रात्र वैऱ्याची...

Mansokt Vachayach Asel Tr Nakki Vacha....





हॅलो नमस्कार.... आज मी तुमच्यासमोर एक आगळीवेगळी सत्य घटना घेऊन येत आहे. जी घडली भांडुप येथे. ही घटना घडली तो काळ होता 1970 - 75 चा. 


     त्यावेळी घराघरांमध्ये ना टीव्ही होता नाही लाईट्स. ही घटना घडली होती माझ्या बाबांबरोबर. त्यांचेच शब्द मी इथे उतरवले आहेत. त्यामुळे ही कथा माझ्या नाही तर माझ्या वडिलांच्या दृष्टीने वाचावी.


माझ्या वाचक वर्गात सुद्धा असे वाचक असतील जे जुन्या काळातील अश्याच सुंदर सुंदर आठवणी जगले असतील. काही तर मी सांगितलेल्या आठवणींचे घटक असतील. म्हणून मी या कथेतील ठिकाणांची नाव सुद्धा तिच घेतलीत. 


तर सुरू करते आजचा हा प्रवास......


............





    त्यावेळेला म्हणजे फार पूर्वी ची ही जुनी गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळी पडद्यावर पिक्चर दाखवायचे. मग काय व्हायचं की मनोरंजनाची साधने नसल्याने जेव्हा असे पिक्चर्स दाखवायचे. तेव्हा गल्ली बोळातली सगळी लोकं रस्त्यावर उतरायची. 


     तेव्हा थिएटर्स सुद्धा असायचे पण त्यांची तिकिटं महाग. म्हणजे १ रू वीस पैसे स्टॉल आणि दोन रू. चाळीस पैसे बाल्कनी. तेव्हा एवढे पैसे ही खूप जास्त असायचे. अशावेळी गणपती ला किंवा दिवाळी ला थिएटर ला लागलेला पिक्चर फुकट मध्ये लोकांना लावून द्यायचे. पण रस्त्यावर...!


      तेव्हा रस्त्यावर वाहनांची एवढी ये जा नसायची. रात्रीच्या वेळी ऐसपैस जागा मिळायची. मग आपल्याला चांगली जागा भेटावी म्हणून लोक लवकर येऊन जागा अडवायचे. अशा वेळेला एक घटना घडलेली होती.


    एक मराठी चित्रपट.... समर्थ नगर हा आमचा एरिया जिथे मी राहायचो. तर समर्थ नगरला ही घटना घडली.

\" अशीच एक रात्र \"  हा मराठी चित्रपट त्यावेळेला खूप गाजला होता. अगदी हॉरर असं म्हणता येत नाही पण सस्पेन्स चित्रपट होता. हा चित्रपट समर्थ नगर , नाईकवाडी येथे रस्त्यावर दाखवला जात होता. आणि त्यावेळेला आम्ही आमच्या गल्लीतले म्हणजे कोष्टी गुंजन चाळ आणि दुखीया भैयाची चाळ अश्या दोन चाळीतील मित्र मैत्रिणी सगळे तो पिक्चर बघायला गेलो होतो.


      अशीच एक रात्र  बघण्यासाठी पिक्चर बघायला गेलो.  आमचा सगळा ग्रुप एकत्र बसला होता. त्याबरोबर नाहीच तर शे दीडशे माणसं ही होती. आम्ही म्हणजे मी माझे दहाबारा मित्र आणि पाच सहा आमच्याच चाळीतील मुली अशी वीस पंचवीस मुलं एकत्र बसलो होती. मोठी माणसेही होती. त्यावेळेला ही घटना घडलेली होती. असं घडेल असं कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.


          अजुन एक तेव्हा आता सारखी advance projector screen नव्हती. तेव्हा एखाद्या मूवी च्या रिळ असायच्या. म्हणजे एका मूवी च्या चार रीळा मग दोन रीळ झाल्यावर इंटर्वल असायचा. मग तिसरी रीळ लावायला पंधरा वीस मिनिटं लागायची. त्या वेळात बाथरुम वैगेरे उरकून यायला वेळ द्यायचे. 


