती शंभुराजेंच्या मुखावर विशेष प्रसन्नता होती. त्या पुत्राचे नाव " शिवाजी " असे ठेवले होते. किरकोळ कामे आटपून महाराज सरदार खंडोजीकडे वळले.

" काय म्हणतोय रामशेज ?" महाराजांनी विचारले.

" चिवटपणे झुंजतोय महाराज. बादशहा औरंगजेबाने मुकूट फेकलाय अस ऐकीवात आहे. " खंडोजी हसत म्हणाले.

" ईश्वर करो हा मुकूट पुन्हा कधीच त्याच्या मस्तकावर चढू नये. शत्रू जरी असला तरी एकाबाबतीत बादशहाचे विलक्षण कौतुक वाटते. या म्हातारवयात महालात आराम करावा तर मोहिमेवर आले. त्यांना त्यांच्या नातवंडांसोबत खेळता येईना आणि आम्हाला आमच्या बाळराजेंसोबत. संपूर्ण उत्तर भारतात पसरलेल्या साम्राज्यात समाधान नाही. स्वराज्याचा घास घ्यायचा. कारण त्याला ठाऊक आहे की हे स्वराज्य साधीसुधी बंडाळी नसून एक ठिणगी आहे. याच ठिणगीने उद्या संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा वणवा पसरेल. " दीर्घ श्वास घेत महाराज म्हणाले.

तेवढ्यात एक सेवक आत आला.

" महाराज , संत तुकाराम यांचे पुत्र महादेवमहाराज आपल्याला भेटायला आले आहेत. " सेवक मुजरा करत म्हणाला.

" नक्कीच बाळराजेंना आशीर्वाद द्यायला आले असतील. " खंडोजी म्हणाले.

" निळोपंतांना सांगून त्यांचा उचित आदरसत्कार करा. आज दरबारातच आम्ही त्यांचे दर्शन घेऊ. महाराणी येसूबाईंनाही कळवा. " महाराज म्हणाले.

***

दरबार भरला. महादेव महाराज प्रसन्न मुद्रेने दरबारात आले. त्यांनी आदराने मुजरा केला. छत्रपती शंभूराजे यांच्या बाजूच्या बैठकीवर महाराणी येसूबाई नुकत्याच जन्मलेल्या बाळराजेंना मांडीवर घेऊन बसल्या होत्या. नारंगी साडी , त्यावर उबदार सोनेरी रंगाची शाल , नाकात सोन्याची नथ , कपाळावर लाल चंद्रकोर , गळ्यात कंठहार , मुखावर करुणा व स्वराज्यप्रति सेवाभाव असे विलक्षण रूप होते. राजमाता जिजाऊ यांनी दिलेले संस्कार त्यांच्या वागण्याबोलण्यातून पदोपदी झळकत होते. शिवस्नुषा कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराणी येसूबाई होय. आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्या डगमगल्या नाहीत. ताठ मानेने आणि मोठ्या धीराने सर्व संकटांचा मुकाबला केला. छत्रपती शिवाजी महाराज कधीकधी परीस वाटतात. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि त्यांचे विचार कळलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचे सोने झाले. ज्यांना महाराजांचे विचार समजले त्यांचे इतिहासात वेगळे पान राखले गेले. यात पेशवे बाजीरावपत्नी मस्तानीचे पिता छत्रसाल राजा पासून ते मुरारबाजी , बाजीप्रभू देशपांडे , शिवा काशिद असे शेकडो उदाहरणे मिळतात. मग शिवकुटुंब तर विभक्त कसे राहील ? महाराजांच्या दोन्ही सुना महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई इतिहासात विशेष कर्तुत्ववान म्हणून गौरविल्या गेल्या.

" या महादेव महाराज. आज हा दरबार तुमच्या चरणस्पर्शानी पावन झाला. आमच्या आजीसाहेबांनी तुकोबांचे अभंग ऐकवूनच आम्हाला मोठे केले. साक्षात तुकोबांचे पुत्र आम्हाला भेटायला आलेत याहून आनंदाची बातमी दुसरी नाही. " छत्रपती संभाजी महाराज म्हणाले.