      सुमारे रात्री अकरा शो होता. चित्रपटाच्या दोन रिळा दाखवून झाल्या होत्या. Interval झाला होता. आम्ही सगळे गप्पा करत होतो की आमच्या ज्या ग्रुप म्हणजे चाळीतल्या ज्या मुली होत्या त्यांना बाथरूमला जायची इच्छा झाली. या सहा सात ज्या मुली होत्या ह्या बाथरूमला म्हणून तिथून बाहेर पडल्या. 


  सार्वजनिक संडास तर चाळी च्या आत होते. आणि हॉरोर मूवी पाहून त्या मुलींची टरकली होती. म्हणून मग त्यांनी आत सार्वजनिक शौचालयात न जाता आत गल्लीत घुसल्या. 


      गल्ल्यांमध्ये उघडी गटार होती. त्या तिथेच गेल्या. या सहा ही जणी दुखीया भैया ची चाळ या चाळीमध्ये राहणाऱ्या होत्या. गल्लीमध्ये गेल्या तेव्हा तर त्यांना अजूनच भीती वाटू लागली होती. कारण गल्लीत घुप्प काळोख...! गल्ली च्या एका कोपऱ्यात एक मिणमिणता बल्प होता. बाकी सगळीकडे अंधार. त्या इवल्याशा प्रकाशात तर गल्ली अजूनच भयानक दिसू लागली होती. 


      त्या सहा ही जणी जीव मुठीत धरून आत प्रवेश करत्या झाल्या. अचानक सगळ्यांच्या असं लक्षात आलं की सफेद साडी नेसलेली बुटकी बाई त्यांना पाठमोरी उभी आहे. तो मूवी पाहून आधीच त्या मुलींच्या मनावर भीतीचं दडपण आलेलं त्यात समोरचा प्रकार पाहून तर त्यांची भीतीने गाळण उडालेली. त्या बुटक्या बाई ला बघितल्या बरोबर लगेच त्या मुलींनी अक्षरशः ओरड ठोकून दिली. 


    त्यांची आरडाओरड ऐकून अचानक एकाएकी ती बुटकी बाई चांगलीच सहासात फुटाची बाई झाली. एवढी उंच की तिचं डोकं चाळीच्या छापराच्या ही वर गेलं. ते पाहून तर त्या मुलींची सिट्टी पिट्टी गुल झाली. एवढ्या भयानक प्रकारा नंतर तर त्या मुलींनी तिथून धूम ठोकली आणि त्या रोडच्या दिशेने पळत सुटल्या.


       बाहेर जे आम्ही पिक्चर बघायला बसलो. जेव्हा त्या मुलींची ओरड ऐकू आली तेव्हा सगळे त्यांच्या दिशेने धावू लागली. तिथले जे आयोजक होते जे कोण पुढारी होते ते सगळे एकत्र आले आणि त्या गल्लीमध्ये जाऊन पाहायला लागले.


    त्या मुलींनी घाबरून घडला प्रकार त्या नेते मंडळींच्या कानावर घातला. जिथे त्या बाई ला पाहिलं होतं तो स्पॉट नेऊन दाखवला. सगळ्यांनी पाहिलं तर तिथे काहीच नव्हतं. सगळीकडे किर्र शांतता होती. ते पाहून ती नेते मंडळी आता त्या पोरींना ओरडू लागली. असं एवढ्या रात्री ओरडत पळाल्या म्हणून चांगलीच फायरींग दिली त्या मुलींना 


      पण त्या पोरी ठामपणे सांगत होत्या की त्यांनी इथेच ती बाई पाहिलेली आहे. ती बाई बुटकी होती आणि अचानक ती लंबू झाली. तिथे काहीच नाही हे पाहून त्या मुलींना ओरडून सगळे लोक पुन्हा त्या रोडला आले. म्हणजे तिथे, जिथे चित्रपट चालू होता. तिथे येऊन बसलो.


          त्या रात्र आम्ही सगळे लोक हसण्यामध्ये आणि काय घडलं असेल..? कसं घडलं असेल...? याचे अंदाज लावत होतो. झाल्या प्रकारानंतर पुन्हा मूवी बघण्यात कोणालाच रस राहिला नव्हता. चित्रपटाकडे कोणाचाही लक्ष नव्हता. आम्ही मुलं त्या मुलींना चिडवत होतो. तर त्या त्यांनी जे पाहिलं ते खर होतं हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होत्या. ती रात्र आम्ही मस्ती मस्करी करत घालवली. आम्ही सगळे लोकं पिक्चर बघून घरी निघून गेलो.