" महाराज , आपल्यासारखे राजे स्वराज्याला लाभले हे रयतेचे भाग्यच. स्वराज्याला वारस भेटला ही खबर कानावर आली. राहवले नाही. आशीर्वाद द्यायला आलो. " महादेव महाराज म्हणाले.

छत्रपती शंभूराजे यांनी इशारा करताच महाराणी येसूबाई पुढे आल्या आणि महादेव महाराजांनी बाळास आशीर्वाद दिले.

" पांडुरंग करो की या पुत्राचे राज्य गुजरात पावेतो बंगाल , तंजावर पावेतो दिल्लीपर्यन्त पोहोचो. यांचे सेनापती सर्वत्र धुमाकूळ घालावेत. यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून यांच्या दरबारात वेगवेगळ्या राज्यातील वकीलांनी गर्दी करावी. " महादेव महाराज उद्गारले.

प्रसन्न मुद्रेने महाराणी येसूबाई पुन्हा स्थानापन्न झाल्या.

" महाराज , देहूगावाहून पालखी निघावी ऐसी इच्छा होती. पण.." महादेव महाराज अडकले.

" पण .. ?" छत्रपती संभाजी महाराज उद्गारले.

" मुघल वारकऱ्यांना छळतात. वारी करायची नाही असं म्हणतात. " महादेव महाराज निराश मुद्रेने उद्गारले.

छत्रपती संभाजी महाराजांनी पंतप्रधान निळोपंतांकडे नजर रोखून धरली.

" महाराज , आज सकाळीच बातमी आली की मुघलांनी शंभर वारकऱ्यांची कत्तल केली. स्त्रियांची विटंबना केली. मूर्तीभंग केला. " पंतप्रधान निळोपंत म्हणाले.

हे सर्व ऐकून छत्रपतींच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. डोळे रागाने लालबुंद झाले. ते तडक उठले. सोबतच महाराणी येसूबाईही उठल्या. दरबारातील सर्व कारभारी उठले. महाराणी येसूबाईंच्या डोळ्यात संताप होता.

" महाराज , याचसाठी का बाजीप्रभू , मुरारबाजी , तानाजीसारख्या कितीतरी नरवीरांनी रक्त सांडले ? याचसाठी आजीसाहेब राजमाता जिजाऊंनी स्वराज्य निर्मिले ? याचसाठी थोरल्या महाराजांनी सह्यकडांवर छत्रपतींचे तख्त उभे केले ? टाळ-मृदुंग वाजवून विठ्ठलाचा जयघोष करणाऱ्या वारकऱ्यांचे हात तोडले जाणार असतील आणि डोक्यावर तुळशी घेणाऱ्या आयाबहिणींची विटंबना होणार असेल तर काय उपयोग या स्वराज्याचा ?" महाराणी येसूबाई गर्जल्या.

बाजूला उभ्या असलेल्या वृद्ध सेविकेने आधीच बाळराजेंना स्वतःकडे घेतले होते. महाराणीचे रौद्ररूप पाहून तिला राजमाता जिजाऊच आठवल्या आणि तिही थरथरू लागली.

" महाराज , परचक्र असेपर्यंत वारी टाळली तर ?" एक मंत्री धाडस करून बोलला.

" खामोश. " छत्रपती संभाजी महाराज एक हात वरती करून गर्जले.

पूर्ण दरबारात भयकंप सुटला.

" भूमी आपली. राज्य आपले. लोक आपले. संस्कृती धर्म देव आपला. आणि कधी काय साजरा करायचे हे ते ठरवणार ? आहेत कोण ते ठरवणारे ? ज्ञानोबा-तुकोबांच्या ओव्यांमध्ये जग जिंकण्याचे सामर्थ्य आहे सांगा त्या मुघलांना. महादेवमहाराज तुम्ही वारी काढा. आम्ही संरक्षण देऊ. जोपर्यंत छत्रपतींची मसनद जिवंत आहे तोपर्यंत हिंदूधर्माच्या रक्षणार्थ मराठे सदैव तत्पर असतील. उद्या आम्ही मराठे राष्ट्राच्या सीमेवर जायलाही धजावणार नाही. तुम्ही तयारी करा आषाढीएकादशीची. आम्ही गनिमांना माऊलीचे दर्शन करवू. कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहणाऱ्या माऊलीचे रूप यांना उमगत नसेल तर कुरुक्षेत्री हाती सुदर्शन चक्र घेऊनि पांडवाकरवे शंभर कौरवांचा नायनाट करणाऱ्याचे दर्शन घडवू. " छत्रपती संभाजी महाराज म्हणाले.

" आपले रूप पाहुनी थोरल्या छत्रपतींची आठव झाली. आता भय नाही. काळ कठीण. शास्त्र ओठांवर आणि शस्त्र कमरेवर ठेवू. येतो महाराज. " महादेव महाराज मुजरा करून निघून गेले.

***

दाभाडे-इंगळे सरदारांना खलिते गेले. देहूहून वारी निघाली. " जय जय रामकृष्ण हरी " हा जयघोष सुरू झाला. अवघे वातावरण भक्तिमय झाले. टाळ-मृदंग वाजू लागले. वैष्णवांची भगवी ध्वजा आसमंती लहरू लागली. मुघल सैनिक एका टेकडीवरून हे दृश्य पाहत होते. त्यांचे डोळे लालबुंद झाले. मुघल वारकऱ्यांच्या समोर आले. "अल्लाहूअकबर " " काट दो काफर को " घोषणा झाल्या. वारकरी मात्र डगमगले नाहीत. तुळशी डोक्यावर ठेवलेल्या आणि निळी साडी घातलेल्या स्त्रीचे मनगट एका यवनाने धरले. क्षणार्धात एका वीणा वाजवणाऱ्या , वारकरी वेशभूषा असलेल्या , मजबूत धिप्पाड अंगकाठी असलेल्या व्यक्तीच्या कमरेतून सर्रकन एक तलवार उपसली आणि त्या यवनी सैनिकाचा हात कापला गेला. " याह अल्लाह " तो यवन किंचाळला. त्याचे रक्त त्या धिप्पाड इसमाच्या मुखावर उडाले. तो इसम साधासुधा इसम नसून दस्तुरखुद्द छत्रपती संभाजी महाराज होते.

" आमच्या माऊलीचे चरणस्पर्श करशील तर तुझ्या सात जन्माचे पाप धुतले जातील. तिच्याकडे वाकडी नजर टाकशील तर हा आबासाहेबांचा छावा तुला नरकातही जागा मिळणार नाही इतक्या यातना देईल. " छत्रपती संभाजी महाराज म्हणाले.

मग वारकऱ्यांच्या वेशात लपलेले मावळे पुढे आले. छत्रपती संभाजी महाराज स्वतः त्वेषाने झुंजू लागले. त्यांचा रौद्रावतार पाहून मावळ्यांनाही विलक्षण हुरूप चढला. छत्रपतींनी दोन्ही हातात तलवारी घेतल्या. मुघलांनी त्यांना घेरले. छत्रपतींच्या तलवारीत साक्षात आई भवानी संचारली. वीज तळपावी तशी ती तलवार आठही दिशांना थैमान गाजवू लागली. काही मुघल " शैतान शैतान " करत पळून गेले. एकाने कुटीलपणे तोफखाना पुढे केला. शंभूराजांनी एक पांढरा अरबी घोडा उचलून तो घोडा तोफखान्यावर फेकला. डळमळत तो तोफखाना खाली रांगत गेला. आठ जणांनी छत्रपतींना घेरले. पण छत्रपतींना रणी हरवू शकणारे रणांगण अद्याप भूतलावर तयारच झाले नव्हते. शंभूराजे ऐसे झुंजले की आठही जण यमसदनी पोहोचले. मुख्य सरदार अंगावर चालून आला तेव्हा महाराजांनी तलवार अशी फिरवली की तो सरदार उभा चिरला गेला. गनिमांच्या रक्ताने शंभूराजे न्हाऊन निघाले. महादेव महाराज स्वतः डोळे भरून हे दृश्य पाहत होते. त्यांनी हात जोडले.