        ही झाली रात्रीची गोष्ट. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गल्लीमध्ये सगळीकडे एकच चर्चा होती. चर्चेमध्ये एकच विषय काल रात्री आपल्या चाळीत बुटक्या बाई च भूत बघितलं गेलं.


    गल्लीत सगळ्या बायका ज्यांच्या त्यांच्या दारासमोर कपडे धुत होत्या. तेव्हा दरवाज्यासमोर च नळ असायचा मग सगळ्या बायका कपडे भांडी तिथेच करायच्या. आणि सगळ्यांच्या खोल्या एकमेकांना लागूनच असल्याने सगळ्या बायकांना गप्पा मारायला ही भेटायच्या.


     त्याच गल्लीत एक भय्या रहायचा. दूध वाला भय्या. त्याची बायको ही कपडे धुवत होती आणि तिच्या कानावर ही गोष्ट पडली. तिने एकदा त्या बायकांना पाहिलं आणि नंतर कपडे धुता धुताच ती मोठमोठ्याने हसू लागली. ती असं अचानक हसताना पाहून बाकीच्या बायका तिच्या कडे विचित्र नजरेने पाहू लागल्या. 


   " या भाभी च्या अंगात ती रात्रीची बुटकी बाई तर नाही ना घुसली...?"  कारण ती घटना त्यांच्या गल्लीत पण जरा पुढे घडली होती. त्यामुळे त्या घाबरून त्या भाभी ला पाहत होत्या.


     भाभी ने सगळ्यांचे रंग उडालेले चेहरे पाहिलं व आपल्या हसू ला कसबसं थांबवलं. 


" अशा पाहू नका मला... त्या बुटक्या बाईचं भूत नाही घुसलं माझ्यात. काल रात्री आमच्या यांना बाथरुम ला झालेली. आमच्या छोट्याश्या मोरीत घाण वास येतो म्हणून मी त्यांना बडबडत होते तर रात्री ते बाहेर गेलेले. ते बाहेर गेले आणि अचानक मला मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. काय झालं म्हणून मी बघायला जाणार तर हेच घाबरून आत आले. मी विचारलं तर म्हणाले की लघवीला म्हणून थोडा पुढे गेलो होतो. जिथे गटार उघडं आहे तिथे... हे उंच आहेत तुम्हाला तर माहीतच आहे ना... म्हणून मग ते खाली बसले होते की अचानक त्यांना मुलींच्या बोलण्याचा आवाज आला. त्यांना वाटलं की जातील निघून पण त्या मुली त्याच दिशेने येत होत्या. ते पाहून आमचे हे घाबरून उभे राहिले. हातातलं धोतर खाली सोडलं. पण त्यांना पाहून त्या मुली ओरडतच तिथून पळून गेल्या. आणि हे घाबरून पळत रूम मध्ये निघून आले." आपलं बोलणं संपवून भाभी पुन्हा हसू लागली.


भाभी च स्पष्टीकरण ऐकून तर तिथल्या सगळ्याच बायका हसू लागल्या.  


म्हणजे घडलं असं की.... या चाळीतला भैय्या हा बाहेर लघवीला बसला होता. पण पोरींना त्याच दिशेने येताना पाहून तो घाबरला. आणि ताडकन उठून उभा राहिला. ते पाहून त्या मुली घाबरल्या. आणि तिथून पळून गेल्या. त्याला पांढरे धोतर आणि पांढरी बॉडी घालायची सवय असल्यामुळे बघणाऱ्या त्या अर्धवट मुलींना त्याने साडी नेसलेली आहे असच वाटलं. जेव्हा तो खाली बसलेला तेव्हा बुटकी बाई असं वाटलं आणि जेव्हा तो उठून उभा राहिला तेव्हा पांढरी साडी नेसलेली बुटकी बाई अचानक उंच झाली हा गैरसमज पोरींमध्ये झाला आणि त्या तिथून पळून गेल्या. 



अशा रिती ने " अशीच एक रात्र " या मूवी ने आमच्या आयुष्यातील रात्रीला ही एक सुंदर अनुभव दिला.




समाप्त.....



अनुभव :- श्री. सुनील पिरणकर

लेखक :- कु. ज्योती सुनील पिरणकर