" विठ्ठला पांडुरंगा माझ्या या छत्रपतीला उदंड आयुष्य दे रे. सुर्यापोटी सूर्य जन्मलाय. तुझी महिमा अगाध. वैष्णवांच्या रक्षणार्थ साक्षात रुद्राला कैलाशाहुनी धाडले. दुष्ट क्षत्रियांचा नायनाट करणारे भगवान परशुराम , तांडव करणारे महादेव आणि हिरण्यकश्यपचे पोट फाडणारे देव नरसिंह तर याहूनी वेगळे कसे असतिल ? आज रौद्रशंभू रूप पाहुनी नेत्रे धन्य धन्य झाली. " महादेव महाराज स्वतःशीच म्हणाले.

सर्व मुघल पळून जाताच महादेव महाराज छत्रपतींकडे आले आणि त्यांचे चरण स्पर्श करायला गेले. पण छत्रपतींनी अडवले.

" तुम्ही वारकरी. आम्ही तुमचे चरण स्पर्शून पुण्य कमवावे. " छत्रपती संभाजी महाराज म्हणाले.

" आपले रौद्ररूप पाहून देव मल्हारच आठवला. नजरेत तोच अंगार , तोच रणावेश. खूप उपकार झाले. आपणही पंढरीस चालावे. " महादेव महाराज म्हणाले.

" उपकार कसले ? राजश्री आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हांस अगत्य. कर्तव्यच आमचे. भय नसावे. जागोजागी मावळे पेरलीत. सरदार सोबत असतील. आम्हास जावे लागेल. आम्हा मराठ्यांसाठी ढालतलवारच विठोबा आणि गनिमाच्या रक्ताचेच स्नान. येतो. " छत्रपती संभाजी महाराज हात जोडून म्हणाले.

मावळ्यांनी गर्जना केली.

छत्रपती संभाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय !

***

रणांगणावर रुद्र प्रकटला
सर्वत्र हाहाकार माजविला
हाती दोन ते तलवारी घेता
गनिमांची मुंडके ती छाटता

उफाळूनि आला किती रणावेश
कंपित शत्रू स्फुरण पावला देश
रक्ताने न्हाऊन निघाले कृष्णकेश
कीर्तीसम देही जखमांचे अवशेष

नजरेत त्याच्या भडकला अंगार
झाला देवमल्हारीचा साक्षात्कार
धन्य जाहलो पाहुनी हे रौद्रावतार
राणीसईबाईपोटी सुर्याचा अवतार

सह्यकड्याची पवित्र कूस उजळली
गौरवकवने किती आम्ही रेखाटावी ?
धन्य ते कुळ जिथे रौद्रशंभू निपजला
धन्य ते राष्ट्र ऐसा राजा जिथे लाभिला !

©®पार्थ धवन

***

टीप :

1. संत तुकाराम महाराज यांचे पुत्र महादेव महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
2. छत्रपती संभाजी महाराज यांनी वारकऱ्यांना सरंक्षण दिले.
3. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्राचे नाव " शिवाजी " असे होते. पुढे औरंगजेबाने ते बदलून " शाहुजी " असे केले. साव = शांत , भोळा
4. छत्रपती संभाजी महाराज यांच्या लढाईचे वर्णन पोर्तुगीज आणि इतर युरोपियन लोकांच्या समकालीन वर्णनातून प्रेरित आहे.
5. कविता स्वयंलिखीत आहे.

ही कथा ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लिहिलेली आणि " सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटातील एका सीनमुळे सुचलेली कथा आहे.

सर्वाना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 


🎭 Series Post

View all